फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना…

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना...

फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना “‘कोविड-१९’ची साथ आणि लॉकडाऊन व साथीमुळे अनेक जण डॉक्टरांचा फोनवरून सल्ला घेत आहेत. पण टेलिकन्सल्टेशन हा प्रकार अजून नवा असल्याने डॉक्टर व रुग्ण या दोहोंना त्याची शिस्त नाही. ती लावून घेण्यासाठी काही नियम समजावून घ्यायला हवेत…

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१.फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेताना फोन किंवा आॅनलाईन कन्सल्टेशनसाठी कुठल्याही अ‍ॅपचा वापर करण्याची गरज नाही. फार्मा कंपन्या काही अ‍ॅप्स स्पॉन्सर करून डॉक्टरांना वापरण्यासाठी देत आहेत. असे अ‍ॅप्स डॉक्टरांनी मुळीच वापरू नये. कारण यामुळे आपल्या रुग्णांचा डेटा, विश्वसनीय माहिती फार्मा कंपन्यांकडे जाऊ शकते. थेट डॉक्टर व रुग्णांनी त्यांचे नंबर वापरावे व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटेशन करावे.

२. कुठल्या जाहिरातीला भुलून किंवा गुगलवर डॉक्टर शोधू नये. गुगलवर डॉक्टरांची माहिती देणारे काही जस्ट डायल, प्रॅक्टोसारखे नेटवर्क डॉक्टरांकडून पैसे घेऊन कोणाचे नाव आधी दाखवायचे हे ठरवतात. म्हणून आपले नियमित डॉक्टरच टेलिकन्सल्टेशनसाठी चांगले राहतील.

३. कन्सल्टेशनची वेळ आणि ते किती अवधीचे असेल, हे आधी निश्चित करून घ्यावे. त्याला लागणारे पैसे व ते कसे भरावे, हे आधी विचारून घ्यावे. फीची देवाण-घेवाण ही थेट डॉक्टर आणि रुग्णामध्येच व्हावी. कोणत्याही थर्ड पार्टीमार्फत नको.

४. आपल्या तक्रारी, आधीचा वैद्यकीय इतिहास, नुकतेच काढलेले रिपोटर््स हे आधीच डॉक्टरांना पाठवून ठेवावे.

५. आॅनलाईन कन्सल्टेशनमध्ये डॉक्टरांशी फक्त आजार व वैद्यकीय तक्रारींबद्दल चर्चा करा. फार अनौपचारिक गप्पा मारू नका. शक्यतो एका कन्सल्टेशनमध्ये एकाच व्यक्तीबद्दल बोला.६. प्रत्यक्ष शारीरीक तपासणी शक्य नसल्याने आपल्या तक्रारी नेमकेपणाने सांगा.

७. फोनवरून डॉक्टरांचा सल्ला घेतानाकन्सल्टेशन झाल्यावर डॉक्टरांच्या सहीच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी करा. त्यावर हे प्रिस्क्रिप्शन फोनद्वारे दिले गेले आहे, याची डॉक्टर नोंद करतील.८. कन्सल्टेशन संपल्यावर उपचार सुरु असताना काही शंका असल्यास प्रत्येक वेळी डॉक्टरला फोन करू नका. मेसेज करा म्हणजे सवड मिळाल्यावर डॉक्टर त्याला प्रतिसाद देतील.

९. मधुमेह, रक्तदाब, थायरॉईडसारखे दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांसाठी कन्सल्टेशनचा हा मार्ग चांगला आहे. पण ‘फोनवर उपचार शक्य नाही, तब्येत जास्त वाटते आहे आणि येऊन भेटावेच लागेल,’ असे डॉक्टर सांगत असल्यास फोन कन्सल्टेशनचा हट्ट धरु नका. डॉक्टरांना भेटायला जा.

१०. फोन कन्सल्टेशन ही साथीच्या काळातील तात्पुरती सोय आहे. डॉक्टरांची प्रत्यक्ष भेट व तपासणीची जागा फोन कन्सल्टेशन कधीही घेऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवावे. साथीच्या काळात उगीचच रुग्णालयाशी संबंध येऊ नये म्हणून फोन कन्सल्टेशनचा मार्ग चांगला आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता