वरची सभागृहे खरेच ‘वरिष्ठ’ राहिलीत का? – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

वरची सभागृहे खरेच ‘वरिष्ठ’ राहिलीत का?

डॉ. अमोल अन्नदाते

भारतीय लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा ही थेट लोकांमधून निवडून जाऊन राज्यव्यवस्था चालवण्याची आणि बदलण्याची संधी असते. यासोबत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे विभागवार निर्माण करून शिक्षित मतदारांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याची संधी देण्यात आली आहे. लोकांमधून निवडून जाण्याव्यतिरिक्त लोकशाही प्रक्रियेच्या मजबुतीसाठी राज्यसभा आणि विधान परिषद अशी वेगळी व्यवस्थाही निर्माण करण्यात आली. सध्या ६ राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. या सभागृहांना वरिष्ठ म्हणजे लोकसभा आणि विधानसभेपेक्षा वरची सभागृहे मानले गेले आहे. पण, गेल्या काही वर्षांत या सभागृहांसाठी सदस्य निवडण्याचे निकष आणि नेमणुकीचे प्रमाण बघता ही खरेच ‘वरिष्ठ’ राहिली आहेत का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

बौद्धिक, वैचारिक, सामाजिक क्षेत्रांबरोबरतच कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील पारंगत लोकांच्या सहभागामुळे संसदीय लोकशाही आणि शासन अधिक प्रभावी होईल, या विचारातून ही व्यवस्था निर्माण झाली. ज्या लोकांना निवडणूक लढवणे शक्य नाही, आपापल्या क्षेत्रातील कौशल्य आणि व्यस्ततेमुळे ज्यांना लोकांमधून निवडून जाण्यात राजकीय अडथळे येऊ शकतात, त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक मार्ग म्हणून वरिष्ठ सभागृहांकडे बघितले जायचे. किंबहुना तेथील लोक अधिक ज्ञानी, विचारी म्हणून ते वरचे सभागृह मानले जाऊ लागले. या सोबतच राजकीय संघटनेत आणि पक्षबांधणीमध्ये अनेक वर्षे घालवलेल्यांनाही या सभागृहात काही प्रमाणात संधी मिळणे ही गोष्टही समजण्यासारखी आहे. पण, हे सभागृह पूर्ण राजकीय किंवा कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आणि त्याचे सदस्य असलेल्या, राजकारणात सक्रिय असलेल्यांनीच भरलेले असावे, असा कधीही त्यामागचा हेतू नव्हता.

गेल्या साधारण वीस वर्षांत मात्र या सभागृहांचे स्वरूप बदलत गेले. विधान परिषदेच्या काही जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि काही जागांसाठी विधानसभेचे प्रतिनिधी मतदान करतात. या निवडणुका प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाप्रमाणे जेवढ्या जागा आहेत, तितकेच उमेदवार अशी बिनविरोध झाली नाही तर त्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक खर्चिक होतात. राजकीय संदर्भात ‘घोडेबाजार’ या शब्दप्रयोगाचा वापर सुरू झाला, तो याच निवडणुकांमुळे. मग अशी स्थिती असेल, तर या सभागृहात विचारी, अराजकीय व्यक्ती जाणार कशी? त्यातच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या अशा जागा म्हणजे पक्षासाठी मागच्या व पुढच्या दाराने निधीचा स्त्रोत असू शकतो, हा शोध पक्षांना लागला. त्यामुळे अनेक पुंजीपतींची वर्णी या सभागृहांमध्ये लागू लागली. पुढे ही सभागृहे पक्षांसाठी राजकीय खरेदी-विक्रीचा बाजार ठरू लागला. काही अराजकीय किंवा राजकारणाच्या वर्तुळातील पण विचारवंत, अभ्यासू लोकांना या सभागृहांमध्ये संधी मिळालीही; मात्र अशी उदाहरणे विरळच होत गेली.

राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त आणि विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्यांचाही समावेश असतो. ही नियुक्ती असल्याने ती राजकारणापासून अलिप्त असणे अपेक्षित असते. पण, यासाठीची नावे मंत्रिमंडळ बैठकीत सत्ताधारी पक्षच ठरवतात आणि या नावांची यादी केवळ स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाते. राज्य सरकार एका पक्षाचे आणि राज्यपाल दुसऱ्या राजकीय पार्श्वभूमीचे असल्यास अशा नियुक्त्यांचे काय होते, हेही महाराष्ट्राने अनुभवले आहे.
एकेकाळी या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर अगदी मध्यरात्रीपर्यंत चर्चा चालत. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी नेते त्यावेळी आवर्जून उपस्थित राहत. या सभागृहांमध्ये मांडलेल्या अनेक प्रश्नांनी देशाच्या आणि राज्याच्या धोरणांना दिशा दिली गेली. वि. स. पागे यांनी १९७२ च्या दुष्काळात सुचवलेली रोजगार हमी योजना, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी संस्था सुरू करण्याचा निर्णय असे अनेक ऐतिहासिक निर्णय या वरिष्ठ सभागृहांतील चर्चेतून आले. आता मात्र ‘वरच्या’ समजल्या जाणाऱ्या या सभागृहांमध्ये अनेकदा अत्यंत ‘खालची’ भाषा वापरली जाते. दोन्हीकडील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याने त्यांचे निलंबन झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.

याच सभागृहांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून सदस्य निवडले जातात. पण, या निवडणुका कधी होतात हेही अनेकदा मतदारांना कळत नाही. या निवडणुकांसाठी दर सहा वर्षांनी नव्याने नोंदणी करण्याची सक्ती कशासाठी, हेही न उमगण्यासारखे आहे. एकदा एखाद्या विभागात पदवीधर म्हणून नोंदणी केली की प्रत्येक निवडणुकीत मतदान करता यायला हवे. या निवडणुका त्यांच्या मतदारांपासून इतक्या लांब गेल्या आहेत की, आपला शिक्षक आणि पदवीधर आमदार कोण, हेही त्या मतदारांना माहीत नसते.

लोकशाहीमध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे महत्त्व आहेच. त्यातून अगदी अल्पशिक्षित व्यक्तीलाही राज्यकर्ता बनण्याची संधी मिळते, हे या व्यवस्थेचे वेगळेपण आहे. पण म्हणून सुशिक्षित वा उच्चशिक्षितांना संधी मिळू नये, असा याचा अर्थ नाही. अशी संधी राज्यसभा आणि विधान परिषदेसारख्या सभागृहांमुळे उपलब्ध होते. राज्यकर्ते आणि कल्याणकारी राज्याची व्यवस्था कशी असावी, हे सांगताना प्लेटो म्हणतो- ‘विचारी, बुद्धिमान आणि तत्त्ववेत्ते राज्यकर्ते बनत नाहीत, तोपर्यंत शहरांची त्रासापासून पूर्ण मुक्तता होणार नाही.’ म्हणून तत्त्ववेत्त्यांना सामावून घेणाऱ्या सभागृहांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

भुकेचा हुंकार कोण ऐकणार?



नुकताच जगातिक भूक निर्देशांकात भारतामध्ये भूक व पर्यायाने उपाशी राहण्याचे प्रमाण व त्या संबंधीची विविध आकडेवारी जाहीर झाली . या आकडेवारीत भारत १२७ देशांपैकी १०५ क्रमांकावर आहे व भारताला मिळालेले २७.३ हे गुणांकन गंभीर व ‘तातडीने नोंद घेण्या सारखे’ या प्रकारात मोडते. साधारण हे गुणांकन ९.९ एवढेच कुठल्या ही राष्ट्राला असणे अपेक्षित आहे. in data resides devil अशी एक इंग्रजी म्हण आहे. अर्थात विदे ( data ) आणि आकडेवारी मध्ये एक राक्षस लपलेला असतो. देशाच्या व राज्याच्या बालक व महिलांच्या आरोग्य समस्यांचा राक्षस नुकत्याच जाहीर झालेल्या भूक निर्देशांकातून डरकाळी फोडतो आहे. प्रश्न हा आहे कि ही डरकाळी व रोज उपाशी झोपणाऱ्यांचा भुकेचा हुंकार कोणी ऐकतो आहे का ?

सर्व प्रथम जागतिक भूक निर्देशांक म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. जसे आपण दरडोई उत्पन्न हे राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे मानक समजतो तसे जागतिक भूक निर्देशांक हा देशातील लहान मुले, माता व एकूण राष्ट्राच्या पोषणाचे प्रमुख मानक ठरते . हा निर्देशांक काढताना मुख्य चार घटक गृहीत धरले जातात.

१. किती मुलांची वाढ खुंटली म्हणजे पांच वर्षाखालील दीर्घ कालीन कुपोषणमुळे उंची वया पेक्षा कमी असलेल्या मुलांचे प्रमाण – ३५.५ %

२. कमी पोषण किंवा गरज आहे त्या पेक्षा कमी उष्मांक मिळणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण – १३.७ %

३.बारीक मुलांचे प्रमाण म्हणजे पाच वर्षांखालील वय व उंचीच्या प्रमाणात वजन कमी असलेल्यांचे प्रमाण – १८.७ %

४. बाल मृत्यू म्हणजे पाचव्या वाढदिवसा आधी मृत्यू होणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण – ३ %

हे प्रमाण अधिक गंभीर असण्याचे कारण म्हणजे शासनाकडून महिला व बाल विकास ही स्वतंत्र व अवाढव्य निधी असलेली मंत्रालये देश तसेच राज्य पातळीवर कित्येक वर्षांपासून चालवली जातात. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, पोषण अभियान, पी एम गरीब कल्याण योजना, मध्यान्ह भोजन , एकात्मिक बाल विकास, शालेय आरोग्य अशा एक न अनेक योजना वर्षानुवर्षे चालवल्या जातात. त्यांच्या जाहिरातींवर ही भरमसाठ खर्च केला जातो पण तरीही जागतिक भूक निर्देशांकात म्हणावी तशी सुधारणा का होत नाही याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन काय करायचे राहून गेले ? व आहे त्यात सुधारणा काय ? हे होताना दिसत नाही.

या आकडेवारीला महिला व बाल कल्याण मंत्रालयाचा पहिला प्रतिसाद हा होता कि मोजमापाची पद्धत चुकली आहे. एका दृष्टीने हे बरोबर आहे कारण ती पद्धत अजून अचूक असती तर हे आकडेवारी अजून भयानक व वाढून आली असती. बाल व माता आरोग्य विषयीचे पहिले दुखणे हेच आहे कि देशाला अजून मुलांची वाढ कशी मोजायची हेच माहित नाही. मुलांची वाढ व विकास मोजण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे जे वाढीचे तक्ते शासन दरबारी वापरले जातात ते भारतासाठी अयोग्य आहेत. भारताने ( icmr ) बनवलेले वाढीचे तक्ते हे जेमतेम २००० मुलांच्या सर्वेक्षणा अंती बनवलेले व शहरी अभिजन वर्गासाठी आहेत. म्हणून देशभर सर्वेक्षण करून आपल्या मुलांसाठी योग्य असतील असे वाढीचे तक्ते तयार करून देशात या चार घटकांचे प्रामाणिक मोजमाप करणे ही माता व बाल आरोग्याचे प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी असेल .

या समस्येचे मूळ हे आई गरोदर असते तेव्हा पासून होते. आईच्या गर्भात बीजारोपण होते त्याच्या तीन महिने आधीच फोलिक अॅसिडच्या गोळ्या सुरु करणे आवश्यक असते. ही तर खूपच पुढची व माता आरोग्याचा अम्रित काल वगैरे सुरु होईल तेव्हाची पायरी झाली. किमान सर्व गरोदर स्त्रियांचे योग्य वजन, हिमोग्लोबिन व त्यांना गरोदर असताना आरोग्य सुविधांची उपलब्धता व प्रसूती साठी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञाची सेवा या चार आघाड्यांवर ही अजून आम्ही पूर्ण यश मिळवू शकलेलो नाही. म्हणून कमी वजनाची व आजारी नवजात शिशूंचे प्रमाण चिंताजनक आहे. लाखांच्या विम्याच्या वल्गना राज्यकर्ते भाषणात करतात तेव्हा प्रत्येक स्त्रीला मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा देणारी प्रसूतीची सुविधा ही आपण देऊ शकलेलो नाही याचे भान आपल्याला नाही.


बाल आरोग्य व पोषण हा विषय सत्ताधारी नेते व प्रशासन यांच्या तावडीतून सोडून तो डॉक्टरांच्या हाती देणे आवश्यक आहे. डॉक्टर म्हणजे सरकारी नोकरीतील होयबा डॉक्टर नव्हे तर स्वायत्तता असलेले डॉक्टर सांगतील ती पूर्व दिशा असे ठरवावे लागेल. जन्म झालेल्या प्रत्येक बाळाची जन्म तारीख , वजन व उंची यांची एका मध्यवर्ती संगणकीय नोंदणी पद्धतीने नोंदवणे आवश्यक आहे व यातून एक हि बाळ सुटता कामा नये . लहान मुलांमधील पोषणासाठी पहिला महिना , पहिले वर्ष , १ ते ३ वर्ष व ३ ते ५ वर्षे असे चार वेगळे कृती आराखडे गरजेचे आहेत. ही मुले वाढीच्या तक्त्यावर घसरून कुपोषणाच्या निसरड्या वाटेवर घसरण्याची प्रक्रिया ही काहींमध्ये दिसागाणिक मुंगीच्या पावलाने असते तर काहींमध्ये एखादा आजार जडल्यावर अचानक असते. सुधारित व योग्य वाढीच्या तक्त्यावर बाळाच्या वजनाचा आलेख मांडला व तो योग्य असेल तर ते आरोग्याच्या रस्त्यावर पुढे चालले आहे असे वैद्यकीय भाषेत म्हंटले जाते. हे करणे इतके सोपे आहे कि शिकवले तर जेमतेम लिहिता वाचता येईल अशी आई ही हे करू शकेल. या तक्त्यालाच रोड टू हेल्थ म्हंटले जाते. देशात वाघ व हत्तींना टॅग केले जाते आहे. मग कुपोषित बालकांना टॅग करून कोणाची स्थिती काय आहे हे जाणून कुपोषणावर तातडीचे उपचार का शक्य नाही ? याचे साधे उत्तर आहे कारण या वैद्यकीय दृष्ट्या योग्य असलेल्या गोष्टी कुठल्या ही शासकीय योजनेत बसत नाहीत. कुपोषित बालके ही सोबत उभे करून फोटो काढण्याची नव्हे तर तातडीने उपचार करण्याची अत्यंत गंभीर गोष्ट आहे हे वैद्यकीय सत्य शासन ७८ वर्षे झाली तरी स्विकारण्यास तयार नाही. कुपोषणाच्या उपचाराला फक्त निधी नव्हे तर पोषणाचे साधे नियम व प्रत्येक आई – बाळा पर्यंत ते पोहोचवून त्याचे कृतीत रुपांतर करण्याची इच्छाशक्ती हवी. आजारी असलेल्या प्रत्येक बालकाला पहिल्या दिवशी उपचार एवढ्या एका साध्या गोष्टीने एका ही बाळाचा मृत्यू होणार नाही व जागतिक भूक निर्देशांक जाहीर होतो तेव्हा मान खाली घालण्याची वेळ येणार नाही.

या निर्देशांका निमित्त एक महत्वाची गोष्ट या अहवालात नमूद केली आहे. दरडोई उत्पन्न आणि भुकेची पातळी याचा काही एक संबंध नाही. म्हणून धोरण पातळीवर ‘ नाही रे’ वर्गा कडे लक्ष द्या असे या अहवालाने भारतासह अनेक देशांना बजावले आहे. देश कसा आर्थिक प्रगती करतो आहे याचे आकडे राहू दया , देशातील पाचव्या वर्षा नंतर किती मुले जिवंत आहेत व आहेत त्यांची स्थिती काय हे ते सांगा – असे राज्य कर्त्यांना डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारण्यास भाग पाडणारा हा जागतिक भूक निर्देशांक आहे . वैद्यकीय संशोधन सांगते कि कुपोषण हे जनुकांवर थेट परिणाम करून पुढील काही पिढ्यांच्या बुध्यांकावर थेट दुष्परिणाम करते. शासन व प्रशासनाच्या धोरण व बौद्धिक दिवाळखोरी मुळे शेवटच्या घटकाच्या या जीनोसाईड चे काय ? या प्रश्नाचे उत्तर शासनाला द्यावे लागेल. कारण जागतिक भूक निर्देशांक हा केवळ आकडा नव्हे तर मारणाऱ्या , खुंटलेल्या लाखो बालकांच्या भुकेचा हुंकार आहे.

-डॉ. अमोल अन्नदाते
……………………………………………………

आपल्या लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक कुठे मिळेल? – डाॅ. अमोल अन्नदाते

दैनिक दिव्य मराठी रसिक पुरवणी

आपल्या लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक कुठे मिळेल?

डाॅ. अमोल अन्नदाते

     विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस उरले असताना राज्यभरातील लोक आपली कामे मार्गी लागण्यासाठी मंत्रालयात आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे घामाच्या धारा वाहत असतानाही मंत्रालयाच्या दारावर लागणाऱ्या रांगेने उच्चांक केला आहे. सत्ताधारी असो की विरोधक; सर्वसामान्यांना कुणीही उत्तरदायी राहिले नसल्याची भावना या रांगेतील काही जणांकडून व्यक्त होते. अशा स्थितीमुळे लोकप्रतिनिधींना मतदारांप्रति उत्तरदायी कसे बनवायचे, हा एक जटिल आणि संशोधनाचा विषय बनला आहे.

या मागील सर्वात मोठे कारण म्हणजे, जी जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते, तिला त्यांचे उत्तरदायित्व कसे जोखायचे, हेच माहीत नसते. हॉटेल, रुग्णालय असो वा सनदी लेखापाल, वकिलांसारख्या सेवा; जिथे विशिष्ट शुल्क आकारले जाते, तिथे ती सेवा समाधानकारक, उपयुक्त होती की नाही, हे ठरवण्याची काही मापके तरी असतात. पण, लोकप्रतिनिधीचे काम वा त्याने केलेल्या सेवेचे मूल्यांकन करण्याची बहुतांश मापके भावनिक असतात. मात्र, ती बाजूला सारून आपल्या लोकप्रतिनिधीच्या कामांचे वर्षातून एकदा आणि पाच वर्षानंतर त्याचा कार्यकाळ संपताना वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले पाहिजे. प्रत्येक तालुक्याने गावात अशी एक अराजकीय समिती बनवायला हवी, जी कोणाचीही बाजू न घेता लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक गावाला सादर करेल.

ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत कुठल्या कक्षेत निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची नेमकी जबाबदारी काय आहे, हे आधी त्या लोकप्रतिनिधींना आणि मग मतदारांनाही समजावून सांगितले गेले पाहिजे.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या मुख्य चार सभागृहांचे कामकाज व त्यात आपल्या लोकप्रतिनिधींचा असलेला सहभाग, तो कुठले प्रश्न मांडतो आहे, कुठले नाही, हे एक महत्त्वाचे मापक आहे. अमुक एक प्रश्न सभागृहात मांडला गेला पाहिजे, असा आग्रह आपण आपल्या आमदार, खासदार किंवा विरोधी पक्ष नेत्यांकडे कधी धरतो का? सभागृहांचे कामकाज या विषयावर ‘संपर्क’ या संस्थेने अभ्यास करून सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे. विधानसभेच्या पाच वर्षांत एकूण १२ अधिवेशने झाली. कोरोना काळामुळे तीन अधिवेशने होऊ शकली नाहीत. विधानसभेत या पाच वर्षांत केवळ १३१ दिवसांचे कामकाज झाले. साधारण असे संकेत आहेत की, एका वर्षात किमान १०० दिवस तरी सभागृहाचे कामकाज चालले पाहिजे. म्हणजे एका वर्षात जेवढे कामकाज व्हायला पाहिजे तेवढे आपल्याकडे पाच वर्षांत झाले आहे. दुसरीकडे, विधिमंडळ समित्यांचे कामच या पाच वर्षात झाले नाही, हेही चिंताजनक आहे. या समित्यांच्या बैठका म्हणजे वर्षभर चालणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांचे गट असतात, जे एकत्रित अभ्यास करून सरकारला राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सल्ला देतात. पण, इतक्या महत्त्वाच्या कामाचे उत्तरदायित्व स्वीकारायला कुणी तयार नाही.
सभागृहात विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप बघितले, तर बालके, आरोग्य अशा कळीच्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांचे प्रमाण ५ ते ७ टक्के एवढे कमी आहे. बऱ्याच प्रश्नांची भाषा बघितली की, लक्षात येते ते विशिष्ट हेतू ठेवून, काही मिटवण्यासाठी विचारले गेले आहेत. विधिमंडळात विचारले जाणारे प्रश्न आणि त्यातील छुपे हितसंबंध हा तर आणखी वेगळा विषय आहे. सामान्यपणे विरोधी पक्षांकडून जास्त प्रश्न विचारले जाणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून तुलनेने कमी प्रश्न उपस्थित केले गेल्याचे दिसते आणि ही अधिक गंभीर बाब आहे. समाज मंदिरे उभारणे, विजेच्या दिव्यांचे खांब उभारणे आणि गावात पेव्हर ब्लॉक बसवणे एवढेच आमदारांचे काम नाही, हेच मतदार म्हणून आपल्याला माहीत नाही. म्हणून राज्यातील २८८ मतदारसंघांशी संबंधित प्रश्नांसाठी पाच वर्षांत विधिमंडळाचे केवळ १३१ दिवस दिले जातात आणि त्यातूनही असंख्य प्रश्न निकाली निघत नाहीत. या स्थितीची आपल्याला मतदार आणि सामान्य नागरिक म्हणून चिंता वाटायला हवी.

आमदार आणि खासदारांना दर वर्षी मतदारसंघाच्या विकासासाठी काही कोटींचा निधी दिला जातो. पण, हा निधी विकासकामांपेक्षा आपल्या कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनवर्सन करण्यासाठीच वापरला जातो, हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. कित्येक राज्यसभा खासदारांचा निधी तर वापरलाही जात नाही. लोकशाहीचे बलस्थान म्हणून एकीकडे आपण माहिती अधिकाराच्या गप्पा आपण मारत असतो, पण आमदार-खासदारांचा निधी कसा खर्च झाला? कोणामार्फत खर्च झाला? खर्च झाला नसेल, तर का नाही झाला? याची कुठलीही माहिती उपलब्ध नसते. हजारो कोटींचा निधी दिल्याच्या जाहिराती होतात, होर्डिंग लावले जातात, पण प्रत्यक्षात काम काहीच दिसत नाही आणि आपल्या करामधून गोळा झालेला हा निधी गेला कुठे, हे मतदारांनाही कळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींविषयी अतिलोभ वा अतिद्वेष या दोन्ही प्रकारच्या भावना दूर ठेऊन, ते जनतेप्रति किती उत्तरदायी राहिले? त्यांच्या कामांमुळे आपला तालुका, जिल्हा आणि राज्याने किती विकास केला? या गोष्टींचे मूल्यमापन त्यांचे प्रगतिपुस्तक पाहून नागरिकांनी केले पाहिजे.
……………………………………………………………………………………….
https://www.facebook.com/DrAmolAnand
https://www.instagram.com/dramolanand
https://x.com/DrAmolAnand
www.amolannadate.com

9421516551

MBBS जागा वाढल्या; पण शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय? – डाॅ. अमोल अन्नदाते

दैनिक लोकमत

MBBS जागा वाढल्या; पण शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय?

डाॅ. अमोल अन्नदाते

देशात डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागा वाढल्या पाहिजेत हे निर्विवाद! पण सुयोग्य नियोजन नसेल, तर आजारापेक्षा उपाय भयानक ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नव्याने परवानगी मिळालेल्या मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा आणि हिंगोली अशा दहा नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बुधवारी ऑनलाइन उद्घाटन केले. यामुळे राज्यात एमबीबीएसच्या ९०० नव्या जागांची वाढ झाली आहे. पण यामागच्या प्रशासकीय बाबी तपासल्या तर जागा वाढल्याच्या आनंदापेक्षा या महाविद्यालयातील डॉक्टर कुठल्या गुणवत्तेचे असतील याची काळजीच वाटते. 

किमान पात्रता निकष पूर्ण झालेले नाहीत म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या सर्व महाविद्यालयांना परवानगी नाकारली होती. तरीही किमान पायाभूत सुविधा व शिकवण्यासाठी अध्यापकांचा अभाव असताना ‘हे निकष आम्ही पूर्ण करू’ अशा प्रतिज्ञापत्रावर या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. यातून रुग्ण व अध्यापकांशिवाय वैद्यकीय शिक्षण, असा वैद्यकीय शिक्षणाचा अजब व घातक ‘महाराष्ट्र पॅटर्न’ जन्माला येतो आहे.

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रशासकीय कामकाजाची सूत्रे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे आहेत. संचालक हंगामी पदावर, तर पूर्ण वेळ संचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक, विभागीय उपसंचालक अशी सर्व पदे रिक्त आहेत; ही या संचालनालयाची सध्याची अवस्था. वाढत्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन त्यासाठी पुरेशा प्रशासकीय यंत्रणेची व्यवस्था नाही. जुलै महिन्यात उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे आधी अस्तित्वात असलेल्या २५ पैकी १४ वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण वेळ अधिष्ठाता नव्हते. नंतर काही नियुक्त्या झाल्या असल्या तरी बऱ्याच अधिष्ठात्यांकडे दोन महाविद्यालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

केईम, जेजे, सायन, नायर, नागपूर या वैद्यकीय महाविद्यालयांची जागतिक कीर्ती ही तिथल्या डॉक्टर शिक्षकांमुळे आहे. आज दहा नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असताना सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांची एकूण मंजूर पदे ३,९२७ एवढी असून यातील १,५८० पदे (तब्बल ४५ टक्के) रिक्त आहेत. याशिवाय परिचारिका व तंत्रज्ञांची ९,५५३ पदांपैकी ३,९७४ पदे रिक्त आहेत. पुरेशा मनुष्यबळाशिवाय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा दुष्परिणाम केवळ वैद्यकीय शिक्षणच नव्हे तर या महाविद्यालयांना संलग्न रुग्णालयातील रुग्ण सेवेवरही होतो. कारण शिकवण्यासाठी व उपचारासाठी असलेले डॉक्टर एकच असतात. त्यातच जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेले निवासी डॉक्टर तरी रुग्णसेवेची धुरा सांभाळतात. पण नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणच सुरू झालेले नाही, म्हणून एवढ्या रिक्त जागा असताना इथे रुग्णांवर उपचार करणार कोण?

२ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू, तर ठाणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका रात्रीत १८ मृत्यू झाल्याची घटना देशभर गाजली. एक वर्षापूर्वी घडलेल्या घटनेनंतरही नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नियोजनात मनुष्यबळ व्यवस्थापनाचा विचार दिसत नाही. वैद्यकीय महाविद्यालये सुरू करताना बरीच जिल्हा रुग्णालये त्यांना संलग्न करण्यात आली आहेत. १९९९ साली आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वेगळा केला तेव्हा रुग्णसेवेची पर्यायी फळी राज्यात निर्माण व्हावी, हा एक हेतू होता. पण आरोग्य विभागाची आधीच गोंधळात असलेली रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालये वापरणार असतील तर वैद्यकीय शिक्षण विभागाची नवी रुग्णालये उभी राहणार कशी?

एका महाविद्यालयासाठी ४०३ कोटी रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात येते आहे. प्रत्यक्षात शिक्षकांचे पगार व इतर सर्व बाबींची पूर्तता एवढ्या कमी निधीत होणे शक्य नाही. तसेच महाविद्यालय चालवण्यासाठी येणाऱ्या वार्षिक १५० कोटी खर्चाची तरतूद नाही. वैद्यकीय शिक्षणाला गेल्या ५ वर्षात मिळालेला निधी पाहिल्यास एवढ्या खर्चाची तरतूद येणार कुठून, असा प्रश्न पडतो. एमबीबीएसच्या जागा वाढल्या पाहिजेत, हे निर्विवाद! पण हे करताना सुयोग्य नियोजन नसेल, तर आजारापेक्षा उपाय भयानक अशी अवस्था होईल.
……………………………………………………………………………………………………..
https://www.facebook.com/DrAmolAnand
https://www.instagram.com/dramolanand
https://x.com/DrAmolAnand
www.amolannadate.com

9421516551

‘एक देश – एक निवडणूक’ किती साधक, किती बाधक – डाॅ. अमोल अन्नदाते

amol annadate

‘एक देश – एक निवडणूक’ किती साधक, किती बाधक
(आजच्या दै. दिव्य मराठी रसिक पुरवणीतील माझा लेख)

लोकशाही देशात सतत नवीन कायदे, नियम, विधेयके बहुमताने संमत होत असतात. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर परिणाम करीत असतात. जीएसटी विधेयक मंजूर झाले तेव्हा आपण त्या विषयीचे आपले मत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, लोकप्रतिनिधी यांना कळवले होते का? आपले मत कळवून काय होणार आहे? आपले मत त्यांनी विचारात घेण्यासाठी आपण तज्ज्ञ आहोत का? असा तुमचा समज असू शकतो. पण, देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला संसदेत मांडल्या जाणाऱ्या प्रत्येक विधेयकावर मत असायाला हवे. ते आपल्या लोकप्रतिनिधींना भेटून किंवा देशाच्या सरकारमधील शीर्षस्थ नेतृत्वाला पत्र, इ मेल वा समाजमाध्यमाद्वारे कळवायला हवे.

आता ‘एक देश – एक निवडणूक’ हे असेच एक नवे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व निवडणुका एकाच वेळी घेणे, ही या मागील संकल्पना आहे. ती का गरजेची आहे, या विषयीचा अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच सरकारला सादर केला आहे. सध्या देशात वेळोवेळी विविध निवडणुका या त्या सरकारचा वा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपल्यावर घेण्यात येतात. एकाच वेळी निवडणुका घेण्याने त्यावर होणारा यंत्रणेचा खर्च, राजकीय पक्षांचा होणारा खर्च वाचेल, अशी भूमिका मांडली जात आहे. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या निमित्ताने सतत आचारसंहिता सुरू राहिल्याने विकासाच्या कामांमध्ये खीळ बसते, असाही युक्तिवाद एक देश – एक निवडणुकीच्या संदर्भात केला जातो.

‘एक देश – एक निवडणुकी’विषयी प्रत्येकाने आपण कुठल्या पक्षाचे समर्थक आहोत, हे बाजूला ठेवून देशासाठी हिताचे काय आहे, या विषयी मत बनवायला हवे. त्यासाठी वर्तमानपत्रातील या विषयीचे लेख वाचणे, वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐकणे, त्यावर तज्ज्ञांशी बोलणे या गोष्टी करतानाच, एकूणच या संकल्पनेचा आपल्या लोकशाहीवर, देशावर काय परिणाम होणार आहे, हे जाणून घ्यायला हवे. संसदेत वा राज्याच्या विधानसभेत येणाऱ्या प्रत्येक विधेयकाविषयी आपण या प्रकारे आपले मत बनवले पाहिजे. ते बाजूने किंवा विरोधात असू शकते, पण ते असणे महत्त्वाचे आहे.

या संकल्पनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, हे विधेयक लागू झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा एकाच वेळी सर्व निवडणुका होतील, त्यावेळेपर्यंत ज्या राज्य सरकारांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आधीच संपला आहे, त्यांना वाट पाहावी लागेल. तर, ज्यांचे कार्यकाळ संपणे बाकी आहे, त्यांच्या विधानसभा विसर्जित करुन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल. परिणामी प्रशासनाची गती कमी होईल. विकासकामांवर त्याचा परिणाम होईल. या संकल्पनेप्रमाणे निवडणुका झाल्यावर काही दिवसांतच एखाद्या राज्याचे सरकार कोसळले, तर पुन्हा पाच वर्षे निवडणुकीसाठी थांबावे लागेल का आणि त्या स्थितीत तिथे राष्ट्रपती राजवट लागू होऊन कारभार प्रशासनाकडे जाईल का, ही प्रश्नही महत्त्वाचा आहे.

निवडणूक खर्चाचा मुद्दा विचारात घेतल्यास, २०२२ – २३ मध्ये निवडणूक आयोगाला ३२० कोटी रुपये, तर २०२३- २४ मध्ये ४६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. निवडणूक खर्चात राज्य सरकारेही वाटा उचलतात. देशातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत किमान एवढा खर्च निवडणुकांवर करावाच लागणार. कारण या निवडणुकांवरच लोकशाहीचे अस्तित्व टिकून आहे. राजकीय पक्षांच्या खर्चाबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी निवडणुकीतील अवास्तव खर्च स्वतःवर लादून घेतला आहे. समाजमाध्यमांच्या युगात अवाढव्य खर्च करून, लाखांच्या सभा घेऊन तासन् तास भाषण करण्याचे दिवस आता गेले आहेत, हे वास्तव कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारायला तयार नाही. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर राजकीय पक्ष त्यांना मिळणारा हजारो कोटींचा निधी रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य यासाठी देणार आहेत का, हाही कळीचा प्रश्न आहे.

लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्यात आधीच कमकुवत असलेल्या देशात किमान वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकीत लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळते. मतदार बऱ्याचदा केंद्र सरकारच्या धोरणांविषयी राज्याच्या निवडणुकीत व्यक्त होतात. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या निवडणुका दोन्हीकडील सत्तांवर अंकुश ठेवण्यास पोषक ठरतात. निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या निवडणुका एकत्रित घेण्याचे अधिकार आहेत. हा काळ सहा महिन्यांवरून फार तर एक वर्ष करण्यात येऊ शकतो. शिवाय, एक किंवा दोन महिने चालणाऱ्या निवडणुका १५ दिवसांत एकाच टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात.

‘एक देश – एक निवडणूक’ संकल्पनेत एक धोका आहे तो म्हणजे, राष्ट्रीय पक्षांना याचा काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. पण, स्थानिक, प्रादेशिक पक्षांचेही लोकशाहीत वेगळे महत्त्व आहे. ते टिकवून ठेवणे हाही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. एकत्र निवडणूक घेतल्याने सततच्या आचारसंहितेमुळे विकास प्रक्रियेला येणारा अडथळा टळू शकतो, हा मुद्दा मात्र जनतेच्या फायद्याचा आहे. या आणि अशा सर्व साधक-बाधक गोष्टी समोर ठेवून ‘एक देश – एक निवडणूक’ ही संकल्पना आपल्या लोकशाहीला नेमक्या कुठल्या दिशेने घेऊन जाईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण हा प्रश्न आपल्या मताचा म्हणजे लोकशाहीतील सर्वांत महत्त्वाच्या आयुधाचा आहे.

(या विषयावरील आणि लेखातील माझ्या मतांबाबत तुमची मते कमेंटमध्ये जाणून घ्यायला आवडतील.)

लोकशाहीचा तिसरा स्तंभ किती मजबूत? – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

लोकशाहीचा तिसरा स्तंभ किती मजबूत?

डॉ. अमोल अन्नदाते

कुठल्याही देशातील लोकशाहीच्या सक्षमतेचे सर्वांत महत्त्वाचे मापक ही त्या देशाची न्यायव्यवस्था असते. आपली लोकशाही सक्षम असल्याच्या आपण कितीही गप्पा मारल्या, तरी न्यायव्यवस्थेत निश्चितपणे न्याय मिळतो किंवा मिळाला तर तो वेळेत मिळतो, याच्याशी सगळेच सहमत असू शकत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, स्वातंत्र्याच्या वेळी जी सुधारित न्यायव्यवस्था अमलात आली, ती आज वाढलेली लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या तुलनेत अपुरी आहे व ती पुरेशी प्रगतही नाही. आपल्याला निश्चितपणे न्याय मिळू शकतो, ही भावना आणि आत्मविश्वास देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजत नाही, तोपर्यंत भारतीय लोकशाही अपूर्ण आहे, असे म्हणावे लागेल.

न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना गुन्हेगारांवर हल्ले होणे, त्यांची हत्या होणे अशा गोष्टी गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. अलीकडे तर सर्वसामान्य जनता आणि नेतेही, ‘गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच शिक्षा देतो,’ असे म्हणू लागले आहेत. अशा मागण्या आणि कृत्ये लोकशाहीतील अस्वस्थता दर्शवतात आणि त्या भविष्यातील अराजकाच्या हाका असतात. पण, त्यामागील कारणही तसेच आहे. गेल्या वर्षी प्रयागराज येथे माजी खासदार असलेला कुख्यात गुंड अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची पोलिस कोठडीत वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना हत्या झाली. त्या अगोदर त्यांची केस वेगवेगळ्या न्यायाधीशांनी ३८ वेळा ‘नॉट बिफोर मी’ म्हणत दुसऱ्या न्यायाधीशांकडे दिली होती. कायदा हातात घेण्याची प्रक्रिया ही अशी न्यायदानाच्या विलंबातून निर्माण होते.

जगभरातील न्यायदानाच्या स्थितीचा अभ्यास केल्यास, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणांची संख्या भारतात असल्याचे लक्षात येते. आज भारतात ३० दशलक्ष प्रकरणे न्यायदानाच्या प्रक्रियेत आहेत. त्यातील ४ दशलक्ष खालच्या कोर्टात, तर ६५ हजार प्रकरणे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. न्यायदानाच्या या संथ प्रक्रियेमुळे गुन्हे दाखल असणाऱ्यांच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. सध्या कारागृहांमधील सर्वाधिक कैदी ‘अंडर ट्रायल’ म्हणजे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या किंवा सुटकेच्या म्हणजेच न्यायदानाच्या प्रतिक्षेत असलेले आहेत. ही संख्या इतकी जास्त आहे की कैदी ठेवण्यासाठी आज कारागृहेच उपलब्ध नाहीत. स्वातंत्र्यानंतर देशात मोठ्या कारागृहांची निर्मिती झालेली नाही.

दुसरीकडे, न्यायदान उशिरा होत असल्याने गुन्हा सिद्ध होऊ न शकलेले आणि जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा तेच ते गुन्हे करत असल्याचे दिसते. अनेक श्रीमंत गुन्हेगार नामवंत वकिलांच्या मदतीने मोठ्या गुन्ह्यातूनही सहज सुटत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पण, वकिलांचा आणि एकूणच न्याय मिळवण्यासाठीचा खर्च न परवडणारे अनेक निर्दोष कारागृहात अनेक वर्षे खितपत पडतात. त्यामुळे ‘न्याय’ ही अधिकार म्हणून लोकशाहीत मिळणारी नैसर्गिक गोष्ट नव्हे, तर श्रीमंतांना सहज विकत मिळणारी गोष्ट असल्याची धारणा जनतेमध्ये दृढ होत आहे. त्याचवेळी न्यायाधीशांच्या नेमणुका आणि कामातील पारदर्शकता यावरही वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेतील व्यक्तींनी न्यायव्यवस्थेला प्रभावित करु नये म्हणून लोकशाहीत न्यायालयांची स्वायत्तता टिकवून ठेवण्याची तरतूद करून ठेवली आहे. पण, बऱ्याच प्रकरणांमध्ये सत्तास्थानांकडून झालेल्या चुकांवर अंकुश ठेवण्यास न्यायालये कमी पडत असल्याचे चित्र दिसते.

स्वातंत्र्याच्या आधी या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी सहज वाकवता येईल आणि सर्वसामान्य माणसावर सत्तेचा ताबा राहील, अशा न्यायव्यवस्थेची रचना केली होती. त्यामुळे न्यायाधीशांना समाजामध्ये मिसळण्याची संधी नव्हती. बऱ्याच देशांतील न्यायप्रक्रियेत समाजातील लोकांचाच समावेश आहे. ब्रिटिशकाळापासून सुरू असलेल्या भारतीय न्यायव्यवस्थेत मात्र अशा गोष्टींना स्थान नाही. आज तंत्रज्ञानाच्या नवनवीन साधनांमुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटवर चालणाऱ्या साधनांमुळे काम साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष भेटींची गरज जवळपास संपली आहे. न्यायदान मात्र या सर्व साधनांच्या मागे आहे. ‘फास्ट ट्रॅक’ हा शब्द गंभीर गुन्ह्यात वापरला जातो, पण सर्वच प्रकरणासाठी न्यायालये ३६५ दिवस चालतील, या दिशेने आजवर कुठलेही पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही.

गेल्या दोन दशकात पुढे आलेल्या सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीच्या प्रकरणांत न्यायदान करताना न्यायव्यवस्था तोकडी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांना कायद्याविषयी भीतीच राहिलेली नाही. कुठलाही देश राहण्यायोग्य आहे की नाही हे ठरवणाऱ्या अनेक घटकांपैकी महत्त्वाचा घटक म्हणजे तिथले न्यायदान होय. आज सिंगापूरसारख्या छोट्या देशांनीही पारदर्शक, जलद न्यायप्रक्रिया राबवून चांगले उदाहरण घालून दिले आहे. पण, भारतासारख्या मोठ्या लोकशाहीतील ‘न्यायपालिका’ हा तिचा तिसरा स्तंभ मजबूत नसणे लोकशाहीच्या इमारतीसाठी धोकादायक आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

स्त्रियांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांचे राजकारण – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

स्त्रियांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांचे राजकारण

डॉ. अमोल अन्नदाते



                    कोलकाता येथील महिला निवासी डॉक्टरची अमानुष अत्याचारानंतर झालेली हत्या आणि बदलापूरमध्ये अवघ्या ४ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार या दोन घटनांनी सध्या समाजमन ढवळून निघाले आहे. कुठल्याही देशात लहान मुले आणि स्त्रिया हिंसेच्या सर्वाधिक बळी ठरतात. विशेषत: लैंगिक शोषणाचे सगळ्यात जास्त गुन्हे स्त्रिया आणि लहान मुलांच्या बाबतीत घडतात. जे प्रतिकार करू शकत नाहीत, अशांना पहिल्यांदा संरक्षण देणे, हे लोकशाही देशातील राज्यघटनांचे प्राधान्याचे आणि महत्त्वाचे तत्त्व असते. आज आपल्या देशात दरदिवशी बलात्काराच्या सरासरी ८६ घटना घडतात. तसेच ३० टक्के लहान मुलांना कधी ना कधी लैंगिक शोषण आणि या स्वरुपाच्या गुन्ह्यांचा अनुभव येतो.

देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलांच्या विरोधात गुन्हे घडत असतील, त्यांच्या हक्कांचे तत्त्व पायदळी तुडवले जात असेल, तर ही गोष्ट लोकशाहीला निश्चितच शोभणारी नाही. अत्याचाराच्या अशा घटनांनंतर.. ‘बलात्काऱ्यांना भरचौकात फाशी द्या’, “त्यांना आमच्या ताब्यात द्या’, ‘त्यांचे हात-पाय तोडा,’ या प्रकारची वक्तव्ये केवळ समाजातूनच नव्हे, तर नेत्यांकडूनही केली जातात. समाजात कायद्याची भीती नसणे आणि संथ न्यायदान या गोष्टी अशा प्रतिक्रियांना जबाबदार असतातच; पण त्याशिवाय समाजातील ही भीती कमी होण्याला आणखी काही गोष्टी कारणीभूत असतात.

महिला-मुलींवरील अत्याचाराच्या, हत्येच्या प्रत्येक घटनेनंतर.. ‘या घटनेचे राजकारण होते आहे,’ हे असे एक वक्तव्य केले जाते. अशी घटना घडली की, या घटनेचे राजकारण होऊन आपली खुर्ची डळमळीत होईल याचीच सत्तेत असणाऱ्यांना जास्त काळजी असते. त्यातही एखादी घटना अत्यंत क्रूर, अत्याचाराचा कळस गाठणारी असेल, त्या घटनेबद्दल समाजात असंतोषाचा उद्रेक होताच सत्ताधारी आणि विरोधक तिची दखल घेण्यास सरसावतात. म्हणजे एकीकडे अनेक अत्याचार घडत असताना तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी यंत्रणा एखाद्या घटनेतील गुन्ह्याच्या तीव्र स्वरूपामुळे हलतात, पण त्या पीडितेची, त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी. एका अर्थाने, रोज अन्य लहान-मोठे गुन्हे घडत राहणे आणि त्यावर काही कारवाई न होणे ही गोष्ट जणू सर्वांनी गृहीतच धरली आहे. खरे तर ही भारतीय लोकशाहीची सर्वात जुनी जखम आहे आणि त्यावर तातडीने इलाज करण्याची गरज आहे.

रोज घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांविषयी कायद्याच्या पलीकडे तिथले नागरिक आणि राज्यकर्ते कसा प्रतिसाद देतात, यावरून लोकशाही देशात एक समाजमन आकाराला येत असते. गेल्या काही वर्षांत आपण गुन्ह्यांची आणि त्यातही बलात्कारासारख्या घटनांची जातीवरून, पक्षावरून, सत्तेत कोण आहे, कोण नाही यावरून विभागणी केली आहे. लोकशाही देशात अतिराजकारण होणे किंवा गरज नसलेल्या मुद्द्यांचे अति राजकीयीकरण होणे घातक असते. अशावेळी बलात्कारासारखे गुन्हे त्यापासून दूर ठेवून हे प्रश्न सोडवले पाहिजेत, याचा विसर आपल्याला पडला आहे.

कथुआपासून कोलकात्यापर्यंत आणि हाथरसपासून बदलापूरपर्यंत अशा अनेक घटना सांगता येतील, ज्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्या मुळापासून सोडवण्याऐवजी राजकरण करण्यातच धन्यता मानली आहे. महिला-मुली किंवा लहान मुलांवर अत्याचार झाले, त्यांचे लैंगिक शोषण झाले तर त्यावेळी काय भूमिका घ्यायची, ते आपण राजकारणात कुठल्या बाजूचे आहोत? सत्तापक्षाचे समर्थक आहोत की विरोधकांचे पाठीराखे आहोत? अत्याचार पीडित कोण आहेत? ते कुठल्या जाती-धर्माचे आहेत? या गोष्टी बघूनच ठरवले जाते. आणि दुर्दैवाने तशाच प्रकारचा संदेश समाजात सातत्याने जातो आहे.

कोलकाता प्रकरणात सुप्रीम कोर्टाला स्वत:हून दखल घेऊन हस्तक्षेप करावा लागला, ही राज्यघटना मानणाऱ्या लोकशाही देशातील यंत्रणांना मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. आज भारत हा जगाच्या दृष्टीने महिला-मुलींवरील अत्याचाराची, बालकांच्या लैंगिक शोषणाची आणि त्यापुढे जाऊन त्यांच्या अमानुष हत्यांची भूमी ठरतो आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी जितकी क्लेशदायक तितकीच लांच्छनास्पदही आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपल्या लोकशाहीच्या कायदेमंडळे, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांनी आणि त्यांच्या छताखालील भारतीय समाजाने अंतर्मुख होऊन आपल्यात तातडीने सुधारणा केली पाहिजे.

डाॅ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551

एक डॉक्टर की मौत – डॉ. अमोल अन्नदाते

dr amol annadate artical

दैनिक सकाळ

एक डॉक्टर की मौत

डॉ. अमोल अन्नदाते

    कोलकाता येथे घडलेल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेने (९ ऑगस्ट) देशभर संताप व्यक्त होतो आहे. वैद्यकीय क्षेत्राला या घटनेने अधिक असुरक्षित वाटू लागले आहे व  जगभर वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर या घटने विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राक्षसी अत्याचार झालेली मुलगी डॉक्टर असल्याने या घटनेला जोडून डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येणे सहाजिक आहे. पण ही घटना केवळ डॉक्टरां वर हल्ला इतकी मर्यादित नाही. स्वातंत्र्याच्या ७८ वया वर्षात आपण लोकशाही म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत असताना स्त्रियांवर होणार लैंगिक व इतर अत्याचार, कायद्याची संपलेली भीती , संथ न्यायदान, अशा घटनां बद्दल राजकीय कोडगेपणा , डॉक्टर व इतर बौद्धिक वर्गाला सतत दडपणाखाली व असुरक्षित वाटून वारंवार संपावर जावे लागणे या प्रश्नांना मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबा इतकाच प्रत्येक नागरिक अस्वस्थ वाटायला हवे. 

                          २०२२ च्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगाच्या आकडेवारीनूसार देशात दिवसाला ८० बलात्कारांची नोंद होते. एका नोंदी मागे न नोंदवलेले किमान १० बलात्कार असतात. म्हणजे जवळपास प्रत्येक क्षणाला देशात कुठेतरी बलत्कार तरी घडतो आहे किंवा त्याचे नियोजन तरी सुरु असते. कोपर्डी , दिल्लीतील निर्भया किंवा कोलकाताची अभया अशा टोकाचे अत्याचार झालेल्या घटना प्रकाशझोतात येतात व त्यावर काही काळ समाजात तीव्र असंतोष उफाळून येतो व काळ पुढे सरकतो तसा शांत होतो. पण गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपी सुटल्यावर त्यांचे जाहीर हारतुरे पेढे देऊन सत्कार झाले तेव्हा या गुन्ह्यांविषयी शासन , कायदा व्यवस्था फारशी गंभीर नाही हा संदेश समाजात खोलवर झिरपतो. कोलकाता घटने विरोधात डॉक्टरांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या डॉक्टरांवर ही मोठा समूह चाल करून गेला व त्यातील महिला डॉक्टरांना ही बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या . न्याय व्यवस्था आपले काहीही बिघडवू शकत नाही या टोकाच्या राक्षसी आत्मविश्वासातून आज गुन्हेगारांमध्ये जबरदस्त हिम्मत आली आली आहे. दिल्लीचे निर्भया प्रकरण होऊन एक तप उलटले व बलात्कारा संदर्भातील कायद्यात सुधारणा होईल अशा वल्गना झाल्या. पण सामाजिक परिणाम होऊन बलात्काराच्या घटना कमी करणारे कुठले ही बदल झाले नाहीत. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी  दर वर्षीच्या १०० कोटींच्या निर्भया निधीतून देशात स्त्रियांविरोधातील वर्षाला किमान १०० गुन्हे तरी कमी झाले का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. 

                          एका डॉक्टरच्या मृत्यूतून अजून एक भयान वास्तव पुढे आले आहे. इतके राक्षसी कृत्य होऊनही रुग्णालयाच्या प्रमुखांनी महिला डॉक्टरने एकट्याने खोलीत जाणे हीच चूक असल्याचे निलाजरे विधान केले. या घटने नंतर गुन्हा दडपण्याचे , गुन्हेगारांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. स्त्रियांविरोधात किती ही अमानुष लैंगिक अत्याचार झाले तरी यात विशेष काही नाही हा संदेश प्रमुख पदावर असणार्या व्यक्तींकडून सातत्याने दिला जातो. कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिकतेशी संबंधित छोटीशी कृती असली व ती खपवून घेतली जाते तेव्हा संदेश तोच असतो. यातूनच पुढे कोणाला तरी कोपर्डी, निर्भया, अभया असे स्त्रियांच्या आत्मसन्माना चा घोट घेण्याचे बळ मिळते. 

वैद्यकीय क्षेत्राची हताशा

            या घटनेमुळे डॉक्टरांची सुरक्षा मग ते पुरुष असो कि स्त्री हे शासनाच्या प्राधान्य क्रमावर का नाही ? या प्रश्नाने वैद्यकीय क्षेत्र हताश व निराश झाले आहे. सुरक्षेसह डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांकडे कोविड सारखे संकट येऊन ही दुर्लक्ष कमी झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आज डॉक्टर येण्यास इच्छुक नाहीत व मनुष्यबळाच्या तुटवड्या मुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व सर्वसामान्यांचे आरोग्य मृत्यू शय्येवर असून शेवटच्या घटका मोजते आहे.महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाल्यास आरोग्य विभागात उपकरणे खरेदी , नवी रुग्णालये उभारण्यावर कोट्यवधींचा खर्च सुरु आहे पण डॉक्टरांची २० हजार पदे रिक्त आहेत.  रुग्णालय हे अनेक वृत्तींच्या लोकांना एका गरजेच्या सक्तीतून एकत्र आणणारे सार्वजनिक ठिकाण असते. या वेगळेपणा मुळे त्याची तुलना इतर सार्वजनिक ठिकाणांशी होऊ शकत नाही . रुग्णालय हे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार व इतर हल्ल्यांसाठी जास्त हिंसा प्रवण व सोपे ठिकाण असते. पण त्या तुलनेत सुरक्षा ही औषधाला ही नसते. दोन वर्षांपूर्वी आसाम मध्ये जोरहाट येथे शासकीय सेवेत सेवा बजावताना एका ज्येष्ठ डॉक्टरची सामुहिक हत्या ( मॉब लीन्चींग ) झाले. पण यावर कुठे ब्र ही निघाला नाही .  १४५ कोटी जनतेसाठी दर वर्षी फक्त १ लाख डॉक्टर शिक्षण घेऊन समाजात येतात. त्यातही काही जणच उपचारांसाठी उतरतात. सूक्ष्म – अल्पसख्यांक ( मायक्रो मायनॉरीटी ) असलेला बोद्धिक वर्ग आपण  असा भयभीत करणार असू तर डॉक्टरांकडून दर्जेदार सोडाच किमान सेवेची अपेक्षा ही पूर्ण होऊ शकणार नाही हा स्वार्थ तरी लक्षात घ्यायला हवा. 

नैतिक खच्चीकरण

सत्तास्थानी असलेल्या एका वर्गा साठी गरजे पेक्षा जास्त सुरक्षेचे कडे व देशाचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी असलेले पायदळी हे लोकशाहीच्या अंता कडे प्रवास सुरु करण्याचे पाउल आहे हे समजून घ्यायला हवे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचे पोशिंदे वाचले पाहिजे हा काळ आता संपला . या लाखात श्रमजीवी व बुद्धीजीवी दोघांच्या जीवाची किंमत महत्वाची आहे. सध्याच्या घटना नेमक्या या दोघांच्या बळी घेण्यार्या आहेत . १९९० साली पंकज कपूर अभिनित ‘एक डॉक्टर कि मौत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सत्तास्थानी असलेले , प्रशासन , समाज सगळेच आपल्या कुटुंबां कडे व स्वतः कडे दुर्लक्ष करून झटणाऱ्या डॉक्टरची शक्य तितकी अवहेलना करून त्याचा करुण शेवट घडवतात. कोलकता येथे ३६ तास सेवा देऊन दोन घटका आराम करण्यासाठी आलेल्या डॉक्टरवर न जाणे किती जणांनी केलेले लैंगिक अत्याचार देशातील प्रत्येक स्त्री व डॉक्टरच्या अवहेलनेच्या हिम नागाचे दिसणारे टोक आहे. स्त्री शिक्षित असो कि अशिक्षित, कुठल्या ही स्त्रीवर अत्याचार हे निंदनीयच आहेत. पण मुलगी शिकली म्हणून ती वाचणार नाही हा शिकणाऱ्या प्रत्येक मुलीचे नैतिक खच्चीकरण करणारा संदेश कोलकाता घटनेतून गेला आहे. स्त्री व बुद्धीवंत या दोघांना ही सन्मानाची वागणूक मिळणार आहे कि नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही डॉक्टर की मौत, ‘एक डॉक्टर कि मौत’ हा चित्रपट विस्मृतीत गेला तसे काही बोध न घेता ही घटना विस्मृतीत जाता कामा नये.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

9421516551

लोकशाही देशांना बांगलादेशने दिलेले धडे – डॉ. अमोल अन्नदाते

लोकशाही देशांना बांगलादेशने दिलेले धडे

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

डॉ. अमोल अन्नदाते

बांगलादेशात शेख हसीनांची राजवट उलथवून त्यांना तेथील विद्यार्थ्यांनी देश सोडून जाण्यास भाग पाडले. लोकशाही टिकवण्यासाठी तिचे यशस्वी प्रारूप जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच महत्त्व त्या लोकशाहीत होणाऱ्या चुकांमधून शिकण्यालाही असते. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणादरम्यान वॉर्डमध्ये एखादा मृत्यू होतो, तेव्हा संबंधित सर्व डॉक्टर एक मॉर्टेलिटी मीटिंग घेतात आणि त्या रुग्णावरील उपचाराबाबत काय चुकले, याचा शोध घेतात. बांगलादेशसारख्या विकासाच्या वाटेवर अग्रेसर झालेल्या देशात अराजक माजते, तेव्हा तो विषय त्या देशासाठी तर अधिक गंभीर असतोच; शिवाय भारतासारख्या शेजारच्या लोकशाही देशातील नागरिकांनाही सजग करणारा ठरतो.

बांगलादेशात आर्थिक विकास की लोकशाही महत्त्वाची? या स्वरूपाचा वाद पुढे आला, तेव्हा लोकांनी स्वातंत्र्य अबाधित राखण्याला आणि हुकूमशाही राजवट धुडकावण्याला प्राधान्य दिले. शेख हसीनांच्या काळात या देशाने आर्थिक विकास दर आणि आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. जगभर प्रसिद्ध असलेले तयार कपड्यांचे मोठे उद्योग उभारण्याला चालना दिली. त्या जोरावर सन २००० पासून विकास दर ६.५ % एवढा राहिला. फारशी संसाधने उपलब्ध नसूनही बांगलादेशचे दरडोई उत्पन्न हे जवळपास भारताएवढे म्हणजे २६०० रूपये इतके आहे. पण, विकास लोकशाहीशी खेळून, ती खिळखिळी करण्याची सूट देऊ शकत नाही. एकवेळ विकासासाठी आम्ही थोडी वाट पाहू, पण लोकशाही हातातून गेली तर ती परत आणण्यासाठी कित्येक पिढ्यांना नव्याने अनिश्चित काळापर्यंत लढा देण्याची वेळ येऊ शकते, ही धारणाही समजून घ्यायला हवी.

एकूणच कोणत्याही लोकशाही देशातील जनतेने तिथल्या सत्ताधाऱ्यांना, ‘आधी लोकशाही मग बाकी सगळे, हा आमचा प्राधान्यक्रम आहे,’ याची आठवण करून देत राहिले पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा असे ऐकायला येते की, आपला देश आणि जनता लोकशाहीला पात्र नाही, झटपट विकासासाठी एखादा हुकूमशहाच असला पाहिजे. हिटलरच्या राजवटीतही जर्मनीने बऱ्याच आघाड्यांवर विकास केला. फोक्सवॅगन हे हिटलरच्याच काळातील, एक्स्प्रेस वे म्हणजे मोठे महामार्ग या संकल्पनेचा जनकही हिटलरच. पण, त्याचे कौतुक करून चालणार नाही, कारण हिटलरच्या हुकूमशाही वृत्तीनेच त्या देशाचा घास घेतला. नंतरच्या काळातील सद्दाम हुसेन, गदाफी अशा अनेक हुकूमशहांची उदाहरणे देता येतील.

बांगलादेशातील असंतोषातून भारतीय लोकशाहीच्या पोटात दडलेल्या एका मोठ्या समस्येच्या हाका ऐकाव्या लागतील. बांगलादेशात १९७१ च्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना आरक्षण देण्याविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शेवटी त्यांनी थेट हसीनांच्या शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला. याचे कारण, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि तयार कपड्यांच्या उद्योगात या वर्गाला रोजगार मान्य नव्हते. म्हणून नगण्य प्रमाणात असलेल्या शासकीय नोकऱ्यांवरून आणि त्यातील आरक्षणावरून देशात अराजक माजले. भारतातील विद्यार्थ्यांचीही बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. देशाच्या अर्थकारणाचा आधार असलेल्या कृषी क्षेत्रापासून हा वर्ग लांब गेला आहे आणि तो शासकीय नोकऱ्यांच्या प्रतिक्षेत बसून आहे. शासनाला प्रत्येकाला नोकरी देणे शक्य नाही. खासगी क्षेत्रात आपापल्या गुणवत्तेनुसार कामाला लागा, हा संदेश तरुणांमध्ये जाणे आणि त्यासाठी खासगी व्यवसायांना आपलेच समजून उचलून धरणे, या गोष्टी भविष्यातील असंतोष टाळण्याच्या व लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत.

शेख हसीनांच्या काळात विकास होत असला, तरी निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाहीत. अलीकडच्या निवडणुकांवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. निवडणुकीचे पावित्र्य जपण्याला, त्यात जराही कुचराई सहन न करण्याला देशातील नागरिकांचे सर्वोच्च प्राधान्याचे असले पाहिजे. ‘झीरो टॉलरन्स’ म्हणजे मुळीच सहन केले जाणार नाही, अशा विषयांच्या यादीत स्वच्छ निवडणूक प्रक्रियेला नागरिकांना नेहमी वरचे स्थान द्यायला हवे.

बांगलादेशात विद्यार्थ्यांनी केवळ शेख हसीनाच नव्हे, तर मुख्य न्यायाधीश आणि त्यांच्यासोबत इतर अनेक न्यायाधीशांना राजीनामा देण्यास भाग पाडले. म्हणजेच, न्यायप्रक्रिया हे लोकशाही वाचवण्याचे मोठे आयुध आहे आणि ते सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात जाताना दिसले, तर ती धोक्याची घंटा आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. शेख हसीनांच्या मुख्य विरोधक आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना नजरकैदेत ठेवले होते. विरोधकांचा आवाज न दडपणे, हे लोकशाहीतील महत्त्वाचे तत्त्व आहे. ते कधीही पायदळी तुडवता कामा नये, हेही बांगलादेशातील असंतोषातून शिकण्यासारखे आहे.

आज जगातील केवळ २० टक्के जनता खऱ्या अर्थाने स्वतंत्र मानली जाते. भारत हा त्यापैकी एक देश आहे. बहुमताला एक खासदार कमी असल्याने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पडले, तेव्हा त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात खूप महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले होते… सरकारें आएंगी, जाएंगी.. पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी.. मगर ये देश रहना चाहिए। बांगलादेशातील असंतोषातून भारतासारख्या सगळ्याच लोकशाही देशांना हाच धडा नव्याने मिळाला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

देशाला अर्थ-गती देणारा मध्यमवर्ग अगतिक का? – -डॉ. अमोल अन्नदाते

dr amol annadate artical

दैनिक दिव्य मराठी रसिक पुरवणी

देशाला अर्थ-गती देणारा मध्यमवर्ग अगतिक का?

-डॉ. अमोल अन्नदाते

       भारतामध्ये टक्केवारीत कमी असला, तरी अर्थव्यवस्था तोलून धरणारा वर्ग म्हणजे मध्यमवर्ग. स्वातंत्र्यानंतरच्या काळात हा वर्ग हळूहळू विस्तारत गेला आणि १९९१ च्या दशकात आर्थिक उदारीकरणानंतर त्याचा अचानक विस्तार झाला. आज जवळपास ३० ते ३५ टक्के लोक मध्यमवर्गामध्ये मोडतात. दर दिवसाला साधारण १५०० ते ८३०० रुपये कमावणारे लोक आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गात मोडतात. ढोबळमानाने विचार केल्यास, ज्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला आहे, ज्यांना राहायला स्वतःचे किंवा भाड्याचे घर आहे, असा हा वर्ग आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सुधारित करप्रणालीमुळे हा वर्ग हताश दिसत असला, तरी अनेक वर्षे भारतातील मध्यमवर्ग...‘मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही.. मी निषेधसुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही..’ या ओळींप्रमाणे जगत आला आहे.

               देश आणि लोकशाही सशक्त होण्याच्या दृष्टीने मध्यमवर्गाचे दुर्लक्षित राहणे आणि निद्रिस्त, कृतिशून्य असणे दोन्ही घातक आहे. भरमसाट कर भरणाऱ्या या वर्गाला मोफत नव्हे, तरी किमान किफायतशीर दरात शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी, रस्ते, जगणे सुकर होईल अशा चांगल्या नागरी सोयी-सुविधांचा परतावा मिळावा, अशी अपेक्षा आहे. पण, यापैकी कुठली गोष्ट मध्यमवर्गाच्या पदरात पडत नाहीच, उलट या वर्गावर वरच्या आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि खालच्या आर्थिकदृष्ट्या विपन्न अशा वर्गांसाठी सक्तीचे दातृत्व लादले जाते. मध्यमवर्गाचा पैसा पगार किंवा इतर मार्गाने बँकेत जमा होतो. या ठेवींवर अर्थव्यवस्था उभी राहते आणि त्या आधारे हजारो कोटींची कर्जे मोठ्या उद्योजक, व्यावसायिकांना दिली जातात. अर्थात, ही कर्जे कशी बुडवली जातात, याचीही अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेतच.

                      सत्तेवरचा प्रत्येक पक्ष आपले सरकार कसे कल्याणकारी आहे, हे दाखवण्यासाठी अनेक गोष्टी मोफत पुरवते. आता तर त्या पुढे जात विशिष्ट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे टाकण्याच्या घातक पद्धती रुजत आहेत. अशा गोष्टींची सर्वांत मोठा फटका मध्यमवर्गालाच बसतो. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात, दूरगामी वित्तीय लाभावरील कर १० वरून १२.५ टक्के आणि अल्पकालीन लाभावरील कर १५ वरुन २० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर जो लाभ मिळेल, त्यावरही अधिक कर लादण्यात आला आहे. मध्यमवर्गाकडून कररुपात मोठा निधी शासनाच्या तिजोरीत जमा करायचा आणि त्यातून मतपेढीवर डोळा ठेवून ‘मोफत’च्या रेवड्या वाटायच्या, हे रॉबिनहूड प्रारूप भारतीय लोकशाहीसाठी फारसे लाभदायक नाही.

               खरे तर, बरीच वर्षे मध्यमवर्ग कुठली निवडणूक आहे? आमदार किंवा खासदार कोण होणार? मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान कोण असणार? याच विचारांच्या मानसिकतेत वावरत होता. २०१० नंतर काही अंशी मध्यमवर्ग राजकीयदृष्ट्या जागा झाला. शेतकरी किंवा कामगार वर्ग आपल्या प्रश्नावर आंदोलन असले की काही प्रमाणात एकवटतो. पण, मतदानाची वेळ येते तेव्हा जात, पक्ष, प्रांतवाद या गोष्टी सोडून आपल्या आर्थिक स्तराच्या मुद्द्यावर तो एक होत नाही. मतदानाच्या क्षणी ते स्वतःचे प्रश्न विसरून आणि आपापल्या वैयक्तिक अस्मितेच्या आहारी जाऊन निर्णय घेतात. अगदी तसेच मध्यमवर्गाचेही आहे. तसे नसते तर मोठ्या प्रमाणात शहरी आणि निमशहरी भागात वास्तव्य असलेल्या मध्यमवर्गीयांच्या भागात राजकारण बदलले असते . कर भरूनही आरोग्य आणि शिक्षणाच्या पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून एखाद्या शहराने आपले लोकप्रतिनिधी विचारपूर्वक निवडल्याची उदाहरणे दिसत नाहीत.

             महागाईची सर्वाधिक झळ मध्यमवर्गाला बसते. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांवर स्वतःचे जीवनमान टिकवण्याचा फारसा दबाव नसतो. पण, मध्यमवर्गावर या प्रकारचा मोठा सामाजिक दबाव असतो. तरीही हा वर्ग महागाईच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे, त्याने मतदानाच्या वेळी ठरवून काही भूमिका घेतल्याचे दिसत नाही. उलट मध्यमवर्ग शिक्षित असूनही अशिक्षित आणि निम्न आर्थिक स्तरातील मतदारांएवढाच मूळ मुद्दे सोडून पोकळ अस्मितेच्या आणि विकासाचा लवलेश नसलेल्या मुद्द्यांच्या आहारी जाताना दिसतो.

            अनेक वर्षे गरिबीत घालवलेल्या देशामध्ये गरिबांच्या प्रश्नांना महत्त्व असणे साहजिक आहे. २०४७ पर्यंत देशातील ६० टक्के लोक मध्यमवर्गात असतील. मोठे उद्योग ही अर्थव्यवस्थेची चाके असतील, तर मध्यमवर्ग आणि त्यांची क्रयशक्ती हे त्याचे इंधन असते. ते इंधन जितके दमदार, कसदार तितका देश अधिक वेगात धावतो. मध्यमवर्गाची क्रयशक्ती जोखूनच परदेशातून वित्तीय गुंतवणूक आकर्षित होते. म्हणून मध्यमवर्गाला आणि त्यांच्या प्रश्नांना कमी लेखून चालणार नाही. एरवी ऑफिस आणि सोसायटीच्या राजकारणात हिरीरीने पुढे असणारा मध्यमवर्ग आपल्या जगण्याशी निगडीत प्रश्न आले की, राजकीयदृष्ट्या एक पाऊल मागे जातो. मध्यमवर्ग हा देशातील सर्वांत सक्रिय घटक असल्याने लोकशाहीतील गैरव्यवस्थापनाचा पहिला बळीही तोच ठरतो. त्यामुळे मध्यमवर्गाने राजकीयदृष्ट्या निद्रिस्त असणे धोकादायक आहे. ‘कल्याणकारी राज्य’ असे म्हटले जाते, तेव्हा त्यातून सर्व वर्गांचे कल्याण अपेक्षित असते. मध्यमवर्गाची होणारी उपेक्षा पाहता सत्ताधाऱ्यांना या तत्त्वाची आठवण करुन देणे आवश्यक आहे.

-डाॅ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551