खोकला हलक्यात घेणे नडले…- डॉ. अमोल अन्नदाते

खोकला हलक्यात घेणे नडले…

डॉ. अमोल अन्नदाते

 मध्यप्रदेशमध्ये कोल्ड्रिफ या औषधात डायइथिल ग्लायकॉल या केमिकलचे प्रमाण अधिक असल्याने त्यामुळे २३ बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पालकांमध्ये घबराट पसरली आहे. एरवी कितीही औषधे द्या पण लवकरात लवकर सर्दी खोकला बरा करा असा आग्रह धरणारे पालक आता डॉक्टरांनी दिलेल्या प्रत्येक खोकल्याच्या औषधा कडे संशयाच्या नजरेने बघू लागले आहेत. या घटनेत मृत्यू नेमके का झाले ? खोकल्याची औषधे कुठली असतात ? त्यापैकी नेमकी कुठली औषधे कधी द्यावी ? या सर्व प्रश्नां विषयी धास्तावलेल्या पालकांना समजून घेणे गरजेचे आहे. तसेच या घटनेत औषध उत्पादनास व विक्रीस परवानगी देणाऱ्या CDSCO  व राज्य अन्न व  औषध प्रशासनाची जबाबदारी ही निश्चित करणे गरजेचे आहे . तसेच या निमित्ताने जेनेरिक औषधांचा जयघोष किती जीवाशी येऊ शकतो हे हि सर्व समान्य जनतेला कळायला हवे .

              जगातील सर्दी खोकल्याची सर्व औषधे समुद्रात बुडवली तर मानव जातीचे कल्याण होईल पण समुद्रातील सर्व प्राणी मात्र मरतील हे वाक्य आहे औषध शास्त्राच्या एका वैद्यकीय अभ्यासक्रमातील पुस्तकातील .यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तर महत्वाचा संदेश हा आहे की योग्य औषध योग्य वयाला योग्य प्रमाणात दिले तरच ते परिणाम कारक ठरते . त्यासोबत ते औषध योग्य गुणवत्तेचे हवे . खोकल्याच्या औषधांच्या बाबतीत सध्या या सर्व बाबतीत गोंधळ उडालेला आहे . मध्यप्रदेश मधील घटना हा एक अपघात आहे. खोकल्याच्या औषधात ते गोड व घट्ट व्हावं म्हणून ग्लिसरीन टाकल जात. जर हे ग्लिसरीन सदोष असेल तर त्यातून डाय इथिल ग्लायकॉल  हे घातक केमिकल तयार होत. याचा किडनीवर परिणाम होऊन मध्यप्रदेश मध्ये बालकांचे  मृत्यू झाले. म्हणून सर्वच खोकल्याच्या औषधाच्या बाबतीत असे घडेलच असे नाही. त्यासाठी तुमच्या बालरोगतज्ञा कडे सर्वात स्वस्त जेनेरिक औषध लिहून दया असा हट्ट धरण्या ऐवजी . चांगली  दर्जेदार व गुणवत्तेसाठी नावाजलेली औषधे दया असा हट्ट धरायला हवा . 

                     सर्वसाधारणपणे लहान मुलांमधील सर्दी खोकला हा विषाणू जन्य म्हणजे व्हायरल असतो . फारशी औषधे न घेता ही तो आठवडा भरात बरा होतो. अशा वेळी  डॉक्टरांना दाखवाव पण सर्दी खोकला त्वरित बरा झालाच पाहिजे असा हट्ट न धरता डॉक्टरांनी दिलेली औषधे द्यावी. खोकल्यासाठी लहान मुलांना डेक्सट्रोमीथारफान हे औषध योग्य प्रमाणात दिल्यास सुरक्षित असते. त्यासोबत मध , तुळस, आल , लिंबू यांचे चाटण व कोमटपाणी  दिल्यास खोकल्याच्या औषधाची गरज कमी होते. कोरड्या खोकल्यासाठी मधा वर बरेच वैद्यकीय संशोधन अभ्यास यशस्वी झाले आहेत . खोकल्याची औषधे ही मुख्यतः तीन प्रकारची असतात .कोरड्या खोकल्यासाठी  खोकला दाबणारी , ओल्या खोकल्या साठी फुफुसातील अडकलेली बेडक बाहेर काढणारी व दम्या मध्ये द्यायची अकुंचन पावलेल्या फुफुसाचे प्रसरण करणारी. यापैकी काही औषधे हि २ वर्षा खाली देणे योग्य नाहीत . त्यातच कोडीन, फोल कोडीन व डाय फिन हायड्रामीन या औषधांमध्ये व्यसन लागण्याची क्षमता आहे.  त्यामुळे कोणीही खोकल्याची औषधे थेट मेडिकल मधून घेऊ नये. या तीन पैकी कुठली औषधे कधी द्यावी या विषयी जनरल प्रॅक्टीशनर मध्ये ही प्रबोधनाची गरज आहे . खोकला हे केवळ एक लक्षण असते , आजार नव्हे . म्हणून नेमका आजार शोधून त्यावर उपचार आवश्यक असतात. उदाहरणार्थ लहान मुलां मध्ये नियमित खोकल्याचा त्रास होणे हे बाल दम्याचे लक्षण असते . अशा वेळी केवळ खोकला दाबणारी औषधे निरुपयोगी ठरतात . 

             डॉक्टर व पालकांच्या सतर्कते सोबत कोल्ड्रिफ सारखी जीवघेणी औषधे बाजारात येतात तेव्हा भारतीय औषधांचे अनियंत्रित विक्री परवाने व जेनेरिक चे अनाठायी कौतुक व प्रचार यावर चर्चा होणे आवश्यक आहे. जेनेरिक व तुलनेने स्वस्त औषधे हा ग्राहकांचा अधिकार असला तरी त्यात गुणवत्ता कमी करून स्वस्त बनवलेली जेनेरिक औषधे जीवाशी येऊ शकतात हे कोल्ड्रिफ या औषधाने दाखवून दिले. औषधांच्या उत्पादनाला  परवानगी देण्यासाठी CSDCO हि केंद्रीय नियंत्रण संस्थेची जबाबदार होती. नंतर याला पळवाट शोधण्यात आली. राज्य अन्न औषध प्रशासनाची परवानगी घेऊन हि राज्य पातळीवर औषधांचे उत्पादन करता येऊ लागले . यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु झाला व देशभर कोल्ड्रिफ प्रमाणे गुणवत्तेशी तडजोड करून औषध उत्पादन सुरु आहे. एकदा परवानगी दिली कि नियमित निर्माण होणार्या औषधाच्या बॅचेसची कुठलीही तपासणी होत नाही.  या वर कळस म्हणजे बरेच चुकीच्या खोकल्याच्या औषधांच्या एकत्रीकरण करून त्यांचे उत्पादन व विक्री राजरोसपणे सुरु आहे. राज्य अन्न व औषध प्रशासनाकडून औषध उत्पादन करण्याची परवानगी देण्याचे अधिकार काढून CSDCO या संस्थेने देशातील रुग्णांच्या हातात पडणाऱ्या औषधांची कसून तपासणी करणारी यंत्रणा उभारावी व २३ बालकांचा मृत्यू झाल्यावर तरी जागे व्हावे . 

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *