वाढते वय आणि कार्यक्षमता – डॉ. अमोल अन्नदाते

वाढते वय आणि कार्यक्षमता

दै. महाराष्ट्र टाइम्स

वाढते वय आणि कार्यक्षमता

  • डॉ. अमोल अन्नदाते

वयाची साठी आली, की अध्यात्माच्या मार्गाला लागणाऱ्या तळेगाव किंवा अलिबागच्या ‘सेकंड होम’कडे वळणाऱ्या आणि आयुष्याची संध्याकाळ आली म्हणून निवृत्तीचे वेध लागलेल्या पिढीचे डोळे उघडणारे एक संशोधन नुकतेच ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष आपल्या आजवरच्या समजुतींना धक्का देणारे आहेत. आपण ज्या क्षेत्रात आहोत, तिथे सर्वाधिक उत्तम कार्यक्षमतेचा काळ कुठला असू शकतो, असे विचारल्यास आपण अर्थातच तरुण पिढीचा विचार करतो. हा अभ्यास मात्र वेगळेच काही सांगतो. मानवी जीवनातला सर्वाधिक दर्जेदार कार्यक्षमतेचा काळ हा विशी आणि तिशीत नसतो, चाळिशीतही नसतो, तर तो साठी आणि सत्तरीत असतो. या पुढे जाऊन हा अभ्यास म्हणतो, की दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार्यक्षमता वयाच्या ७० ते ८० या दशकादरम्यान असते. ५० ते ६०च्या दशकाचा क्रमांक त्यानंतर लागतो.

हे ऐकून अर्थातच आश्चर्य वाटते. आपल्या आजूबाजूला गुडघे दुखत असलेले, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सज्ज असलेले, पाठदुखीने त्रस्त असणारे वृद्ध दिसत असतील, तर त्यांकडे काणाडोळा करून याची दुसरी बाजू तपासून पाहा. बहात्तराव्या वर्षी, २०२४च्या निवडणुकीची तयारी करत असलेले देशाचे पंतप्रधान आहेत आणि ब्याऐंशीव्या वर्षी नव्याने पक्ष बांधणी करीत असलेले शरद पवार. राजकारणातील उदाहरणे बाजूला ठेवू. जगभरातील यशस्वी फॉर्च्यून ५००’ म्हणून गणल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या न सीइओचे सरासरी वय ६३ आहे. नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्यांचे सरासरी वय ६२ आहे. आतापर्यंत पोप राहिलेल्यांचे सरासरी वय ७६ आहे. आता जो बायडेन वयाच्या ऐंशीव्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत; तसे मोरारजी देसाई ८१ व्या वर्षी पंतप्रधान झाले. साठीला निवृत्त व्हा, हे ठरवणाऱ्या मंत्रीमंडळाचे सरासरी वय मात्र ६२ आहे! ही झाली मोठ्या पदावरची उदाहरणे. आपल्या महाराष्ट्रात अकोल्याचे डॉ. नानासाहेब चौधरी हे शल्यचिकित्सक वयाच्या ९५व्या वर्षी,आजही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. प्रेमानंद रामाणी वयाची ८० वर्षे होऊन गेल्यावरही रोज शस्त्रक्रिया करतात. निवृत्तीची अट नसलेल्या वकिली, लेखन, लेखपाल अशा क्षेत्रांत तर कित्येक लोक ऐंशीव्या वर्षी सक्रिय आहेत; किंबहुना कामातली गुणवत्ताही टिकवून आहेत. ‘इस्कॉन’ चे संस्थापक स्वामी प्रभुपाद हे मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत नव्हे, तर अखेरच्या क्षणापर्यंत पुस्तकासाठीचे डिक्टेशन देत होते.

हे सगळे समजून घेण्याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले, भारतातील निवृत्तीचे वय आणि दुसरे, वयाची मर्यादा नसलेल्या क्षेत्रांतही स्वतःहून ठरावीक वयात निवृत्त होण्याची प्रवृत्ती. अनेक राज्यात अशा स्वेच्छानिवृत्तीचे वय ६० ते ६३च्या दरम्यान आहे. केरळमध्ये तर ते केवळ ५६ आहे. “वृद्धांनी जागा रिकामी केली नाही, तर तरुणांना संधी ‘कशी मिळणार,’ हा युक्तिवाद समृद्धी असलेल्या विकसित देशात एक वेळ मान्य केला जाऊ शकतो. भारतात प्रत्येक क्षेत्रात आणि त्यातही वेगाने विकसित होत असलेल्या खासगी क्षेत्रात कामाचा महाकाय डोंगर उभा असताना, तरुण वृद्ध हा भेदभाव फोल ठरतो. तरुणांना ते तरुण आहेत म्हणून पगार द्यायचा आणि कार्यक्षम वृद्धांना, गुणवान हातांना बळजबरीने घरात बसवून पेन्शन द्यायची, हे देशाला दारिद्र्याकडे नेणारे आहे. याचे उत्तम उदाहरण वैद्यकीय क्षेत्रात दिसते. आज एमबीबीएस झाल्यावर अनिवार्य ग्रामीण शासकीय सेवेचा करार आहे. नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या २२-२३ वर्षांच्या अननुभवी डॉक्टरांना पदव्युत्तर प्रवेश परीक्षा, लग्न असे विविध प्रकारचे वेध लागलेले असताना, त्यांचे या बळजबरीच्या ग्रामीण शासकीय सेवेत कसे बरे मन लागेल ? दुसरीकडे, साठीनंतर निवृत्त झालेल्या डॉक्टरांच्या पेन्शनवर खर्च सुरू आहे. खरे तर यातील अनेक डॉक्टर ग्रामीण भागात जाऊन काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांना फुकट पेन्शन नको आहे. अंग मेहनत व ‘फिल्ड वर्क’ गरजेचे असेल,तिथे तरुणांना आणि शांत बसून विचार करण्याची गरज आहे, तिथे ज्येष्ठांना संधी देऊन समतोल राखण्याची खरी गरज आहे. येणाऱ्या काळात संख्येने वाढत जाणार असलेल्या ज्येष्ठांना कामाच्या प्रवाहात सामील करून घ्यावेच लागणार आहे.

वैद्यकीय संशोधन सांगते, की आकलनविषयक क्षमता सत्तरीत व ऐंशीतही शाबूत असतात. अर्थात, त्यासाठी बलोपासना व निर्व्यसनी जीवनशैलीची पूजा बांधावी लागते, हे सांगणे न लगे! वाढत्या वयासोबत साठवलेल्या ज्ञानाची नव्या परिस्थितीत वापर करण्याची क्षमता व सामाजिक आकलनशक्ती या दोन्ही वाढीस लागतात. याचा सगळ्यांत मोठा फायदा, म्हणजे कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठांमध्ये मानसिक व शारीरिक झीज थांबते. त्यातून बऱ्याच आजारांना आपोआप प्रतिबंध होतो. ज्येष्ठांनी आनंदी राहण्यासाठी शब्दकोडे सोडवावे अथवा टीव्ही मालिका पाहाव्यात, असे सल्ले म्हणूनच कायमचे निकालात निघाले पाहिजेत.

देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा अभ्यास केल्यास, वाढत्या आयुर्मानामुळे ६० ते ८० वय असलेल्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. चीनमध्ये आज कमावणारे तरुण हात कमी आणि सांभाळावे लागणारे वृद्ध मोठ्या प्रमाणात, असा असमतोल भेडसावत आहे; त्यामुळे त्यांना एकच मूल हे धोरण मागे घ्यावे लागले आहे. सन २०३१मध्ये आपली १९ कोटी ४० लाख एवढी लोकसंख्या साठीच्या पुढे असणार आहे. याचा अर्थ, येत्या तीन दशकांत दर पाच लोकांमागे एक व्यक्ती साठीच्या पुढची असेल. वैद्यकीय प्रगती होते, तशी सरासरी आयुर्मर्यादाही वाढत जाणार आहे. अर्थकारणाच्या भाषेत बोलायचे झाल्यास, निवृत्तीनंतर ‘स्वस्थ; पण निष्क्रिय असणारी लोकसंख्या’ ही भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या अस्थिर व कमकुवत देशाच्या खिशाला जड जाणारी गोष्ट ठरणार आहे. तरुणांना काम कसे द्यावे, या प्रश्नाचेच निश्चित उत्तर अजूनजिथे गवसलेले नाही, तिथे साठीनंतर हात टेकण्याची मानसिकता प्रबळ होणारच. देशात वाढत जात असलेल्या ज्येष्ठांना कार्यमग्न कसे ठेवायचे, या संबंधी धोरण आखायला हवे, हे देशातील धोरणकर्त्यांच्या अद्याप ध्यानीमनीही नाही. उलट, एवढ्या मोठ्या संख्येतील ज्येष्ठांना पेन्शन व सामाजिक सुरक्षा द्यायची कुठून, हा प्रश्न अर्थतज्ज्ञांना अस्वस्थ करत आहे. जुनी की नवी पेन्शन योजना, हा तिढा यातूनच निर्माण झाला आहे. या जटिल समस्येच्या पोटात अजून एक गंभीर प्रश्न आहे, तो म्हणजे ज्येष्ठांमध्येही स्त्रियांना आधी निवृत्त केले जाते. प्रत्यक्षात स्त्रियांची आयुर्मर्यादा पुरुषांपेक्षा जास्त आहे.

आपल्या देशात ज्येष्ठांना कार्यरत ठेवण्यासाठी अनेकदा अध्यात्माचा मार्ग दाखवला जातो; पण सतत कार्यमग्न राहणे, हाच अध्यात्माचा मूळ आणि खरा गाभा आहे, हे कोणीही समजून सांगत नाहीत. सिद्धार्थ गौतम यांना आत्मसाक्षात्कार होऊन, ते वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी ‘गौतम बुद्ध’ झाले; पण त्यांनी काही सचिन तेंडुलकरसारखी चाळिसाव्या वर्षी निवृत्ती जाहीर केली नाही. वयाच्या ८० वर्षांपर्यंत ते धम्माचा प्रसार करण्यात व्यग्र होते. कुशीनगर येथे झाडाखाली देह ठेवण्याचा क्षण आला, तेव्हा एक व्यक्ती गौतम बुद्धांवर रागावली आणि म्हणाली, ‘माझा धम्म शिकायचा राहून गेला असताना, तुम्ही कसे काय जाऊ शकता?’ तेव्हा बुद्धांनी मृत्यूची नियोजित वेळ दोन तास पुढे ढकलली व त्या व्यक्तीला धम्माचा उपदेश केला. कार्यमग्न राहूनच बुद्ध होता येते, हाच संदेश त्यांना द्यायचा होता. आता विज्ञानानेही तेच सिद्ध केले आहे. ‘न्यू इंग्लंड ‘जर्नल ऑफ मेडिसिन’मधील संशोधनाचा खरा अर्थ हा आहे.

डॉ.अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com
www.amolannadate.com
9421516551

‘या’ स्टोरींचे काय करायचे? -डॉ. अमोल अन्नदाते

‘या’ स्टोरींचे काय करायचे?

-डॉ. अमोल अन्नदाते

आपल्या समाजातील महिला- मुलींच्या वाट्याला अन्याय, अत्याचार, अनारोग्य, उपेक्षेच्या अनेक ‘स्टोरी’ आल्या आहेत. त्याविषयी आपल्याला प्रश्न पडत नसतील, तर आपला समस्या सोडवण्याचा प्राधान्यक्रम नक्कीच चुकतो आहे. समस्त महिलांच्या अशा एकाही समस्येला निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये कुठलाच पक्ष महत्त्व देत नाही, हा राजकीय व्यवस्थेचा आणि त्याबद्दल जाब न विचारणारे मतदार म्हणून आपलाही करंटेपणा आहे.

एकेकाळी महाराष्ट्राने टिळक आणि आगरकरांचा ‘आधी स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा ?’ हा गाजलेला वाद अनुभवला आहे. आज ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे असाच काहीसा वाद भारतीय स्त्रियांच्या बाबतीत देश अनुभवतो आहे. स्त्रियांच्या बाबतीत आधी धार्मिक सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, असे या वादाचे काहीसे वेगळे स्वरूप आहे, एवढेच. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा उल्लेख झाल्या झाल्या त्याला विरोध केला आहे की बाजू घेतली आहे, असा विचार प्रत्येकाच्या मनात अजाणतेपणे येऊ शकतो. पण, या चित्रपटामुळे तयार झालेल्या अशा बाजूंपेक्षा इथे जो विचार मांडायचा आहे, तो खूप वेगळा आणि अधिक महत्त्वाचा आहे. जी गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ती या चित्रपटाचे समर्थन किवा विरोधासारख्या विचारांपासून खूपच वेगळी आहे. म्हणून सगळ्या प्रकारचे चष्मे बाजूला ठेवून स्त्रियांच्या सर्वच सामाजिक समस्यांचा ‘लसावि’ समजून घेणे गरजेचे आहे.

भारतीय मुली मुस्लिम मुलांच्या प्रेमात पडून दहशतवादी संघटनेच्या गळाला लागत आहेत, अशी एका वाक्यात या चित्रपटाची पटकथा आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना दहशतवादासाठी उद्युक्त केले जाणे ही समस्या नाही, असेही मुळीच नाही. ही समस्या नाकारून दुसरे टोक गाठण्यातही अर्थ नाही. प्रश्न हा आहे की, देशात स्त्रियांशी निगडित ही आणि हीच समस्या अस्तित्वात आहे व प्रत्येक मुलीला एवढ्या एकाच समस्येबद्दल जागरूक करणे, ही एक राष्ट्रीय निकड आहे, अशा तन्हेने जी आणीबाणीची भावना निर्माण केली जाते आहे, ती वाजवी आहे का? याबाबतीत अगदी अलीकडे अनुभवलेले एक उदाहरण इथे द्यायला हवे.. एके दिवशी ग्रामीण भागातील एक युवक माझ्याकडे आला. त्याची आई अंथरुणाला खिळली होती. या मरणासन्न आईच्या उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्या बायकोचे हिमोग्लोबिन सहापर्यंत तळाला गेले होते. तिच्यावर उपचारासाठी पैसे हवेत म्हणून एकीकडे तो युवक नेत्यांचे उंबरठे झिजवत होता, तर दुसरीकडे कुटुंबातील या स्थितीमुळे त्याच्या मुलीच्या शिक्षणाची आबाळ सुरू होती. मुलीच्या शिक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करावी, हेही त्याच्या डोक्यात नव्हते. आणि हा युवक भेटणाऱ्या प्रत्येकाला विचारत होता… केरला स्टोरी बघितला का? नसेल तर लगेच बघा!’

प्रत्येक मुलीने हा चित्रपट जरूर बघावा. पण, भारतात दर १६ मिनिटांनी एका मुलीवर बलात्कार होतो आहे आणि अशा स्थितीत स्वतःची सुरक्षा कशी करावी, याबाबतीतही मुलींना जागरूक केले पाहिजे, ही निकड आपल्या समस्यांच्या प्राधान्यक्रमात का नाही ? २०२३ च्या पहिल्या पाच महिन्यांत राज्यातील ५ हजार ६१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसाकाठी बेपत्ता होणाऱ्या या महाराष्ट्राच्या कन्या कुठल्या जातीच्या असतील, हा विचार बाजूला सारून त्या कुठे जात असतील ? त्यांचं पुढं काय होत असेल ? कुठल्या मरणयातना सोसत आयुष्य कंठत असतील त्या? राज्यातील कुठलीच यंत्रणा त्यांना शोधण्यास उत्तरदायी नाही का ? देशातील १५ वर्षांखालील ४६ टक्के मुली अॅनिमियाग्रस्तआहेत. म्हणजे त्यांचे हिमोग्लोबिन नोंद घेण्याइतके कमी आहे. हे हिमोग्लोबिनच त्यांना विचार करण्याची शक्ती प्रदान करते. सशक्त मुलगी आपल्या राष्ट्राविरोधात द्रोह करणे अविवेकी आहे, हे आपोआपच ठरवेल. त्यासाठी तिला काही सांगण्याची गरज पडणार नाही, ही साधी Retrograde Theory (मुळाशी जाऊन विचार करणे) आपल्याला का जमत नाही? सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांसाठीची स्वच्छतागृहे अजूनही पन्नास टक्क्यांनी कमी आहेत. देशामधील सर्व स्तरांतील स्त्रियांपैकी ५६ टक्के स्त्रियांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागते. Marital Rape अर्थात लग्नानंतर इच्छेविरुद्ध लैंगिक संबंधाच्या त्रासामुळे कित्येक स्त्रियांना आयुष्य नकोसे झाले आहे.

या देशात १९८७ मध्ये रूपकंवर शेवटची सती गेली आणि त्यावर संसदेत निश्चित कायदा आला १९८८ मध्ये. त्याच्या साधारण एकशेसाठ वर्षे आधी, १८२८ मध्ये सामाजिक सुधारणांच्या लढ्याची सुरुवात सतीप्रथेपासूनच करावी, असे राजा राममोहन रॉय यांना का वाटले असेल ? महात्मा फुलेंचे सहकारी डॉ. विश्राम रामजी घोले यांची लाडकी मुलगी बाहुली शाळेत जाऊ लागली, तेव्हा घरातील स्त्रियांनीच तिला बांगड्या कुटून काचेचा लाडू खाऊ घालून निर्दयीपणे तिचा जीव घेतला होता. याच प्रवृत्तीचे विस्तारित अन् आणखी क्रूर रूप अलीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या छोट्याशा गावात समोर आले होते. आपल्या जातीतच पण इच्छेविरुद्ध लग्न केले म्हणून भाऊ आणि आईने नववधूचे मुंडके छाटून अख्ख्या गावात नाचवले होते. म्हणजे, एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाप्रमाणे एकविसाव्या शतकातही ‘ती’च्या वाट्याला येणारे भोग कमी झालेले नाहीत. उलट काळ जितका प्रगत होतो आहे, तितके ते आणखी भीषण आणि भयानक होत आहेत.

आपल्या समाजातील महिला-मुलींच्या वाट्याला अशा अनेक ‘स्टोरी’ आल्या आहेत. त्याविषयी आपल्याला प्रश्न पडत नसतील, तर आपला समस्या सोडवण्याचा प्राधान्यक्रम नक्कीच चुकतो आहे. समस्त महिलांच्या अशा एकाही समस्येला निवडणुकीच्या मुद्दयांमध्ये कुठलाच पक्ष महत्त्व देत नाही, हा राजकीय व्यवस्थेचा आणि त्याबद्दल जाब न विचारणारे मतदार म्हणून आपलाही करंटेपणा आहे.

निवडणुकीच्या प्रचारसमेत द केरला स्टोरीचा आणि त्याच्या कथानकाचा जोशाने उल्लेख केला जातो, तेव्हा तर या समस्येचे खरे गांभीर्य आणखीच बोथट होते. ही समस्या असली, तरी ती एक Electoral Narrative म्हणून ती सांगितली गेली, हे उघड गुपित त्यामुळे आपसूक समोर येते. परिणामी हा प्रश्न गंभीर असूनही त्याकडे निवडणुकीचा मुद्दा म्हणून पाहिले जाईल आणि ती सुटण्याची शक्यता कमी होत जाईल, हेही समस्या खरेच सोडवू इच्छिणाऱ्यांच्याही ध्यान येत नाही. एखाद्या धर्मातील स्त्रियांचे कोणत्याही पद्धतीने होणारे धर्मांतर रोखू नये, असे अजिबात नाही. पण, डोक्यात राख घालून घेऊन केवळ कट्टरवादी विचारांचा दबाव वाढवून आजच्या विज्ञानवादी मुलींना हे पटवणे शक्य होणार नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. Pressure Yields. Resistance म्हणजे दबावाने विद्रोह वाढू शकतो, हे विज्ञानाचेच नव्हे, तर मानसशास्त्राचेही तत्त्व आहे. त्यामुळे आधी मुली-महिलांच्या स्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांच्यापुढच्या समस्यांचा क्रम नीट ठरवला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांच्या सबलीकरणाचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू करायला हवेत. तसे झाले तर खंबीरपणे आणि सद्सद्विवेक जागृत ठेवून, केवळ धार्मिकच नव्हे; तर कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय भूमिका घेण्यासही त्या सक्षम होतील.

-डॉ. अमोल अन्नदाते -reachme@amolannadate.com
www.amolannadate.com
• संपर्क: ९४२१५१६५५१

विद्यार्थ्यांनो, किमान ‘नीट’ परीक्षेला तरी बसा !

विद्यार्थ्यांनो, किमान ‘नीट’ परीक्षेला तरी बसा !

-डॉ. अमोल अन्नदाते

नीट परीक्षेचे फॉर्म भरणे व त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत मुख्यत: ग्रामीण भागात आजही बरेच अज्ञान आहे! ते दूर करण्यासाठी तर चळवळच सुरू करायला हवी!

सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट या सामायिक परीक्षेला या वर्षी २१ लाख एवढ्या विक्रमी संख्येने विद्यार्थी बसले. यापैकी सर्वाधिक २.७७ लाख मुले महाराष्ट्रातून बसली असली, तरी वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी मात्र विद्यार्थी व पालकांचे बरेच अज्ञान समोर येते त्यातच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे जाणवते.

विज्ञान शाखेतून २०२३ साली ६.७ लाख मुले बारावीच्या परीक्षेला बसली. यापैकी सगळीच मुले वैद्यकीय शाखेकडे नीटबद्दल माहितीच नाही, अशा विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आढळून येते. क्लासची फी परवडत असलेल्या शहरी उच्च मध्यमवर्गीय वर्गातील एमबीबीएस, बीडीएस (दंतवैद्यक) व इकडे नाहीच प्रवेश मिळाला तर बीएएमएस (आयुर्वेद) या तीन अभ्यासक्रमांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेची माहिती असते; पण प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर नाव नोंदणी करताना छोट्या चुका झाल्याने खर्च परवडत असूनही प्रवेशाला मुकावे लागते.

उदाहरणार्थ सीईटी सेलची नोंदणी करताना १००० रुपये व ६००० रुपये अशा २ प्रकारच्या नोंदणीचे पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी जास्त फी असलेल्या व्यवस्थापन कोटा / इन्स्टिट्यूशनल कोटामधून सहज प्रवेश मिळतो; पण विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना हा पर्यायच निवडलेला नसल्याच्या तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस नव्हे. होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी अशा अनेक उत्तम पर्यायांची अनेक विद्यार्थ्यांना माहितीच नसते. विशेष म्हणजे नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या शाखेमधील प्रवेशासाठी फक्त नीट परीक्षेला बसणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना शून्य किंवा अगदी त्याखाली निगेटिव्ह मार्क असले तरी प्रवेश मिळतो; पण प्रवेशासाठी येणाऱ्या बन्याच इच्छुक विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसावे लागते, हेच माहीत नसते.

नीट परीक्षा सुरू होऊन आता १० वर्षे उलटली तरी विज्ञान शाखेच्या विद्यार्थी/ पालकांना अजून या परीक्षेविषयी माहिती नाही, हे मुख्यतः ग्रामीण भागातील वास्तव आहे. आपल्या भवितव्याशी निगडित माहिती गुगलवर सर्च करण्याची तसदी हे विद्यार्थी, पालक घेत नाहीत.

२०१३ आधी वैद्यकीय प्रवेश हे महाराष्ट्र सीईटीच्या माध्यमातून होत. कित्येक विद्यार्थी याच भ्रमात राहून वैद्यकीय प्रवेशासाठी याच परीक्षेचे निकाल घेऊन येतात. परीक्षा दिली तरी त्या पुढचे अज्ञान असते नोंदणीबाबतचे कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू होताना सीईटी सेलची नोंदणी करायची असते, हेच माहीत नसते. याविषयीचे अज्ञान लक्षात घेता सीईटी सेलने प्रत्येक प्रवेशाच्या राउंड आधी ही नोंदणी खुली करणे आवश्यक आहे; पण असा फिडबॅक व गरज वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व मंत्र्यांपर्यंत कदाचित पोहोचतच नसावा. पोहोचला तरी या छोट्या पण महत्त्वाच्या सूचना ते किती गांभीर्याने घेतील, हा प्रश्नच आहे.

केवळ या अज्ञानामुळे विद्यार्थी प्रवेशाला इच्छुक असूनही गेल्या वर्षी अखेरच्या राउंडआधी होमिओपॅथी (बीएचएमएस) ४४१, आयुर्वेद (बीएएमएस) ५८३, युनानी ४, बीएस्सी नर्सिंग ९७५, फिजिओथेरपी – ७८१ एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त होत्या. यात ओबीसी विद्यार्थ्यांना ५०% व अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), भटक्या विमुक्त जातीच्या विद्यार्थ्याना १०० % शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळाचा मोठा व तीव्र तुटवडा असताना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणे हे गंभीर व चिंताजनक आहे. दर वर्षी शासनाने मोठ्या प्रमाणावर या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना परवानगी देण्याआधी आहेत त्या जागा भरल्या जाण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नीट परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी व त्यानंतरच्या प्रक्रियेतील अज्ञान दूर करण्यासाठी तर चळवळच सुरू होणे गरजेचे आहे.

-डॉ. अमोल अन्नदाते
-reachme@amolannadate.com

  • www.amolannadate.com
    9421516551

तप्त वाटेवर ‘विवेकाचा घात’

दै. दिव्य मराठी रसिक

तप्त वाटेवर ‘विवेकाचा घात’

-डॉ. अमोल अन्नदाते

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या सामान्य लोकांच्या मृत्यूची जबाबदारी जो तो आपापल्या परीने निश्चित करतो आहे. प्रशासनाचे गैरव्यवस्थापन, कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमामागील सरकारचा हेतू अशा सर्व बाजूंनी चर्चा झडत आहेत. पण, या घटनेत दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्यांविषयी सहानुभूती व्यक्त करतानाच आपल्या गुरूवर श्रद्धा व्यक्त करताना भक्तीच्या भावनेने दुसरे टोक गाठल्यामुळे कुणाही भक्तावर मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये या विवेकाचे भान कोण देणार ? या प्रश्नाने अस्वस्थ होऊन त्यावर उत्तर शोधण्याचे आणि समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने इतरांना ते सांगण्याचे धारिष्ट्य कुणी दाखवत नाही हेही तितकेच मोठे दुर्दैव! श्रद्धा आणि भक्तीला विवेकाचे कोंदण असल्याशिवाय विज्ञानवादी, संतुलित समाज घडणार नाही म्हणून प्रसंगी वाईटपणा स्वीकारून हे विवेकभान देणे आवश्यक आहे.

भक्तीच्या भोळ्या भावनेपोटी लोक एकत्रित जमून त्यात भाविक मृत्युमुखी पडल्याची ही काही पहिली घटना नाही. काही वर्षांपूर्वी घडलेल्या मांढरदेवी दुर्घटनेपासून ते सिहोरमधील रुद्राक्ष मिळवण्यासाठी उसळलेल्या जीवघेण्या गर्दीपर्यंत अशा अनेक घटना घडत आल्या आहेत. म्हणून हा जसा कुणा एका संप्रदायाचा विषय नाही तसा तो कुणा एका व्यक्तीच्या वा गुरूच्या संदर्भात विशिष्ट मर्यादेत आणि एकाच भिंगातून बघण्याचा विषय नाही. आयुष्याच्या धकाधकीत प्रत्येक माणूस काही ना काही आधार शोधत असतो. एक तर अदृश्य शक्तीच्या रुपात ईश्वरामध्ये किंवा सगुण स्वरूपातील जिवंत माणसांमध्ये तो असा आधार शोधतो. भक्ती आणि आध्यात्माच्याच भाषेत बोलायचे तर स्वतःसह प्रत्येकामध्ये असलेला ब्रह्मन किंवा आत्मन तो इतर कोणामध्ये शोधत असतो. अनेक वेळा न दिसणाऱ्या ईश्वरापेक्षा प्रत्यक्ष भेटणारी, बोलणारी एखादी प्रतिमा लाभली तर तिच्या ठायी प्रत्यक्ष असा व्यक्त करणे, निष्ठा वाहणे हे माणसासाठी अधिक सोपे आणि जास्त मानवी समाधान देणारे असते. कुठलीही आनंददायी क्रिया करताना लाभणाऱ्या आत्मिक समाधानाची ‘डोपामिन किक’ या श्रद्धेमध्येही मिळते. शिवाय, असे गुरू थेट काही मागत नसतात, कालच्या पेक्षा आज आपण अधिक चांगले व्यक्ती होण्याचा ‘फील गुड’ मिळतो आणि या आध्यात्मिक व्यासपीठाद्वारे सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे एक चांगले निमित्तही मिळते..

आपली ‘कोअर कॉम्पिटन्सी’ (मुख्य अंगभूत कौशल्याचे कार्य) असलेला कर्मयोग सुरू असताना आणि ही भक्ती कौटुंबिक, व्यक्तिगत पातळीवर मॅनेजेवेल असेपर्यंत हे सगळे ठीक व कर्मयोगाला पूरक असे असते. म्हणजे विषादयोगातील अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितल्यावर त्याने गांडीव उचलून युद्ध करणेच अपेक्षित होते. ‘हे गांडीव तू घे. मला रथ चालवू दे किंवा मी युद्ध सोडून गीतेचे पारायण करतो’ अशा कुठल्याही पलायनवादाला श्रीकृष्ण या गुरूने परवानगी दिली नाही. ‘न कर्मणा मना रम्भा नेष्कर पुरुषोश्नुते’ अर्थात कर्म न केल्याने आणि कर्म त्यागल्याने कधीही तुझे भले होणे शक्य नाही हे सांगून श्रीकृष्णाने अर्जुनापासून स्वतःची नियोजनबद्ध सुटका करून घेत त्याला स्वतःच्या पायावर उभे केले.

आज गुरू भक्तांच्या मांदियाळीत मात्र नेमके याच्या उलट चित्र दिसते आहे. एकदा का आपण कोणा गुरूचे छत्र स्वीकारले की या निसरड्या वाटेवर संतुलन शिकण्याऐवजी त्यावर घरंगळत अतिभक्तीचा लंबक दुसऱ्या टोकाला कधी आणि कसा सरकतो हे भक्तांनादेखील कळत नाही. त्यातच कुठल्याही अविवेकीपणाला मोठ्या समूहाचे अनुमोदन मिळते तेव्हा जितकी मानवी संख्या जास्त तितकी वैचारिकतेची पातळी सूक्ष्म होत जाते. त्यातून मग गुरूची शिकवण किंवा आध्यात्म साध्य करायला आपले अस्तित्व तरी शाबूत राहायला हवे हेही श्रद्धेत भिजलेले भोळे मन विसरून जाते आणि असे अतिसश्रद्ध मन विवेकी मेंदूवर मात करते. म्हणून गुरूंवर भक्ती असावी की नसावी यापेक्षा आधी मी, माझे अस्तित्व आणि ते राहिले तर भक्ती एवढे साधे-सोपे सूत्र समजण्यासाठी कुठल्या गुरूची गरज असते असे वाटत नाही. खरे तर आध्यात्मिक गुरू म्हणून वावरणाच्या ज्या काही समाजमान्य आणि राजमान्य व्यक्ती आज भारतात लोकांच्या मनाचा ताबा घेत आहेत त्याचे प्रथम कर्तव्य आहे की, अनुयायांना आपल्यापासून मुक्त करणे आणि त्यांनाआत्मिक शांती समाधान मिळवण्यासाठी स्वावलंबी बनवणे. कोणतेही समुपदेशन करताना संबंधित व्यक्तीची समुपदेशकाशी भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असते. समुपदेशनाचे अंतिम ध्येय हे त्या पीडित व्यक्तीला स्वावलंबी बनवणे हे असते. वास्तवात भक्त किंवा साधकही आध्यात्मिक गुरूंकडे लेबल नसलेले समुपदेशक म्हणूनच पाहत असतात. म्हणून या गुरूंकडूनही समुपदेशकासारखी गुंतागुंत नसलेली क्रिया अपेक्षित असते. पण, कालांतराने आध्यात्मिक व्यक्तीचे कल्ट अँड म्हणजे प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेले अनुयायी आणि या ब्रँडचे यशापयश म्हणजे आपले यशापयश मानणारा वर्ग असा समूह तयार होतो. त्यातूनच कॉर्पोरेट क्षेत्रात शिताफीने निर्माण केली जाणारी ‘लॉयल्टी बियाँड लॉजिक’ (प्रश्न पडण्यापलीकडची निष्ठा) आध्यात्मिक क्षेत्रात सहजतेने आपसूकच तयार होते.

सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवण्यासाठी वाटाडे नक्कीच हवे असतात. आयुष्य जगण्यासाठीच नव्हे, तर करिअरमध्ये तसेच सर्व पातळ्यांवरच्या कौटुंबिक, मानसिक, भावनिक व्यवस्थापनासाठी सल्लागाराच्या रूपात प्रत्येकाच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर अनेक गुरू येत असतातच. त्याप्रमाणे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीही कुणी वाटाड्या असल्यास त्यात वावगे काहीच नाही. पण, वाट दाखवल्यावर त्या वाटेने चालणे सोडून रस्ता दाखवणाऱ्याची पूजा बांधून, तिथेच फतकल मारून बसल्यास आपल्या निर्धारित ठिकाणी आपण पोहोचणार कसे आणि कधी? गुगल मॅपवर पत्ता शोधल्यावर काही क्षणात दिसणाऱ्या रस्त्याचा अवलंब करणे सोडून गुगलच्या प्रशंसेची भजने आपण गातो का ? गुगल मॅपवर गोड आवाजात रस्ता सांगणारी स्त्री असो की गुरूची सुरेल प्रवचने असोत; ही केवळ मार्ग दाखवणारी साधने आहेत आणि त्यानुसार चालणे, मार्ग क्रमित होणे हे आपले साध्य आहे, हे कळले नाही तर या साऱ्याचा उपयोग काय? अशा वेळी माणसाचे बुद्धिप्रामाण्यवादावर आधारलेले विवेकी अस्तित्वच पणाला लागते. ऐंशीच्या दशकात ओशोच्या तत्त्वज्ञानाने जगात भल्याभल्यांना वेड लावले होते. त्यांच्या शिबिरात सहभागी होण्यासाठी रग्गड पैसे मोजावे लागत आणि जगभरातील धनदांडगे लोक ते मोजून ओशोंच्या आश्रमात रमत. तेव्हा एका गरीब माणसाने ओशोंना विचारले, ‘तुमचे आध्यात्म श्रीमंतांसाठीच आहे का? गरिबाला मोक्षप्राप्तीचे ज्ञान तुम्ही देणार नाही का ?’ त्यावर ओशो उत्तरले, ‘सध्या पैसे कमावणे हाच तुझा मोक्ष आहे!’ आपल्या कर्तव्यातून मोक्षमागांचे पहिले साधन काय, याचे उत्तर स्वतःच्याच सद्सदविवेकबुद्धीचा गुरू आपल्याला देईल. आपली हीच निरक्षीरविवेकबुद्धी सदैव जागी राहिली तर मानसिक, भावनिक आधारासाठी ज्या वाटाड्यांकडे आपण जातो, त्यांनी दाखवलेली वाट अनुसरण्याऐवजी आपण तिथेच गुंतून पडणार नाही. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैवचार्जुन । कुठलीही गोष्ट अति करू नकोस, हे अर्जुनाला सांगणाऱ्या श्रीकृष्णाचे हे वचन आपल्यालाही अनुसरायला लावण्याचे काम हा विवेकच करेल.

हरिणाच्या नाभीत कस्तुरीची उत्पत्ती होऊन आसमंतात सुगंध दरवळू लागतो तेव्हा त्या हरिणाला तो कुठून येतोय हे कळतच नाही. हा सुगंध येतोय तरी कुठून? या व्याकुळतेत हे हरीण अख्ख्या जंगलात सैरभैर धावत सुटते. काटेकुटे, दगडगोटे, झाडी झुडपांमुळे ओरखडे येऊन रक्तबंबाळ होते. पण, या सुगंधाचा मूलस्रोत तूच आहेस हे सांगणारा कोणीही त्याला त्या जंगलात भेटत नाही… अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या मानवी आयुष्यात विवेकाच्या अशाच सुगंधाचा साक्षात्कार आपल्याला जितक्या लवकर होईल तितकी आपली वाटचाल सुकर, सुखद अन् समृद्ध होईल.

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com
संपर्क: ९४२१५१६५५१