एक डॉक्टर की मौत – डॉ. अमोल अन्नदाते

dr amol annadate artical

दैनिक सकाळ

एक डॉक्टर की मौत

डॉ. अमोल अन्नदाते

    कोलकाता येथे घडलेल्या डॉक्टरच्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेने (९ ऑगस्ट) देशभर संताप व्यक्त होतो आहे. वैद्यकीय क्षेत्राला या घटनेने अधिक असुरक्षित वाटू लागले आहे व  जगभर वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर या घटने विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राक्षसी अत्याचार झालेली मुलगी डॉक्टर असल्याने या घटनेला जोडून डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर येणे सहाजिक आहे. पण ही घटना केवळ डॉक्टरां वर हल्ला इतकी मर्यादित नाही. स्वातंत्र्याच्या ७८ वया वर्षात आपण लोकशाही म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत असताना स्त्रियांवर होणार लैंगिक व इतर अत्याचार, कायद्याची संपलेली भीती , संथ न्यायदान, अशा घटनां बद्दल राजकीय कोडगेपणा , डॉक्टर व इतर बौद्धिक वर्गाला सतत दडपणाखाली व असुरक्षित वाटून वारंवार संपावर जावे लागणे या प्रश्नांना मृत्यू झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबा इतकाच प्रत्येक नागरिक अस्वस्थ वाटायला हवे. 

                          २०२२ च्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगाच्या आकडेवारीनूसार देशात दिवसाला ८० बलात्कारांची नोंद होते. एका नोंदी मागे न नोंदवलेले किमान १० बलात्कार असतात. म्हणजे जवळपास प्रत्येक क्षणाला देशात कुठेतरी बलत्कार तरी घडतो आहे किंवा त्याचे नियोजन तरी सुरु असते. कोपर्डी , दिल्लीतील निर्भया किंवा कोलकाताची अभया अशा टोकाचे अत्याचार झालेल्या घटना प्रकाशझोतात येतात व त्यावर काही काळ समाजात तीव्र असंतोष उफाळून येतो व काळ पुढे सरकतो तसा शांत होतो. पण गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपी सुटल्यावर त्यांचे जाहीर हारतुरे पेढे देऊन सत्कार झाले तेव्हा या गुन्ह्यांविषयी शासन , कायदा व्यवस्था फारशी गंभीर नाही हा संदेश समाजात खोलवर झिरपतो. कोलकाता घटने विरोधात डॉक्टरांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या डॉक्टरांवर ही मोठा समूह चाल करून गेला व त्यातील महिला डॉक्टरांना ही बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या . न्याय व्यवस्था आपले काहीही बिघडवू शकत नाही या टोकाच्या राक्षसी आत्मविश्वासातून आज गुन्हेगारांमध्ये जबरदस्त हिम्मत आली आली आहे. दिल्लीचे निर्भया प्रकरण होऊन एक तप उलटले व बलात्कारा संदर्भातील कायद्यात सुधारणा होईल अशा वल्गना झाल्या. पण सामाजिक परिणाम होऊन बलात्काराच्या घटना कमी करणारे कुठले ही बदल झाले नाहीत. स्त्रियांच्या सुरक्षेसाठी  दर वर्षीच्या १०० कोटींच्या निर्भया निधीतून देशात स्त्रियांविरोधातील वर्षाला किमान १०० गुन्हे तरी कमी झाले का या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. 

                          एका डॉक्टरच्या मृत्यूतून अजून एक भयान वास्तव पुढे आले आहे. इतके राक्षसी कृत्य होऊनही रुग्णालयाच्या प्रमुखांनी महिला डॉक्टरने एकट्याने खोलीत जाणे हीच चूक असल्याचे निलाजरे विधान केले. या घटने नंतर गुन्हा दडपण्याचे , गुन्हेगारांना वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. स्त्रियांविरोधात किती ही अमानुष लैंगिक अत्याचार झाले तरी यात विशेष काही नाही हा संदेश प्रमुख पदावर असणार्या व्यक्तींकडून सातत्याने दिला जातो. कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिकतेशी संबंधित छोटीशी कृती असली व ती खपवून घेतली जाते तेव्हा संदेश तोच असतो. यातूनच पुढे कोणाला तरी कोपर्डी, निर्भया, अभया असे स्त्रियांच्या आत्मसन्माना चा घोट घेण्याचे बळ मिळते. 

वैद्यकीय क्षेत्राची हताशा

            या घटनेमुळे डॉक्टरांची सुरक्षा मग ते पुरुष असो कि स्त्री हे शासनाच्या प्राधान्य क्रमावर का नाही ? या प्रश्नाने वैद्यकीय क्षेत्र हताश व निराश झाले आहे. सुरक्षेसह डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांकडे कोविड सारखे संकट येऊन ही दुर्लक्ष कमी झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आज डॉक्टर येण्यास इच्छुक नाहीत व मनुष्यबळाच्या तुटवड्या मुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व सर्वसामान्यांचे आरोग्य मृत्यू शय्येवर असून शेवटच्या घटका मोजते आहे.महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाल्यास आरोग्य विभागात उपकरणे खरेदी , नवी रुग्णालये उभारण्यावर कोट्यवधींचा खर्च सुरु आहे पण डॉक्टरांची २० हजार पदे रिक्त आहेत.  रुग्णालय हे अनेक वृत्तींच्या लोकांना एका गरजेच्या सक्तीतून एकत्र आणणारे सार्वजनिक ठिकाण असते. या वेगळेपणा मुळे त्याची तुलना इतर सार्वजनिक ठिकाणांशी होऊ शकत नाही . रुग्णालय हे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार व इतर हल्ल्यांसाठी जास्त हिंसा प्रवण व सोपे ठिकाण असते. पण त्या तुलनेत सुरक्षा ही औषधाला ही नसते. दोन वर्षांपूर्वी आसाम मध्ये जोरहाट येथे शासकीय सेवेत सेवा बजावताना एका ज्येष्ठ डॉक्टरची सामुहिक हत्या ( मॉब लीन्चींग ) झाले. पण यावर कुठे ब्र ही निघाला नाही .  १४५ कोटी जनतेसाठी दर वर्षी फक्त १ लाख डॉक्टर शिक्षण घेऊन समाजात येतात. त्यातही काही जणच उपचारांसाठी उतरतात. सूक्ष्म – अल्पसख्यांक ( मायक्रो मायनॉरीटी ) असलेला बोद्धिक वर्ग आपण  असा भयभीत करणार असू तर डॉक्टरांकडून दर्जेदार सोडाच किमान सेवेची अपेक्षा ही पूर्ण होऊ शकणार नाही हा स्वार्थ तरी लक्षात घ्यायला हवा. 

नैतिक खच्चीकरण

सत्तास्थानी असलेल्या एका वर्गा साठी गरजे पेक्षा जास्त सुरक्षेचे कडे व देशाचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी असलेले पायदळी हे लोकशाहीच्या अंता कडे प्रवास सुरु करण्याचे पाउल आहे हे समजून घ्यायला हवे. लाख मेले तरी चालतील पण लाखांचे पोशिंदे वाचले पाहिजे हा काळ आता संपला . या लाखात श्रमजीवी व बुद्धीजीवी दोघांच्या जीवाची किंमत महत्वाची आहे. सध्याच्या घटना नेमक्या या दोघांच्या बळी घेण्यार्या आहेत . १९९० साली पंकज कपूर अभिनित ‘एक डॉक्टर कि मौत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सत्तास्थानी असलेले , प्रशासन , समाज सगळेच आपल्या कुटुंबां कडे व स्वतः कडे दुर्लक्ष करून झटणाऱ्या डॉक्टरची शक्य तितकी अवहेलना करून त्याचा करुण शेवट घडवतात. कोलकता येथे ३६ तास सेवा देऊन दोन घटका आराम करण्यासाठी आलेल्या डॉक्टरवर न जाणे किती जणांनी केलेले लैंगिक अत्याचार देशातील प्रत्येक स्त्री व डॉक्टरच्या अवहेलनेच्या हिम नागाचे दिसणारे टोक आहे. स्त्री शिक्षित असो कि अशिक्षित, कुठल्या ही स्त्रीवर अत्याचार हे निंदनीयच आहेत. पण मुलगी शिकली म्हणून ती वाचणार नाही हा शिकणाऱ्या प्रत्येक मुलीचे नैतिक खच्चीकरण करणारा संदेश कोलकाता घटनेतून गेला आहे. स्त्री व बुद्धीवंत या दोघांना ही सन्मानाची वागणूक मिळणार आहे कि नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही डॉक्टर की मौत, ‘एक डॉक्टर कि मौत’ हा चित्रपट विस्मृतीत गेला तसे काही बोध न घेता ही घटना विस्मृतीत जाता कामा नये.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

9421516551

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते ? – डॉ. अमोल अन्नदाते

Dr amol annadate artical

दैनिक लोकमत

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते ?

डॉ. अमोल अन्नदाते

         गेल्या अनेक वर्षांपासून स्वाईन फ्लू पासून कोरोना पर्यंत व आता आताच्या झिका , चंदीपुरा अशा अनेक विषाणूंच्या साथी सुरूच आहेत. अनेक संसर्गजन्य आजार हे अधून मधून थोड्या फार फारकत प्रत्येकाला होत असतात. पण साथ पसरते तेव्हा तसे नसते. मानव जातीने आजवर प्लेग, फ्लू , कोलेरा , कोरोना अशा जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम केलेल्या महा साथी अनुभवल्या. मानवी जिवाला असलेला धोका लक्षात घेता या साथींची तुलना महायुद्धशीच होऊ शकते. पण हे युद्ध फक्त रुग्णालयातच लढले जात असल्याने त्याची तीव्रता कोणच्याही लक्षात येत नाही. युद्धात जसा देश बेचीरख होऊ शकतो तसा साथीत ही होऊ शकतो. आज ही कोरोनाच्या दुसर्या लाटेची आठवण निघाली तर अंगावर काटा येतो. कोरोना साथीत प्रत्येक व्यक्तीची जवळची तीन तरी व्यक्ती दगावल्याचे एका क्षणात सहज आठवेल. पण तरीही कोरोनाच्या साथीत आपण जे शिकलो ते सगळे स्मशान वैराग्यच ठरले. वेगाने मानवतेवर आदळणार्या साथी पाहता साथींचे शास्त्र हे फक्त डॉक्टरच नव्हे तर सर्व सामन्य लोक व धोरण आखणाऱ्या , राबवणाऱ्या प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे. 

                         साथ कुठलीही असो त्याची काही वैशिष्ट्ये असतात. साथ ही न सांगता कधी येत नाही. ती धोक्याची घंटा आधी वाजवते. भारतात कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच चीन व इतर अनेक देशात ती हाहाकार माजवत असल्याचे अक्खे विश्व पहात होते. साथीत सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट असते कमी वेळेत खूप मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होऊन अपुर्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण येणे. भारतात साथीं मध्ये आधीच मोडकळीला आलेल्या सार्वजनिक व्यवस्थे अजून अधिक ताणली जाणे ही  सर्वात मोठी समस्या असते. साथी टाळण्याचे उपाय हे अत्यंत साधे व आरोग्याच्या साध्या नियमांशी निगडीत असतात. साथी कमी होतात , पण पूर्णतः कधीही संपत नाहीत.  पण गरज सरो वैद्य मरो या वृत्ती प्रमाणे साथीची दाहकता कमी झाली कि सर्व यंत्रणा परत उपाय योजनांच्या बाबतीत सुस्त होते. १९६८ साली साधा सर्दी खोकला म्हणजे फ्लू ची साथ येऊन प्रत्येकाला तो होऊन गेला . पण आज ही जगभरात 7 लाख लोक साध्या फ्लू मुळे मृत्यू मुखी पडतात व यात भारतात ही ५ वर्षां खाली व ६५ वर्षां पुढे अनेक जणांचा फ्लू मुळे मृत्यू होतो. फ्लू टाळणारी उतम लस उपलब्ध असून ही कोणी पैसे खर्च करून ही लस घेत नाही व सार्वजनिक आरोग्य सेवेत ही लस मोफत मिळणे दिवा स्वप्नच आहे.कोरनाची साथ वेगळी होती कारण विषाणू बद्दल व उपाययोजना , उपचारांबद्दल फारशी माहिती नव्हती. पण डेंग्यू , चिकनगुनिया , झिका, फ्लू, न्युमोनिया अशा अनेक साथी आहेत ज्यांच्या उपाययोजना वर्षनुवर्षे माहित आहेत व सिध्द झाल्या आहेत.

               साथींचे प्रमाण वाढते आहे व अनेक नवे विषाणू किंवा आधी फारशे घातक नसलेले विषाणू हे डोके वर काढत आहेत . विषाणू हा सतत स्वतः मध्ये बदल घडवत असतो. ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ हा डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जसा मानवाला लागू आहे तसाच साथ पसरवणाऱ्या विषाणू , जीवाणूंना ही लागू आहे. म्हणून संक्रमित होऊन मानवावर मात करण्यासाठी विषाणू , जीवाणू ही झटत असतात.हवामानात होणारे टोकाचे बदल हे विषाणूंच्या संक्रमणासाठी एक महत्वाचे कारण आहे. २०२४ मधील उन्हाळा हा गेल्या कित्येक वर्षातील तापमानाचा उच्चांक गाठणारा ठरला. पावसाळा आधी सारखा राहिलेला नसून कमी वेळेत ढगफुटी सदृश पाउस पडतो. त्यामुळे साचलेल्या पाण्याचे प्रमाण वाढते. हवामानातील हे सगळे बदल विषाणूंना त्यांच्यात संक्रमण घडवून नव्या साथीच्या रुपात येण्यास पोषक आहेत.  
                   जीवनशैलीतील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती व आहारातील बदल हे साथी आल्यावर जीवितहानी वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच भारता विषयी एक निरीक्षण नोंदवले कि भारतातील ५० % लोक दिवसाच्या किमान हालचालींची गरज पूर्ण करत नाहीत. व्यायाम , हालचालींचा अभाव तुमची प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत असतात  व त्यातून साथीं मधले सोपे सावज निर्माण होतात  . भारतीय आहारत कर्बोदकांचे प्रमाण जास्त व प्रथिनांचे प्रमाण कमी आहे. तसेच भाज्या , फळे यांचा दर्जा घसरल्याने मायक्रोन्युट्रीयंटचे प्रमाण कमी असते.  अधिक साखर व मीठ असलेल्या साठवलेल्या आहाराचे ( अल्ट्रा प्रोसेस्ड फूड ) प्रमाण हे वाढत चालले आहे. प्रत्येक चौकात असलेली परदेशी फास्ट फूड आउटलेट्स हे लठ्ठपणा , मधुमेह , उच्च रक्तदाबाची ब्रंड अॅम्बॅसीडर आहेत. हे सगळे आजार प्रतिकारशक्तीचा बळी घेणारे आहेत. वाघ जेव्हा हरणाच्या कळपाची शिकार करतो तेव्हा त्यातील कमकुवत मागे राहून शिकार होतात. साथी मध्ये शिकार होणारे असे कमकुवत प्रतिकारशक्ती व सह आजार असलेले असतात. नियमित येणाऱ्या साथी ही मानवाच्या आरोग्याची वार्षिक परीक्षा असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आरोग्याची मुलभूत तत्वे हाच मुख्य अभ्यासक्रम आहे. 

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

बाळ आमचा पूरक आहार घेई… – डॉ. अमोल अन्नदाते

दै. महाराष्ट्र टाइम्स संवाद

बाळ आमचा पूरक आहार घेई…

डॉ. अमोल अन्नदाते

पब्लिक आय या स्विस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सध्या चर्चेत आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक वयाच्या बालकांसाठी नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सेरेलॅक या पूरक आहार म्हणून वापरल्या जाणाऱ्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात ( प्रति सर्विंग २.7 ग्राम म्हणजे अर्धा चमचा ) साखर वापरली जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल म्हणजे जणू साक्षात्काराच आहे, असे वातावरण माध्यमे व राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. पण या मुद्या भोवतीची चर्चा ही भलत्याच मुद्द्या भोवती सुरु होऊ लागली आहे. आशिया व आफ्रिकेतील पूरक आहारात नेस्ले मोठ्या प्रमाणात साखर वापरते आहे पण अमेरिका व युरोप मधील सेरेलॅक मध्ये मात्र साखर नसते या भोवतीच हे नेस्लेच्या साखरेचे वादळ घोंगावत राहिले. प्रश्न चुकीचे उपस्थित केल्यावर उत्तरे कशी बरोबर मिळणार ? मुळात साखर किती या पेक्षा सहा महिन्या नंतर पूरक आहारासाठी डबाबंद कृत्रिम सेरीलॅक व बाजारात उपलब्ध असलेली तत्सम उत्पादने द्यायचीच कशाला ? त्याची खरच गरज आहे का ? हा मुद्दा महत्वाचा आहे. 

                            साधारण सन २००० नंतर जन्माला आलेल्या मिलेनियम बेबीज एक वेगळाच प्रश्न घेऊन जन्माला आली. सहा महिन्या नंतर पूरक आहार म्हणून कृत्रिम तयार डबा बंद अन्न ज्याला बेबी फूड म्हणतात किंवा आर्थिक स्तर कमी असेल तर बिस्कीट असा एक मत प्रवाह प्रत्येक आईच्या मनात पक्का झाला. हा गोंधळ जन्माच्या वेळीच आईचे दुध कि दुधाची पावडर इथूनच मूळ धरू लागला. काम करणारी आई ( वर्किंग मदर ) व्यस्त असल्याने तिला बाळा साठी अन्न शिजवायला वेळ नाही व म्हणून ती पूरक आहार देते असे ही नाही. ग्रामीण भागातील कामावर न जाणाऱ्या  आईला ही या बेबी फूडने कह्यात घेतले. याचे कारण जाहिरातीचे मानवी वर्तनावर असणारे परिणाम व घरात शिजवलेल्या मोफत अन्नाला कोण जाहिरातदार मिळणार ? बेबी फूड व दुधाच्या पावडर वर इंडियन मिल्क सब्सटीट्युट अॅक्ट या कायद्याचे नियंत्रण आहे पण या कायद्याला वळसा घालून निरनिराळ्या क्लुप्त्या वापरून आज पूरक आहार म्हणून ताटातल्या शिजवलेल्या अन्नाची जागा कृत्रिम बेबी फुडणे घेतली आहे. बाजार पेठेचा दबाव व जाहिरातीमुळे ती जागा इतकी पक्की झाली आहे कि, त्यात नैसर्गिक पूरक आहार ताटाबाहेर ढकलला जात आहे. 

काय आहे हा नैसर्गिक पूरक आहार?

                       मुळात सहा महिन्यानंतरच्या बालकांसाठीचे पूरक आहाराचे काही मुलभूत नियम समजून घेणे गरजेचे आहे. नियम पहिला – ते घरात शिजवलेले अन्न असावे अर्थात  . नियम दुसरा – हे अन्न घट्ट चमचा वाकडा केल्यावर खाली पडणार नाही इतके घट्ट असावे ( डाळीचे पाणी, भाताचे पाणी अयोग्य पूरक आहार आहे. पातळ अन्न म्हणजे बारीक बाळ , घट्ट अन्न म्हणजे सुदृढ बाळ ), नियम  तिसरा – हे एक किंवा दोन नव्हे तर चार पाच अन्नाचे मिश्रण हवे ( फक्त वरण भात किंवा दुध पोळी अयोग्य आहार आहे )  . नियम चौथा – कमीत कमी चार वेळा द्यावे, नियम पाचवा – अन्नाचे उष्मांक घनता वाढवण्या साठी प्रत्येक अन्नात तेल / तूप / लोणी घालावे .  नियम सहावा – खाऊ घालताना बसून खाऊ घालावे , आडवे नको. नियम सातवा – बाळाला खाऊ घालताना एका आठवड्याला एक नवी चव आशा प्रकारे चवींची ओळख करून द्यावी. 

                       आता या नियमातील काही बारकावे व वयाप्रमाणे अन्नाचे बदलणारे टप्पे समजून घेणे गरजेचे आहे. सहा महिने ते नऊ महिने , नऊ महिने ते एक वर्ष व एक ते दोन वर्ष असे हे टप्पे आहेत. सहा ते नऊ महिने खीर , कांजी व घरातील जे अन्न असेल ते कुसकरून किंवा मिक्सर मधून फिरवून देता येते .  त्याचे मिश्रण तिखट न टाकता व चवी पुरती साखर टाकून देता येते. प्रत्येक वेळी भरवताना साखर टाकलीच पाहिजे व तेच लहान मुलांना आवडते हा गैरसमज आहे. आहारात लहान वयापासुन साखर , गुळ, मध जितकी कमी तितके चांगले. तसेच मैदा व गहू ही जितका टाळता येईल तितका उत्तम. लहान वयापासून साखरेची चव जितकी कमी दिली जाईल तितके मोठे होऊन साखर खाण्याची आवड व पुढे मधुमेह , ह्रदय रोग या जीवन शैलीच्या आजारांचा धोका कमी होईल. साखरेला दुसरा पर्याय म्हणजे पूरक आहारात थोडे आईचे दुध काढून ते टाकले जाऊ शकते. दिवसातून चार ते पाच वेळा भरवताना दर वेळी अन्न बदलून देणे गरजेचे असते. यात तांदळाची खीर, गव्हाची खीर, वरण भात कोशिंबीर , फळे असे विविध मिश्रित आहार दिला जाऊ शकतो. सहा महिन्या पर्यंत आईचे दुध सुरु असल्याने दुधाची सवय मोडणे ही आवश्यक असते. त्यासाठी आधी पूरक आहार व मगच दुध ही साव्य बाळाला सांगावी व इशाऱ्याने ही दाखवावी. हळूहळू आईच्या दुधाची वारंवारता कमी करत पूरक आहार वाढवावा.  आईचे दुध सुरु असे पर्यंत ६ महिन्यां नंतर गाई म्हशीचे दुध गरजेचे नसते. आईचे दुध बंद झाल्यावर ही गाई , म्हशीचे दुध हे प्रमाणात दिवसातून एक ते दोन वाट्या पुरेसे असते. दुध हे पातळ असल्याने ते आदर्श पूरक आहाराच्या यादीत येत नाहीत. त्या ऐवजी एखाद्या आहारात दही टाकलेले उत्तम. 

                          नऊ महिन्याला आहार मिक्सर मधून काढण्या ऐवजी हातानेच कूसकरून देण्यास सुरु करावे. नऊ महिन्याला बाळाचा पिन्सर ग्रास्प अर्थात चिमटीत वस्तू पकडण्याची क्षमता विकसित होते. अशा वेळी बाळाला अन्नाचे थोडे मोठे तुकडे , फळांचे तुकडे , साळीच्या लाह्या , असे चिमटीत पकडून खाता येतील असे सर्व अन्न बाळा समोर वाढावे.  काकडी , गाजर , बीटचे छोटे रंगीत तुकडे बाळाला स्वतः खाण्यासाठी प्रोत्साहन देईल. ९ महिन्या पासून बाळाचे स्वतः खाण्याचे प्रशिक्षण सुरु व्हायला हवे. बाळ एक वर्षाचे झाले कि पहिल्या वाढदिवसापासून बाळ घरात आई , वडिलांच्या व त्याच्या स्वतःच्या ताटात जेवायल हवे. त्या नंतर बाळासाठी वेगळे नव्हे पण घरात सर्व जण खाणार आहेत तेच पण थोडे कमी तिखट घातलेले अन्न बनवता येईल. दीड ते दोन वर्षा पर्यंत हे ही बंद करून घरातील सर्व जण खातात तेच अन्न लहान मुल खाऊ शकते. 

                      किती खाऊ घालावे व कसे खाऊ घालावे व किती वेळ खाऊ घालावे हे समजून त्यातील चुका समजून घेणे ही गरजेचे आहे. काय खायचे हे आई ठरवेल पण किती खायचे हे बाळ ठरवेल हे तत्व त्यासाठी पाळणे गरजेचे आहे. बाळ नको म्हंटले कि त्या क्षणी थांबणे गरजेचे असते. आपल्या बाळाने भरपूर खायला हवे व गुटगुटीत दिसायला हवे हा समज घातक व बाळासाठी लहान वयातच लठ्ठपणाची समस्या निर्माण करणारा ठरू शकतो. दर दोन महिन्यांनी बालरोगतज्ञांकडून वाढीचा तक्ता भरून बाळाचे वजन नॉर्मल असल्याची खात्री असेल तर बाळाच्या इच्छे विरुद्ध त्याला बळजबरी भरवणे ही बाळाला खाण्याविषयी चीड निर्माण करते व आहाराच्या सवयींवर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. सहसा बाळ फिरत, रमत-गमत खाते. पण मोठ्यांसारखी लहान मुले २० - २५ मिनिटांत एका वेळचा आहार संपवत नाहीत. लहान मुलांना भरवताना त्यांच्याशी संवाद ही आवश्यक असतो. जसे मोठ्यांना एखाद्या दिवशी कमी खाण्याची व न खाण्याची इच्छा असते तसे लहान बाळांचा न खाण्याचा मूड असतो. अधून मधून त्यांच्या या अनिच्छेचा आदर करणे आवश्यक असते. मुलांना खाऊ घालताना मोबाईल / टीव्ही दाखवत खाऊ घालण्याचा एक सार्वत्रिक कल दिसतो आहे. या मुळे मुलांच्या संवेदना मोबाईलवर एकवटल्याने त्यांना अन्नाची चव कळत नाही , तसेच खाताना तृत्पीची भावना आल्याचे लक्षात येत नाही व पोट भरले तरी मुले खात राहतात व पहिल्या - दुसऱ्या वर्षात लठ्ठपणा सुरु होतो.   आईने मुलांना हाताने भरवणे कधी पूर्ण बंद करावे हा ही प्रश्न राहतो. पहिल्या वर्षा पासून हाताने भरवणे कमी करावे व दोन वर्षा नंतर हाताने भरवणे पूर्ण बंद करावे. ज्या मुलांना २ वर्षा नंतरही आईच भरवत राहते ते आयुष्यात लवकर मानसिक दृष्ट्या स्वावलंबी होत नाहीत असे संशोधन सांगते. 

                     पूरक आहारचा प्रवास असा आई व बाळासह पूर्ण कुटुंबा कडून नैसर्गिक रीत्या करायचा असतो. यात कृत्रिम डबा बंद आहार , बिस्किटे , ब्रेड , पाव , खारी , बेकरीचे इतर पदार्थ यांचा दुरान्वये संबंध नाही. मानवी संस्कृती डबा बंद आहार व बिस्किटांचे उत्पादन सुरु होण्या आधी हजारो वर्षापूर्वी जन्माला आली, ती बहरली .एवढा एक युक्तिवाद अशा कुठल्याही गोष्टी बाळाला पूरक आहार म्हणून गरजेच्या नाहीत यासाठी पुरेसा आहे . काय करावे हे कळले कि काय करू नये व त्या संदर्भातल्या सगळ्या चर्चा मोडीत निघतात. म्हणून नेस्ले व सेरेलॅक मध्ये साखर किती, या पेक्षा हे कशाशी खातात? हेच आम्हाला ठाऊक नाही, या टोकाला आपण जायला हवे, तेच हिताचे आहे. 

डॉ . अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551

‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे? – डॉ. अमोल अन्नदाते

medical students

दै. महाराष्ट्र टाइम्स

‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे?

-डॉ. अमोल अन्नदाते

मागील पाच वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एक हजार ११७ व एमबीबीएस पदवी करत असताना १५३ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडल्याची आकडेवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( नॅशनल मेडिकल कमिशन ) दिली. अर्ध्यावर शिक्षण सोडून जाण्याचे प्रमणात इतर अभ्यासक्रमातही असते. पण ज्या प्रवेश परीक्षेत १ लाख जागांसाठी २५ लाख विद्यार्थी स्पर्धा करत असतात व हुशार मुले ज्या अभ्यासक्रमाला पसंती देतात तो अभ्यासक्रम इतक्या विद्यार्थ्यांनी सोडणे हे चिंताजनक आहे.

                         खरेतर एकदा एमबीबीएस ला प्रवेश मिळाला की विद्यार्थी डॉक्टर होणारच हे गृहीत धरलेले असते. सन २००० पर्यंत एमबीबीएस  तृतीय वर्ष परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नव्हते. आता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात तसेच देशभर ही एमबीबीएस परीक्षा पूर्वी इतकी अवघड ठेवलेली नाही. तरीही अभ्यासक्रमाचा भार न झेपल्याने काही प्रमाणात मुले कोर्स सोडतात. महाराष्ट्रात पहिल्या वर्षी उत्तीर्ण होण्यासाठी चार परीक्षांची संधी दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी बाहेर जातो. उशिराने सुरु होणारे प्रवेश , न्यायालयीन खटले यामुळे ऑगस्ट  मध्ये सुरु होणे अपेक्षित असलेले वर्ग हे सुरु होण्यास जानेवारी , डिसेंबर उजाडते व ऑक्टोबर मध्ये परीक्षा असते. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात नवख्या असलेल्या विद्यार्थ्याना अवाढव्य अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यास जेमतेम १० महिने मिळतात. त्यातही संक्रांत , जयंत्या , दसरा , दिवाळी या महाविद्यालयाला सुट्ट्या सुरूच असतात. म्हणून पहिल्या वर्षात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यास सोप्या असल्या तरी त्यांचा तणाव नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या वयासाठी मोठा असतो. त्यामुळे मानसिक समस्या , तणाव व त्यातून व्यसनाधीनतेचे प्रमाण वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या सर्व नैराश्येतून अभ्यासक्रम सोडणारे काही विद्यार्थी असतात.

                              सहसा वर्गात पहिल्या पाच मध्ये असलेले विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला येतात. शालेय जीवनापासून सतत हे विद्यार्थी शैक्षणिक यश अनुभवलेले असतात. वर्गात मधल्या फळीतील मुलाना फार शैक्षणिक प्रगती ही नाही व घसरण ही नाही अशा स्थिर मानसिकतेत रहायची सवय असते पण पहिल्या फळीतील विद्यार्थ्यांची जराही शैक्षणिक घसरण पचवण्याची मानसिक क्षमता कमी असते. पडून परत उसळी मारण्याच्या मानसिक प्रक्रियेला रेसिलंस ( resilience ) असे म्हंटले जाते. या आघाडीवर वैद्यकीय विद्यार्थी काहीसे कमकुवत असतात. म्हणून एमबीबीएस व त्यानंतर जराही शैक्षणिक अपयश आले कि अभ्यासक्रम सोडण्याचे टोकाचे पाउल काही विद्यार्थी उचलतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व त्यातच विदर्भातील काही महाविद्यालयात रॅगींगचे  प्रमाण खूप आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात एका वैद्यकीय विद्यार्थ्यांची महाविद्यालय प्रांगणात हत्या झाल्या नंतर हे विषय काहीसे पुढे आले. घरापासून लांब असलेले विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक दृष्ट्या स्थिर राहतील व त्यांना वसतिगृह, महाविद्यालय हे दुसरे घर वाटावे असे आवर्जुन प्रयत्न होत नाहीत.

                        अनेकांना आपण या अभ्यासक्रमाला का आलोय हेच माहित नसते. त्यातील काही जण पालकांच्या हट्टापायी या अभ्यासक्रमाला आलेले असतात. बर्याच जणांना हे क्षेत्र म्हणजे आर्थिक मिळकत  व सामाजिक स्थैर्याची खात्री वाटते पण या क्षेत्रात आल्यावर त्यातील संघर्ष कळतो. वैद्यकीय प्रवेश घेऊन नंतर इतर क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण ही त्यामुळे वाढले आहे. 

              पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्पर्धा पदवी परीक्षे एवढीच तीव्र आहे. तरीही तिथे ही अभ्यासक्रम सोडण्याचे प्रमाण आहे. भारतातील निवासी डॉक्टरांची काम करण्याची पद्धत जगात सर्वात सदोष व गैर व्यवस्थापनाने ग्रासलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न रुग्णालयात हजारो रुग्णांची गर्दी असते पण एका कक्षात बोटावर मोजण्या इतपत  निवासी डॉक्टरांवर सगळा भार असतो. त्यामुळे अनियमित कामाचे तास व निवासाच्या अस्वच्छ व अपुर्या सोयी ही समस्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असाध्य कॅन्सर  सारखी झाली आहे. एक आठवड्या पूर्वी आजारी असलेल्या सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा वसतिगृहातील खोलीतच मृत्यू झाला. नांदेड व ठाणे  वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू होऊनही परिस्थिती बदललेली नाही . अपुऱ्या वैद्यकीय साधनांमध्ये अपेक्षांचे ओझे झेलत होणारे पदव्युत्तर शिक्षण हे आनंदात नव्हे तर  फरफटत,  अपमान सोसत पूर्ण करण्याचे शिक्षण झाले आहे. यातून ही बरेच निवासी डॉक्टर हे तणावाखाली असतात व प्रसंगी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. काही विद्यार्थी हे शिक्षण चालू असताना इतर ठिकाणी व अभ्यासक्रमात संधी मिळाली म्हणून ही शिक्षण सोडतात. वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत अभ्यासक्रमाची लांबी जास्त असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिशी उजाडते . त्यातच लग्न व इतर कौटुंबिक जबाबदार्या राहून जातात. स्त्री डॉक्टरांसाठी तर तारुण्य, लग्नाचे वय व पदव्युत्तर  शैक्षणिक संधी हे नेमके एकाच वेळी येते म्हणून हे गणित जुळवत असताना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. 

वैद्यकीय शिक्षणात आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग शिक्षण घेत आहेत. त्यात शासकीय महाविद्यालय व खाजगी वैदकीय महाविद्यालयातील कमी फीच्या कोट्यातील विद्यार्थी हे निम्न व मध्यम वर्गातील आहेत . अभिमत व खाजगी महाविद्यालयात उच्च मध्यम वर्ग व अभिजन वर्ग शिक्षण घेतो. दुर्दैवाने असे म्हणावे लागते कि आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती शिक्षण व विद्यार्थ्यांचे मानसिक व्यवस्थापन याबाबत चिंताजनक आहे. भरघोस फी आकारणारे अभिमत विद्यापीठे व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये यांच्यावर तुलनेने फी भरणाऱ्या वर्गाचा दबाव जास्त आहे व म्हणून मुलाला सुखरूप अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व त्याला उत्तीर्ण करण्यास काळजी घेतली जाते. म्हणून शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हे तुलनेने जास्त तणावा खाली असतात . खरे तर अभ्यासक्रम सोडून जाण्याची इच्छा ही तात्कालिक असते पण काही विद्यार्थी या तणावाच्या काळात आधार न मिळाल्यामुळे अभ्यासक्रम सोडतात. बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील फार्माकोलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ पद्माकर पंडित यांनी अशा अभ्यासक्रम सोडून गेलेल्या व सोडण्याच्या बेतात असलेल्या अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना समुपदेशन व शैक्षणिक पाठबळ देऊन त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत केली. अशा मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात क्रोनिक असे म्हंटले जाते. आश्चर्य म्हणजे हेच क्रोनिक त्यांना पडत्या काळात आधार मिळाल्यास पुढे केवळ यशस्वी डॉक्टरच नाही तर प्रशासन , राजकारणा अशा अनेक क्षेत्रात नाव कमवतात. म्हणून डॉ पद्माकर पंडित यांच्या सारखे विद्यार्थ्यांना आधार देणारी बेटे ही प्रत्येक महाविद्यालयात असणे गरजेचे आहे. सैन्याच्या प्रशिक्षणात आपल्या सोबतचा जवान युद्धात जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेऊन धावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्येकाला मानसिक आधार देण्याच साठी एक बडी जवान अर्थात मित्र ठरवून दिला जातो. आपल्या मित्र जवानाची मानसिकता ढासळत असेल तर त्वरित वरिष्ठांना सांगण्याचे आदेश दिले जातात. वैद्यकीय शिक्षणात ही सोबतचा मानसिक रित्या जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेण्याचे अर्थात आधार देण्याचे प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना गरजेचे आहे.

जी एस वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षी ‘शिदोरी’ नावाचा उपक्रम राबवला जातो. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी दोन सिनियर विद्यार्थी व एका शिक्षका कडे दिली जाते. परदेशातील अनेक विद्यापीठात असा मेंटर – मेंटी प्रोग्राम अर्थात विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थी व शिक्षक वाटाड्या म्हणून ठरवून दिले जातात. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम कागदावरच राहतो. मानसिक समस्या हा समाजातील येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्या बर्या करण्याची, टाळण्याची जबाबदारी ही मुख्यतः वैद्यकीय क्षेत्रावरच असणार आहे. पण यासाठी आधी त्यांनी आपले विद्यार्थी तेवढे सक्षम असतील व एक ही विद्यार्थी अभ्यासक्रम सोडून जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. कणखर वैद्यकीय विद्यार्थीच कणखर समाज घडवेल.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

सरकार खरंच बहुमताचं असतं? – डाॅ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

सरकार खरंच बहुमताचं असतं?

डाॅ. अमोल अन्नदाते

भारतीय लोकशाही मध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बहुमताच्या सरकार कडून राज्यशकट हाकले जावे असे म्हटले जाते. पण ग्राम पंचायती पासून ते अगदी केंद्रापर्यंत हे सरकार दर वेळी बहुमताचेच असते का ? असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर स्वतंत्र्यानंतर ७६ वर्षे उलटूनही नाही असेच द्यावे लागेल . यात प्रश्न फक्त मतदानाची टक्केवारी किंवा निकाला नंतर होणार्या अनैतिक आघाड्या एवढा नाही तर देशातील प्रत्येकाच्या मनातील भावना बहुमताच्या रूपाने प्रकट होते का व तसे होत नसेल तर ती व्हावी यासाठी काय करता येईल ? हा लोकशाहीतील संशोधनाचा मोठा विषय आहे. अर्थात बहुमत व्यक्त होताना सर्वात महत्वाचा प्रश्न आहे देशातील किती लोक मतदान करतात . 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत स्वतन्त्र भारताच्या इतिहासातील आज वरचे सर्वाधिक ६७ % मतदान झाले . बहुमताने निवडून आलेल्या पक्षाला ४५ % मतदानाचा वाटा होता ज्याला बराच काळ राक्षसी बहुमत म्हंटले गेले. मतदान केलेल्यांपैकी मतदानाची ही टक्केवारी आहे. त्यापैकी २२ % मतदारांनी या सरकारच्या विरोधातले मत नोंदवले पण मतदान न केलेल्या ३३ % लोकांना नेमके काय वाटत होते हे गुलदस्त्यातच राहिले. बर्याचदा निवडणुकीत असे होते कि राज्यातील एखाद्या सरकारच्या किंवा त्या मतदारसंघात एखाद्या उमेदवाराच्या विरोधात अनेक जण बोलताना मत व्यक्त करत असतात. पण निवडून मात्र तोच उमेदवार येतो. तुरुंगात असताना निवडून आलेले तर असे कित्येक अट्टल गुन्हेगार आहेत. तेव्हा नेमके लोकशाहीचे हे बहुमताचे तत्व उलटे पडताना दिसते. याचे कारण विचारपूर्वक मतदान करण्याची बौद्धिक , वैचारिक शक्ती व मतदानाच्या दिवशी आवर्जुन मतदान करण्याची शक्यता याचा परस्पर विरोधी संबंध आहे. मतदान न करणऱ्या ३३ % मध्ये बहुसंख्य विचारी मतदार असतो जो मतदान फार गांभीर्याने घेत नाही किंवा निवडणुकीच्या फिवर पासून काहीसा लांब असतो. पण आपले वैचारिक मते हिरीरीने मांडण्यात मात्र हा वर्ग पुढे असतो. आम आदमी पार्टीला पहिल्या निवडणुकीत जे अभूतपूर्व यश मिळाले ते याच ठाम मत असलेल्या पण मतदानासाठी बाहेर न पडणार्या वर्गाला मतदानासाठी घराबाहेर काढून मतदान केंद्रावर पोहोचवण्यास यश आल्या मुळेच.

मतदान न करण्या मध्ये काही प्रमाणात शेवटच्या घटकातील निरक्षर , मागास व वायो वृद्ध यांची संख्याही असते. साधे रेशन कार्ड नसलेले किंवा आधार कार्ड म्हणजे काय ? हे नीट माहित नसलेला आज ही एक वर्ग या देशात आहे. भारतीय निवडणुकांचे निकाल या मूळ व ठोस मुद्दे नव्हे तर भावनेवरच होत असल्याने सहसा ग्रामीण व अशिक्षित वर्ग जो लवकर भावनिक होऊ शकतो अशांच मतदानासाठी बाहेर काढून मतदान केंद्रावर पोहोचवून निवडणूका जिंकल्या जातात. जितका शिक्षित व विचारी मतदार तितके त्याच्या कडे येऊन मला मतदान करा असे उमेदवार किंवा पक्षा कडून म्हटले जाण्याची व मतदान केंद्रावर त्याला घेऊन जाण्याची उत्सुकता कमी. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जाहिराती देण्यापलीकडे फारसे संशोधन करून प्रयोग झाले नाहीत. मतदाना इतक्या महत्वाच्या गोष्टीला आजवर जबाबदारी किवा उत्तरदायीत्व अशा कुठल्याही भावनेने देशातील लोक जोडले गेलेले नाही.मतदानासाठी इंसेन्टीव म्हणजे प्रोत्साहनपर काही सवलती मिळाव्या असा एक विचार नेहमी पुढे येतो. पण घटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत अधिकार वापरण्यासाठीही तुम्हाला काही तरी प्रलोभन हवे असेल तर हे घरातील लहान मुलांनी शाळेत जाण्यासाठी पालकांकडून पैसे मागण्यासारखे आहे.

मतदान करताना आपण आपला उमेदवार नाही तर राज्यातील सरकारे पर्यायाने मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान निवडत आहोत ही भावना मतदारांमध्ये संपुष्टात येत चालली आहे. मतदान पश्चात कोणीही कधीही कोणाही सोबत अनैतिक आघाड्या करत असल्याने ही काही प्रमणात मतदानात उदासीनता आली आहे. पण त्यावर आपल्याला काय वाटले हे बहुमताने सांगण्यासाठी परत प्रत्येकाने मतदान केंद्रावरच गेले पाहिजे हे समजून घ्यायला हवे. निकाला नंतरच्या आघाड्यांना अजून एका गोष्टीची जोड मिळाली आहे. आधी मतदान हे पक्ष किंवा एखाद्या पक्षाच्या विचाराला केले जायचे . उमेदवार हे केवळ त्या विचाराचे वाहक समजले जायचे . आता मात्र निवडणुका पक्ष नव्हे तर उमेदवार लढतात. निवडून येण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या उमेदवाराला सत्तेत येण्याची सर्वधिक क्षमता असलेला पक्ष hand pick अर्थात वेचून निवडते व त्यांची युती होऊन निवडणूक लढली जाते. यात पक्षाचा किंवा उमेदवाराचा विचार काय आहे , तो कुठल्या तात्विक बाजूचा आहे हे मुद्दे अगदीच हास्यस्पद समजले जाण्या इतपत परिस्थिती खालावली आहे. अशा वेळी आपले मत कोणाला ही दिले तरी अमुक एक पक्ष व अमुक एक उमेदवारच निवडून येणार या परसेप्शन पायी विरोधी मत असलेले मतदानच करत नाहीत. पण बर्याचदा हे परसेप्शन तयार केलेले ही असते हे अनेकांच्या लक्षात येत नाही. शंकरराव कोल्हे यांच्या सुरुवातीच्या काळात ते नवखे उमेदवार होते. त्यांनी काही ज्योतिषी मतदारसंघात पेरले . इतर काही प्रश्नांची उत्तरे देऊन ते निवडणुकीच्या निकाला कडे येत व शंकरराव निवडून येणार असल्याचे सांगत. प्रस्थापित सोडून इतर कोणी तरी निवडून येऊ शकते हा विचार रुजवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली.

भारतात शिक्षित तसेच मोठा कामगार वर्ग हा स्थलांतर करणारा आहे. स्थलांतर झाल्यावर बहुतांश वेळा आपली मतदानाची जागा बदलून घेतली जात नाही. यात जवळपास ५ % मतदार मतदानापासून वंचित राहतात. ग्रामीण व शहरी मतदाना मध्येही अजून १० -१५ टक्क्यांची दरी आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदान केलेल्यांची पाहणी होते. पण मतदान न करणाऱ्यांची व त्यांच्या या वागणुकीची पाहणी आजवर झालेली नाही. खर्या अर्थाने बहुमताचे सरकार स्थापित होणे ही लोकशाहीची पहली अट पूर्ण करायची असेल तर या कडे दुर्लक्ष करता येणार नाही.

डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551