दैनिक सकाळ
काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम?
डाॅ. अमोल अन्नदाते
सध्या पुण्यामध्ये गिया बारी सिंड्रोम हा आजार ७३ मुलांना झाल्याचे आढळून आले आहे. यातील ७ केसेस या ६० वर्षां पेक्षा अधिक वयाच्या असल्या तरी बहुतांश केसेस या लहान मुलांमध्येच आढळून आल्या आहेत.
काय आहे गिया बारी सिंड्रोम हा हा आजार?
गिया बारी सिंड्रोम हा हा आजार नवा नसून तुरळक प्रमाणात हा आजार दिसून येतो. या आजारात काही बॅक्टेरियल व व्हायरल संसर्गानंतर शरीरातील प्रतिकार शक्ती चुकून नसांवर ( नर्व ) आक्रमण करते. त्यामुळे संसर्गाच्या १ ते ३ आठवड्यानंतर अचानक पुढील लक्षणे आढळून येतात –¬
- हात व पायांमध्ये तीव्र स्वरूपाचा अशक्तपणा येऊन हात व पायांची हालचाल करता न येणे
- हात व पायांना मुंग्या येणे
- हि दुर्बलता पाया पासून सुरु होते व पुढील चार आठवडे वर सरकत छाती, चेहरा , डोळ्यांपर्यंत येते.
- पहिले चार आठवडे हि दुर्बलता वाढत जाते, पुढील चार आठवडे तशीच राहते व त्या नात्र चार आठवड्यात हळूहळू कमी होते.
- काही मुलांमध्ये चार आठवड्यांऐवजी कमी वेळेत दुर्बलता शरीरात वर सरकते
- दुर्बलतावर सरकून छातीचे स्नायू अशक्त होतात तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो व शरीराला ऑक्सिजनचा रक्त पुरवठा कमी होतो.
सध्या साथी सारख्या पसरणाऱ्या या आजाराचे मुख्य कारण काय ?
गीया बारी सिंड्रोम हा विविध संसर्गा मुळे होत असला तरी सध्या पुणे येथील साथ कॅम्पायलो बॅक्टर जेजूनाय या जुलाब – उलट्यां ( गॅस्ट्रो ) साठी जबाबदार जीवाणू मुळे आली आहे. इतर वेळी गीबीएस हा डेंग्यू , चिकनगुनिया व इतर विषाणूंमुळे ही येते आहे.
कॅम्पायलो बॅक्टर जेजूनाय संसर्गाची मुख्य लक्षणे काय ?
- जुलाब
- काही वेळा जुलाबात रक्त पडणे
- पोट दुखणे
- ताप
- मळमळ व उलट्या
या मात्र १ ते ३ आठवड्यानंतर नंतर जीबीएसची लक्षणे दिसून येतात
जुलाब उलट्याच्या प्रत्येक केस मध्ये जीबीएस होईलच का ?
जुलाब उलट्यांनंतर प्रत्येक केस नंतर जीबीएस होईलच असे नाही. कोणाला जीबीएस होईल हे हि निश्चित सांगता येत नाही. पण जुलाब व उलट्यांचा त्रास सुरु झाल्यास तातडीने बाल रोग तज्ञांकडून उपचार घ्यावे
जीबीएस टाळण्यासाठी काय करावे ?
- पाणी उकळून प्यावे
- फळे , भाज्या स्वच्छ धुवूनच वापरावे
- शक्यतो मांसाहार टाळावा
- मांसाहार करायचाच असल्यास ते ७५ डिग्री सेल्सियस पर्यंत नित शिजवलेले असावे
- कच्चे अन्न व त्यातच अंडे व मासे कच्चे खाणे टाळावे
- जेवणा आधी व शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे
- उलट्या व जुलाबाचा त्रास असल्यास रुग्णाने शक्यतो वेगळे भांडे वापरावे
- कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवावे
- न शिजवलेले मांस हाताळल्यावर हात व स्वयंपाकघर स्वच्छ धुवावे
- शक्यतो बाहेरचे ( हॉटेलचे ) अन्न खाणे टाळावे
जुलाब – उलट्यांचा त्रास होऊन गेल्यावर पुढे जीबीएस होऊ नये म्हणून काय करता येईल ?
एकदा उलट्या जुलाबांचा त्रास होऊन गेल्यावर जीबीएस टाळण्यासाठी असे निश्चित काही उपाय व औषध नाही.
जीबीएसचे उपचार काय ?
जीबीएसचे मुख्य उपचार हे रक्तातून इम्युनोग्लोब्यूलीन हे औषध देणे व शरीरातील प्लाज्मा बदलणे ( प्लाज्मा एक्सचेंज ) हा आहे. या शिवाय श्वास घ्यायला त्रास होत असल्यास व्हेंटीलेटर द्वारे श्वास घेण्यास रुग्णाला मांडत करणे.
हा आजार पूर्ण बरा होतो का ?
नीट व तातडीने वेळेत उपचार मिळाल्यास हा आजार पूर्ण बरा होतो.
शासना कडून कुठली पाऊले अपेक्षित ?
- वेगळा जीबीएसचा कक्ष स्थापन करणे
- इम्युनोग्लोब्यूलीन औषधाचा खर्च लाखात असल्याने व उपचार अत्यंत महागडे असल्याने प्रत्येक रुग्णाला शासना कडून मोफत इम्युनोग्लोब्यूलीन मिळतील याची सोय करणे गरजेचे
- जीबीएस च्या लक्षणां विषयी जन जागृती करणे एका हेल्पलाईन नंबर वर लक्षणे दिसल्यास तातडीने संपर्क करण्याची सोय करणे
- प्रत्येक जिल्ह्यात व्हेंटीलेटरची सोय निर्माण करणे
सध्या पुण्यात असलेली साथ राज्यात इतरत्र पसरण्याची शक्यता आहे का ?
हा आजार श्वासातून पसरणारा नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर व जलद गतीने ही साथ राज्यात इतर ठिकाणी स्नायूची शक्यता नाही. पण सतर्कता म्हणून अन्न व पाण्या विषयीचे स्वच्छतेचे नियम मात्र पाळणे आवश्यक आहे.
कॅम्पायलो बॅक्टर जेजूनाय व जीबीएस टाळण्यास कुठली लस उपलब्ध आहे का ?
हा संसर्ग व जीबीएस टाळण्यास कुठलीही लस उपलब्ध नाही.
डॉ. अमोल अन्नदाते
dramolannadate@gmail.com
9421516551