Articles

लोकशाही, निवडणूका अन् राजकारण समजून घेताना …- डाॅ. अमोल अन्नदाते

By Admin

February 25, 2024

दै. दिव्य मराठी रसिक

लोकशाही, निवडणूका अन् राजकारण समजून घेताना …

डाॅ. अमोल अन्नदाते

भारताच्या इतिहासातील अनेक राजांनी राजकारण आणि कल्याणकारी राज्य चालवण्याची आदर्श तत्वे मांडली. स्वातंत्र्यापुर्वीचे राजकारण स्वाभाविकपणे स्वातंत्र्यलढया भोवती फिरत होते त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याला या राजकारणाचा स्पर्श होता व त्यात त्याचा सहभाग होता. पुढे स्वतंत्र्यानंतर जस जशा गरजा पूर्ण होत गेल्या तस तशी राजकारणाची व लोकशाही प्रक्रियेत सामील होण्याची व्याख्या बदलत गेली. आता तर ती ३६० अंशात इतकी बदलली कि बहुतांश राजकारणाचा अर्थ केवळ काही तरी उद्दिष्ट ठरवणे , त्या भोवती व्यूहरचना करणे व सत्तेचे एखादे पद मिळवणे एवढ्यावरच येऊन ठेपली आहे. थोडक्यात निवडणुका लढवणे एवढे आणि एवढेच राजकाराण.कोणी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला कि राजकारणात प्रवेश असा एक शब्द वापरला जातो. रूढार्थाने तो खरा असला तरी जर तुम्ही या देशाचे नागरिक असाल तर तुम्ही प्रत्येक जण राजकारणाच्या परिघात आहात हे समजून घेणे गरजेचे आहे. तसेच लोकशाही प्रक्रियेचे ही आहे. लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणे एवढे मर्यादित कर्तव्य नाही. सत्ताकारण हा राजकारणाचा व मतदान हा लोकशाही प्रक्रियेतील महत्वाचा भाग असला तरी ते आणि तेच सर्व काही असे नाही. ती साधने असू शकतात पण साध्य मात्र निश्चितच नाहीत.

आपण दैनंदिन जीवनात जसे वागण्या बोलण्याचे काही शिष्टाचार, सामाजिक संकेत पाळतो व त्यातून आपण कुठल्या स्वभावाचे , कशा प्रकारे वागणारे व्यक्ती आहोत हे कळते. त्याच धर्तीवर आपण लोकशाही संदर्भात व आपल्याला कोण सत्तास्थानी हवे आहे हे ठरवणारे मतदानाचा निर्णय घ्यायला भाग पाडणारी एक वागणूक आहे. याला इलेक्टोरल बेहीवीयर व डेमोक्रॅटिक बेहीवियर असे म्हणता येईल . जशा बर्याच गोष्टी अनुवांशिक व वारशाने आपल्याला मिळतात तसे हे विचार आपल्याला आपल्या जनुकांमधून मिळत नाही. आपण कुठल्या घरात जन्माला येतो याचा त्यावर प्रभाव असला तरी व्यक्ती म्हणून आपल्या वाट्याला येणारा संघर्ष ,रोज येणारे अनुभव व मिळणारे शैक्षणिक, सांस्कृतिक , समाजिक, वैचारिक उत्तेजना यावरून आपली लोकशाहीला पोषक वागणूक तयार होते. म्हणूनच जेव्हा जेव्हा सत्ता उलथवण्यासाठी परकीय शक्ती आल्या तेव्हा त्यांनी आधी राजाला नाही तर त्या देशातील विद्यापीठे , संस्कृती व वैचारिक नेतृत्व संपवले.

आज भारतीय लोकशाही मध्ये सर्व सामान्य नागरिकांमध्ये या गोष्टींचे अप्रूप वाटणे कमी झाले आहे. राजकीय सभां मधील रॉक शो सदृश शक्ती प्रदर्शन म्हणजेच सर्व काही व आपले भवितव्य घडवणाऱ्या विचारांचा एकमेव स्त्रोत असा गैरसमाज झाल्याने ‘लाखांच्या सभा’ हे ग्लॅमर काही संपता संपेना. त्यामुळे एके काळी गावो गावी व त्यातच ग्रामीण भागात व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व गर्दी आटणे ही नागरिकांची वैचारिक प्रक्रियेत सहभागी होण्याची उदासीनता दर्शवणारी आहे. काळाच्या ओघात गरज नसलेल्या गोष्टी आपोआप नामशेष होतात व त्या नामशेष झाल्या बद्दल रडगाणे गात नॉस्टेलजियात जगण्यात अर्थ नसतो. पण काळजी तेव्हा असते जेव्हा वैचारिक जडणघडण करणाऱ्या गोष्टी या इतर इव्हेंट्स व कल्पनांनी ठरवून त्यांची आदला बदल केली जाते.म्हणजे विचार प्रवर्तक , शैक्षणिक, विकासाभिमुख विचारां ऐवजी केवळ कुठल्या ही स्वरूपाची अस्मिता जागी करणारे इव्हेंट्स हे मोठ्या प्रमाणावर आज समाजात सगळ्यांकडूनच रुजवले जात आहेत. मग ती अस्मिता कशाची ही असो पण ती अशा प्रकारे बनवली जाते आहे जेणेकरून वेगवेगळे समूह हे कुठल्या प्रगती व आधुनिक विचाराच्या नव्हे तर त्या अस्मितेच्या अमला खाली राहतील . व त्यांचे लोकशाहीतील वागणूक ही पूर्णपणे त्या अस्मितेभोवती फिरत राहील. अस्मिता असाव्या पण त्या एवढ्या टोकदार ही नको कि लोकशाही साठी योग्य अयोग्येतेचा सारासार विचार करण्याची शक्तीच खुंटेल. हे भान देणारे वैचारिक स्त्रोत जगवणे व ते आपलेसे करणे हा निवडणुका , राजकारणा एवढेच महत्वाचे आहे.

डॉ. अमोल अन्नदातेDramolaannadate@gmail.com9421516551