करोना व्हायरस: घाबरण्याचे कारण नाही!

चीन मध्ये करोना व्हायरस च्या साथीचे थैमान सुरु असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँन्डेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा करोना व्हायरस चे संकट रोखण्यासाठी आणी ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न करोना व्हायरस च्या निमित्ताने पडत आहेत.

        सध्या जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरस ला जागतिक साथ म्हणून घोषित केलेले नाही. पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत – चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणी आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीन मधून भारतात येणार्या प्रत्येक नागरिकाची अंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान व सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे अढळलयास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होई पर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करात ही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महीन्यात चीन ला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांची ही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे. नवी साथ दाखल होते तेव्हा सगळ्यात महत्वाचे असते देशातील पहील्या काही केसेस ओळखणे आणी त्यांना वेगळे ठेऊन त्यांचे उपचार करणे. पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे.  साथ अजून दाखल झालेली नाही पण ती झालीच तर या पहील्या केसेस च्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला तेव्हा २००७ साली ही माहीती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये हा हेतू असला तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.

करोना व्हायरस

  या साठीची तुलना २००३ च्या  सार्सशी केली जाते आहे पण हा त्या इतका घातक नक्कीच नाही.  सर्वसामन्यांनी लगेचच करोना व्हायरस ला घाबरण्याची गरज नाही. पण चीनला प्रवास झाला असल्यास व श्वसनाची कुठलीही तक्रार असल्यास तपासणी करून घ्यायला हवी. तसेच चीन ला प्रवास ही टाळायला हवा. ताप , खोकला आणी श्वास घेण्यास त्रास ही करोना ची प्रमुख लक्षणे आहेत. न्युमोनिया व किडनी फेल्यर हे कोम्लीकेशन्स होऊ शकतात. पण साधा सर्दी खोकला झाला तरी करोना असेल म्हणून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा आजार टाळण्यासाठी मानवा कडून मानवाला होणाऱ्या श्वसन मार्गाच्या आजराला जी काळजी घ्यावी लागते तीच घ्यायची आहे. यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर व जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे , शिंक आल्यावर किव्हा खोकताना तोंड , नाक, झाकणे , सर्दी , खोकला असलेल्यांनी इतरां पासून लांब राहणे आणी प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे. पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली तरी करायच्याच आहेत. साथ ही चीन मधून इतर देशात पसरत असताना  शक्यतो मांसाहारी , त्यातच न शिजवलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे , प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.  तसेच आरोग्य विभागाची या साथीवर उपाय योजना  म्हणजे केवळ या साध्या प्रतिबंधक उपायांच्या भव्य जाहीराती व होर्डींग, असे असू नये.  त्या ऐवजी केसेसचे निदान, त्यांचे आयसोलेशन व उपचार याची यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा. हा आजार व्हायरल असल्याने तो अपोआप बरा होणारा आहे.  त्यावर इतर व्हायरल आजारांसारखे निश्चित असे काही उपचार नाहीत. करोना व्हायरस वर उपचारच नाहीत असे भीतीदायक वृत्त ही येत आहेत. पण याचा अर्थ हा अपोआप बरा होणारा आहे. सध्या चीन मध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे पण भारतात हे किती असेल हे सध्या सांगता येणे कठीण आहे.  पण अशा कुठल्याही व्हायरल आजारात काही काळा नंतर मानवा मध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे समुहाची प्रतिकार शक्ती निर्माण होते. व साथ हळूहळू ओसरू लागते. म्हणून उद्या ही साथ आलीच व करोना व्हायरस ची लागण झालीच तर आपला मृत्यू निश्चित आहे अशा भीतीत मुळीच राहू नये. आपली प्रतिकारशक्ती हेच अशा साथी मध्ये सगळ्यात मोठे हत्यार असते. व त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व चांगली जीवनशैली हेच उत्तर आहे. करोना व्हायरस साठी स्वाइन फ्लू प्रमाणे कुठली ही गोळी किव्हा लस उपलब्ध नाही. तसेच फ्लू ची लस घेऊन करोना व्हायरस पासून संरक्षण मिळू शकते असा अपप्रचार ही सुरु झाला पण यात काही तथ्य नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 अशा साथीत मास्कच्या वापराचा खूप अतिरेक होतो. मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे तर आपल्याकडून इतरांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून केला जातो. करोना व्हायरस चा निश्चित किंवा संशयित रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतूसंसर्ग होणार असेल तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो. करोना व्हायरस सारख्या साथी म्हणजे घाबरलेल्या सर्वसामन्यांच्या फसवणुकीसाठी अनेकांना एक संधी असते. अमुक साबण वापरा, अमुक औषध घेऊन करोना ची शक्यता टाळा, समाज माध्यमांवरील घरगुती उपायांचे वायरल होणारे सल्ले या पासून सगळ्यांनी दूर राहायला हवे.

आरोग्य यंत्रणेची सज्जता आणी सर्वसामान्यांनी न घाबरता, माहीती घेऊन सतर्क राहणे व आजाराचे मास हीस्टेरियात रुपांतर न होऊ देणे एवढेच या वेळी करोना व्हायरस विषयी गरजेचे आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *