नर्स: नमस्कार मी जीटी हॉस्पिटलमधून बोलतेय..

नर्स Mumbai Bridge Collapse
नर्स Mumbai Bridge Collapse

तुम्ही मला ऐकू शकता का? मला माहित नाही. माझ नाव … जाऊ द्या ..आता नावाच काय ……? मी काल जी.टी. हॉस्पिटल मधून स्टाफ नर्स म्हणून माझी ड्युटी संपवून निघाले. ७.५० ची डोंबिवली फास्ट पकडायची म्हणून मी व माझ्या दोन मैत्रिणी झपझप चालत स्टेशन कडे निघालो. तेवढ्यात काय झाले कळले नाही. एका खोल खड्ड्यात पडल्या सारखे वाटले. काय झाले हे कळण्याआधी आम्ही तिघी एका वेगळ्याच विश्वात ढकलल्या गेलो. नंतर कळले कि, ते कुटुंब, मुलं, घर, रुग्णालय, रुग्ण सगळ आता मागे सुटलं आहे.

शेवटची ओव्हर नीट देता आली. रात्री १२ नंबर वॉर्डमधल्या ७ नंबर बेड वरच्या पेशंटच्या बिपीची गोळीचा रात्री ३ वाजता डोस आहे. त्याचा बिपी दुपारी जास्त होता, म्हणून सरांनी रात्री अर्धी गोळी जास्त द्यायला सांगितली. हे ओव्हर मध्ये तीन चार वेळा सांगितलं एवढ समाधान आहे. यांच्या साठी मटकी भिजवली होती. आज मिसळ कर म्हणाले होते … ते मात्र राहून गेलं. मुलासाठी स्टेशन वरून जाताना फोल्डर घेऊन ये म्हंटला होता. तेही राहीलच! अजून एक खूप मोठी गोष्ट राहिली. अंधेरी, एलफिन्स्टन, सावित्री नदीवरचा महाड जवळचा असे पूल कोसळत होते तेव्हा मी कधी यावर विचार केला नाही. फक्त बातम्या वाचल्या. या पुलांचे म्हणे ऑडिट झाले होते. कोण होते हे ऑडिट करणारे? याचा शोध घेऊन वर काही करता येण्यासारखे आहे का? हे पाहायला हवे!

या दोघीही आहेतच कि सोबत! अजून दोन जन ही कोणी तरी दिसतायत सोबत. अजून एक बातमी वाचली होती सावित्री नदीचा पूल कोसळल्यावर कि त्यात काही कारकुनांना म्हणे कोकण भवनला ट्रान्स्फर केले. नंतर सगळ मॅनेज आणि पूर्ववत झालं. मागे अंधेरी कामगार रूग्णालयातली माझी नर्स मैत्रीण सांगत होती, तिथे ही आगीत ७ रुग्ण भस्मसात झाले. भेटतीलच म्हणाव तेही! त्यातही म्हणे काही झाल नाही. मी तेव्हा शांत राहिले. मला वाटल, आपला काय संबंध !! थोड्या वेळात कळेल पुढचा जन्म. तेव्हा मात्र शांत राहायचं नाही. बरीच सेवा केलीय रुग्णांची. डायरेक्ट देवाची भेट झाली, चांगली जागा मिळाली तर बघते ना त्याच्याशी ही बोलून याचं काय करता येईल ते! जाऊ द्या… तुम्ही टेंशन घेऊ नका.. तुमचं चालू द्या …!!

डॉ. अमोल अन्नदातेंचे वैद्यकीय क्षेत्रावरील इतर लिखाण वाचण्यासाठी क्लीक करा.

Dr. Amol Annadate
reachme@amolannadate.com