तप्त वाटेवर ‘विवेकाचा घात’

दै. दिव्य मराठी रसिक

तप्त वाटेवर ‘विवेकाचा घात’

-डॉ. अमोल अन्नदाते

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या सामान्य लोकांच्या मृत्यूची जबाबदारी जो तो आपापल्या परीने निश्चित करतो आहे. प्रशासनाचे गैरव्यवस्थापन, कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमामागील सरकारचा हेतू अशा सर्व बाजूंनी चर्चा झडत आहेत. पण, या घटनेत दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्यांविषयी सहानुभूती व्यक्त करतानाच आपल्या गुरूवर श्रद्धा व्यक्त करताना भक्तीच्या भावनेने दुसरे टोक गाठल्यामुळे कुणाही भक्तावर मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या विवेकाचे भान कोण देणार ? या प्रश्नाने अस्वस्थ होऊन त्यावर उत्तर शोधण्याचे आणि समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने इतरांना ते सांगण्याचे धारिष्ट्य कुणी दाखवत नाही हेही तितकेच मोठे दुर्दैव! श्रद्धा आणि भक्तीला विवेकाचे कोंदण असल्याशिवाय विज्ञानवादी, संतुलित समाज घडणार नाही म्हणून प्रसंगी वाईटपणा स्वीकारून हे विवेकभान देणे आवश्यक आहे.

भक्तीच्या भोळ्या भावनेपोटी लोक एकत्रित जमून त्यात भाविक मृत्युमुखी पडल्याची ही काही पहिली घटना नाही. काही वर्षांपूर्वी घडलेल्या मांढरदेवी दुर्घटनेपासून ते सिहोरमधील रुद्राक्ष मिळवण्यासाठी उसळलेल्या जीवघेण्या गर्दीपर्यंत अशा अनेक घटना घडत आल्या आहेत. म्हणून हा जसा कुणा एका संप्रदायाचा विषय नाही तसा तो कुणा एका व्यक्तीच्या वा गुरूच्या संदर्भात विशिष्ट मर्यादेत आणि एकाच भिंगातून बघण्याचा विषय नाही. आयुष्याच्या धकाधकीत प्रत्येक माणूस काही ना काही आधार शोधत असतो. एक तर अदृश्य शक्तीच्या रुपात ईश्वरामध्ये किंवा सगुण स्वरूपातील जिवंत माणसांमध्ये तो असा आधार शोधतो. भक्ती आणि आध्यात्माच्याच भाषेत बोलायचे तर स्वतःसह प्रत्येकामध्ये असलेला ब्रह्मन किंवा आत्मन तो इतर कोणामध्ये शोधत असतो. अनेक वेळा न दिसणाऱ्या ईश्वरापेक्षा प्रत्यक्ष भेटणारी, बोलणारी एखादी प्रतिमा लाभली तर तिच्या ठायी प्रत्यक्ष असा व्यक्त करणे, निष्ठा वाहणे हे माणसासाठी अधिक सोपे आणि जास्त मानवी समाधान देणारे असते. कुठलीही आनंददायी क्रिया करताना लाभणाऱ्या आत्मिक समाधानाची ‘डोपामिन किक’ या श्रद्धेमध्येही मिळते. शिवाय, असे गुरू थेट काही मागत नसतात, कालच्या पेक्षा आज आपण अधिक चांगले व्यक्ती होण्याचा ‘फील गुड’ मिळतो आणि या आध्यात्मिक व्यासपीठाद्वारे सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे एक चांगले निमित्तही मिळते..

आपली ‘कोअर कॉम्पिटन्सी’ (मुख्य अंगभूत कौशल्याचे कार्य) असलेला कर्मयोग सुरू असताना आणि ही भक्ती कौटुंबिक, व्यक्तिगत पातळीवर मॅनेजेवेल असेपर्यंत हे सगळे ठीक व कर्मयोगाला पूरक असे असते. म्हणजे विषादयोगातील अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितल्यावर त्याने गांडीव उचलून युद्ध करणेच अपेक्षित होते. ‘हे गांडीव तू घे. मला रथ चालवू दे किंवा मी युद्ध सोडून गीतेचे पारायण करतो’ अशा कुठल्याही पलायनवादाला श्रीकृष्ण या गुरूने परवानगी दिली नाही. ‘न कर्मणा मना रम्भा नेष्कर पुरुषोश्नुते’ अर्थात कर्म न केल्याने आणि कर्म त्यागल्याने कधीही तुझे भले होणे शक्य नाही हे सांगून श्रीकृष्णाने अर्जुनापासून स्वतःची नियोजनबद्ध सुटका करून घेत त्याला स्वतःच्या पायावर उभे केले.

आज गुरू भक्तांच्या मांदियाळीत मात्र नेमके याच्या उलट चित्र दिसते आहे. एकदा का आपण कोणा गुरूचे छत्र स्वीकारले की या निसरड्या वाटेवर संतुलन शिकण्याऐवजी त्यावर घरंगळत अतिभक्तीचा लंबक दुसऱ्या टोकाला कधी आणि कसा सरकतो हे भक्तांनादेखील कळत नाही. त्यातच कुठल्याही अविवेकीपणाला मोठ्या समूहाचे अनुमोदन मिळते तेव्हा जितकी मानवी संख्या जास्त तितकी वैचारिकतेची पातळी सूक्ष्म होत जाते. त्यातून मग गुरूची शिकवण किंवा आध्यात्म साध्य करायला आपले अस्तित्व तरी शाबूत राहायला हवे हेही श्रद्धेत भिजलेले भोळे मन विसरून जाते आणि असे अतिसश्रद्ध मन विवेकी मेंदूवर मात करते. म्हणून गुरूंवर भक्ती असावी की नसावी यापेक्षा आधी मी, माझे अस्तित्व आणि ते राहिले तर भक्ती एवढे साधे-सोपे सूत्र समजण्यासाठी कुठल्या गुरूची गरज असते असे वाटत नाही. खरे तर आध्यात्मिक गुरू म्हणून वावरणाच्या ज्या काही समाजमान्य आणि राजमान्य व्यक्ती आज भारतात लोकांच्या मनाचा ताबा घेत आहेत त्याचे प्रथम कर्तव्य आहे की, अनुयायांना आपल्यापासून मुक्त करणे आणि त्यांनाआत्मिक शांती समाधान मिळवण्यासाठी स्वावलंबी बनवणे. कोणतेही समुपदेशन करताना संबंधित व्यक्तीची समुपदेशकाशी भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असते. समुपदेशनाचे अंतिम ध्येय हे त्या पीडित व्यक्तीला स्वावलंबी बनवणे हे असते. वास्तवात भक्त किंवा साधकही आध्यात्मिक गुरूंकडे लेबल नसलेले समुपदेशक म्हणूनच पाहत असतात. म्हणून या गुरूंकडूनही समुपदेशकासारखी गुंतागुंत नसलेली क्रिया अपेक्षित असते. पण, कालांतराने आध्यात्मिक व्यक्तीचे कल्ट अँड म्हणजे प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेले अनुयायी आणि या ब्रँडचे यशापयश म्हणजे आपले यशापयश मानणारा वर्ग असा समूह तयार होतो. त्यातूनच कॉर्पोरेट क्षेत्रात शिताफीने निर्माण केली जाणारी ‘लॉयल्टी बियाँड लॉजिक’ (प्रश्न पडण्यापलीकडची निष्ठा) आध्यात्मिक क्षेत्रात सहजतेने आपसूकच तयार होते.

सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवण्यासाठी वाटाडे नक्कीच हवे असतात. आयुष्य जगण्यासाठीच नव्हे, तर करिअरमध्ये तसेच सर्व पातळ्यांवरच्या कौटुंबिक, मानसिक, भावनिक व्यवस्थापनासाठी सल्लागाराच्या रूपात प्रत्येकाच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर अनेक गुरू येत असतातच. त्याप्रमाणे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीही कुणी वाटाड्या असल्यास त्यात वावगे काहीच नाही. पण, वाट दाखवल्यावर त्या वाटेने चालणे सोडून रस्ता दाखवणाऱ्याची पूजा बांधून, तिथेच फतकल मारून बसल्यास आपल्या निर्धारित ठिकाणी आपण पोहोचणार कसे आणि कधी? गुगल मॅपवर पत्ता शोधल्यावर काही क्षणात दिसणाऱ्या रस्त्याचा अवलंब करणे सोडून गुगलच्या प्रशंसेची भजने आपण गातो का ? गुगल मॅपवर गोड आवाजात रस्ता सांगणारी स्त्री असो की गुरूची सुरेल प्रवचने असोत; ही केवळ मार्ग दाखवणारी साधने आहेत आणि त्यानुसार चालणे, मार्ग क्रमित होणे हे आपले साध्य आहे, हे कळले नाही तर या साऱ्याचा उपयोग काय? अशा वेळी माणसाचे बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले विवेकी अस्तित्वच पणाला लागते. ऐंशीच्या दशकात ओशोच्या तत्त्वज्ञानाने जगात भल्याभल्यांना वेड लावले होते. त्यांच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी रग्गड पैसे मोजावे लागत आणि जगभरातील धनदांडगे लोक ते मोजून ओशोंच्या आश्रमात रमत. तेव्हा एका गरीब माणसाने ओशोंना विचारले, ‘तुमचे आध्यात्म श्रीमंतांसाठीच आहे का? गरिबाला मोक्षप्राप्तीचे ज्ञान तुम्ही देणार नाही का ?’ त्यावर ओशो उत्तरले, ‘सध्या पैसे कमावणे हाच तुझा मोक्ष आहे!’ आपल्या कर्तव्यातून मोक्षमागांचे पहिले साधन काय, याचे उत्तर स्वतःच्याच सद्सदविवेकबुद्धीचा गुरू आपल्याला देईल. आपली हीच निरक्षीरविवेकबुद्धी सदैव जागी राहिली तर मानसिक, भावनिक आधारासाठी ज्या वाटाड्यांकडे आपण जातो, त्यांनी दाखवलेली वाट अनुसरण्याऐवजी आपण तिथेच गुंतून पडणार नाही. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैवचार्जुन । कुठलीही गोष्ट अति करू नकोस, हे अर्जुनाला सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे हे वचन आपल्यालाही अनुसरायला लावण्याचे काम हा विवेकच करेल.

हरिणाच्या नाभीत कस्तुरीची उत्पत्ती होऊन आसमंतात सुगंध दरवळू लागतो तेव्हा त्या हरिणाला तो कुठून येतोय हे कळतच नाही. हा सुगंध येतोय तरी कुठून? या व्याकुळतेत हे हरीण अख्ख्या जंगलात सैरभैर धावत सुटते. काटेकुटे, दगडगोटे, झाडी झुडपांमुळे ओरखडे येऊन रक्तबंबाळ होते. पण, या सुगंधाचा मूलस्रोत तूच आहेस हे सांगणारा कोणीही त्याला त्या जंगलात भेटत नाही… अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या मानवी आयुष्यात विवेकाच्या अशाच सुगंधाचा साक्षात्कार आपल्याला जितक्या लवकर होईल तितकी आपली वाटचाल सुकर, सुखद अन् समृद्ध होईल.

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com
संपर्क: ९४२१५१६५५१