युद्ध मानसिकतेत ‘जोश’ बरोबर होश पण हवा !

War Psycology

गेला महिना आपला देश एका वेगळ्याच राष्ट्रीय मानसिकतेतून जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर ते विंग कमांडर अभिनंदनची अटक व सुटका पर्यंत देशातील नागरिक अनेक मानसिक आंदोलने अनुभवत आहेत. यात पाकिस्तान बद्दल राग, द्वेष, बदल्याची तीव्र भावना. आपल्या देशा बद्दल किंवा कुटुंबांबद्दल हल्ले, युद्ध सदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे. बालाकोट वरील भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर ‘हाऊज द जोश’ सारखे वाक्य समाज माध्यमांवर सतत गाजत होते. शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंदा पासून ते देशभक्तीचे साजरीकरण अशा सकारात्मक व पुढे काय या अनिश्चितता, भीती अशा नकारात्मक भावनांचे हेलकावे लंबकाच्या आंदोलनाप्रमाणे दोन विरुद्ध भावनेवर देश आंदोलणे घेत होता .

युद्ध
युद्ध सदृश परिस्थितीतून भीती, चिंता, काळजी, मृतांबद्दल दु:ख अशा अनेक भावनांचा समावेश आहे.

या सगळ्या भावना उत्स्प्फुर्त असल्या तरी आज समाज माध्यमांमुळे अधिक प्रमाणात व्यक्त व झपाट्याने पसरणाऱ्या आहेत. पण या सर्व भावनांचा आपल्या तब्येतीशी आपल्या प्रत्येकाच्या मानसिक परिस्थितीशी सहज न जाणवणारा पण निश्चित कुठे तरी, कुठल्या तरी स्वरुपात बाहेर येणारा मानसिक परिणाम आहे. या सर्व भावना देशभक्तीशी जोडून आपण त्याचे समर्थन करत असलो तरी शरीरात उठणाऱ्या प्रत्येक भावनिक तरंगांना शरीर व त्याची फीसीयॉलॉजी काही तरी प्रतिसाद देतच असते. मानसशास्त्राच्या भाषेत याला ‘मास हिस्टेरिया’ किंवा ‘मास मेनिया’ म्हणत असले तरी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर असे अनिश्चिततेचा भावनावेग तीव्र होतो तेव्हा तेव्हा देशाच्या नागरिकाला त्याची मानसिक आजारांच्या, असंतुलनाच्या रुपात किंमत मोजावी लागली आहे. अंतरराष्ट्रीय पातळीवर अशा घडामोडी झाल्या तेव्हा त्याचा मानसिकतेवर होणारा नजीकचा व दुरागामी परिणामांचा अभ्यास झाला आहे. जसे आधी युद्ध जमिनीवर लढली जायची, पुढे ती फक्त सैन्यांमध्ये लढली जाऊ लागली, नंतर सायबर हल्ले, विषाणू–जीवाणूंच्या रूपाने बायो टेररीझम अशी स्वरूपे बदलत गेली. पण त्याचा एक भाग हा असा मानसिक युद्ध ही असू शकतो हे यावेळी सामाजिक माध्यमांवरच्या व जनते मधील भावनिक स्फोटाच्या रूपाने पुढे आला आहे.

डॉ अमोल अन्नदातेंचे इतर लेख वाचण्यासाठी

अमेरिकेत ९/११ घडले तेव्हा त्या नंतर तीव्र नैराश्य, असुरीक्षितते मुळे लोकसंख्येचा स्फोट अशा रुपात पुढे आला. भारताचा स्वातंत्र्य लढा हा त्या वेळी मानसशास्त्रात कुठले ही मोठे संशोधन झालेले नसताना स्वातंत्र्य लढ्यात कुठल्या ही नकारात्मक भावनांचा भार पिढी पुढे घेऊन जाणार नाही, अशा स्वरुपात नियोजनबद्ध रित्या संपवला. ब्रिटेनचेच राज्य असलेले ऑस्ट्रेलिया सारखे देश ही स्वतंत्र झाले पण त्यांच्या पारतंत्र्यातील भावनांमुळे आजही त्यांच्या तिसर्या पिढीत नैराश्याच्या तीव्र भावना व हा आजार आहे. जणू यामुळे त्यांच्यात जनुकीय बदलच झाले. म्हणूनच त्या देशात आजही ड्रग अॅडीक्शनचे प्रमाण खूप जास्त आहे. सध्या आपल्या देशात ही व त्यातच गेल्या महिना भरात अशा भावनिक लाटा येत आहेत. आपल्याला प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम आहे व तो व्यक्त करण्याचा अधिकार आहे. इतरांसारखा तो मला ही आहे. पण कुठल्याही भावनावेगाला योग्य रूप मिळाले नाही तर त्याचे दमन न होता ती उर्जा कुठल्यान कुठल्या स्वरुपात बाहेर पडणार. उदाहरणार्थ शत्रूला हरवल्याच्या तीव्र आनंद व हा आनंद परत परत अनुभवण्याची मानसिकता, व्यक्त करण्याचे प्रकार या मुळे उन्माद होतो व रस्त्यावरील भांडणांचे, रागाचे, रस्त्यावर छोट्या मोठ्या कारणांवरून खुनांचे प्रकार वाढतात. सतत बदल्याच्या भावने पोटी नैराश्य येऊ शकते. राग, चिंता, बदल्याची भावना या सर्व गोष्टींचा आज ह्र्दयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेह अशा आजारांशी संबंध सिध्द झाला आहे. अगदी पाठदुखी सारख्या आजारांचा भावनिक संबंध सिध्द झाला आहे.

मग याचा अर्थ मी देशभक्ती व्यक्तच करायची नाही का? असे मुळीच नाही. पण अशा तीव्र भावना व्यक्त करताना किंवा अनुभवताना गरज असते रॅशनल थिंकिंग किंवा तारतम्य व विवेकी वैचारिक प्रक्रियेची. म्हणजेच शत्रू राष्ट्र किंवा देशा बद्दल माझ्या या भावना कितीही तीव्र असल्या तरी त्याच्या वर निर्णय घेणारी, त्याचे सतत विवेचन करणारी या गोष्टीला वाहिलेली स्वतंत्र यंत्रणा माझ्या देशात आहे व ती सक्षम आहे . त्यावर मी स्वतः कुठला ही निर्णय घेऊ शकत नाही. या उलट आपल्या नकारत्मक भावनांच्या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वगैरे खूपच पुढच्या गोष्टी आहेत. आधी आपल्या मानसिकतेला धोका व इतर राष्ट्राचा आपल्याला नकारात्मक भावनांच्या खाईत लोटण्याचा हेतू साध्य होऊ शकतो हे समजून घ्यावे. म्हणून या भावना जरूर असाव्या पण भावनावेगात वाहवत न जाणे हा आपल्या राष्ट्राच्या, राष्ट्रीय सुरक्षेच्या कर्तव्याचा भाग समजावा. म्हणूनच ‘हाऊज द जोश’ ला उत्तर “हाय बट ईन माय हॅन्ड्स सर” हे उत्तर जास्त समर्पक ठरेल.

सदरील लेख २ मार्च, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Dr. Amol Annadte | amolaannadate@gmail.com