पंढरपूर मध्ये जंगी प्रचारसभा झाल्यावर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तेथील सभा ऐकून नेत्यांच्या भाषणात टाळ्या शिट्या वाजवणारी सर्व सामान्य जनता, सध्या मोठ्या प्रमाणावर ‘कोरोना संसर्गि’त होऊन रूग्णालयात बेड शोधत फिरते आहे. त्यांचे नातेवाईक रेमडिसीवीर साठी छाती फुटेस्तोवर भटकंती करत आहेत. हीच स्थिती पश्चिम बंगाल मध्येही आहे , तिथले आकडे अजून पुरेसे बाहेर येताना दिसत नाहीत. मात्र तिथेही आतली खरी स्थिती कळल्यावर निवडणूक आयोगाने काही निर्बंध लादले. या प्रचारसभा सुरु असताना राज्यात व देशात अनेक ठिकाणी ‘कडक निर्बंध’ अशी एक नवीन संज्ञा निर्माण केली गेली. मुंबईत मुख्यमंत्र्यांचे ‘कडक निर्बंध’ वाले फेसबुक लाईव्ह सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे नेते जाहीर कार्यक्रम , उद्घाटने यांचे फेसबुक लाईव्ह करत होते. मुख्यमंत्री इकडे कडक निर्बंध जाहीर करतात , दुसरीकडे एका सत्ताधारी मुख्य असे मंत्री सांगतात – “ त्या ठिकाणी निवडणूक आहे तिथे नियम सैल असायला हवे “. पश्चिम बंगालमध्ये मास्क शिवाय काढलेल्या रॅली विषयी भाजपचे एक राष्ट्रीय नेते म्हणाले कि ‘आम्हाला वाटत नाही रॅली मुळे संसर्ग वाढला आहे’. परत एकमेकांकडे बोट दाखवत ते शेण खाताय आम्हीही खाऊ म्हणत हात झटकायला मोकळे. प्रचार सभा गाजवताना प्रेतांसाठी स्मशानभूमी कमी पडते आहे याचे कोणाला ही भान राहिले नाही. सर्वच पक्षांचे नेते दुसऱ्या लाटेत असा प्रचार करत होते की जणू काही कोरोनाने निवडणूक आयोगाला निवेदन देऊन ‘आम्ही या भागात जाणार नाही’ असे जाहीर केले आहे.
हातावर पोट असलेला फेरीवाला , चहाची टपरी चालवणारे, शेतकरी यांना मात्र, कोरोनाचे कारण दाखवून औषध , बेड शिवाय घरात उपाशी बसवणारे ‘जीआर’ मात्र रोज काढले जात होते. लोकांच्या बेशिस्तीचे समर्थन करता येणार नाही, पण दुसऱ्या लाटेत हजारांच्या सभा भरवणारे हेच नेते सांगणार – काय करणार, जनता बेजबाबदारपणे वागत असल्यावर लॉकडाउन लावावाच लागणार. चुकून नेत्यांना त्यांच्याच सभा वगैरे घेण्याबदल प्रश्न विचारले की ‘तुम्हाला एवढंच दिसत का? ’ म्हणून चिडायचं किंवा ‘आम्ही कुठे बोलावलंय लोकांना, ते स्वतःच आले.’ सर्वसामान्य जनता एवढे होऊनही सभांना गर्दी करतच होती. आपण कोरोनाच्या गर्दीच्या सापळ्यात अडकून मरणार आहोत ही साधी गोष्टही न कळणारे सर्वसामान्य परत कोरोनाने गेलेल्यांच्या श्रद्धांजलीच्या बोर्डावर याच नेत्यांचे फोटो टाकतात. दुसरी लाट सुरु झाली तेव्हा पंढरपूर आणि पश्चिम बंगाल दोन्ही निवडणुकीचे प्रचार वेगळ्या पद्धतीने होतील असे वाटले होते. पण कोण जास्त थोर – मूर्ख बनवणारे की मुर्खात निघणारे, असे सगळीकडे चित्र होते. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या या नेत्यांचा मोठेपणा नेमका कोणत्या खात्यात लिहायचा तेच कळत नाही. आवडत्या लोकनेत्यांनी एकमेकांना दिलेली टोपणनावे, शिव्या मतदार इतके गर्दी करून ऐकत होते की या शिव्यांच्या दर्जावरच जणू काही कोणाला निवडून द्यायचे हे ते ठरवणार आहेत. हा प्रचाराचा मनोरंजनाचा खेळ चघळत असताना, हेच कार्यकर्ते किंवा मतदार आजारी पडल्यावर जेंव्हा त्यांना बेड मिळणार नाही तेव्हा या लोकनेत्याच्या घरी गेले तर या नेत्यांच्या बंगल्यावरची कुत्री त्यांना आतमध्ये तरी शिरू देईल का? हा साधा प्रश्न ही या सर्व सामान्य जनतेच्या मनात येत नाही.
पंढरपूर , बंगाल मध्ये जे झाले ते उद्या आपल्या गावातही होऊ शकते. आपल्या गावात कोरोना नको असेल तर आधी एक करा – आमच्या गावात एक वर्षभर कोरोनाचा एकही रुग्ण सापडत नाही व गावात प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळत नाही तो पर्यंत एकही सभा घेण्यास परवानगी नाही, असे फलक गावात वेशीवर लावा. असे करायचे नसेल तर ही दुसरी लाट इतकी भयानक आहे की गावात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चे किती बोर्ड्स तयार ठेवावे लागतील याचा हिशोब करत बसा.
- डॉ. अमोल अन्नदाते