टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग मुलांना टॉयलेट ट्रेनिंगची गरज का आहे? स्वतः नीट व स्वच्छतेचे नियम पाळून ‘शी’, ‘सु’ करायला शिकणे हे मुलाला आयुष्यात पहिली अशी गोष्ट असते, जी त्याला स्वावलंबी झाल्याची भावना निर्माण करून आत्मविश्वास वाढवते व इतर गोष्टी स्वतः करण्यास प्रेरित करते. तसेच, ‘शी’, ‘सु’ करण्याचे प्रशिक्षण नीट झाले नाही किंवा हे करत असताना मुलाच्या मनात तणाव निर्माण झाल्यास पुढील आयुष्यात मानसिक समस्या निर्माण होता त.

सुरुवात कधी करावी?
टॉयलेट ट्रेनिंग शक्यतो मूल १८ महिने ते २४ महिन्या दरम्यान ‘शी’ करायला पॉटी सीटवर बसण्यास तयारी दाखवतात. मात्र, हे वय प्रत्येक मुलागणिक बदलू शकते आणि मुलाच्या मानसिक व शारीरिक तयारीप्रमाणे आईने वेळ ठरवावी. 
१८ महिन्यापासून पुढे मात्र या विषयी मुलाशी चर्चा करायला, त्याला याविषयी सांगायला सुरुवात करावी. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मूल प्रशिक्षणासाठी तयार आहे, हे कसे ओळखावे?

  • मूल तुमची नक्कल करू लागते. 
  • खेळणी जागच्या जागी ठेवू लागते. 
  • तुमच्यामागे बाथरूममध्ये येऊ लागते. 
  • स्वावलंबनाच्या खुणा दिसतात; नाही म्हणू लागते. 
  • स्वतः कपडे काढू लागते. 
  • ‘शी’, ‘सु’ आल्याचे सांगू लागते. 

कसे करावे?

  • यासाठी शक्यतो बाजारात मिळणाऱ्या पॉटी चेअरचा वापर करावा. कारण भारतीय शौचालयाचे भांडे मोठे असते व त्यावर मुलांना बसणे शक्य नसते व उभे राहण्यास भीती वाटते. 
  • प्रशिक्षणाचे मुख्य टप्पे असतात – ‘शी’ आल्याचे सांगणे, कपडे काढणे, ‘शी’साठी पॉटी चेअरवर बसणे/उभे राहणे, हात धुणे, कपडे परत घालणे. 
  • पॉटी चेअरचा वापर सुरू करण्याअगोदर ती मुलाला दाखवा, त्याची खरेदी करताना मुलाला सोबत घेऊन जा, त्याला त्यावर बसून खेळून बघू द्या. 
  • ही तुझी खुर्ची’, ‘ ही तुझ्या ‘शी’साठी आहे, असे ‘तुझे’ हा शब्द वापरून पॉटी चेअरची ओळख करून द्या. 
  • हे करताना ही प्रक्रिया सुरू ठेवणे गरजेचे हे मुख्य ध्येय असले पाहिजे, ती पूर्ण यशस्वी करणे नाही. 
  • सुरुवातीला ‘शी’ आलेली नसताना व जेवण झाल्यावर, दूध पिल्यावर मुलाला पूर्ण कपडे घालून फक्त पॉटी चेअरवर बसायला सांगणे. हे बसणे भारतीय पद्धतीने पाय गुडघ्यात दुमडून किंवा पाश्चिमात्य पद्धतीने खुर्चीवर बसल्यासारखे, कसे ही असू शकते. 
  • यासाठी रोज एक वेळ निवडावी व त्या वेळेला बसावे. 
  • बसलेले असताना मुलाशी गप्पा माराव्या. 
  • याची एकदा सवय लागली की ‘शी’ आल्यावर याच्यावर बसायचे का, असे मूल स्वतःच विचारेल. विचारले नाही की दरवेळी ‘शी’ आल्यावर तुझ्या खुर्चीत बसू या का ‘शी’ला, असे आपणहून विचारावे. 
  • बसले म्हणजे पॉटी चेअरमध्येच ‘शी’ करावी असा काही नियम घालून देऊ नये, मुलाचा त्या वेळचा मूड पाहून निर्णय घ्यावा. 
  • डायपरमध्ये ‘शी’ होते तेव्हा ती फेकताना पॉटी चेअरमध्ये टाकावी व हे मुलाला वारंवार दाखवावे 

काही टिप्स

  • टॉयलेट ट्रेनिंग पॉटी चेअर बाथरूममध्येच ठेवली पाहिजे, असा काही नियम नाही, ती मुलाला आवडत्या ठिकाणी ठेवून वापरू द्यावी. 
  • टॉयलेट ट्रेनिंग सुरू असताना शक्यतो ‘शी’ आई किंवा घरातील व्यक्तीनेच धुवावी, मुलाला स्वतःची शी धुण्याचा आग्रह व याची घाई करू नये. यात वडिलांनीही सामील व्हावे. 
  • टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान बाळाला ‘शी’ कडक होते का, याकडे लक्ष द्यावे. ज्या मुलांना कडक ‘शी’ म्हणजे बद्धकोष्ठता होते, त्यांना टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान त्रास होतो. म्हणून ही समस्या असल्यास उपचार करावेत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.