मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगाव बद्दल आजवर जी चर्चा झाली ती फक्त जातीय चष्म्यातून. पण कोरोना बद्दल वैद्यकीय आणि विज्ञान निष्ठ चर्चा करायची झाली तर धार्मिक स्पर्श बाजूला ठेवून धीराने मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण आणि त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. जसे मुंबई हे महाराष्ट्रच नव्हे तर देशाची कोरोना राजधानी ठरते आहे तशीच मालेगाव ही ग्रामीण व उर्वरित महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुधारणा करायची असेल तर या मुद्द्यांकडे जातीय दृष्टीने बघू नये.

Articles

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

By Amol Annadate

May 31, 2020

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगावमधील ‘कोरोना’ च्या प्रादुर्भावाबद्दल वैद्यकीय आणि  विज्ञाननिष्ठ चर्चा करायची झाली तर धार्मिक स्पर्श बाजूला ठेवून धीराने मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण आणि  त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. जसे मुंबई हे महाराष्ट्रच नव्हे तर देशाची कोरोना राजधानी ठरते आहे तशीच मालेगाव ही ग्रामीण व उर्वरित महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुधारणा करायची  असेल तर या मुद्द्यांकडे जातीय दृष्टीकोनातून न पाहता तातडीने पावले उचलली पाहिजेत.

     डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगाव मध्ये कोरोना बाधितांचा अधिकृत आकडा ६९६ व कोरोना मृतांचा आकडा ४४  असला तरी खरा आकडा खूप मोठा आहे. मुस्लीम बहूल मालेगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला ८ एप्रिलला म्हणजे रमजानच्या तोंडावर. क्वारनटाईन व आयसोलेशनची भीती, सणाच्या तोंडावर रुग्णालयात जाणे चांगले नाही अशा अनेक गैरसमजांमुळे इथला मुस्लीम समाज तपासणी साठी फारसा पुढे आला नाही. त्यातच जुन्या मालेगाव मध्ये दाटी वाटीने राहात असलेल्या मुस्लीम वस्त्यांमध्ये सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड आहे. यामुळे अधिकृत आकडे आणि  मृत्यू जरी कमी दिसत असले तरी मालेगाव मध्ये गेल्या दीड महिन्यात मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये एप्रिल महिन्यात ४५७ मृतदेहांचे दहन करण्यात आले आहे व तुलनेत एप्रिल २०१९ मध्ये केवळ १४० मृतददेहांचे दहन जाहले आहे. प्रशासना कडून मात्र मृतांचा आकडा ४४ सांगितला जात असला आणि  इतर मृत्यू हे कोरोना मुळे नव्हे तर इतर कारणांमुळे होत असल्याचे सांगितले जाते आहे. मुळात मालेगाव मध्ये मृतांचा आकडा हा ४०० – ५०० पेक्षा खूप अधिक आहे आणि  शासनाने खरच खरा आकडा शोधून काढला तर मालेगाव मध्ये  प्रती दशलक्ष मृत्यू दर हा मुंबई व न्युयोर्क पेक्षा खूप जास्त निघेल असे मालेगाव मधील डॉक्टर व काही जाणकार नागरिक सांगतात. आज मालेगावच्या बडा कब्रस्थान मध्ये मृतदेह पुरायला जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. असे असेल तर मृतांचे स्वॅब घेऊन ते कोरोनाचे होते का  हे सिध्द करायला हवे आणि  खरच इतर कारण असतील तर त्या कारणांचा शोध घ्यायला नको का? इतर कारण आहेत हे प्रशासनाचे उत्तर ग्राह्य धरले तरी या इतर आजार असलेले रुग्णच कोरोनाच्या भक्षस्थळी पडतात.

     मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मृतांचा आकडा वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे साथ सुरु झाल्यावर शासकीय रुग्णालयात रुग्ण हाताळण्यासाठी कुठलीही सक्षम व्यवस्था नव्हती. त्यातच सर्दी खोकल्याचे रुग्ण खाजगी रुग्णालयात पहायचे नाहीत असा नियम असल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयात जावे लागायचे. पहिल्या काही दिवसात कोरोनाचे जे मृत्यू झाले ते बहुतांश सायलेंट हायपॉक्सिया मुळे झाले. म्हणजेच रुग्णांना विशेष लक्षणे नाही पण ऑक्सिजनची पातळी मात्र खालावलेली. काही जण खूप उशिरा रुग्णालयात पोहोचत. त्यामुळे साथ सुरु होताच झपाट्याने मृत्यूचा आकडा वाढला. या मुळे शासकीय रुग्णालयात कोरोना चा रुग्ण दाखल झाला म्हणजे मृत्यूच होणार अशी भीती पसरली आणि  या भीती पोटी मुस्लीम समाजात रुग्णालयात दाखल होणे किंवा त्रास होत असल्यास टेस्टिंग साठी पुढे येणे याचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे केसेस व मृत्यू वाढतच गेले. यासाठी स्थानिक प्रशासन सुस्त असून फारसे काही पाऊले उचलत नाहीत हे दिसल्याने इथल्या मुस्लीम डॉक्टर्सने जन जागृतीचे काम सुरु केले. टेस्टिंग आणि  उपचारासाठी पुढे आला नाहीत तर आपल्यालाच धोका आहे हे समाजाला समजावून सांगितले. आता स्थिती काहीशी नियंत्रणात असली तरी अजून सगळे आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. मालेगाव मध्ये मुस्लीम लोकसंख्या ८० टक्के असली तरी टेस्टिंग झालेल्यांपैकी केवळ १० % मुस्लीम आहेत. अजून हे प्रमाण वाढलेले नाही. हा प्रश्न धार्मिक पेक्षा अज्ञानाचा आणि  असुरक्षिततेचा आहे. तो दूर करण्यासाठी कुठला हा आराखडा आणि  मोहीम शासनाने आखलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि  तेवढ्या पूर्ती चक्रे हलली पण परत सगळे जैसे थे झाले.

       मालेगाव हे दुसरे धारावी आहे असे मानून शासनाला वेगळे “मिशन मालेगाव“ आखावे लागणार आहे. राज्यात इतरत्र जसे एकसुरी कार्यक्रम राबवला जातो आहे तसे इथे करता येणार नाही. मालेगावचे प्रश्न वेगळे आहेत आणि  त्यात मुस्लीम समाजाला मोठ्या प्रमाणावर विश्वासात घेऊन पाऊले उचलावी लागणार आहेत. मालेगाव मनपा घरोघरी जाऊन होम स्क्रीनिंग ही करते आहे. पण तरी खरे आकडे बाहेर येणे आणि  त्याप्रमाणे कठोर पाऊले अजून उचल गेली पाहिजे . ‘मिशन मालेगाव’ चे अनेक पदर असू शकतात –

          मालेगाव व बसवंत पिंपळगाव ही दोन शहरे नाशिकचा आर्थिक कणा आहेतच तसेच इथल्या संपन्न , सधन बाजारपेठा महराष्ट्राच्या ग्रामीण अर्थचक्राचा मोठा आधार आहेत. मालेगाव मध्ये कोरोना प्रतिबंध गांभीर्याने घेतला नाही तर इथला कापड व इतर उद्योग ढासळून , इथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची आवक थांबून त्याचा नाशिक व राज्याच्या अर्थकारणावर मोठा दुष्परिणाम होईल. म्हणून दडवून ठेवलेला मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट स्वीकारून तातडीने पाऊले उचलली गेली पाहिजे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता