क्वारंटाइन न समजल्याने घात कोरोना ची साथ महाराष्ट्रात प्रवेश करून आता २ महिने होऊन गेले तरी अजून साथ शास्रातील, इपिडीमीऑलोजीतील काही मुलभूत व्याख्या धोरण आखणी करणारे शासन, प्रशासन आणि सर्व सामान्य समजून घेण्यास तयार नाही हा वैद्यकीय अज्ञानाचा कळस आहे. या साठी सर्व प्रथम क्वारंटाइनचा इतिहास आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ. चौदाव्या शतकात प्लेग ची साथ आली व जेव्हा बहुतांश प्रवास हा जहाजाने व्हायचा तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाने येणाऱ्या प्रवाशांना ४० दिवस वेगळे व एकत्र ठेवून त्यांची राहण्या, जेवणाची सोय केली जायची. ४० ला ग्रीक मध्ये quaranta giorni म्हणतात म्हणून क्वारंटाइन. ४० दिवस का तर प्लेग सह इतर सर्व आजार बाधित व्यक्ती पासून होण्यास किमान १ व कमाल ४० दिवस लागतात म्हणून तो पर्यंत या प्रवाशांपैकी कोणाला लक्षणे आली तर उपचारार्थ पुढे त्याला वेगळे ठेवून उपचार करता यायचे व तसेच इतर देशातील आजार पसरायचे नाही. चौदाव्या शतकात आजारांचे उपचार, औषधे अजून विकसित झालेले नव्हते. म्हणून आजार आपल्या देशात येऊ न देणे हाच मुख्य उपाय होता. पुढे एखाद्या प्रांतात हा आजार झाला तर इतर प्रांता साठी व त्या पुढे गावासाठी ही क्वारंटाइन ही संकल्पना रुजली.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
१८७८ ची यलो फिवर व एकोणिसाव्या शतकातली कोलेरा ची साथ रोखण्यात गांभीर्याने राबवलेल्या क्वारंटाइनचा मोठा वाटा होता. पुढे तर अनेक देशात ही साथ सुरु असे पर्यंत क्वारंटाइनच्या सुरक्षेच्या जबाबदारी साठी पोलिसांची वेगळी तुकडीच निर्माण करण्यात आली. पण चौदाव्या शतकात जे कळले ते आज कोरोना या निश्चित उपचार नसलेल्या व जगभर थैमान घालत असलेल्या आजारा विषयी आपल्याला कळेनासे झाले आहे. इतर देशात जिथे अर्धे देशच्या देश शासकीय क्वारंटाइन मध्ये ठेवून काळजी घेण्यात आली तिथे आधी पासूनच हे आपल्याला शक्यच नाही म्हणून हात टेकले व होम क्वारंटाइन ही संकल्पना आपल्या सोयीसाठी आपण जन्माला घातली. खर तर होम क्वारंटाइन हा शब्दच एक विरोधाभासी शब्द आहे. होम क्वारंटाइन हा शब्द रागीट, शांत गृहस्थ किंवा विवाहित लिव्ह इन जोडपे या सारखा आहे. जो व्यक्ती बाधित देशातून आला आहे त्याला वेगळे ठेवण्यासाठी आपण ” जा तुझ्या घरी तू वेगळा राहा ” असा हातावर शिक्का मारून सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत आपण परत पाठवतो या सारखा दुसरा विनोद या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासात घडणार नाही. क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे बरे होम क्वारंटाइन मध्ये नेमके काय करायचे आहे या विषयी नेमकी माहिती आपण संबंधित व्यक्तीला देतो आहे का ? या व्यक्तीचे घर कशाने पुसायचे हे ही ठरलेले आहे. तरच कदाचित ही होम क्वारंटाइनची संकल्पना काही प्रमाणात यशस्वी होऊ शकली असती. त्या पलीकडे ज्या लोकशाहीला एवढ्या वर्षात शिस्त लागू शकली नाही, तिथे एक स्वस्थ व्यक्ती स्वतःला एका खोलीत चौदा दिवस कोंडून घेईल ही अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. होम क्वारंटाइन पाळला जातोय का यासाठी सिंगापूर सारखी लक्ष ठेवणारी सक्षम व्हिजिलन्स आपल्या कडे आहे का ? मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती सुरु झाली आहे पण ती ही सदोष आणि जुजबीच आहे. हातावर शिक्का दिसल्यास पोलिसांना फोन करा एवढ्या वर विषय संपायला ही काही रात्री वाजणाऱ्या डी जे एवढी साधी गोष्ट आपल्याला वाटते आहे का? याची परिणीती अशी झाली कि विद्यापीठांचे कुलगुरू, कॉलेजेस चे अधीक्षक,आय.ए.एस अधिकारी अशा शिक्षित उच्चभ्रू लोकांनी कोण कुठला होम क्वारंटाइन म्हणून ही संकल्पना धुडकावून लावली. पुण्यात होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्यांनी मुलांचे वाढदिवस गर्दी बोलवून साजरे केले . या पुढे ग्रामीण निम्न शिख्सित लोकांकडून तरी काय अपेक्षा करता येईल ? झाले ही तसेच . सांगली, इस्लामपूर मध्ये तर परदेश व धार्मिक स्थळांवरून आलेल्या काहींनी जेवणावळी दिल्या आणि आज पुणे, मुंबई, नागपूर नंतर सांगली, इस्लामपूर च्या रूपाने कोरोनाची नवी राजधानी निर्माण होताना दिसते आहे.
खरेतर अजून ही वेळ गेलेली नाही. आज घडीला ११ हजार लोकांना होम क्वारंटाइनचे हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून आपण एक प्रकारे कोरोना पसरवण्याचे लायसन्सच दिले आहे क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे . साडेबारा कोटी लोकसंख्येच्या राज्याला ११ हजार लोकांना वेगळे ठेवून त्यांची १४ दिवस व्यवस्था ठेवणे एवढे अवघड आहे का ? खरे तर सव्वाशे कोटीच्या देशात परदेशातून येणाऱ्या सगळ्यांना जानेवारी , फेब्रुवरी महिन्यात शिस्तबद्ध क्वारंटाइन केले असते तर आज आपण जगा पुढे एक उदाहरण घालून दिले असते. पण अजून ही महाराष्ट्राला ही संधी आहे. प्रत्येक जिल्ह्यात १०८ शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, शासकीय विश्राम गृहे, धार्मिक तीर्थ क्षेत्रांचे भक्त निवास अशा किती तरी वास्तू सहज उपलब्ध होतील. यांच्या आहार व्यवस्थेसाठी शासनाकडे पैसे नसतील तर स्वयंसेवी संस्था पुढे येतील. लाखांच्या सभांचे उत्तम नियोजन करणारे राजकीय पक्ष सत्तेत असताना इथे त्यांचे नियोजन कौशल्य का दिसत नाही. एवढ्या मोठ्या राज्यात हे शक्य व प्रॅक्टीकल नाही अशी उत्तरे दिली जात आहेत.
क्वारंटाइन मधील व्यक्तीला कुठली ही लक्षणे नसतात. त्याचा फक्त कोरोना बाधित देशात प्रवास झालेला असतो किंवा सध्या देशातील कोरोना ग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो. कोरोना चा संपर्क येऊन त्याचा संसर्ग होतो पण काहीच लक्षणे दिसत नाहीत असा हा कोरोना पसरवणारा छुपा घटक या साखळीत सगळ्यात महत्वाचा असतो. कोरोना ग्रस्तांची संख्या सांखिक पद्धतीने ( exponentially ) म्हणजे एकाचे चार, सोळा, बत्तीस अशी झपाट्याने वाढवण्यासाठी कोरोना पोझीटीव नव्हे तर हा कोरोना असून ही लक्षणे नसल्याने समजून न येणारा घटक जबाबदार असतो. कारण कोरोना निश्चित निदान झालेला आयसोलेशन मध्ये असतो. एकीकडे हा घटक आपण क्वारंटाइन मोडीत काढत समाजात कोरोना पसरवण्यासाठी मोकळे सोडत आहोत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोना बाधित व्यक्तीचा शोध ही आपण घेत नाही आहोत. या पुढे जाऊन कॉन्टॅक्ट म्हणजे थेट संपर्कात आलेले आणि कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेले अशी सगळी साखळी एक केस सापडल्यावर शोधावी लागते.
आपण मात्र अजून ही कमी टेस्टिंग मुळे कोरोना चे आपले आकडे त्या मानाने कमी आहेत या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. हे सर्व कॉन्टॅक्ट शोधण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असायला हवी . ही सगळी प्रक्रिया केवळ पुढील एक महिन्यासाठी राबवायची आहे. सध्या लॉक डाऊन मुळे तशी ती सोपी ही आहे. पण ही यंत्रणेला थकवणारी असल्याने होम क्वारंटाइनची फसवी पळवाट शासनाने स्वीकारलेली दिसते आहे. एक तर शासकीय इमारती आरोग्य खात्याने अधिग्रहीत करून तातडीने होम क्वारंटाइन मोडीत काढून थेट क्वारंटाइन सुरु करावे. किंवा किमान सिंगापूर प्रमाणे होम क्वारंटाइन मध्ये प्रत्येका ला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करून त्याचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करणे, त्यांच्या घरी भेटी देऊन ते घरी आहेत का याची चाचपणी करणे व होम क्वारंटाइन चे नियम मोडल्यास स्पेन मध्ये ३०,००० डॉलर चा दंड आहे तसा दंड आकारणे अशा गोष्टी तरी कराव्या. क्वारंटाइन किंवा कडक नियमांचे होम क्वारंटाइन या दोन्ही पैकी काही ही न केल्यास पुढे आपल्या देशाचा एका साथीने कसा घात केला हा इतिहास भावी पिढी साठी तेवढा उरेल.
सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता