एमबीबीएसचा अभ्यासक्रम प्रवेशापासून दहा वर्षात पूर्ण करण्याचा नवा नियम येत्या वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लागू केला आहे आहे. हा अभ्यासक्रम मुळात साडेचार वर्षांचा असतो पण क्वचीतच प्रत्येक बॅचला नापास होत अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही विद्यार्थी असतात. त्यातही एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी १० वर्षे लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. ही विद्यार्थी संख्या कमी असली तरी या निर्णयाचा विद्यापीठ व अभ्यासक्रम पूर्ण करण्यास वेळ घेणारे विद्यार्थी असा दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे.
वैद्यकीय क्षेत्रात अशी उदाहरणे आहेत जिथे विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक पातळीमुळे नव्हे तर इतर कौटुंबिक, मानसिक, सामाजिक समस्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. अशा मुलांसाठी क्रोनिक हा शब्द वैद्यकीय महाविद्यालयात वापरला जातो. खरेतर आधी पेक्षा सध्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीण्य पातळी ही खूप कमी आहे. म्हणून नापास होण्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला नापासच व्हायचे आहे हे तुम्हाला ठरवावेच लागते. पण तरीही विद्यार्थी अनेक वर्षे नापास होत असेल तर नक्कीच त्या मागे बौद्धिक पातळी किव्हा अभ्यासक्रम न कळण्यापलीकडे काही सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणे असू शकतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला म्हणजे त्या विद्यार्थ्याचा स्तर बरा असतो. त्यातच अभिमत विद्यापीठांपेक्षा आरोग्य विद्यापीठाशी संलग्न शासकीय व खाजगी विद्यापीठात परीक्षा अधिक पारदर्शक असते. म्हणून या कॉलेजेस मध्ये विद्यार्थी रखडण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्रोनिक रखडलेल्या विद्यार्थ्याची अशी एक स्वतःची कहाणी असते. काही विद्यार्थी मानसिक समस्येमुळे व्यसनाधीन झालेले असतात. काहींना मानसिक समस्या असल्या तरी त्या ओळखल्या जाऊन त्यावर उपचारच होत नाहीत. हे सगळे मोठ मोठे मानसोपचार विभाग मिरवत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नाका खाली घडत असते हे विशेष. एमबीबीएस परीक्षा आधी पेक्षा झाली सोपी असली तरी वैद्यकीय अभ्यासक्रम अवाढव्य असतो. त्याचा पहिल्या वर्षी तरी प्रचंड ताण असतो. आपल्याकडे दर वर्षी प्रवेशावर होणाऱ्या केसेस आणि प्रवेशाच्या लांबत जाणाऱ्या प्रक्रीये मुळे मुळात १ ऑगस्टला सुरु होणारे वर्ग सुरु होण्यास ऑक्टोबर उजाडते. त्यातच आधी ९ महिन्याचा असलेला पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आता १४ महिन्याचा करण्यात आला आहे म्हणून दिलासा आहे. पण तरी या बदलेल्या वातावरणाशी जुळवून न घेऊ शकणारे पहिल्या वर्षी नापास झाले की प्रवाहाबाहेर फेकले जातात. वैद्यकीय महाविद्यालयात ही टाॅपर्स , डिस्टिनक्षण , नापास आणी क्रोनिक असा एक बौद्धिक वर्णभेद असतो. म्हणून वारंवार नापास होणार्यांना कालमर्यादेच्या नियमाचा बडगा उगारायचा कि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायचा हे ठरवावे लागेल.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
अनेक वर्ष रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत यंत्रणेची ही मोठी ससेहोलपट होत असते. नुकतेच बदललेल्या अभ्यासक्रमामुळे जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशी अध्यापनासाठी व परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. अनेक वर्षे नापास झालेल्यांची विद्यार्थी संख्या कमी असली तरी त्यांच्या साठी वेगळा पेपर काढणे आणी घेणे अशा प्रकारे यंत्रणा व्यस्त होते. शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर ५.५ लाख रुपये खर्च होत असतो. असे असताना विद्यार्थ्यांची किमान काही काळात डिग्री पूर्ण करण्याची बांधिलकी असावी असा विचार विद्यापीठाच्या दृष्टीने असू शकतो.
हा नियम राबवताना अशा वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकॅडॅमीक व सामाजिक पुनर्वसनासाठी काही यंत्रणा नाही. हे विद्यार्थी का नापास होत आहेत याची कारणे शोधण्यासाठी एखादा संशोधात्मक अभ्यास आपण अजून केला आहे का? अनेक वर्षे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी नंतर उत्तम प्रॅक्टीस करतात. तसेच असे काही विद्यार्थी प्रसिद्ध व निष्णात डॉक्टर म्हणून ही नावारूपाला आल्याची उदाहरणे आहेत. ही संधी या विद्यार्थ्यां कडून आपण हिरावून घ्यायची का या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. एकदा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील एका हॉटेल ला जेवायला गेले. तिथला वेटर हा वारंवार त्या विद्यार्थ्यांच्या गप्पा जवळ येऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होता. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जवळ बोलावून याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले कि अनेक वर्षांपूर्वी तो बीजेचाच एमबीबीएसचा विद्यार्थी होता. पण एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. पुढच्या दिवशी सर्व विद्यार्थी त्याला होस्टेल वर घेऊन गेले. सगळ्यांनी त्याला मदत करत पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसवले आणी त्याने पुढे अभ्यासक्रम पूर्ण केला . हा विद्यार्थी आज महाराष्ट्रातच शासकीय सेवेत मेडिकल ऑफिसर म्हणून चांगली सेवा देतो आहे आणि चांगले आयुष्य जगतो आहे. कालमर्यादे मुळे वेळ हुकलेले पण पुन्हा संधी मिळाल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आपले कायदे मंडळ ही एका ही निर्दोषा ला शिक्षा होऊ नये म्हणून हजारो गुन्हेगारांना सोडण्याची जोखीम घेते . मग बुद्धिवंतांसाठीच्या अभ्यासक्रमात कुठल्या तरी कारणाने कमी पडलेल्या एकाला आपण वेळेचे कारण दाखवत संधी नाकारायची का ?
या प्रश्नावर बीजे चे माझी प्राध्यापक डॉ.पद्माकर पंडित व डॉ. दाक्षायणी पंडित यांनी रखडलेले विद्यार्थी हे एक मिशन समजून अनेक वर्षे काम केले. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांचे समुपदेशन , त्यांचा अभ्यास वर्ग घेणे, अगदी स्वतःच्या घरी त्यांची राहण्याची , जेवण्याची सोय , त्यांना आर्थिक मदती पर्यंत प्रयत्न करून या जोडप्याने असे अनेक व्यवस्थेच्या कडीतून निसटणार्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे डॉ. पंडित दाम्पत्याने घडवलेले हे अनेक क्रोनिक आज समाजात उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. यातील काहींनी तर ५ – १० वर्षे प्रवेशाला उलटून गेल्यावर ही परत येऊन एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा या विद्यार्थ्यांचा भार वाहताना व्यवस्थेचची ससेहोलपट आणि या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन यातून काही मधला मार्ग काढता येतो का हे पाहायला हवे.