कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट दारात उभा… आता?

Corona's new Omicron variant standing in the doorway ... nowCorona's new Omicron variant standing in the doorway ... now

२६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या संक्रमित प्रजातीला ‘व्हेरिअंट ऑफ कन्सर्न’ म्हणजे नोंद घेण्याजोगी प्रजाती म्हणून जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका व युरोपसह नऊ  देशांमध्ये सध्या या नव्या प्रजातीमुळे नव्याने कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळण्यास सुरुवात झाली आहे. भारतात पहिली लाट ओसरल्यावर कोरोना संपल्याचा उत्सव सुरु होता, तेव्हा डेल्टाचे रुग्ण अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये आढळण्यास सुरुवात झाली व त्यावेळच्या गाफीलतेतून मार्च महिन्यात भारतात दुसरी लाट आली.  आता भारतात काळजी वाऱ्यावर सोडून दिलेली असताना  हा ओमिक्रॉन व्हेरिअंट आला आहे.

कोरोनामध्ये अशी संक्रमणे अपेक्षित असली, तरी ओमिक्रॉनच्या संक्रमणामध्ये काहीसा वेगळेपणा आहे. अल्फा व डेल्टा ही भावंडं निर्माण झाली तेव्हा कोरोना विषाणूमध्ये दोन ते तीन ठिकाणी जनुकीय बदल झाले होते. पण ओमिक्रॉन मध्ये तब्बल ३० ठिकाणी अशी म्युटेशन्स झाली आहेत. त्यामुळे हे संक्रमण आधीपेक्षा जनुकीयदृष्ट्या जास्त घातक आहे. अशा संक्रमणामुळे एक तर विषाणू जास्त लोकांना संक्रमित करण्यास सक्षम होतो आणि लसवंत व्यक्तिलाही संसर्गित करू शकतो. अर्थात, असे होईलच, असेही नाही. कारण संक्रमण घातक ठरेल की, विषाणूला माघार घ्यावी लागेल, हे मानव समूह म्हणून त्याला कसा प्रतिसाद देतो व सार्वजनिक आरोग्याची त्या विरोधात धोरणे कशी असतात, यावरून ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अर्धवट लोकसंख्येला कोरोना संसर्गामुळे मिळालेली अर्धवट प्रतिकारशक्ती व अजून सर्व लोकसंख्येचे न झालेले लसीकरण अशा सामूहिक प्रतिकारशक्तीची ‘ ना घर का, ना घाट का’ स्थिती ओमिक्रॉनच्या आक्रमणासाठी एक आदर्श स्थिती आहे. आज देशात केवळ ३१ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. २६ टक्के लोकांनी एक डोस घेतला असून, दुसरा डोस घेणे बाकी आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांपैकी १०० दशलक्ष भारतीयांनी दुसऱ्या डोसची वेळ येऊनही हा डोस घेतलेला नाही. दुसऱ्या डोसची वाट पाहणारे व तारीख उलटूनही न घेणारे हे दोन गट भारताला ओमिक्रॉनच्या तोंडी  देऊ शकतात. अजून लसीकरणच न झालेले ४३ टक्के भारतीय हे तर ओमिक्रॉनसाठी सर्वात सोपे सावज!

संक्रमण कुठलेही व कितीही घातक असो पूर्ण लसीकृत देश हेच त्याला उत्तर असणार आहे. म्हणून लसीकरणाची गती अजून वाढवणे, मुदत उलटून गेलेल्यांना शोधून तो देणे व पहिला डोस झालेल्यांना त्याच तारखेला डोस देणे, यासाठी तीन पातळ्यांवर काम करणारे आरोग्य सेवकांचे गट व स्वतंत्र कृती आराखडे तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय दुसरा डोस घेऊन सहा महिने होऊन गेलेल्यांना तिसरा बुस्टर डोस देण्याच्या निर्णयालाही काहीसा उशीर होतो आहे. जगात ३६ देशांमध्ये तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ६०पेक्षा जास्त वय असलेले, इतर आजार असलेले व पहिल्या फळीत काम करणारे आरोग्यसेवक या तीन गटांना बुस्टर डोसचा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा. ओमिक्रॉनचे अस्तित्व असलेल्या सर्व देशातून भारतात येणाऱ्या लोकांना १४ दिवस ठराविक ठिकाणी (गृह नाही) विलगीकरण, तपासणी अनिवार्य करणे गरजेचे आहे.  कोरोना रुग्णांचे जनुकीय वर्गीकरण वाढवून त्यात ओमिक्रॉन आढळतो का, याची सतत चाचपणी आवश्यक आहे. एवढे नुकसान झाले तरीही, मास्क, हात, धुणे व शारीरिक अंतर  या तीन मूलभूत गोष्टी जीवनशैलीचा भाग बनवण्यास आपण तयार नाही. ओमिक्रॉन अजून किती घातक ठरेल, हे काळच ठरवेल. पण त्यादृष्टीने आरोग्य सुविधांची तत्परता, बंद केलेले कोविड सेंटर्स कधीही सुरु करता येतील, अशी तयारी व औषधांचा पुरेसा साठा या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरी लाट येण्याआधीची गाफीलता व दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या चुका टाळून ओमिक्रॉनचा मुकाबला करावा लागेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते