‘पायल तडवी’ च्या मृत्यू मधून आपण काही शिकणार आहोत का ?

'पायल तडवी' चा मृत्यू

डॉ. पायल तडवी या नायर रुग्णालयातील रेसिडेंटचा सिनिअर्सच्या मानसिक छळा पायी मृत्यू झाला. याला रॅगिंगही म्हणता येत नाही कारण, सहसा रॅगिंग हे एम.बी.बी.एस करतानाचा टाईमपास, गमती यात मोडते. यावरून एक महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला आणी एकमेकांना विचारायला हवा. खर तर आपण डॉक्टर्स हे व्यवसायिक दृष्ट्या संख्येने सगळ्यात कमी आणि सगळ्यात बुद्धिमान वर्गात मोडतो. पण तरीही आपण डॉक्टर आहोत आणि डॉक्टर हा आपला सगळ्यांचा धर्म आहे या एका अस्मितेवर आपण मनाने एकमेकांशी का बांधले जात नाही.

डॉ. पायल तडवी

डॉ. पायल तडवी

पायल तडवी ला आलेला अनुभव आपल्याला प्रत्येकाला कधी न कधी कुठल्याना कुठल्या पायरीवर व्यवसाय करताना येत असतो. मग तो व्यवसायिक द्वेष असो, सरकारी डॉक्टरकडून झालेली अडवणूक असो, पी.जी. करत असताना सिनिअर लेक्चरर , हेड ऑफ डिपार्टमेंट कडून झालेला अपमान असो कि आपला सहव्यवसायाकडून झालेला व्यावसायिक त्रास असो. डॉक्टर असला तरी तो शेवटी माणूसच असतो हे मान्य केले तरी इतक्या उच्च प्रतीच्या व्यवसायात, उच्च बुद्धिमतेच्या कामात ,त्या मानाने आता ‘मानाचे नसले’ तरी समृद्ध व्यवसायात असून ही आपण असे का वागतो? इतके कडवट का होत जातो कि, आपल्या सम व्यवसायिकाला, बंधूला आपण टोकाचा मानसिक त्रास देण्यापर्यंत आपली मजल जाते. व्यवसायात प्रत्येकाच्या वाट्याची प्रॅक्टीस त्याला मिळणारच आहे. कोणीही ती हिरावून घेऊ शकत नाही हे माहित असूनही काही प्रमाणात दुसऱ्याला नामोहरम करण्याची संधी आपण सोडत नाही. शासकीय, प्रशासकीय कामातही एखादा डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टरच्या समोर येतो तेव्हा आपण एकाच आईची पोरं आहोत, या भावनेने मोकळ्या मनाने तो कधी मदत करत नाही. आता डॉक्टर, पेशंट म्हणून आला तर त्याच्या कडून फी न घेण्याचे इथिक्स ही इतिहास जमा झाले आहेत. अर्थात हा प्रत्येकाचे वैयक्तिक निर्णय असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण त्या पलीकडे आय.ए,एस, आय.पी.एस, आय.आय.टी. ही सर्व मंडळी जशी आपल्या शैक्षणिक अस्मितेवर त्यांची पक्की ‘फेवर बँक’ तयार करतात, तशी आपल्या डॉक्टरांची का होत नसेल? याला ‘लॉबी’ असा एक नकारार्थी व क्रूर शब्द प्रयोग केला जातो. अगदी ‘लॉबिंग’ च्या पातळीवर नाही तरी ‘डॉक्टर आहे’ म्हणून आपण दुसऱ्या डॉक्टरला चंगले वागवण्याचे सत्व तरी नक्कीच जपू शकतो! मी हे जवळून अनुभवलेले आहे कि, कुठला ही आय.ए.एस. दुसऱ्या आय.ए.एस. ने सांगितलेले काम शक्यतो टाळत नाही. मनोहर पर्रीकर दर वर्षी आय.आय.टी कॅम्पस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. त्यांना सांगायचे कि कधी या आयआयटीयनचे दार मदती साठी अगदी मध्य रात्री वाजवा, हा आयआयटीयन तुमच्या पाठीशी आहे. असे आपल्या मध्ये का होत नाही? हार्वर्ड सारख्या संस्थेचेही ‘अल्युमनाय नेटवर्क’ इतके सशक्त आहे आणि इतक्या पातळ्यांवर सगळे एकमेकांना मदत करत असतात कि, त्यामुळे या संस्थेच्या अनेकांना नोबेल मिळाले. अगदी राजकारणात विरोधी पक्षाच्या खासदाराला सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने घर मिळवून द्यायला मदत करताना मी पहिले आहे. पायल तडवीचा तीन डॉक्टरांमुळे होणाऱ्या मृत्यू मध्ये समाजात डॉक्टरची एवढी कुचंबणा का होते आहे, याची बरेच उत्तरे सापडतील!

डॉ अमोल अन्नदातेंचे इतर लेख वाचण्यासाठी

अगदीच उजळ नैतिक प्रतिमेचा टेंभा मिरवण्यासाठी नव्हे, पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे रोज दुःख, वेदना, इतरांच्या जीवनाच्या तीव्र भावना बघत असताना आपल्यावर ‘देवाची आवडती मुले’ होण्याची जबाबदारी टाकली आहे, हे आपण का विसरतो! आपल्याला देवाने त्याच्याशी थेट निगडीत कामासाठी निवडले आहे, यात काही तरी प्रयोजन असले पाहिजे . हे तत्वज्ञान बाजूला ठेवून, परमार्थ सोडा, पण व्यवसायिक यशापलीकडे चांगली माणसे होणे आपल्या स्वतःच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी ही गरजेचे आहे, हे ही आपण विसरून गेलो! आज आपल्याला मदत केलेल्या अनेक डॉक्टरांमुळे, शिक्षकांमुळे आपण आपल्या आयुष्यात जे काही थोडे थोडके यश मिळवू शकलो, मी तरी अशा डॉक्टर मित्रांच्या मदतीवर आणि त्यांच्या खांद्यावरून हे जग पहिले आहे. आपल्या इतर डॉक्टर ज्यूनिअर सिनियर्सशी चांगले वागुनच आपल्याला त्याची परतफेड करायला हवी. जेव्हा कोणी डॉक्टर आपल्याशी माणूस म्हणून वागत नाही तेव्हा, आपण इतर कोणाशीच असे वागायचे नाही, एवढाच धडा त्यातून आपण घ्यावा! आज डॉक्टरांना मुळे जीव गमवावा लागलेल्या पायल तडवी च्या आई-वडीलांप्रमाणे प्रत्येक डॉक्टरच्या डोळ्यात तिच्या साठी अश्रू यायला हवे. आणि प्रत्येकाने यातून काही तरी शिकायला हवे.

डॉ.अमोल अन्नदाते | www.amolannadate.com
reachme@amolannadate.com