अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा

अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा मुल अंथरुणात लघवी करत आहे का, हे समजण्यासाठी ३ ते 4 वर्षांदरम्यान रात्री झोपताना डायपर घालण बंद करावे व या सवयीचा अंदाज घ्यावा. भारतात ५ वर्षांपुढील ७.५ ते १६.५ टक्के मुलांना ही सवय आहे. कुमारवयीन मुलांमध्ये हे प्रमाण ३ टक्के आहे, मात्र हे प्रमाण फक्त रुग्णालयात आलेल्यांचे आहे. उपचार न घेणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मुलांमध्ये हे प्रमाण मुलींपेक्षा जास्त आहे. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दखल कधी घ्यावी?
मुल सहसा ५ वर्षांपर्यंत अंथरूण ओले करते. यानंतर सलग तीन महिने, महिन्यातून एकदा अंथरूण ओले करत असल्यास त्याची दखल घेऊन उपचार करण्याइतपत ही समस्या आहे, असे समजावे. याला पाचवर्षांपर्यंत उपचारांची गरज नसते. तरीही ५ वर्षांच्या आधीही सवय असल्यास तिसऱ्या वर्षापासून जमेल तसे औषध न देता लघवी करण्याच्या सवयीची शुचिता – संहिता मुलाला समजून सांगण्यास सुरुवात करायला हवी व ही सवय ५ वर्षापर्यंत जाईल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

सवयीचे परिणाम
या सवयीचे मानसिक परिणाम पालक व पाल्य दोघांवर होतात. पालकांची रात्री झोपमोड होऊन चीडचीड व दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम होतोच. या शिवाय मुलांमध्ये लाज वाटणे, अपराधीपणाची भावना निर्माण होणे, भीती आणि नैराश्य व हतबद्धतेची भावना निर्माण होते. यामुळे त्यांच्या अभ्यासावर व इतर क्षमतांवर परिणाम होतो.संशोधन सांगते, आपल्या पूर्ण आयुष्यात मनाला त्रासदायक गोष्टींपैकी घटस्फोट, आई-वडिलांची तीव्र भांडणे यांनतर अंथरुणात लघवी करणे मोठे कारण असते.

अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांचे प्रकार 
यात दोन प्रकारे वर्गीकरण करता येते 

  • जे फक्त रात्रीच अंथरूण ओले करतात.
  • जे रात्री व दिवसाही झोपल्यास अंथरूण ओले करतात.

दुसऱ्या प्रकारात वर्गीकरण करताना 

  • फक्त अंथरूण ओले करण्याची सवय असलेले.
  • या सोबत लघवी मार्गाच्या संसर्गाची लक्षणे व लघवी लागल्यास स्वच्छतागृहात जाईपर्यंत थांबता न येणे, वारंवार लघवी होणे अशी लक्षणे असतात.
  • लहानपणापासून नेहमीच अंथरूण ओले करत होते. – प्रायमरी 
  • आधी ६ महिने अंथरूण ओले करत नव्हते, पण नंतर करू लागले. – सेकंडरी

उपचारापूर्वी
अंथरुणात लघवी करण्याची सवय घालवा एक ते तीन महिन्याची लघवीची डायरी आधी मेंटेन करावी. यात झोपण्याची आणि उठण्याची वेळ , किती दिवस दिवसा व रात्री अंथरुणात लघवी केली, दिवसभर किती पाणी प्यायले, रात्री झोपण्याअगोदर किती पाणी प्यायले, सकाळी उठल्यावर किती लघवी होते, बाळ डायपर घालत असल्यास सकाळी ओल्या डायपरचे व डायपर घालताना कोरड्या डायपरचे वजन याची नोंद ठेवावी. यावरूनच उपचाराची दिशा ठरते.

  • कारणे
  • वाढ व विकासातील अडथळे व समस्या.
  • जनुकीय कारणे – पालक लहानपणी अंथरुणात लघवी करत असतील, तर त्यांच्या मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
  • मानसिक तणाव – आत्मसन्मान कमी असणे ( सेल्फ इस्टीम ), नैराश्य 
  • जन्मतः मूत्राशयाची लघवी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असणे.
  • लघवी होऊ नये म्हणून शरीरात स्रवणारा संप्रेरक अँटी डाययुरॅटीक हार्मोनची कमतरता.
  • झोपेच्या समस्या  
  • अतिचंचलता
  • बद्धकोष्टता
  • टॉन्सील व अॅडीनॉईड मुळे झोपताना श्वास अडखळणे
  • जंत असणे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.