दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी
लोकशाहीचे वाहक कोण ? – चेहरे, पक्ष की विचार..?
डाॅ. अमोल अन्नदाते
रहनुमाओं की अदाओं पे फिदा ही दुनिया, इस बेहकती हुई दुनिया को संभालो यारो… कवी दुष्यंतकुमार यांच्या या ओळींची प्रचीती भारतीय लोकशाही अनेक वर्षे घेत आहे. तारणहारांच्या आणि मसिहांच्या दिखाऊ गुण आणि लकबी वर जग भुलत चालले आहे, या भ्रमित जगाला सावरण्याची गरज आहे. एस दुष्यंतकुमारांना सुचवायचे आहे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्तविकेची सुरुवातच मुळात ‘वी द पिपल आँफ इंडिया’ अर्थात ‘ आम्ही भारताचे लोक’ अशी होते. पण गेल्या दोन दशकात लोक हे केंद्रस्थानी नसून नेत्यांचे मोठे कल्ट ब्रँन्ड्स यांच्या भोवती भारतीय लोकशाही फिरते आहे. मुळात कल्ट ब्रँन्ड् ही कॉर्पोरेट संकल्पना पण राजकारणात ती जाणीवपूर्वक अंगिकारली गेली.
कल्ट ब्रँन्ड् म्हणजे जाणीवपूर्वक एखादा चेहरा व त्या भोवतीचे समज तयार करणे व त्यासाठी प्रश्न उपस्थित होणार नाहीत व तर्कशक्ती , विचारशक्ती आव्हान देणार नाही अशी निष्ठा निर्माण करायची. रजनीकांत , अमिताभ बच्चन , सलमान खान हे चित्रपट सृष्टीतील कल्ट ब्रँन्ड्स. त्यांचे चित्रपट कसे ही असले तरी त्यांचा म्हणून एक प्रेक्षक वर्ग तयार असतो जो काहीही झाले तरी त्यांचा चित्रपट पाहतोच. राजकारण ही आता धडाकेबाज हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटा प्रमाणेच सुरु असते ज्यात एक मसीहा तुमचा तारणहार म्हणून प्रोजेक्ट केला जातो. तुम्हाला रीतसर त्याच्या चेहऱ्याच्या , लकबीच्या प्रेमात पाडले जाते . त्याच्या नावाचा जयघोष तुमच्या कडून करून घेतला जातो व त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली ही वदवून घेतली जाते. व मग तो कितीही चुकला तरी तुमचे हात दगडा खाली असतात. तुम्ही त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिल्यामुळे त्याची चूक कशी बरोबर हे तुम्ही आधी स्वतःला व मग इतरांना समजावून सांगत राहता.
या मुळे भारतीय लोकशाही समोर एक मोठे आव्हान गेल्या दशकात उभे राहिले आहे. ते म्हणजे लोकसभा निवडणुकीचे स्वरूप अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसारखे झाले आहे. आता दोन पक्ष किंवा विचार किंवा एका विचाराचे समूह निवडणूक लढत नाहीत तर दोन चेहरे निवडणूक लढतात. चेहरे लढत असताना तीन चार – पाच चेहरे ही नसतात. नेता व त्याच्या क्षमता गरजेच्या असतातच . तो किती सक्षम हे ही वेळोवेळी बघितले जायला हवे पण नेत्याची छबी ही ‘लार्जर दॅन लाईफ’ असायला हवी व त्याच्या व्यक्तीमत्वात करिश्मा असायला हवा हा विचार प्रवाह लोकशाही मध्ये रुजणे घातक आहे. आज वर भारतात अत्यंत साध्या भासणार्या व्यक्तीमत्वांनी , कुठला ही करिश्मा नसणाऱ्या चेहऱ्यांना सत्तास्थानी आल्यावर असामान्य कार्य केल्याची उदाहरणे आहेत.
प्रदेशातील अनेक लोकशाही राष्ट्रांकडे पहिले तर लक्षात येते कि तिथे सत्तास्थानी असणार्यांकडे देशातील इतर लोक जसे काम करतात तसेच एक काम करणारे असे बघितले जाते. त्यामुळे राजकीय व्यक्ती, सत्तास्थानी असलेल्यां भोवती भारतात आहे तसे ग्लॅमर उभे राहत नाही. म्हणून तिथे चेहर्या पेक्षा काम महत्वाचे ठरते. राजकारण व सत्तास्थानी असलेले व्यक्ती कोणी तरी वेगळे व विशेष आहेत व सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहेत ही भावना जनतेतून जो पर्यंत जात नाही तो पर्यंत आपला चेहरा व पदा भोवतीचे ग्लॅमर याचे महत्व राजशकट चालवणाऱ्यांच्या मनातून जाणार नाही. भारतीय जनतेने हजारो वर्षे राजसत्ता अनुभवली आहे. त्यामुळे लोकशाही व लोकांचे राज्य येऊन कित्येक दशके उलटून गेली तरी लोकांच्या मनातून ‘राजा’ ही संकल्पना काही केल्या जात नाही. स्वतंत्र भारतात अनेक राजांनी त्यांची गादी सोडून भारतीय लोकशाहीत विलीन झाले. ज्या काश्मीरच्या राजा हरी सिंग यांच्या वरून आज ही वादंग होते त्यांचे चिरंजीव माजी मंत्री करण सिंग यांनी तर त्यांच्या कडे वारसा हक्काने आलेल्या स्थावर जंगम मालमत्ते पासून ही स्वतःला लांब ठेवले. पण भारतीय जनतेच्या मनातून काही सत्तास्थानी बसलेले आपण बसवले आहेत व ‘राजे’ ते नसून आपण आहोत ही भावना काही पुसली गेली नाही. राज घराण्याच्या कित्येक पिढ्या आज ही फारसे कर्तुत्व नसताना निवडणून येत आहेत. या मागची चेहरे , नाव यांना अवास्तव महत्व देण्याची भारतीय मानसिकता. मानवी चेहरा मर्त्य असतो पण देश व लोकशाही आमर असते. ज्या विचारावर देश व लोकशाही पुढे जाते तो विचार अमर असतो. म्हणून चेहरा नव्हे तर विचार व त्यावर चालणारे पक्ष हेच भारतीय जनते साठी सदा सर्वकाळ महत्वाचे ठरायला हवे.
डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551