कोरोनाच्या साथीचे पुढे काय? What Next?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ?

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? नवी साथ येते तेव्हा समाजामध्ये त्या नवीन विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती अजून तयार झालेली नसते. त्यामुळे नव्या साथीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

तसेच तीन महिन्यांमध्ये काही प्रमाणामध्ये ही साथ जीवघेणी ठरू शकते. पण तरीही याचा मृत्युदर हा सध्या इतर देशांमध्ये तीन टक्केपेक्षा जास्त नाही. एक ते दोन महिन्यांमध्ये या व्हायरसच्या विरोधात समाजामध्ये एक सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. याला वैद्यकीय भाषेत ‘हर्ड इम्युनिटी’ असे म्हणतात. तसेच कुठलाही व्हायरस जसा आहे त्या रूपात फार काळ राहत नाही. व्हायरस हा बहुरुप्या सारखा असतो. त्याचे रूप तो सतत बदलत असतो. याला वैद्यकीय भाषेत अँटीजनीक ड्रीफ्ट आणि शिफ्ट असे म्हटले जाते. तो संक्रमित झाला की त्याची संसर्ग करण्याची क्षमता व त्याच्यामुळे मृत्यू होण्याची तीव्रता कमी होते म्हणून तीन महिने हा व्हायरस संक्रमित होई पर्यंत हा टाळण्यासाठीचे नियम पाळणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनाच्या साथीचे पुढे काय ? एका ठिकाणी जास्त लोकांनी गर्दी न करणे, सार्वजनिक कार्यक्रम टाळणे, काम नसताना प्रवास न करणे मौजमजेसाठी किंवा कार्यक्रम किंवा राजकीय कार्यक्रम टाळणे हे व्हायरस मध्ये बदल होईपर्यंत पुढे एक ते दोन महिन्यात गरजेचे आहेत.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

एमबीबीएसचा अभ्यासक्रम : मुदत योग्य की अयोग्य?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

एमबीबीएसचा अभ्यासक्रम प्रवेशापासून दहा वर्षात पूर्ण करण्याचा नवा नियम येत्या वर्षापासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने लागू केला आहे आहे. हा अभ्यासक्रम मुळात साडेचार वर्षांचा असतो पण क्वचीतच प्रत्येक बॅचला नापास होत अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही विद्यार्थी असतात. त्यातही  एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांसाठी १० वर्षे लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. ही विद्यार्थी संख्या कमी असली तरी या निर्णयाचा विद्यापीठ व अभ्यासक्रम पूर्ण करण्यास वेळ घेणारे विद्यार्थी असा दोन्ही बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे.

वैद्यकीय क्षेत्रात अशी उदाहरणे आहेत जिथे विद्यार्थ्याला त्याच्या बौद्धिक पातळीमुळे नव्हे तर इतर कौटुंबिक, मानसिक, सामाजिक समस्यांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. अशा मुलांसाठी क्रोनिक हा शब्द वैद्यकीय महाविद्यालयात वापरला जातो. खरेतर आधी पेक्षा सध्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीण्य पातळी ही खूप कमी आहे. म्हणून नापास होण्यासाठी बऱ्याचदा तुम्हाला नापासच व्हायचे आहे हे तुम्हाला ठरवावेच लागते. पण तरीही विद्यार्थी अनेक वर्षे नापास होत असेल तर नक्कीच त्या मागे बौद्धिक पातळी किव्हा अभ्यासक्रम न कळण्यापलीकडे काही सामाजिक, आर्थिक, मानसिक कारणे असू शकतात. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला म्हणजे त्या विद्यार्थ्याचा स्तर बरा असतो. त्यातच अभिमत विद्यापीठांपेक्षा आरोग्य विद्यापीठाशी संलग्न शासकीय व खाजगी विद्यापीठात परीक्षा अधिक पारदर्शक असते. म्हणून या कॉलेजेस मध्ये विद्यार्थी रखडण्याचे प्रमाण जास्त असते. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्रोनिक रखडलेल्या विद्यार्थ्याची अशी एक स्वतःची कहाणी असते. काही विद्यार्थी मानसिक समस्येमुळे व्यसनाधीन झालेले असतात. काहींना मानसिक समस्या असल्या तरी त्या ओळखल्या जाऊन त्यावर उपचारच होत नाहीत. हे सगळे मोठ मोठे मानसोपचार विभाग मिरवत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नाका खाली घडत असते हे विशेष. एमबीबीएस परीक्षा आधी पेक्षा झाली सोपी असली तरी वैद्यकीय अभ्यासक्रम अवाढव्य असतो. त्याचा पहिल्या वर्षी तरी प्रचंड ताण असतो. आपल्याकडे दर वर्षी प्रवेशावर होणाऱ्या केसेस आणि प्रवेशाच्या लांबत जाणाऱ्या प्रक्रीये  मुळे मुळात १ ऑगस्टला सुरु होणारे वर्ग सुरु होण्यास ऑक्टोबर उजाडते. त्यातच आधी ९ महिन्याचा असलेला पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम आता १४ महिन्याचा करण्यात आला आहे म्हणून दिलासा आहे. पण तरी या बदलेल्या वातावरणाशी जुळवून न घेऊ शकणारे पहिल्या वर्षी नापास झाले की प्रवाहाबाहेर फेकले जातात. वैद्यकीय महाविद्यालयात ही टाॅपर्स , डिस्टिनक्षण , नापास आणी क्रोनिक असा एक बौद्धिक वर्णभेद असतो. म्हणून वारंवार नापास होणार्यांना कालमर्यादेच्या नियमाचा बडगा उगारायचा कि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करायचा हे ठरवावे लागेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अनेक वर्ष रखडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत यंत्रणेची ही मोठी ससेहोलपट होत असते. नुकतेच बदललेल्या  अभ्यासक्रमामुळे जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अशी अध्यापनासाठी व परीक्षेसाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. अनेक वर्षे नापास झालेल्यांची विद्यार्थी संख्या कमी असली तरी त्यांच्या साठी वेगळा पेपर काढणे  आणी घेणे अशा प्रकारे यंत्रणा व्यस्त होते. शासनाचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणावर ५.५ लाख रुपये खर्च होत असतो. असे असताना विद्यार्थ्यांची किमान काही काळात डिग्री पूर्ण करण्याची बांधिलकी असावी असा विचार विद्यापीठाच्या दृष्टीने असू शकतो.

हा नियम राबवताना अशा वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अकॅडॅमीक व सामाजिक पुनर्वसनासाठी काही यंत्रणा नाही. हे विद्यार्थी का नापास होत आहेत याची कारणे शोधण्यासाठी एखादा संशोधात्मक अभ्यास आपण अजून केला आहे का? अनेक वर्षे घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी नंतर उत्तम प्रॅक्टीस करतात. तसेच असे काही विद्यार्थी प्रसिद्ध व निष्णात डॉक्टर म्हणून ही नावारूपाला आल्याची उदाहरणे आहेत. ही संधी या विद्यार्थ्यां कडून आपण हिरावून घ्यायची का या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. एकदा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे काही विद्यार्थी पुण्यातील एका हॉटेल ला जेवायला गेले. तिथला वेटर हा वारंवार त्या विद्यार्थ्यांच्या गप्पा जवळ येऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होता. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जवळ बोलावून याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले कि अनेक वर्षांपूर्वी तो बीजेचाच एमबीबीएसचा विद्यार्थी होता. पण एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाही. पुढच्या दिवशी सर्व विद्यार्थी त्याला होस्टेल वर घेऊन गेले. सगळ्यांनी त्याला मदत करत पहिल्या वर्षाच्या परीक्षेला बसवले आणी त्याने पुढे अभ्यासक्रम पूर्ण केला . हा विद्यार्थी आज महाराष्ट्रातच शासकीय सेवेत मेडिकल ऑफिसर म्हणून चांगली सेवा देतो आहे आणि चांगले आयुष्य जगतो आहे. कालमर्यादे मुळे वेळ हुकलेले पण पुन्हा संधी मिळाल्यास त्यातून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो. आपले कायदे मंडळ ही एका ही निर्दोषा ला शिक्षा होऊ नये म्हणून हजारो गुन्हेगारांना सोडण्याची जोखीम घेते . मग बुद्धिवंतांसाठीच्या अभ्यासक्रमात कुठल्या तरी कारणाने कमी पडलेल्या एकाला आपण वेळेचे कारण दाखवत संधी नाकारायची का ?

एमबीबीएसचा अभ्यासक्रम

 या प्रश्नावर बीजे चे माझी प्राध्यापक डॉ.पद्माकर पंडित व डॉ. दाक्षायणी पंडित यांनी रखडलेले विद्यार्थी हे एक मिशन समजून अनेक वर्षे काम केले. अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांचे समुपदेशन , त्यांचा अभ्यास वर्ग घेणे, अगदी स्वतःच्या घरी त्यांची राहण्याची , जेवण्याची सोय , त्यांना आर्थिक मदती पर्यंत प्रयत्न करून या जोडप्याने असे अनेक व्यवस्थेच्या कडीतून निसटणार्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे डॉ. पंडित दाम्पत्याने घडवलेले हे अनेक क्रोनिक आज समाजात उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. यातील काहींनी तर ५ – १० वर्षे प्रवेशाला उलटून गेल्यावर ही परत येऊन एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा या विद्यार्थ्यांचा भार वाहताना व्यवस्थेचची  ससेहोलपट आणि या विद्यार्थ्यांचे पुनर्वसन यातून काही मधला मार्ग काढता येतो का हे पाहायला हवे.

करोना व्हायरस: घाबरण्याचे कारण नाही!

करोना व्हायरस

चीन मध्ये करोना व्हायरस च्या साथीचे थैमान सुरु असल्याने आता ही साथ जगात पसरणार का? या साथीला जागतिक साथ म्हणजे पँन्डेमीकचे स्वरूप येणार का? भारताला याचा धोका किती? भारताची आरोग्य यंत्रणा करोना व्हायरस चे संकट रोखण्यासाठी आणी ते आल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? असे अनेक प्रश्न करोना व्हायरस च्या निमित्ताने पडत आहेत.

        सध्या जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरस ला जागतिक साथ म्हणून घोषित केलेले नाही. पण भारत हा मुळातच संसर्गजन्य रोगांची जागतिक राजधानी असल्याने व भारत – चीन या दोन देशांमध्ये दळणवळणाचे प्रमाण जास्त असल्याने ही साथ भारतात दाखल होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी नागरी वाहतूक, विदेश आणी आरोग्य मंत्रालयाला समन्वयाने ही साथ रोखण्यासाठी कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. चीन मधून भारतात येणार्या प्रत्येक नागरिकाची अंतरराष्ट्रीय विमानतळावर तापमान व सर्दी, खोकला व श्वसनाचा त्रास असल्याची चौकशी करणे आवश्यक आहे. ताप व ही लक्षणे अढळलयास त्यांना तातडीने आयसोलेशन म्हणजेच उपचारासाठी स्वतंत्र कक्षात बरे होई पर्यंत ठेवणे आवश्यक असते. हवाई वाहतूक सोडून चीन व नेपाळ सीमेवरील लष्करात ही सैनिकांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने निदान आवश्यक आहे. गेल्या महीन्यात चीन ला भेट दिलेल्या नागरिकांना कुठलाही त्रास जाणवल्यास त्या नागरिकांची ही तातडीने तपासणी होणे गरजेचे आहे. नवी साथ दाखल होते तेव्हा सगळ्यात महत्वाचे असते देशातील पहील्या काही केसेस ओळखणे आणी त्यांना वेगळे ठेऊन त्यांचे उपचार करणे. पण आपल्या देशात अजून तत्पर निदानाची यंत्रणा सज्ज नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे सोडून आपल्याकडे अशा नव्या व्हायरसेस व साथीचे निदान करणारी यंत्रणा अपुरी आहे.  साथ अजून दाखल झालेली नाही पण ती झालीच तर या पहील्या केसेस च्या निदानाची तयारी असायला हवी. झिका व्हायरस भारतात दाखल झाला तेव्हा २००७ साली ही माहीती शासकीय आरोग्य यंत्रणेने दडवून ठेवली. घबराट निर्माण होऊ नये हा हेतू असला तरी इतर यंत्रणेच्या सतर्कतेवर याचे दुष्परिणाम होतात.

करोना व्हायरस

  या साठीची तुलना २००३ च्या  सार्सशी केली जाते आहे पण हा त्या इतका घातक नक्कीच नाही.  सर्वसामन्यांनी लगेचच करोना व्हायरस ला घाबरण्याची गरज नाही. पण चीनला प्रवास झाला असल्यास व श्वसनाची कुठलीही तक्रार असल्यास तपासणी करून घ्यायला हवी. तसेच चीन ला प्रवास ही टाळायला हवा. ताप , खोकला आणी श्वास घेण्यास त्रास ही करोना ची प्रमुख लक्षणे आहेत. न्युमोनिया व किडनी फेल्यर हे कोम्लीकेशन्स होऊ शकतात. पण साधा सर्दी खोकला झाला तरी करोना असेल म्हणून घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा आजार टाळण्यासाठी मानवा कडून मानवाला होणाऱ्या श्वसन मार्गाच्या आजराला जी काळजी घ्यावी लागते तीच घ्यायची आहे. यात प्रामुख्याने बाहेरून आल्यावर व जेवण्याआधी कुठला साबण व पाण्याने हात धुणे , शिंक आल्यावर किव्हा खोकताना तोंड , नाक, झाकणे , सर्दी , खोकला असलेल्यांनी इतरां पासून लांब राहणे आणी प्राण्यांशी संपर्क टाळणे हेच आहे. पण यात प्राण्यांशी संपर्क सोडून इतर गोष्टी कुठलीही साथ नसली तरी करायच्याच आहेत. साथ ही चीन मधून इतर देशात पसरत असताना  शक्यतो मांसाहारी , त्यातच न शिजवलेले मांसाहारी अन्न व समुद्रातील मांसाहारी अन्न म्हणजे मासे , प्रॉन्स खाणे टाळलेले बरे.  तसेच आरोग्य विभागाची या साथीवर उपाय योजना  म्हणजे केवळ या साध्या प्रतिबंधक उपायांच्या भव्य जाहीराती व होर्डींग, असे असू नये.  त्या ऐवजी केसेसचे निदान, त्यांचे आयसोलेशन व उपचार याची यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर द्यावा. हा आजार व्हायरल असल्याने तो अपोआप बरा होणारा आहे.  त्यावर इतर व्हायरल आजारांसारखे निश्चित असे काही उपचार नाहीत. करोना व्हायरस वर उपचारच नाहीत असे भीतीदायक वृत्त ही येत आहेत. पण याचा अर्थ हा अपोआप बरा होणारा आहे. सध्या चीन मध्ये मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे पण भारतात हे किती असेल हे सध्या सांगता येणे कठीण आहे.  पण अशा कुठल्याही व्हायरल आजारात काही काळा नंतर मानवा मध्ये हर्ड इम्युनिटी म्हणजे समुहाची प्रतिकार शक्ती निर्माण होते. व साथ हळूहळू ओसरू लागते. म्हणून उद्या ही साथ आलीच व करोना व्हायरस ची लागण झालीच तर आपला मृत्यू निश्चित आहे अशा भीतीत मुळीच राहू नये. आपली प्रतिकारशक्ती हेच अशा साथी मध्ये सगळ्यात मोठे हत्यार असते. व त्यासाठी संतुलित आहार, व्यायाम व चांगली जीवनशैली हेच उत्तर आहे. करोना व्हायरस साठी स्वाइन फ्लू प्रमाणे कुठली ही गोळी किव्हा लस उपलब्ध नाही. तसेच फ्लू ची लस घेऊन करोना व्हायरस पासून संरक्षण मिळू शकते असा अपप्रचार ही सुरु झाला पण यात काही तथ्य नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 अशा साथीत मास्कच्या वापराचा खूप अतिरेक होतो. मास्कचा वापर हा स्वत:च्या संरक्षणासाठी नव्हे तर आपल्याकडून इतरांना जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून केला जातो. करोना व्हायरस चा निश्चित किंवा संशयित रुग्णांसाठीच मास्कचा वापर योग्य आहे. स्वस्थ व्यक्तींनी मास्क वापरून काहीच उपयोग नाही, कारण जर जंतूसंसर्ग होणार असेल तर तो मास्कच्या बाजूला खुल्या जागेतूनही होऊ शकतो. करोना व्हायरस सारख्या साथी म्हणजे घाबरलेल्या सर्वसामन्यांच्या फसवणुकीसाठी अनेकांना एक संधी असते. अमुक साबण वापरा, अमुक औषध घेऊन करोना ची शक्यता टाळा, समाज माध्यमांवरील घरगुती उपायांचे वायरल होणारे सल्ले या पासून सगळ्यांनी दूर राहायला हवे.

आरोग्य यंत्रणेची सज्जता आणी सर्वसामान्यांनी न घाबरता, माहीती घेऊन सतर्क राहणे व आजाराचे मास हीस्टेरियात रुपांतर न होऊ देणे एवढेच या वेळी करोना व्हायरस विषयी गरजेचे आहे.  

हिरकणी ‘अमृता सुदामे’ नावाची!

हिरकणी

ही हिरकणी आपल्या बाळांपर्यंत पोहोचण्या आधीच वाहून गेली !

सध्या राज्यात किचन ओटा किंवा बेसिन धूत असताना, बारीक कीटक ड्रेनेज मध्ये वाहून जातात त्याप्रमाणे माणसे वाहून जात आहेत. नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात, धायरी पुलावरून घरी जात असलेली ‘अमृता सुदामे’ ही वाहून गेली. एक मैत्रिणीकडून तिचा सगळा वैयक्तिक तपशील कळाला तेव्हा ‘या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण काय करतोय?’ या हतबलतेने अमृताच्या चीतेत आपण जिवंत जळतोय अशा वेदना झाल्या!

एका डायग्नोस्टिक सेंटरवर रीसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी ‘अमृता’ ही तरुणी रात्रभर घरी पोचत नाही. आणि रात्री पासून बेपत्ता असलेल्या अमृताचा शोध शेवटी ससूनच्या शवागारात संपतो! त्या शोधासोबतच उन्मळून पडतो, एका अख्ख्या कुटुंबाचा आधारवड!! आपल्यासाठी ‘पुरात एका तरुणीचा मृत्यू’ एवढ्या बातमीवर विषय संपतो. ती कोणा मंत्र्याची–सत्ताधाऱ्यांची किंवा हाय-प्रोफाइल समाजातील कुणाचे मुल बाळ नातलग नसल्याने, तिच्या मृत्यूची मोठी बातमी होत नाही आणि ती कोण होती यावर रकाने लिहून येत नाहीत. कोण होती ही ‘अमृता’ ??

इयत्ता आठवी आणि शिशू वर्गातील दोन मुलींचं एकल पालकत्व निभावत काबाड कष्ट करत जीवनसंघर्ष चालू ठेवणारी एक माता… २ वर्षापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यावर कँन्सरग्रस्त आईची जबाबदारी पेलणारी एक लेक. परिस्थितीसमोर हात न टेकता उलट तिच्याशी दोन हात करून आलेला दिवस समर्थपणे झेलणारी एक रणंगिनी…! जाऊ नको, रात्री इथेच थांब असे सांगूनही, “मी गेले नाही तर माझ्या मुलींकडे या भयाण रात्री कोण पाहणार ” असे म्हणत, पाण्यातच दुचाकीने घरी निघालेली ‘आधुनिक हिरकणी’! कामावरून धो धो पावसात बाहेर निघेलेली आणि पापांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहात लेकरांसाठी घरी निघालेल्या अमृताचे हेच वाक्य शेवटचे वाक्य ठरले!

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अशी ही परिस्थितीशी झुंज देणारी अमृता त्या रात्री व्यवस्थेशी संघर्ष करू शकली नाही आणि शेवटी या व्यवस्थेने तिचा जीव घेऊनच तिचा संघर्ष संपवला.

Its High Time We Talk

‘एका महिलेचा पुरात वाहून मृत्यू’ या बातमी मागे उघडे पडलेले एक कुटुंब आणि एवढी करूण कहाणी असू शकते याची जाणीव ही न ठेवता वर्तमानपत्रांची पाने आपण उलटत असतो, सोशल मिडिया खाली खाली स्क्रोल करत जातो.

हिची संघर्षगाथा ऐकून आमच्या मित्राने आजच्या युगाची हिरकणी गेली अशी प्रतिक्रिया नोंदवली. शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या बाळासाठी गड चढून गेलेल्या हिरकणीची कथा आपल्याला माहित आहे. ‘माझी मुले घरी एकटी आहेत मला घरी जावेच लागेल’ या ओढीने घरी निघालेली ही हिरकणी मात्र आपल्या बछड्यांपर्यंत पोहोचूच शकली नाही! आज शिवरायांच्या नावाने यात्रा, राजकारण करणाऱ्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे. अनेक वर्षे शिवछत्रपतींचे दाखले देणाऱ्यापर्यंत कदाचित अमृताची ही गोष्ट पोहोचणार ही नाही, कारण सध्या प्रचार सुरु आहे ना! कोण जिंकणार, कोण हरणार , कुठल्या मतदार संघात मराठा किती, दलित, माळी, धनगर, मुस्लीम मतदान किती …? त्यावरून कुठल्या जातीचा उमेदवार द्यायचा याच्यातून सत्ताधरी, विरोधकांना वेळ कुठे आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका इंजिनिअर मित्राने सांगितले कि, पुण्यात ड्रेनेजसाठी जे खड्डे आणी त्यावर जाळी दिसते त्यात अनेक ठिकाणे फक्त खड्डे आणी त्यावर जाळी आहे .खाली त्यांना जोडणारी पाईपलाईन अस्तित्वातच नाही. आपण नागरिक म्हणून हे खड्डे कधी उघडून बघितले आहेत का ? पुण्यात अनेक नाले बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. यात घरे विकत घेणाऱ्याला ही आपण अशा अनेकांचे जीव धोक्यात घालून उभे राहिलेल्या इमारतीत राहणार आहोत हे माहित नसते. स्थापत्य अभियंते , बांधकाम व्यवसायिक, राज्यकर्ते यांच्या संगनमताने अशा विकासाचे आपण सगळे भागीदार आहोत. पण तो विकास ‘अमृता’ सारख्यांच्या थडग्यांवर उभा आहे … फरक इतकाच आहे … हे थडगे आज अमृताचे आहे … उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणाचे असेल सांगता येत नाही … कारण संधाकाळ पर्यंत कुठलीही सूचना नसताना भर शहरात अचानक घुसलेले पाणी वाहून नेताना कोणात ही भेद करत नाही ….!

डॉ. अमोल अन्नदाते | reachme@amolannadate.com

डॉ. केतन खुर्जेकर असे जायला नको होते!

डॉ. केतन खुर्जेकर

काल रात्री ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ वर डॉ. केतन खुर्जेकर, पुण्यातील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन यांचं अपघातामध्ये दुखद निधन झालं. त्यांच्या जाण्याच्या काही तासात त्यांचा वाढदिवस उजाडणार होता. खरतर अशा घटनेवर व्यक्त होतांना अश्रू तर आटतातच आणि शब्दही पांगळे होतात. डॉ. केतन हे पुण्याच्या प्रसिद्ध संचेती हॉस्पिटल च्या अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते व मणक्यांच्या शस्रक्रियेत पारंगत होते. त्या पलीकडे ते कोणाचे तरी पुत्र, पती, वडील होते. मानेच्या व पाठीच्या मणक्यांच्या जन्मजात व्याधी (deformities) सरळ करण्यात त्यांचा विशेष हातखंड होता. ही शस्रक्रिया करत असतांना एखाद्या हार्मोनियम वर संगीतकाराची बोटे सहज रेंगाळावी आणि त्यातून साक्षात दैवी गांधार रूप सहज बाहेर पडाव तसच ऑपरेशन थियटर मध्ये डॉ. केतन यांची बोटे मणक्यांवर फिरायची आणि जादू केल्याप्रमाणे ऑपरेशन थियटर मधून वेगळ्याच मणक्याचा रुग्ण बाहेर यायचा. आशा अनेक रुग्णांना डॉ. केतन यांनी शब्दशः ताठ मानेने आणि ताठ कण्याने जगण्याचे वरदान दिले. साक्षात देवानेच दिलेल्या मणक्याच्या व्याधीही डॉ. केतन अविरत दोन हात करत राहिले. पण त्यांचा मृत्यु अशा प्रकारे होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही आणि ‘नियतीचा न्याय’ या शब्दांवरून विश्वास उडून जातो. मुंबईत होणाऱ्या मणक्यांच्या शस्रक्रीयेच्या Conference वरून परतत असतांना डॉ. केतन यांचा वैयक्तिक ड्रायवर नसल्याने त्यांनी OLA कॅब घेतली. आपल्या दोन साथीदारांसह OLA कॅब ने प्रवास करण पसंद केलं. रस्त्यात गाडीचं टायर पंक्चर झाल्याने ड्रायवर ने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. नेहमी प्रमाणे मदतीला धावून जाणारे डॉ. केतनही driver च्या मदतीला गाडीतून खाली उतरले. मागून येणाऱ्या भरधाव luxury बस ने या दोघांना काळाने स्वतःच्या पोटात ओढून घेतले!! आता हे सगळ ऐकल्यावर स्वतःच्या गाडीने प्रवास करा, स्वतःचा ड्रायवर वापरा, एक्स्प्रेस वे वर मध्ये थांबू नका, थांबले तरी गाडीतून खाली उतरू नका, एक्स्प्रेस वे वर रात्री प्रवास करू नका या सूचनांना तसा काहीच अर्थ वाटत नाही. कारण डॉ. केतन ज्याप्रमाणे मणक्यांचे भवितव्य बदलून टाकायचे तस काळाने केलेल हे ऑपरेशन बदलणे आपल्या कोणाच्याच हातात नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

डॉ. केतन यांच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबाचे क्षणार्धात सगळेच हरपून गेले पण त्यासोबत या राज्याचे आणि देशाचे न भरून येणारे नुकसान झाले. खरतर एक निष्णात डॉक्टर काळाच्या पडद्या आड जातो तेव्हा केवढ मोठी पोकळी निर्माण होते, हे रोज अनेक रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरलाच आणी गंभीर आजारातुन बऱ्या झालेल्या रुग्णालाच समजू शकते. एखादा व्यक्ती डॉक्टर म्हणून नियती जेव्हा जन्माला घालते, तेव्हा त्याच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी देऊन पाठवत असते. जे असाधारण कौशल्य डॉ. केतन यांच्या हाती होते. त्यावरून डॉ. केतन यांच्या वरही अजून खूप काही करण्याच अनेकांच आयुष्य बदलून टाकण्याची किमया साधण्याची जबाबदारी होती. वयाच्या, यशाच्या, पैश्याच्या एका टप्प्यानंतर डॉक्टर हा या पलीकडे जाऊन फक्त काम करण्यासाठी, त्याच्या कौशल्यासाठी जगत असतो. ते कौशल्यच त्याच्या जगण्याचे साध्य आणि साधन असते. डॉ केतनच्या जाण्याने एक दैवी साध्य आणि साधनच संपले. गेलेल्या डॉक्टरला तोफांची सलामी किंवा कुठलाही शासकीय इतमामाचा प्रोटोकॉल नसतो. पण डॉ. केतन खुर्जेकर तुम्ही बरे केलेले हजारो मणके आज तुमच्यासाठी अश्रू ढाळत आहेत, सलामी देत आहेत, मानवंदना देत आहेत …!

– डॉ. अमोल अन्नदाते
– reachme@amolannadate.com