‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून…. – डॉ. अमोल अन्नदाते

Dr. amol annadate artical

दै. लोकमत

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून….डॉ. अमोल अन्नदाते

सदोष रस्ता बांधणी, वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक/आदर नसणारे वाहनचालक, सदोष वाहने, अतिवेगाची नशा, अतिपाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे .

२०३ दिवसांत ४५० अपघात आणि ९७ मृत्यू ही ‘समृद्धी महामार्गाची आकडेवारी, परिस्थिती किती भीषण आहे हे दर्शवणारी आहे. सदोष रस्ता बांधणीबरोबरच वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक / आदर नसणारे वाहनचालक अशा महामार्गावरून चालण्याच्या स्थितीत नसलेली सदोष वाहने, अतिवेगाची नशा आणि अकारण घाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे.

या महामार्गावर सर्वाधिक वेग मर्यादा १२० आहे. पण, भारतीय वाहनचालकांचे गाडी चालवण्याचे सरासरी तारतम्य लक्षात घेता ही कमाल मर्यादा अपघातांमध्ये भर घालणारी ठरते आहे. ही वेगमर्यादा महामार्गाची व वाहनाची आदर्श स्थिती व वाहतुकीचे सर्व नियम पाळले जात आहेत असे गृहीत धरून ठरवलेली असते. पण, ही आदर्श स्थिती क्वचितच जुळून येते. म्हणून ठरवून दिलेली वेगमर्यादा काहीही असली तरी समृद्धीवर १०० वेग मर्यादा न ओलांडणे महत्त्वाचे आहे. ८०. १०० व १२० अशा तीन लेन मार्गिका (लेन्स) महामार्गावर ठरवून दिल्या आहेत. पण, या तीन मार्गिका आणि ओव्हरटेक करण्याची सर्वात उजवी मार्गिका ही शिस्त खूप कमी गाड्या पाळतात. स्वयंशिस्तीने हे नियम पाळणे व वेगमर्यादेवर कठोर व कायदेशीर नियंत्रण आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग बांधताना काही चुका झाल्या आहेत. खालून रस्ता असताना त्याठिकाणी सिमेंटचा रास्ता डांबरी होतो व डांबरीकरण सुरू होते. त्याठिकणी मोठे उंचवटे निर्माण झालेले आहेत.काही ठिकाणी हे उंचवटे एवढे उंच आहेत की १२० किंवा काही वेळा १०० च्या वेगाने गाडी जात असल्यास त्यावरून गतिरोधक असावा,तशी उडते. जास्त वेग असल्यास ती आपली लेन तोडून इतर वाहनांवर आदळण्याची किंवा चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या कठड्यावर आदळण्याची, प्रसंगी खाली फेकली जाण्याची शक्यता आहे. बरेच अपघात हे पुलावर किंवा पूल ओलांडून गेल्यावर गाडी उडाल्याने झाल्याचे लक्षात येईल. या सर्व पुलांआधी वेग कमी करून तो ८० करण्याचे फलक लावणे व या जोडणीचे उंचवटे कमी करणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग हा सरळ एका रेषेत असल्याने व वाहनचालकांना सतत समोर त्याच प्रकारच्या दृश्याकडे बघून बधिरता येते व ते संमोहित होतात. दर दोन तासांनी किमान पाच मिनिटांच्या विश्रांतीसाठी थांबण्याची सोय या महामार्गावर कुठेही नाही. टोलनाके येतात तेही महामार्ग चढल्यावर व उतरताना.

५४,००० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या महामार्गावर अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी ट्रॉमा सेंटर, नजीकच्या रुग्णालयांपर्यंत जाण्यासाठीची आपत्कालीन सोय, रुग्णवाहिका, त्यात प्रशिक्षित डॉक्टरची उपलब्धता याचे पुरेसे नियोजन नाही. म्हणायला काही रुग्णवाहिका उभ्या असतात. पण, आतापर्यंतच्या अपघातात त्यांचा फारसा उपयोग झालेला नाही. ९ जूनपासून महामार्गाच्या टोलनाक्यांवर टायर्सची तपासणी करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. पण प्रत्येक वाहनाची अशी तपासणी जिकिरीची आहे. प्रत्येकाने स्वतः आपल्या वाहनाची स्थिती तपासणे हाच त्यावरचा मार्ग होय!

शिर्डी, नाशिक, शनी शिंगणापूर, माहूर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर अशी देवस्थाने व धार्मिक पर्यटनाला जाताना हा महामार्ग वापरणाऱ्यांना विदर्भ आणि मुंबईकडून एका दिवसात भाड्याच्या वाहनाने सकाळी लवकर निघून रात्रीपर्यंत परतण्याची घाई असते. या विचित्र हट्टामुळे ड्रायव्हरवर अतिताण येतो व रात्रभर प्रवासात अपुऱ्या झोपेमुळे अनेक अपघात घडतात. महामार्गावर शक्यतो रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेतला प्रवास टाळायला हवा.

रस्त्यांच्या बाबतीत एक वाक्य नेहमी सांगितले जाते. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे चांगले रस्ते आहेत असे नाही तर अमेरिकेमध्ये चांगले रस्ते आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. आपल्या ‘समृद्ध अनुभवा नंतर त्यात एक भर घालायला हवी. अमेरिकेकडे (खरेतर बहुतांश प्रगत देशांकडे) चांगल्या रस्त्यांसोबत त्यांचे चांगले नियोजन आहे, लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल आदर आहे आणि ते पाळण्याची सवय आहे; म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. त्यांच्या समृद्धीची वाट रस्त्याने तरी विनाशाकडे जात नाही!

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com