रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही

Articles

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही

By Amol Annadate

April 12, 2021

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही सध्या रेमडीसिवीरचा तुटवडा , यासाठी मेडिकल समोर रांगा आणि या औषधा साठी दाही दिशा धावणारे नातेवाईक असे चित्र आहे. डॉक्टरांनी द्यायला सांगितलेले हे औषध मिळवण्याचा प्रयत्न जरूर करा पण या विज्ञानिक गोष्टी समजून घ्या.

   रेमडीसिवीरचा उपयोग हा लक्षणे सुरु झाल्यावर पहिल्या १० दिवसात केल्यास प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे कि याचा मृत्यू दर कमी करण्यावर काही विशेष परिणाम नाही पण रुग्णालयातले दिवस ३ ते ५ दिवस  व लक्षणे कमी करण्यास मात्र उपयोग आहे. मग मृत्यू टळणार नसेल तर डॉक्टर हे औषध का देत आहेत? कुठल्या ही मेडिकल ट्रायलच्या निकालांचे विश्लेषण करण्याची एक पद्धत असते. मृत्यूचा कमी होणारा आकडा सांख्यिकी दृष्ट्या कमी आहे व नोंद घेण्या जोगा नाही असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे मनसेचा किंवा शेकापचा विधानसभेत एकच आमदार आहे अरे पण एक तरी आहे ना असा हा अर्थ समजावून सांगता येईल. म्हणजे रेमडीसिवीरने  कदाचित ६ वाचत असतील पण ६० वाचत नाहीत. पण जसे १०० पैकी कुठल्या ३ लोकांचा कोरोनाने मृत्यू होणार हे निश्चितपणे सांगता येत नाही, तसेच कुठले ६ रेमडीसिवीरने वाचणार हे ही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यातच ज्या रुग्णांचे वय जास्त आहे, ज्यांना डायबेटीस , उच्च रक्तदाब, हृदयरोग आहे त्यांना वाचवण्यात दिलेल्या प्रत्येक गोष्टीची मदत होते. त्यापैकी रेमडीसिवीर आहे. हे औषध अर्ध्या हळकुंडात पिवळे असले तरी सध्या रेमडीसिवीर, टोकलीझुमॅब, स्टीरॉईड असे अनेक अर्धे अर्धे पिवळे करणारे हळकुंडाचे  तुकडे एकत्र करून रुग्ण व उपचार शक्य तितके पिवळे – यशस्वी करण्याची प्रयत्नांची शर्थ डॉक्टर करत आहेत. यातला ३ ते ५ दिवस लक्षणे कमी करण्याचा फायदा अशा साथीत कसा होतो ते समजून घ्या. आज बेड शिवाय व ऑक्सिजन शिवाय लोक रस्त्यावर तडफडून मरत असताना १००० रुग्णांचे ३ ते ५ दिवसांनी लक्षणे कमी होऊन ती घरी गेली कि पुढील प्रतीक्षेत असलेल्या १००० रुग्णांसाठी बेड उपलब्ध होतो आणि त्यांना लवकर उपचार सुरु झाल्या मुळे ते वाचतात. तुम्हाला वाटेल त्यांना वाचवायला मी कशाला रेमडीसिवीर घेऊ ? कारण तो रुग्ण तुमचा भाऊ , वडील , बायको , मुल कोणीही असू शकत. मागचा रुग्ण रेमडीसिवीर घेऊन ३ दिवस लवकर घरी गेला म्हणून तुम्हाला / तुमच्या नातेवाईकाला बेड मोकळा झाला हे विसरता येणार नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रेमडीसिवीरची ५ मुख्य इंडीकेशन्स आहेत –

ही मुख्य ५ कारणे सोडून यातल्या काही गोष्टींची सरमिसळ किंवा आजार झपाट्याने वाढत असल्याची किंवा कुठली एखादी तपासणी तीव्रता दर्शवत असल्यास सहाव कारण हे डॉक्टरांच्या सिक्स्थ सेन्स साठी सोडाव लागत.

सध्या रुग्णांची संख्याच जास्त असल्याने मुख्य ५ कारणांमध्ये बसणाऱ्या रुग्णांची संख्याच जास्त आहे ही डॉक्टरांची बाजू रुग्णांनी समजून घ्यावी व खाजगी रुग्णालयात उगीचच फायदा नसताना रेमडीसिवीर देत आहेत हा गैरसमज मनातून काढून टाकावा.

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही सध्या अत्यवस्थ कोविड रुग्ण वाचवण्यासाठी ऑक्सिजन , लो मोल्युकेलार वेट हिपॅरीन, स्टीरॉईड, रेमडीसिवीर, टोकलीझुमॅब हे आम्हा डॉक्टरांच्या भात्यातील ५ मुख्य बाण आहेत. यातले कुठले ही रामबाण नाही पण त्या त्या परिस्थितीत तो तो बाण उपयोगी पडतो. बाहुबलीच्या पोस्टरमधील देवसेना व बाहुबली एकत्रित पकडलेला तीन बाणांचा धनुष्य तुम्हाला आठवत असेल. असेच आम्हा डॉक्टरांच्या हातातल्या धनुष्यातील ५ बाण एकत्रित  किंवा कुठलेही तीन बाण सोडल्यास किमान काही रुग्णांना वाचवण्यात आम्हाला यश येते आहे. आज प्रेतांच्या अंत्य संस्काराला सरणपण ही मिळत नसल्याची भयानक परिस्थिती काही ठिकाणी असताना काहीही करा पण रुग्ण वाचवा अशी डॉक्टरांची मनस्थिती आहे आणि म्हणून रेमडीसिवीरचा वापर डॉक्टरांना अपरिहार्य आहे. पुढच्या क्षणाला रेमडीसिवीर मिळाल नाही तर रुग्ण लगेच दगावेल का ? नाही पण तो अशा स्थितीत आहे कि रेमडीसिवीर दिल्याने तो वाचण्याची शक्यता वाढेल. हा शब्दांचा खेळ नाही , वैज्ञानिक सत्य आहे. मग आपण काय करायचे ? डॉक्टरांवर विश्वास ठेवून रेमडीसिवीर आणायला सांगितले तर प्रयत्न करायचे , मिळाले नाही तर सगळे संपले अशी भावना मनात आणून मुळीच हतबद्ध व्हायचे नाही, खचून जायचे नाही , कुठे रे रेमडीसिवीरचा काळा बाजार सुरु असेल तर तो उघड्यावर आणायचा व त्या विषयी दाद मागायची, शासनाकडे रेमडीसीवर मुबलक प्रमाणात मिळावे म्हणून जनरेटा वाढवायचा.

डॉ. अमोल अन्नदाते

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा