शस्त्रक्रिया शाखेला वळसा – डॉ.अमोल अन्नदाते

दै.महाराष्ट्र टाईम्स

शस्त्रकीया शाखेला वळसा

-डॉ.अमोल अन्नदाते

लेखक व तत्त्ववेत्ते इडेवू कोयिनिकान म्हणतात – “ देशातील तरुण काय विचार करतोय व कोणाला आदर्श म्हणून पाहतोय हे मला सांगा व त्यावरून मी त्या देशाचे भवितव्य सांगू शकतो “. त्याच धर्तीवर देशातील वैद्यकीय विद्यार्थी काय विचार करतोय हे बघा व त्यावरून वैद्यकीय क्षेत्राचे व एकूण रुग्ण सेवेच्या पुढील काही वर्षांचे भवितव्य काय असेल हा अंदाज बांधता येऊ शकेल. देशातील पहिले शंभर एमबीबीएस विद्यार्थी पदव्युत्तर शाखेसाठी कुठली शाखा निवडतात याच्या अभ्यासातून डोळ्यात अंजन घालणारी अनेक निरीक्षणे नोंदवता येतील. पहिल्या १०० पैकी बहुतांश विद्यार्थ्यांना रेडीओलॉजी , त्वचारोग ( डरमॅटॉलॉजी ) व जनरल मेडिसिन या शाखांना पसंती दिली आहे. बालरोग ( एक टक्के), जनरल सर्जरी ( चार टक्के) व स्त्रीरोग ( दोन टक्के) या शाखांकडे केवळ सात टक्के विद्यार्थी वळताना दिसत आहेत. एकेकाळी सर्वाधिक पसंतीच्या शाखा या विद्यार्थ्यांना नकोशा का वाटू लागल्या हा फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेतील बदल नसून समाजिक बदलाचा ही संकेत आहे.
सहसा समाजातील बुद्धिवान विद्यार्थ्यांचा सर्वात वरचा थर हा वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतो. त्यातही एमबीबीएस व पदव्युत्तर जागांमध्ये एवढी तफावत आहे की पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ही जवळपास युपएससी परीक्षे एवढीच तीव्र स्पर्धेची परीक्षा असते. त्यासाठी लागणारे अटेम्प्ट , शासकीय बॉंड हे पूर्ण करताना जवळपास तिशी उजाडलेली असते. शस्त्रक्रिये सारख्या शाखेत एवढ्यावर शिक्षण थांबून चालत नाही. पुढे अजून सराव व सुपर स्पेशलायजेशन करणे आवश्यक असते. एवढे संपून वयाच्या पस्तिसाव्या वर्षी प्रॅक्तीस सुरु करण्यास भांडवल अवाढव्य असते. त्यामुळे प्रचंड अंगमेहनीतीच्या या शाखांमध्ये अर्धे अधिक आयुष्य शिक्षणात खर्च होऊन हाती काय लागेल तर त्यासोबत अनिश्चितता . इमर्जन्सी , प्रचंड मेहनत असण्याचा काही प्रमणात विद्यार्थ्यांचा विचार असला तरी एवढा एकच विचार शाखा नाकारण्या मागे आहे असे नाही. कारण ३५ टक्के विद्यार्थी हे मेडिसिन शाखा निवडत आहेत ज्याठी मेहनत व इमर्जन्सी असतेच. पहिली पसंती असलेल्या रेडीओलॉजी शाखे मध्ये मात्र काही प्रमाणात रुग्णांशी कमीत कमी संवाद व ठरवलेल्या वेळेत काम संपवून घरी जाण्याची मुभा आहे. पण या शाखेत अंगमेहनत नसली तरी मेंदूची कसरत इतर सर्व शाखेच्या तुलनेत अधिक आहे जी कुठल्याही टॉपर विद्यार्थ्यला जास्त सोपी वाटते. आपल्या सोबतचे इतर शाखेतील टॉपर विद्यार्थी हे कौशल्याच्या जोरावर तिशी आधी परदेशात बंगले विकत घेताना व सुखासीन आयुष्य जगत असताना पाहून आपण किमान त्या तुलनेत सुखासीन नसले तरी आयुष्य सुकर करणारे पर्याय का निवडू नये ? हा विचार वैद्यकीय क्षेत्रात पहिल्या ५० विद्यार्थ्यांच्या मनात येणे सहाजिक आहे.


शाखा स्वीकारणे व नाकारणारण्याला वैद्यकीय क्षेत्रातील काही बदल व रुग्ण – डॉक्टर संबंधातील स्थित्यांतरे ही जबाबदार आहेत. भारत हा असंसर्गजन्य आजार म्हणजेच ह्र्दय रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब , लठ्ठपणाची जागतिक राजधानी बनत चालला आहे. देशातील दर चौथ्या व्यक्तीला या पैकी एक आजार जडला आहे. या आजारांच्या उपचारासाठी साधा बाह्यरुग्ण विभाग पुरेसा असतो. तसेच सरासरी आयुर्मान वाढल्या मुळे अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही खूप वाढले आहे. यामुळे जनरल मेडिसिन शाखेला प्रचंड मागणी आहे. रुग्णालयातील सर्व शाखा या मेडिसिन शाखे भोवती फिरतात. म्हणून या शाखेला विद्यार्थ्यांची पसंती असणे हे नैसर्गिक व गरजेचे ही आहे. १९९५ साली वैद्यकीय क्षेत्र हे ग्राहक संरक्षक कायद्याच्या कक्षेत आले. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना कोर्टात खेचू लागले. त्यासाठी प्रत्येक आजाराचा पुरावा असणे हे डॉक्टरांना स्वतःच्या कायदेशीर संरक्षणासाठी गरजेचे वाटू लागले . त्यासाठी प्रत्येक रुग्णाचा आजार सिद्ध करण्यासाठी रेडीओलॉजिस्टची गरज भासू लागली. अर्थात कायदेशीर संरक्षणापलीकडे लवकर निदान होऊन योग्य उपचार देण्यास ही या शाखेची उपयुक्तता आहेच. त्यातही या शाखेत तंत्रज्ञान इतके प्रगत आहे कि एका मिलीमीटरच्या थरातील बदल ही सोनोग्राफी , सिटी स्कॅन व एमआरआय मशीन टिपू शकतात. त्यातच सिटी व एमआरआय चे रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जगात कुठेही बसून रिपोर्ट करू शकतात.

एवढ्या सर्व बाजूने फुलून आलेल्या शाखे कडे गुणवत्ता आकर्षित न झाली असती तरच नवल होते. पण या शाखेचे काही सुप्त दोष अजून ही शाखा निवडणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेले नाही . ही शाखे एखाद्या गर्भ श्रीमंत घरातील जन्माला आलेल्या टॉपर विद्यार्थ्या साठी आदर्श आहे पण हलाखीत शिक्षण पूर्ण केलेल्या टॉपरला या शाखेत तग धरणे वाटते तितके सोपे नाही. कारण सोनोग्राफी सोडले तरी सिटी व एमआरआय मशीन्स या पांढऱ्या हत्ती प्रमाणे असतात व गुंतवणूक – मिळकत गणित जुळवणे हे खूप जिकीरीचे आहे. त्यातच या शाखेत रुग्ण रेफर करणारे डॉक्टर हेच तुमचे भवितव्य ठरवतात म्हणून तुम्ही किती ही हुशार असला तरी व्यवसायिक दृष्ट्या तुम्ही परावलंबी असता. रेफर करणाऱ्या डॉक्टरांची मर्जी सांभाळणे , गुंतवणूक ही व्यावसायिक कसरत जमली नाही तर कुठल्याशा कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी करण्यावाचून पर्याय नसतो. त्वचारोग व त्यातच कोस्मेटॉलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्र ही शाखा गेल्या दोन दशकात आर्थिक दृष्ट्या सर्वात समृद्ध शाखा झाली आहे. यासाठी समाजातील एक मोठा बदल जबाबदार आहे. आज जिथे पाणी , रस्ते , वीज नाही अशा अगदी डोंगराच्या टोकावर असलेल्या छोट्या टपरी वर दोन गोष्टी आवर्जुन मिळतात. बिस्कीटचा पुडा आणि गोरे करणारे फेअरनेस क्रीम. गोरे, सुंदर , छान दिसण्याच्या आंतरिक भावनेने आर्थिक स्तिथी , वय , धर्म, लिंग , प्रदेश या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत . म्हणून आज अगदी ग्रामीण भागातही सर्वधिक गर्दी असते ती कोस्मेटॉलॉजीस्ट च्या बाह्यरुग्ण विभागात. आपण जे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही म्हणून शक्य नसलेल्या परफेक्ट लुक मध्ये स्वतःला बसवण्याची समाजातील घुसमट यातून अधोरेखित होते. लेझर तंत्रज्ञानातील मोठ्या बदला मुळे आज कोस्मेटॉलॉजीस्ट साठी या लेझर मशीन्स कामधेनु व कल्पवृकक्षाचे काम करत आहेत.


शास्त्रक्रिया व स्त्रीरोग या शाखा दिवसेंदिवस कायदेशीर दृष्ट्या जोखमीच्या झाल्या आहेत. यात प्रसिद्धी व पैसे तसे पहायला गेल्यास इतर शाखांपेक्षा जास्त आहे. पण या शाखेमध्ये रुग्णांच्या जीवाला धोका व अनिश्चीतता सर्वाधिक आहे. एकही छोटीशी चूक किंवा अति रक्तस्त्रावामुळे माता मृत्यूची एक केस तुमचे पूर्ण आयुष्य व करिअर बेचिराख करू शकतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शस्त्रक्रियेत अनिश्चितता जास्त असल्याने हल्ल्यांचे प्रमाण या क्षेत्रात वाढले आहे. त्यामुळे रूग्णासोबत स्वतः चा जीव वाचवणे ही डॉक्टरांना गरजेचे वाटू लागले आहे. त्यामुळे जास्त जोखमीच्या शस्त्रक्रिया निगडीत शाखा नकोच हा विचार जोर धरतो आहे.
या सगळ्या ट्रेंड्स मध्ये बालरोग शाखेकडे न वळण्याचे कारण म्हणजे बहुतांश डॉक्टर हे शहरी भागात स्थायिक होतात व शहरांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे या शाखेत काम कमी झाले आहे व बालरोगतज्ञांची संख्या ही वाढली आहे. ग्रामीण भागात मात्र बालरोग क्षेत्रातील समस्या, बालमृत्यूचे प्रमाण खूप आहे. म्हणून या शाखेकडे डॉक्टरांचे न वळणे व त्यातच ग्रामीण भागात न येणे ही सामाजिक समस्या आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे आरोग्य विभागात व शासकीय सेवेत बालरोगतज्ञांच्या जागा रिक्त असून व त्यांची गरज असून ही शासन त्यांना चांगला मोबदला देण्यास उदासीन आहे. ग्रामीण भागात हिच समस्या स्त्रीरोग तज्ञांच्या बाबतीत आहे. कुठल्या ही राष्ट्राच्या प्रगतीचे मापक हे दर डोई उत्पन्न नसते तर त्या राष्ट्राचा माता मृत्यू व बाल मृत्यू दर असतो. व याच शाखांकडे जर डॉक्टर वळत नसतील तर सर्व दोष डॉक्टरांवर न ढकलता यावर सामाजिक संशोधन होणे गरजेचे आहे.


शस्त्रक्रिया व बालरोगशाखेकडे पहिले येणारे विद्यार्थी वळत नाहीत म्हणजे या जागा अगदी रिकाम्या जात आहेत असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील क्रीम व हुशार विद्यार्थी या शाखेकडे वळत नाही व या शाखांकडे एकेकाळी असणारा ओढा ओसरत चालला आहे असा त्याचा अर्थ आहे. शस्त्रक्रियाच कशाला पण मानसशास्त्र , कर्करोग, लहान मुलांच्या मानसिक समस्या, अॉर्थोपेडिक अशा अनेक शाखा आहेत ज्यांची गरज वाढत जाणार आहे. शाखा निवडीचे पर्याय हे वैद्यकीय क्षेत्रात दर ३० वर्षांनी बदलत असतात. कारण दर तीन दशकांनी समाजात ही वैचारिक स्थित्यंतर घडत असते. शेवटी वैद्यकीय विद्यार्थी याच समाजातून आले आहेत व पुढे काय घडणार याचा अंदाज बांधून विद्यार्थी हा निर्णय घेतात. ग्रामीण – शहरी विकासाची दरी व समाजात बुद्धिवंतांना मिळणारी वागणूक याचा ही शाखा निवडीशी थेट संबंध आहे. यश तुम्हाला बरेच काही देते पण त्याची पुरपूर किंमत वसूल ही करते असे म्हंटले जाते. कदाचित याचा ताळेबंद वैद्यकीय विद्यार्थीही बांधत असावेत. एका बौद्धिक वर्गाने समाजिक समस्या समोर ठेवून त्याग करावा व आपल्या करिअरचे निर्णय घ्यावे हा विचार आजच्या काळासाठी अति आदर्शवादी आहे. आजची पिढी त्यागाच्या रोमँटीसिझम मध्ये जगून करिअरचे भावनिक निर्णय घेणारी नाही. त्याग करायचा असेल सोपा व मोबदला देणारा वाटावा असे बदल समाज व धोरण आखणाऱ्यांना करावे लागतील. आता होणारे बदल त्याचेच निदर्शक आहेत.

  • डॉ अमोल अन्नदाते
    dramolannadate@gmail.com
    www.amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *