पल्स ऑक्सिमीटरचा वापर

पल्स ऑक्सिमीटीरचा वापर

पल्स ऑक्सिमीटरचा वापर शरीरातील ऑक्सिजनची पातळी व ह्रदयाचे ठोके  मोजण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरण म्हणजे  पल्स ऑक्सिमीटर. लक्षणविरहीत तसेच सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या होम आयसोलेशन मधील व्यक्तीला स्वतःच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची पातळी मोजणे का गरजेचे असते ?
कोरोना मध्ये श्वास घेण्यास त्रास सुरु होण्या आधी कमी झालेल्या ऑक्सिजन वरून न्युमोनिया किंवा ऑक्सिजन कमी करणाऱ्या इतर गुंतागुंतीचे निदान करता येते.

नॉर्मल ऑक्सिजनची पातळी किती असते ?
सहसा ९४ – १०० ही नॉर्मल ऑक्सिजनची पातळी असते , कधी ९३ पर्यंत ही चालते. पण ९० च्या खाली मात्र तातडीने रुग्णालयात जायला हवे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रीडिंग कशी बघावी?
पल्स ऑक्सिमीटर ह्र्दायचे ठोके व ऑक्सिजनची पातळी अशा दोन्ही रीडिंग दाखवते. ऑक्सिजन दाखवले जाते तिथे SPO2 असे लिहिलेले असते. सहसा वर दाखवलेली रीडिंग ऑक्सिजनची असते आणि खाली दाखवलेली ह्रदयाच्या ठोक्याची असते. काही पल्सऑक्स मध्ये हे उलटे असू शकते व कुठली पातळी कशाची आहे हे मशिनच्या कव्हर वर लिहिलेले असते. हे ओळखण्यासाठी पल्स आणल्यावर घरातील एक दोन स्वस्थ व्यक्तींना लावून बघावे. जिथे सगळ्यांची रीडिंग ९० च्या पुढे दिसते आहे ती ऑक्सिजनची पातळी दाखवणारी रीडिंग आहे हे मार्क करून घ्यावे. हे नीट समजून घेण्याचे कारण म्हणजे ह्रदयाचे ठोके ही ऑक्सिजनची पातळी समजून रुग्ण घाबरून जातात.
रीडिंग दाखवण्यासाठी किमान ३० सेकंद लागतात.
पल्स ऑक्सिमीटीर लावण्याआधी बोटे तळ हातावर चोळून गरम करून घ्यावे.

ऑक्सिजनची पातळी कमी दाखवत असेल तर ?
पल्स ऑक्सिमीटरचा वापर ऑक्सिजनची पातळी कमी दाखवली तरी दर वेळी ती बरोबर असेल असे नाही. व्यक्ती नॉर्मल , स्वस्थ असताना ही पातळी कमी दाखवण्याची खालील करणे असू शकतात –

  • मशीन बोटाला नीट लावलेले नसेल.
  • हाताला मेहेंदी / नखाला नेल पॉलीश लावलेले असेल.
  • हात थंड असतील.
  • शरीरात लिपीड – चरबीचे प्रमाण जास्त असणे.
  • नख मोठे असल्याने पल्सऑक्स बोटावर नीट न बसने.
  • खोलीतील जास्त प्रमाणात असलेला प्रकाश / सूर्यप्रकाश पल्सऑक्स च्या लाईटशी ढवळाढवळ करत असणे.
    म्हणून ऑक्सिजन कमी दाखवले तर लगेच घाबरून जाऊ नये व मशीन योग्य रित्या काम करते आहे का हे तपासून पहावे.

घरात प्रत्येकाने पल्सऑक्स विकत घ्यावे का ?
प्रत्येकाने घरोघरी विकत घेण्याची गरज नाही पण पूर्ण सोसायटीत सगळ्यांनी मिळून एखादे पल्सऑक्स किंवा काही कुटुंबांच्या ग्रुपने मिळून एखादे घेण्यास हरकत नाही. कारण सगळ्यांना हे एकाच वेळी लागणार नाही.

काहीही लक्षणे नसलेल्यांना प्रतिबंध म्हणून रोज पल्सऑक्सने ऑक्सिजनची पातळी तपासावी का ?
याची मुळीच गरज नाही आणि याचा वापर फक्त कोरोना संसर्ग झाल्यावरच करावा.

स्मार्टफोन मध्ये अॅप मध्ये ऑक्सिजनची पातळी मोजावी का ?
फोन मधील ऑक्सिजनची पातळी दाखवणारे अॅप हे सदोष आहेत व त्यामुळे चुकीची पातळी दाखवण्याचे प्रमाण आहे म्हणून शक्यतो हे अॅप वापरू नये .
एका पेक्षा जास्त जन वापरणार असेल तर पल्स ऑक्सिमीटीर सॅनिटायजरने क्लीन करून घ्यावे.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता