काल चांद्रयान-२, चंद्रापासून २.१ किलोमीटर लांब असताना संपर्क तुटला. त्यानंतर इसरो प्रमुख के. सिवान हे पंतप्रधान मोदी च्या खांद्यावर डोके ठेवून ढसढसा रडतानाची क्लिप अनेकांनी पहिली. देशाच्या दोन सर्वोच्च पदावरील लोकांनी जाहीरपणे असे भावनाविवश व्हावे का? अशा अनेकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. पण या क्षणाची सहवेदना मी डॉक्टर म्हणून, त्यातच बालरोगतज्ञ म्हणून, समजू शकतो! त्या सोबत empathise करू शकतो! असे क्षण आम्ही, त्यातच अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारातील डॉक्टर, रोजच अनुभवत असतो.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
बऱ्याच गोष्टी माणूस म्हणून आपल्या हाता बाहेर असतात याची जाणीव उपचार करताना सतत येत असते. दोन आठवड्याखाली ‘Duchenne Muscular Dystrophy‘ हा कधीच बरा न होणारा आजार आणि मुलाला सोळाव्या वर्षापर्यंत रोज मृत्यू पहावा लागेल हे पालकांना समजून सांगताना, मी हा क्षण अनुभवला! त्यानंतर दोन दिवसांनी ८ वर्षांचा, ह्र्दय रोग असलेला एक मुलगा ऑपरेशन करण्यापलीकडे आहे, हे माझ्या हार्ट सर्जन मित्राने मला फोनवर सांगितले तेव्हा ही मी हे अनुभवले! अजून पालकांना मी हे सांगायचे राहिले आहे!! परवा दर महिन्याला रक्त घ्यावा लागणारा व आयुष्य भर असे रक्त घेण्याची गरज असलेला, ४ वर्षांचा मुलगा intra Cath लावताना मला विचारत होता – ” डॉक्टर अस दर महिन्याला कधी पर्यंत तुम्ही मला टोचत राहणार!” अशा वेळेला आईच्या, बापाच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं! आम्हा डॉक्टरांना मात्र मनात भरून येत असतानाही, सिवान मोदींच्या खांद्यावर डोके ठेवून रडले तसे, रुग्णाच्या वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्याची मुभा नसते! रोजच मरण बघून मन घट्ट होत जातं, पण कशाच काहीच वाटत नाही एवढ ही घट्ट नसतं! कर्तव्यासाठी ते घट्ट कराव लागतं. एकदा उपचारांसाठी आलेला एक स्मशान जोगी मला म्हणाला, “डॉक्टर, आपले दोघांचे आयुष्य सारखेच आहे, न रडता रोज मृत्यू बघत रहायचे!” रुग्ण, आई-वडील, नातेवाईक बऱ्याचदा रागवतात, प्रसंगी आज-काल मारतात ही, पण रडत बसू नको, उचल ते गांडीव परत, असं सांगायला कोणी कृष्ण नसतो. तेव्हा आपल्या सदसद्विवेकबुद्धीलाच कृष्ण बनवावं लागतं.
इसरो प्रमुख के. सिवान, तुम्ही रडून मोकळे झालात, ते बर केलत. या घटनेच भांडवल करून आम्हा डॉक्टरांच अपयश स्वीकारा हो, अशी आर्त विनवणी मी करणार नाही. पण प्रत्येक व्यवसायात यशाचा ‘Law of Averages’ काम करत असतो. म्हणजे तुम्ही दहा वेळा प्रयत्न केला तर दहाच्या दहा वेळेला यश येणे अशक्य असते. सचिन तेंडूलकर, विराट कोहली प्रत्येक मॅच मध्ये शतक ठोकू शकत नाही. बऱ्याचदा त्यांच्यावरही शून्यावर बाद होण्याची वेळ येते. हाच नियम चांद्रयान मोहिमेला ही काल लागू पडला. वैद्यकीय क्षेत्राला, उपचारांनाही हा नियम लागू असतो, पण इथे प्रश्न जगण्या मरण्याचा असल्याने तो आपलं मन स्वीकारत नाही. पण तो आम्हा डॉक्टरांना माणूस म्हणून स्वीकारावा लागतो. कधी अगदी हातातून बाहेर गेलेली केस परत हातात येते…जवळपास मृत्यू झालेला असतांना CPR ने ह्र्दय परत सुरु होते, अशा अनअपेक्षित यशाने अपरिहार्यपणे येणारे इतर अपयशाची भरपाई झाली असे मानत आम्ही डॉक्टर पुढे जात राहतो! फक्त डॉक्टर च नाही इतर प्रत्येक व्यवसायिकाचे अपयश मनापासून स्वीकारा! चेहरा पाडून मध्यरात्री – बाळ आता जिवंत नाही – ही गोष्ट सांगताना एखादा नातेवाईक म्हणतो – “ठीक हैं साब, जाने दिजीये, आप ने बहोत कोशिश कि, हम आप के शुक्रगुजार है!” तेव्हा तो मला काल रडण्यासाठी खांदा देणाऱ्या मोदी सारखा वाटतो, फरक इतकाच, सिवान सारखे मला रडता येणार नाही!