Articles

लोकशाही देशांना बांगलादेशने दिलेले धडे – डॉ. अमोल अन्नदाते

By Admin

August 18, 2024

लोकशाही देशांना बांगलादेशने दिलेले धडे

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

डॉ. अमोल अन्नदाते

बांगलादेशात शेख हसीनांची राजवट उलथवून त्यांना तेथील विद्यार्थ्यांनी देश सोडून जाण्यास भाग पाडले. लोकशाही टिकवण्यासाठी तिचे यशस्वी प्रारूप जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच महत्त्व त्या लोकशाहीत होणाऱ्या चुकांमधून शिकण्यालाही असते. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणादरम्यान वॉर्डमध्ये एखादा मृत्यू होतो, तेव्हा संबंधित सर्व डॉक्टर एक मॉर्टेलिटी मीटिंग घेतात आणि त्या रुग्णावरील उपचाराबाबत काय चुकले, याचा शोध घेतात. बांगलादेशसारख्या विकासाच्या वाटेवर अग्रेसर झालेल्या देशात अराजक माजते, तेव्हा तो विषय त्या देशासाठी तर अधिक गंभीर असतोच; शिवाय भारतासारख्या शेजारच्या लोकशाही देशातील नागरिकांनाही सजग करणारा ठरतो.

बांगलादेशात आर्थिक विकास की लोकशाही महत्त्वाची? या स्वरूपाचा वाद पुढे आला, तेव्हा लोकांनी स्वातंत्र्य अबाधित राखण्याला आणि हुकूमशाही राजवट धुडकावण्याला प्राधान्य दिले. शेख हसीनांच्या काळात या देशाने आर्थिक विकास दर आणि आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. जगभर प्रसिद्ध असलेले तयार कपड्यांचे मोठे उद्योग उभारण्याला चालना दिली. त्या जोरावर सन २००० पासून विकास दर ६.५ % एवढा राहिला. फारशी संसाधने उपलब्ध नसूनही बांगलादेशचे दरडोई उत्पन्न हे जवळपास भारताएवढे म्हणजे २६०० रूपये इतके आहे. पण, विकास लोकशाहीशी खेळून, ती खिळखिळी करण्याची सूट देऊ शकत नाही. एकवेळ विकासासाठी आम्ही थोडी वाट पाहू, पण लोकशाही हातातून गेली तर ती परत आणण्यासाठी कित्येक पिढ्यांना नव्याने अनिश्चित काळापर्यंत लढा देण्याची वेळ येऊ शकते, ही धारणाही समजून घ्यायला हवी.

एकूणच कोणत्याही लोकशाही देशातील जनतेने तिथल्या सत्ताधाऱ्यांना, ‘आधी लोकशाही मग बाकी सगळे, हा आमचा प्राधान्यक्रम आहे,’ याची आठवण करून देत राहिले पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा असे ऐकायला येते की, आपला देश आणि जनता लोकशाहीला पात्र नाही, झटपट विकासासाठी एखादा हुकूमशहाच असला पाहिजे. हिटलरच्या राजवटीतही जर्मनीने बऱ्याच आघाड्यांवर विकास केला. फोक्सवॅगन हे हिटलरच्याच काळातील, एक्स्प्रेस वे म्हणजे मोठे महामार्ग या संकल्पनेचा जनकही हिटलरच. पण, त्याचे कौतुक करून चालणार नाही, कारण हिटलरच्या हुकूमशाही वृत्तीनेच त्या देशाचा घास घेतला. नंतरच्या काळातील सद्दाम हुसेन, गदाफी अशा अनेक हुकूमशहांची उदाहरणे देता येतील.

बांगलादेशातील असंतोषातून भारतीय लोकशाहीच्या पोटात दडलेल्या एका मोठ्या समस्येच्या हाका ऐकाव्या लागतील. बांगलादेशात १९७१ च्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना आरक्षण देण्याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शेवटी त्यांनी थेट हसीनांच्या शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला. याचे कारण, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि तयार कपड्यांच्या उद्योगात या वर्गाला रोजगार मान्य नव्हते. म्हणून नगण्य प्रमाणात असलेल्या शासकीय नोकऱ्यांवरून आणि त्यातील आरक्षणावरून देशात अराजक माजले. भारतातील विद्यार्थ्यांचीही बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. देशाच्या अर्थकारणाचा आधार असलेल्या कृषी क्षेत्रापासून हा वर्ग लांब गेला आहे आणि तो शासकीय नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत बसून आहे. शासनाला प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही. खासगी क्षेत्रात आपापल्या गुणवत्तेनुसार कामाला लागा, हा संदेश तरुणांमध्ये जाणे आणि त्यासाठी खासगी व्यवसायांना आपलेच समजून उचलून धरणे, या गोष्टी भविष्यातील असंतोष टाळण्याच्या व लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत.

शेख हसीनांच्या काळात विकास होत असला, तरी निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाहीत. अलीकडच्या निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. निवडणुकीचे पावित्र्य जपण्याला, त्यात जराही कुचराई सहन न करण्याला देशातील नागरिकांचे सर्वोच्च प्राधान्याचे असले पाहिजे. ‘झीरो टॉलरन्स’ म्हणजे मुळीच सहन केले जाणार नाही, अशा विषयांच्या यादीत स्वच्छ निवडणूक प्रक्रियेला नागरिकांना नेहमी वरचे स्थान द्यायला हवे.

बांगलादेशात विद्यार्थ्यांनी केवळ शेख हसीनाच नव्हे, तर मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्यासोबत इतर अनेक न्यायाधीशांना राजीनामा देण्यास भाग पाडले. म्हणजेच, न्यायप्रक्रिया हे लोकशाही वाचवण्याचे मोठे आयुध आहे आणि ते सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात जाताना दिसले, तर ती धोक्याची घंटा आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. शेख हसीनांच्या मुख्य विरोधक आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना नजरकैदेत ठेवले होते. विरोधकांचा आवाज न दडपणे, हे लोकशाहीतील महत्त्वाचे तत्त्व आहे. ते कधीही पायदळी तुडवता कामा नये, हेही बांगलादेशातील असंतोषातून शिकण्यासारखे आहे.

आज जगातील केवळ २० टक्के जनता खऱ्या अर्थाने स्वतंत्र मानली जाते. भारत हा त्यापैकी एक देश आहे. बहुमताला एक खासदार कमी असल्याने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पडले, तेव्हा त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात खूप महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले होते… सरकारें आएंगी, जाएंगी.. पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी.. मगर ये देश रहना चाहिए। बांगलादेशातील असंतोषातून भारतासारख्या सगळ्याच लोकशाही देशांना हाच धडा नव्याने मिळाला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551