डॉ. पायल या घटनेला जातीय भेदाचे एक उदाहरण मानण्याइतके तिचे स्वरूप मर्यादित नाही. यातील जातीय भेदाच्या मुद्द्याबद्दलचा निष्कर्ष नोंदवण्याचा हक्क सध्या न्यायालयालाच आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रात अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेद मात्र नक्कीच चर्चिले जायला हवे. नव्हे इतर क्षेत्रांतही असलेला भेदभाव संपवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रानेच बौद्धिक नेतृत्व करावे.
डॉ. पायल तडवी चे प्रकरण बाजूला ठेवले तरी या वर्षी पहिल्यांदाच वैद्यकीय प्रवेशामध्ये आरक्षित व अनारक्षित वर्गाला मिळणाऱ्या जागांमध्ये मोठी तफावत दिसून आली. मराठा आरक्षण, समाजिक, आर्थिक वर्गासाठी आरक्षण यांमुळे अनारक्षित खुल्या वर्गासाठी त्वचारोग, रेडिओलॉजी अशा शाखांसाठी राज्यात एकेक जागा शिल्लक राहिली. एमबीबीएसच्या प्रवेशातही तेच झाले. यामुळे असमाधानाची व अस्वस्थतेची मोठी ठिणगी खुल्या वर्गात पडली. खरे तर अशा बौद्धिक क्षेत्रात असा जातीय कारणावरून भेद निर्माण होणे हे घातक आहे. १९९३ पासून २०१९ पर्यंत याबद्दलची नाराजी धुमसत असली तरी ती एवढी तीव्र कधीच झाली नव्हती. याच्या चर्चा दबक्या आवाजात व्हायच्या.
वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात काही भेदभाव खूप आधीपासून होते, पण फारच तुरळक प्रमाणात. ते फक्त जातीयच नव्हे तर इतर स्वरूपाचेही असायचे. ते आजही आहेत. एमबीबीएसचे शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांना काही भेदभाव जाणवतात. स्थानिक–परके (म्हणजे मुंबई, पुण्याचे आणि बाहेरचे), ऑल इंडिया कॅटॅगरीतील म्हणजे परप्रांतीय आणि प्रांतीय, मराठी–अमराठी, होस्टेलला राहणारे–घरी राहणारे, अशा प्रकारच्या भेदभावांना सामोरे जावेच लागते. मुंबईबाहेरच्या काही महाविद्यालयांत तर जातींनुसार वेगळ्या खानावळीही असायच्या.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असतानाची तऱ्हा आणखी वेगळीच असते. कामाचा प्रचंड ताण, इतर निवासी डॉक्टर व सिनिअरचे दडपण, लेक्चरर, प्राध्यापक यांचा दरारा, त्यांचा इगो सांभाळण्याचा मानसिक ताण अशी सगळी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांची आणि अपुऱ्या सुरक्षेची धास्ती वेगळीच. यावर कळस म्हणजे हल्ली चर्चेत येत असलेला जातीय भेद. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे ऐन तारुण्यात, मौजमजा करण्याच्या काळात, रोमॅंटिसीझम असण्याच्या काळात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी मुले हे सारे ताण सहन करत असतात.
वैद्यकीय क्षेत्र असे सेवाक्षेत्र आहे, की येथे आस्था, जिव्हाळा या भावना मनात असणे महत्त्वाचे असते. प्रेम हा ज्या क्षेत्राचा गाभा आहे, त्या क्षेत्रात काम करणारी माणसे मात्र एकमेकांना माणूस म्हणून प्रेमाने जोडलेली दिसत नाहीत. निवासी डॉक्टर असताना बऱ्याचदा आपल्या प्राध्यापकाला आपले नावही माहीत नाही हे जाणवते, तेव्हा त्या निवासी डॉक्टरला ‘आयडेंटीटी क्रायसिस’ होतो. अशा मन:स्थितीत एखादा सौम्य टोमणासुद्धा मनाला जखम करतो.
पूर्वीही हे सगळे असायचे, पण कुठे ना कुठे शिक्षकांमधील एखाद्याशी भावनिक नाते जुळायचे. अगदी आधारवड नाही तर एखादी पारंबी तरी हाती लागायची. बाहेरून येणाऱ्या आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ. रवी बापट यांच्यासारखे शिक्षक आई–बाप व्हायचे. अत्यंत व्यग्र व मोठे वलय असलेल्या या डॉक्टरांची केबिन म्हणजे कॅम्पसमधल्या शिकाऊ डॉक्टरांचे घर व्हायचे. डॉ. संजय ओक हे डीन असतानाही मुलांसोबत क्रिकेटची अख्खी मॅच खेळायचे. आजही आम्ही आमचे मन मोकळे करायला, जे अडेल ते विचारायला या शिक्षकांकडे जातो.
आता विद्यार्थी–शिक्षक नाते तसे राहिलेले नाही. अर्थात, नक्राश्रू ढाळत बसण्यात अर्थ नाही, पण पायलसारख्या डॉक्टरला आधाराची दोरी कॅम्पसवर न मिळाल्याने गळफासाची दोरी जवळ करावीशी वाटत असेल तर काहीतरी चुकतेय, काहीतरी न्यून राहतेय. निवासी डॉक्टरच्या मनातील भावनिक आंदोलने शांत करणारी व्यवस्था आपल्याला नक्कीच उभारावी लागणार आहे.
आज महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने नियम केलेले असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगविरोधी कमिटी, विशाखा समिती अशा व्यवस्था असतात. परंतु त्यांच्या बैठका कितपत गांभीर्याने होतात, याबद्दल साशंकता आहे. या समित्यांद्वारे विद्यार्थ्यांना भावनिक आधार मिळतो, अशा नोंदी ‘मिनिट्स ऑफ मीटिंग’ मध्ये बंदिस्त होतात. प्रत्यक्षात भावनिक आधार वगैरे द्यायला वेळ आहे कोणाला? अशा मानसिक गरजा भागवायला फार वेळ लागतो, हा गैरसमज आहे. या सहज चालताबोलता होणाऱ्या गोष्टी आहेत. क्लिनिकलच्या शिक्षकांवर भरगच्च भरलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना सेवा देण्याचा ताण आहे. नॉन–क्लिनिकल विभागांतील मंडळींनी ही जबाबदारी घ्यायला हरकत नाही.
कुटुंबात एखाद्याचा मूड चांगला नसेल तर आपण लगेच विचारपूस करतो; त्यासाठी घरात कोणी औपचारिक बैठक घेत नाही. तसेच वातावरण वैद्यकीय महाविद्यालयात असायला हवे. वैद्यकीय सेवेसारख्या तणावाच्या क्षेत्रात दोन व्यक्तींमध्ये भावनिक ताणाताणी होणे सहाजिक आहे, मात्र ती मिटल्यावर हसत एकत्र चहा घेतला तरी विषय मार्गी लागतात. आपण कोणी कनिष्ठ, वरिष्ठ नाही तर सगळे मिळून वैद्यकीय सेवेसाठी काम करतोय, हे सर्वांना उमजले की सगळे प्रश्न संपतील.
डॉ. पायल तडवी संबंधित इतर लेख वाचू शकता.
आरक्षण असणे हा व्यवस्थेचा भाग आहे. तो स्वीकारण्याला पर्याय नाही. एकमेकांवर रोष ठेवून त्या स्थितीत काही फरक होणार नाही. डॉ. पायल तडवीसारखी एखादी तरुणी जग सोडून गेल्यावरच काय चुकतेय याचा विचार होतो, हे दुर्दैव आहे. साध्या माणुसकीच्या गोष्टी लक्षात ठेवून वागले, एकमेकांना समजून घेतले, तर एकमेकांना आधार देणारे दोर भक्कम होतील. एखादा गटांगळ्या खाणारा जीव त्या दोराला धरून स्वत:ला सावरेल… गळफास नाही लावून घ्यावासा वाटणार त्याला!
सदरील लेख झी मराठी दिशा या साप्ताहिकात प्रकाशित झाला आहे.
डॉ. अमोल अन्नदाते | वेबसाईट: amolannadate.com
ई-मेल: reachme@amolannadate.com