नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातीवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का , यावर अजून चौकशी सुरु आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
जर डॉ. पायल तडवी च्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरु असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे टाकणार नाहीत याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्या वरून उभी फुट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रा सारख्या थेट जगण्या मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकरे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्का साठी लढा यातून कधी नव्हे ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते. आरक्षण हवे नको हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत , आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवी सारख्या तरूण डॉक्टरचा जीव जातो तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मा पलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये. तसेच कुठला ही बदल आणताना तो अचानक आणला तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडा ही शासनाने यातून घ्यायला हवा.
या पलीकडे जाऊन या घटने मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कांगोरे ही तपासून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येत जाती चा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला तरी तिच्यावरील ताण ही नाकारला जाऊ शकत नाही. तसेच काहीही कारण असले तरी सोबत काम करणार्या कनिष्ठ , वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले हा सगळ्या कारणां पलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक , शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दर वर्षी केईम, सायन, नायर येथील तीन – चार निवासी डॉक्टरांना टी.बी चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दर वर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणा पायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधून मधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सिनियर – ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी ही भावना असली तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातीवाचक शेरे म्हणा, किव्हा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायल सारख्या निरागस डॉक्टरच्या अत्म्हत्यातून कधीतरी समाजा पुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्या मोठ्या डिग्रीची रांग नवा मागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे तर चांगला संवेदनशील माणूस व समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्व ही तयार करायचे आहे हे वूसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे , मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन ही करावे लागणार आहे. तसेच काही ही झाले तरी समोर आलेल्या आपल्या कनिष्ठ – वरिष्ठ, जात – धर्म हे भेदभाव सोडून आपल्या सहकारी डॉक्टरशी प्रेमाने व सह –वेदनेची ( एमपथी ) भावना ठेवून वागण्याचे धडे गिरवावे लागणार आहेत. आपल्या सहकार्यासाठी माणुसकीची भावना हीच रूग्णा साठी प्रेमाची आणी पुढे आपल्या व्यक्तिगत, व्यवसायिक यशाची पहिली पायरी आहे.
आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत डॉ. पायल तडवी सारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच नव्हे तर समाजाचा या क्षेत्रा विषयीचा दृष्टीकोन हि पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचार पूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे. तसेच या वर केवळ तात्पुरत्या मलम पट्ट्या नव्हे तर याच्या मुलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता मानसिक दृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायल च्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे .
सदरील लेख ३० मे, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
डॉ.अमोल अन्नदाते | www.amolannadate.comreachme@amolannadate.com