घरात फॅन्सी उत्पादने आणू नका ! कोरोनाच्या साथीनंतर अनेक कोरोना उत्पादनांची साथही बाजारात आली आहे. यातली बरीचशी उत्पादने अनावश्यक आहेत, विज्ञानवादी नाहीत. अशा उत्पादनांपासून सावध राहावे. दारे उघडण्यासाठी प्लॅस्टिक व इतर साहित्याचे आकडे : असे भासवले जाते की, दार उघडणे बंद करण्यासाठी आपला हात लागणार नाही. पण आकडा आपण परत खिशात ठेवणार म्हणजे त्या जागेच्या संपर्कातून आकडा संसर्गित झाला तर तो परत आपल्याच खिशात येऊन आपल्याला संसर्गित करणार आहे. मग या आकड्याचा उपयोग काय?
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
- हेपा फिल्टर्स : घरातील कोरोना विषाणू फिल्टरद्वारे बाहेर काढण्याचा दावा केला जातो. बरेच हेपा फिल्टर फक्त बॅक्टेरिया फिल्टर करतात, विषाणू नाही. जे काही प्रमाणात विषाणू फिल्टर करतात त्यांची गरज फक्त मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात अशा आॅपरेशन थिएटरमध्ये आहे.
- वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी चेंबर्स : असे काही चेंबर्स निर्माण केले गेले आहेत, ज्यात अतिनील किरणे सोडली जातात व तुम्ही वस्तू आणली किंवा नोटा वापरण्याआधी यात काही वेळ ठेवायच्या व नंतर वापरायच्या, म्हणजे त्या निर्जंतुक होतील. हे निर्जंतुकीकरण अजून पूर्ण सिद्ध व्हायचे आहे. दुसरे असे की, अशा किती गोष्टी तुम्ही निर्जंतुक करणार आहात? त्या निर्जंतुककरण्याआधी कधी तरी, कुठे तरी तुमचा अशा वस्तूंशी संपर्क येणार आहे.
- सॅनिटायझेशन चेंबर : कार्यालय, सोसायटी, घराबाहेर, बसच्या दारावर असे सॅनिटायझेशन चेंबर बसवले जात आहेत. पण अंगावर कुठल्याही सॅनिटायझेशनची फवारणी ही उपयोगाची तर नाहीच, शिवाय ती घातक ठरू शकते.
- घरात फॅन्सी उत्पादने आणू नका ! टेम्परेचर सेन्सर मॉनिटर : तापमान तपासणी ही स्क्रीनिंगची ढोबळ पद्धत आहे. महागडे तापमानाचे स्क्रीनिंग बसवून काही साध्य होणार नाही. संसर्ग झाल्यावर तीन-चार दिवसांनी लक्षणे सुरू होतात. त्यानंतरही ताप २४ तास असेलच असे नाही. म्हणून अशा मशीन बसवू नये.
- कोरोना क्लिनिंग सर्व्हिस : खास कोरोनासाठी येऊन घर स्वच्छ केले जाण्याच्या जाहिरीतींना भुलू नका. पाण्यात सोडियम हायपोक्लोराइड टाकले व साधे ग्लोव्हज घातले तरी हे सहज करता येते.
- एसी क्लिनिंग : हेही एसीची जाळी गरम पाण्यातून काढून एक दिवस उन्हात ठेवून सहज शक्य आहे. साबणाने हात धुणे, शारीरिक अंतर, सॅनिटायझर, मास्क, चष्मा किंवा जोखीम जास्त असलेले काम असल्यास फेस शिल्ड पुरेसे आहे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.