दैनिक महाराष्ट्र टाइम्स
गिरणगावच्या इतिहासाचे साक्षीदार
डॉ. अमोल अन्नदाते
दिग्विजय मिल्स , पत्रा चाळ, खोली क्र १२, काळाचौकी... या मूळ गिरणगावच्या शेवटच्या अवशेषात दहा बाय बाराच्या खोलीत कुठल्या ही तक्रारी शिवाय आनंदात आयुष्य घालवणारे पंढरीनाथ सावंत हे ही गेल्या ६० वर्षात बदललेल्या महाराष्ट्राचे शेवटचे प्रमाणिक साक्षीदार होते. गिरणगावात टॉवर्सच्या गर्दीतील उंच भोंगे प्राणहीन असले तरी जसे आज ही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत तसे सगळ काही बदलल पण पंढरीनाथ सावंत ही उंच मानेने , प्रामाणिकपणे नैतिकतेच्या पत्रकारितेचा दाखला शेवट पर्यंत देत राहिले.
कोकणातून मुंबईतून येऊन रेडीओ लँम्प कंपनीत हेल्पर , गणपती बनवण्याच्या कामात रंगारी, बेस्ट मध्ये कंडक्टर , चित्रकलेचे शिक्षण घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू शाळेत चित्रकलेचे शिक्षक , शाळेत शिक्षक हा प्रवास अंगभूत शहाणपण , सुंदर हस्ताक्षर या मुळे प्रबोधनकारांच्या दारात म्हणजे मातोश्री वर कसा येऊन पोहोचला हे त्यांना ही कळले नाही. बेस्ट मध्ये कंडक्टर असताना एकदा पंढरीनाथ बेस्ट संपाची बातमी देण्यासाठी मराठाच्या कार्यालयात आचार्य अत्रे यांना भेटायला गेले. अर्जामधील भाषेची शुद्धता आणि हस्ताक्षर पाहून पंढरीनाथ यांच्या गळ्यात लटकत असलेल्या शिट्टीला धरून “ हे काय करताय ? “ असे अत्रे ओरडत म्हणाले . मग गळ्यातील पेनाला धरून “ हे तुमचे काम आहे , हे करा , हे “ म्हणाले हा प्रसंग पंढरीनाथ अत्रेंचा आवाज काढत नक्कल करत तसाचा तसा करून दाखवत . प्रबोधनकारांचे लेखनिक आणि मुख्य सहाय्यक म्हणून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ठाकरे – अत्रे वाद , मार्मिकची स्थापना, शिवसेना पक्ष नसताना ठाकरे बंधूंचे मराठी माणसाचे संघटन , त्यातून शिवसेनेचा जन्म अशा मोठ्या काळाचे केवळ साक्षीदारच नव्हे तर या प्रत्येक घटनेतील संप्रेरकाची भूमिका त्यांनी शांतपणे बजावली . संघटनेचे नाव काय ठेवायचे या बैठकीत प्रबोधनकार आणि बाळसाहेब , श्रीकांत ठाकरे सोडून चौथी व्यक्ती म्हणजे पंढरीनाथ सावंत. संघटनेचे नाव ठरत असताना या बैठकीत कसे ब्रेन स्टॉर्मिंग झाले, कोण कसे कुठे बसले होते आणि प्रबोधनकारांचे डोळ्यात एक चमक येऊन त्यांच्या तोंडून ‘शिवसेना’ हा शब्द निघाला हा सगळा एकपात्री प्रयोगच ते करून दाखवत . १९ जून १९६६ साली शिवसेनेची घोषणा झाली तेव्हा बाळासाहेबांच्या बरोबरीने सतेज बांधणारे व सतरंजी टाकणारे व्यक्ती म्हणजे पंढरीनाथ सावंत. गर्दीतून पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख अशी शी .... व .... लांबवत घोषणा देणारी व्यक्ती कोण होती व ती दादर ला कुठे रहता होती इतका नेमका इतिहास त्यांना माहित होता .
प्रबोधनकारांनी त्यांना मार्मिक सोडून जगाच्या मोठ्या शाळेत पत्रकारिता शिकण्यासाठी मार्मिक बाहेर पड म्हणून सल्ला दिला. त्यानंतर श्री साप्ताहिक , ब्लिट्झ , प्रभंजन , लोकमत नागपूर , लोकमत औरंगाबाद , पुढारी कोल्हापूर असा पत्रकारितेचा मोठा प्रवास केला. श्री , ब्लिट्झ मिळून साप्ताहिकांच्या कव्हर स्टोरीतून महाराष्ट्र हलवण्याचे काम श्याम मोकाशी ( परेश मोकाशी यांचे वडील ) , पुष्पा त्रिलोकेकर , वसंत सोपारकर आणि पंढरीनाथ सावंत या सुवर्ण चतुष्कोनाने केले . मार्मिक मध्ये परतल्यावर शिवसेना , सामना वाढत गेला पण शिवसेनेला जन्म देणारी मार्मिक ही आई कृश होत एका बोळी वजा खोलीत आक्रसून गेली. तेव्हा श्याम मोकाशी आणि वसंत सोपारकर यांना सोबत घेऊन या तिघांनी करंगळीवर गोवर्धन तोलून धरावा तसा ४० वर्षे मार्मिक जगवला. श्री साठी ७२ चा दुष्काळ कव्हर करण्यासाठी एक क्लिक ३ कॅमेरा घेऊन पंढरीनाथ यांनी २००० मैल प्रवास केला. बिहार मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या सभा , विद्यापीठ नामांतर चळवळीत पेटलेला महाराष्ट्र , नागपूर अधिवेशनाच्या वेळी शरद जोशींची शरद पवार यांनी हायजॅक केलेली शेतकरी दिंडी या घटना त्यांनी इतक्या जवळून पहिल्या होत्या कि अगदी गेल्या वर्षा पर्यंत ते जसेच्या तसे सांगायचे .
केवळ राज्य व देशच नव्हे तर जागतिक राजकारण , विविध देशांच्या हेरसंस्था, हिटलरचे मानस शास्त्रीय विश्लेषण , पहिले व दुसरे महायुद्ध या सर्व गोष्टींचे ते एनसायक्लोपिडीया होते . कॉम्रेड डांगे यांच्या ओळखीने त्यांनी इंदिरी गांधींची मुलाखत मिळाली. त्यांचे बाळासाहेबांसोबतचे नाते इतके प्रामाणिक होते की, इंदिरा गांधी यांच्याशी असलेला स्नेह त्यांनी बाळासाहेबांपासून कधीत लपवला नाही. मुल्याधारित पत्रकारिता, निष्ठा, अभ्यास, नि:स्वार्थी सेवा असे शब्द अर्थहीन ठरत असताना पंढरीनाथ सावंत यांचे जाणे हे अधिकच उदास करणारे आहे.
डॉ.अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551