कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको सध्या मुंबईत व राज्यात इतरत्र ही कोरोनामधून बरे झालेले, संपर्क आलेल्यांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाइन) किंवा विलगीकरण (आयसोलेशन) सांगितले आहे. पण अशा अनेकांना राहत्या घराजवळ सोसायटीमध्ये सामाजिक बहिष्काराचे वाईट अनुभव आले. एकदा बऱ्या झालेल्या रुग्णांकडून किंवा विलगीकरणाचा कालावधी संपल्यावर इतरांना या व्यक्तीकडून संसर्गाचा कुठला ही धोका नसतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे बहिष्कार नव्हे
कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको आपल्या सोसायटी किंवा निवासी जागेतील एखादा रुग्ण परत आल्यावर तो दिसला कि लगेच घाई घाईने लांब जाणे, त्याच्याशी न बोलणे, जाताना त्याच्याकडे न बघणे असे वर्तन करू नका. फिजिकल डिस्टन्सिंग जरूर ठेवावे. पण ते ठेवत असताना लांबून संवाद साधता येतो. तसेच अशा कुटुंबाला किंवा घरात एकट्याने विलगीकरणात असलेल्यांना काय हवे ते बाहेरून आणून देण्यासाठी मदत करा. तसेच त्यांच्याशी खिडकीतून, गॅलरीतून, फोनवरून बोलून त्यांना मानसिक आधार द्या.

रुग्णांबद्दल बोलताना, समाज माध्यमांवर व्यक्त होताना भान ठेवा
एखादा रुग्ण आपल्या भागात सापडला की त्याला रुग्णवाहिकेतून नेतानाचे फोटो टाकणे, त्याला नेत असताना पार्श्वसंगीत किंवा गाणी टाकून व्हिडीओ बनवून फोनवर शेअर करणे असे करू नये व हे वैद्यकीय नीतीमूल्यांच्या विरोधात आहे. रुग्णाचे नाव घेऊन त्याला उचलले, पकडले, धरून नेले असे शब्द वापरून रुग्णांबाबत चर्चा करू नये.

सहवेदना बाळगा
आपण स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे कोणीही वागू नये. ही महामारी असल्याने प्रत्येक नागरिकाला संसर्गाची समान जोखीम आहे. म्हणून प्रत्येक कोरोनाग्रस्तांसाठी सहवेदना म्हणजे त्याचा त्रास हा जणू आपला ही त्रास आहे, असे समजून वागले पाहिजे. साथीच्या या वातावरणात कोरोनाचा संसर्ग कोणाला ही होऊ शकतो. म्हणून चांगुलपणाची देवाणघेवाण ही गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता