सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय? सध्या आपण कोरोनाच्या स्टेज २ मध्ये म्हणजे जिथे एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो अशा स्टेज मध्ये आहोत. या घडीला आपल्याला स्टेज ३ मध्ये जायचे नसेल तर सोशल डीस्टन्सिंग म्हणजे काय हे समजून ती पार पाडणे समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गरज नसताना घराबाहेर न जाणे आणि उगीचच प्रवास न करणे. जर कामावर जायचे असेल तर ठीक आहे पण मौज म्हणून बागेत, हॉटेल मध्ये जायचे नाही. बाहेर जायचे असल्यास अगदीच गरजेचे आहे आणि तेव्हा ही एखाद्याच व्यक्तीने बाहेर जाणे. शक्यतो २० पेक्षा जास्त लोक एका खोलीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणे. मोठे समारंभ, कार्यक्रम हे टाळावे व शक्यतो आयोजन केले असल्यास रद्द करावे. येत्या दोन आठवड्यात पाहुणे म्हणून कोणाकडे जाऊ नका आणि कोणी पाहुणे उगीचच येणार असतील तर त्यांना प्रेमाने नकार देत सध्या सोशल डीस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगा.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
बाहेर जाण्याची गरज पडल्यास इतरांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर राखा. घरात वावरताना ही शक्यतो एकमेकांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवा. हात मिळवण्याऐवजी नमस्कार करावा. लिफ्ट मध्ये किंवा इतरत्र एकमेकांकडे तोंड करून उभे राहण्यापेक्षा एकमेकांकडे पाठ करून उभे राहावे. या काळात आपण काय करू शकता तर सकाळी मोकळ्या हवेत चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जाऊ शकता. किंवा घराच्या छतावर फिरायला जाऊ शकता.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता