‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे? – डॉ. अमोल अन्नदाते

medical students

दै. महाराष्ट्र टाइम्स

‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे?

-डॉ. अमोल अन्नदाते

मागील पाच वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एक हजार ११७ व एमबीबीएस पदवी करत असताना १५३ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडल्याची आकडेवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( नॅशनल मेडिकल कमिशन ) दिली. अर्ध्यावर शिक्षण सोडून जाण्याचे प्रमणात इतर अभ्यासक्रमातही असते. पण ज्या प्रवेश परीक्षेत १ लाख जागांसाठी २५ लाख विद्यार्थी स्पर्धा करत असतात व हुशार मुले ज्या अभ्यासक्रमाला पसंती देतात तो अभ्यासक्रम इतक्या विद्यार्थ्यांनी सोडणे हे चिंताजनक आहे.

             खरेतर एकदा एमबीबीएस ला प्रवेश मिळाला की विद्यार्थी डॉक्टर होणारच हे गृहीत धरलेले असते. सन २००० पर्यंत एमबीबीएस तृतीय वर्ष परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नव्हते. आता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात तसेच देशभर ही एमबीबीएस परीक्षा पूर्वी इतकी अवघड ठेवलेली नाही. तरीही अभ्यासक्रमाचा भार न झेपल्याने काही प्रमाणात मुले कोर्स सोडतात. महाराष्ट्रात पहिल्या वर्षी उत्तीर्ण होण्यासाठी चार परीक्षांची संधी दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी बाहेर जातो. उशिराने सुरु होणारे प्रवेश , न्यायालयीन खटले यामुळे ऑगस्ट मध्ये सुरु होणे अपेक्षित असलेले वर्ग हे सुरु होण्यास जानेवारी , डिसेंबर उजाडते व ऑक्टोबर मध्ये परीक्षा असते. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात नवख्या असलेल्या विद्यार्थ्याना अवाढव्य अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यास जेमतेम १० महिने मिळतात. त्यातही संक्रांत , जयंत्या , दसरा , दिवाळी या महाविद्यालयाला सुट्ट्या सुरूच असतात. म्हणून पहिल्या वर्षात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यास सोप्या असल्या तरी त्यांचा तणाव नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या वयासाठी मोठा असतो. त्यामुळे मानसिक समस्या , तणाव व त्यातून व्यसनाधीनतेचे प्रमाण वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या सर्व नैराश्येतून अभ्यासक्रम सोडणारे काही विद्यार्थी असतात.

               सहसा वर्गात पहिल्या पाच मध्ये असलेले विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला येतात. शालेय जीवनापासून सतत हे विद्यार्थी शैक्षणिक यश अनुभवलेले असतात. वर्गात मधल्या फळीतील मुलाना फार शैक्षणिक प्रगती ही नाही व घसरण ही नाही अशा स्थिर मानसिकतेत रहायची सवय असते पण पहिल्या फळीतील विद्यार्थ्यांची जराही शैक्षणिक घसरण पचवण्याची मानसिक क्षमता कमी असते. पडून परत उसळी मारण्याच्या मानसिक प्रक्रियेला रेसिलंस ( resilience ) असे म्हंटले जाते. या आघाडीवर वैद्यकीय विद्यार्थी काहीसे कमकुवत असतात. म्हणून एमबीबीएस व त्यानंतर जराही शैक्षणिक अपयश आले कि अभ्यासक्रम सोडण्याचे टोकाचे पाउल काही विद्यार्थी उचलतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व त्यातच विदर्भातील काही महाविद्यालयात रॅगींगचे प्रमाण खूप आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात एका वैद्यकीय विद्यार्थ्यांची महाविद्यालय प्रांगणात हत्या झाल्या नंतर हे विषय काहीसे पुढे आले. घरापासून लांब असलेले विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक दृष्ट्या स्थिर राहतील व त्यांना वसतिगृह, महाविद्यालय हे दुसरे घर वाटावे असे आवर्जुन प्रयत्न होत नाहीत.

            अनेकांना आपण या अभ्यासक्रमाला का आलोय हेच माहित नसते. त्यातील काही जण पालकांच्या हट्टापायी या अभ्यासक्रमाला आलेले असतात. बर्याच जणांना हे क्षेत्र म्हणजे आर्थिक मिळकत व सामाजिक स्थैर्याची खात्री वाटते पण या क्षेत्रात आल्यावर त्यातील संघर्ष कळतो. वैद्यकीय प्रवेश घेऊन नंतर इतर क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण ही त्यामुळे वाढले आहे. 

       पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्पर्धा पदवी परीक्षे एवढीच तीव्र आहे. तरीही तिथे ही अभ्यासक्रम सोडण्याचे प्रमाण आहे. भारतातील निवासी डॉक्टरांची काम करण्याची पद्धत जगात सर्वात सदोष व गैर व्यवस्थापनाने ग्रासलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न रुग्णालयात हजारो रुग्णांची गर्दी असते पण एका कक्षात बोटावर मोजण्या इतपत निवासी डॉक्टरांवर सगळा भार असतो. त्यामुळे अनियमित कामाचे तास व निवासाच्या अस्वच्छ व अपुर्या सोयी ही समस्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असाध्य कॅन्सर सारखी झाली आहे. एक आठवड्या पूर्वी आजारी असलेल्या सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा वसतिगृहातील खोलीतच मृत्यू झाला. नांदेड व ठाणे वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू होऊनही परिस्थिती बदललेली नाही . अपुऱ्या वैद्यकीय साधनांमध्ये अपेक्षांचे ओझे झेलत होणारे पदव्युत्तर शिक्षण हे आनंदात नव्हे तर फरफटत, अपमान सोसत पूर्ण करण्याचे शिक्षण झाले आहे. यातून ही बरेच निवासी डॉक्टर हे तणावाखाली असतात व प्रसंगी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. काही विद्यार्थी हे शिक्षण चालू असताना इतर ठिकाणी व अभ्यासक्रमात संधी मिळाली म्हणून ही शिक्षण सोडतात. वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत अभ्यासक्रमाची लांबी जास्त असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिशी उजाडते . त्यातच लग्न व इतर कौटुंबिक जबाबदार्या राहून जातात. स्त्री डॉक्टरांसाठी तर तारुण्य, लग्नाचे वय व पदव्युत्तर शैक्षणिक संधी हे नेमके एकाच वेळी येते म्हणून हे गणित जुळवत असताना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. 

वैद्यकीय शिक्षणात आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग शिक्षण घेत आहेत. त्यात शासकीय महाविद्यालय व खाजगी वैदकीय महाविद्यालयातील कमी फीच्या कोट्यातील विद्यार्थी हे निम्न व मध्यम वर्गातील आहेत . अभिमत व खाजगी महाविद्यालयात उच्च मध्यम वर्ग व अभिजन वर्ग शिक्षण घेतो. दुर्दैवाने असे म्हणावे लागते कि आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती शिक्षण व विद्यार्थ्यांचे मानसिक व्यवस्थापन याबाबत चिंताजनक आहे. भरघोस फी आकारणारे अभिमत विद्यापीठे व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये यांच्यावर तुलनेने फी भरणाऱ्या वर्गाचा दबाव जास्त आहे व म्हणून मुलाला सुखरूप अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व त्याला उत्तीर्ण करण्यास काळजी घेतली जाते. म्हणून शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हे तुलनेने जास्त तणावा खाली असतात . खरे तर अभ्यासक्रम सोडून जाण्याची इच्छा ही तात्कालिक असते पण काही विद्यार्थी या तणावाच्या काळात आधार न मिळाल्यामुळे अभ्यासक्रम सोडतात. बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील फार्माकोलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ पद्माकर पंडित यांनी अशा अभ्यासक्रम सोडून गेलेल्या व सोडण्याच्या बेतात असलेल्या अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना समुपदेशन व शैक्षणिक पाठबळ देऊन त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत केली. अशा मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात क्रोनिक असे म्हंटले जाते. आश्चर्य म्हणजे हेच क्रोनिक त्यांना पडत्या काळात आधार मिळाल्यास पुढे केवळ यशस्वी डॉक्टरच नाही तर प्रशासन , राजकारणा अशा अनेक क्षेत्रात नाव कमवतात. म्हणून डॉ पद्माकर पंडित यांच्या सारखे विद्यार्थ्यांना आधार देणारी बेटे ही प्रत्येक महाविद्यालयात असणे गरजेचे आहे. सैन्याच्या प्रशिक्षणात आपल्या सोबतचा जवान युद्धात जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेऊन धावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्येकाला मानसिक आधार देण्याच साठी एक बडी जवान अर्थात मित्र ठरवून दिला जातो. आपल्या मित्र जवानाची मानसिकता ढासळत असेल तर त्वरित वरिष्ठांना सांगण्याचे आदेश दिले जातात. वैद्यकीय शिक्षणात ही सोबतचा मानसिक रित्या जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेण्याचे अर्थात आधार देण्याचे प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना गरजेचे आहे.

जी एस वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षी ‘शिदोरी’ नावाचा उपक्रम राबवला जातो. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी दोन सिनियर विद्यार्थी व एका शिक्षका कडे दिली जाते. परदेशातील अनेक विद्यापीठात असा मेंटर – मेंटी प्रोग्राम अर्थात विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थी व शिक्षक वाटाड्या म्हणून ठरवून दिले जातात. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम कागदावरच राहतो. मानसिक समस्या हा समाजातील येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्या बर्या करण्याची, टाळण्याची जबाबदारी ही मुख्यतः वैद्यकीय क्षेत्रावरच असणार आहे. पण यासाठी आधी त्यांनी आपले विद्यार्थी तेवढे सक्षम असतील व एक ही विद्यार्थी अभ्यासक्रम सोडून जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. कणखर वैद्यकीय विद्यार्थीच कणखर समाज घडवेल.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551