शाळा पूर्ण वेळ हव्यात

School should be full time

राज्यात शहरी भागात आठवी ते दहावी, तर ग्रामीण भागात पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्या असल्या तर हे जस उशिराने सुचलेले शहानपण आहे तसे अर्धवट शहाणपण ही आहे. दुसरी लाट ओसरल्यावर तीन महिन्यांपूर्वी  झालेल्या सिरो सर्वे ( एकूण बाधित झालेल्या लोकांचे सर्वेक्षण ) मध्ये ७० ते ८० % मुले बाधित झाल्याचे निष्कर्ष हाती आले. या आधारावर शाळा सुरु करण्याचे निर्देश आयसीएमआरने तेव्हाच दिले होते. उशीरा का होईना शाळा सुरु झाल्या पण या  धोरणात एका महत्वाच्या शास्त्रीय निरीक्षणाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो हे स्पष्ट झाले आहे पण या सोबत जितक कमी वय तितका संसर्ग अधिक सौम्य हे निरीक्षण ही महत्वाचे आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना आधी बालवाडी पासून ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहेत. पण नेमके हेच वर्ग व ज्या वयोगटाला सगळ्यात कमी धोका त्यांचेच वर्ग बंद ठेवण्याचे सध्याचे धोरण अनाकलनीय आहे. आता खर तर काही निश्चित मार्गदर्शक तत्वे अनुसरून शहरी व ग्रामीण असं कुठला ही भेदभाव न करता सरसकट राज्यातील सर्व शाळांचे सर्व वर्ग उघडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सरसकट सर्व शाळा उघडण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे संशोधनात हे आता सिद्ध झाले कि शाळे मुळे लहान मुलेच नव्हे तर त्यांच्या मुळे घरातील मोठ्या व्यक्तीना होण्यार्या संसार्गात अशी कुठलीही विशेष भर पडताना दिसत नाही. अनलॉक नंतर शाळा बंद असल्या तरी पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे , मॉल अशा सर्व गर्दीच्या ठिकणी लहान मुलांचा मुक्त संचार सुरु आहेच. तो मोठ्यांचा ही असल्याने त्यांना संसर्ग व्हायचाच तर याही ठिकाणी होऊ शकेल. म्हणून शाळा पूर्ण व सर्व वर्ग न उघडण्यासाठी घरातील ज्येष्ठांच्या संसर्गाचे कारण फसवे व वैद्यकीय दृष्ट्या न पटणारे आहे. तसेच अनेक ठिकाणी काही मुले शाळेत व काही ऑनलाईन अशी पद्धतीने शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना संपण्याचा मुहूर्त शोधत अर्धवट ऑनलाईन शिक्षण देणाऱ्यांनी आता एकदाचे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे पूर्ण विसर्जन करणे गरजेचे आहे.
            कुठले ही सार्वजनिक आरोग्याचे धोरण राबवताना त्याचे रिस्क – बेनीफिट रेशो तपासावे लागते. म्हणजेच शाळा बंद ठेवण्याची जोखीम विरुद्ध फायदा हा हिशोब मांडणे गरजेचे असते .  शाळेचे सर्व वर्ग व पूर्णवेळ सुरु होण्याचे व त्यातच प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु होण्याचे तोटे सध्या जास्त आहेत व लहान मुलांच्या मानसिक व शैक्षणिक आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. शाळेतील अक्षर ओळख हा पहिल्या ५ वर्षात फक्त शैक्षणिकच नव्हे तर मानसिक वाढीचा व शाळेत सवंगड्यांसोबत खेळणे , रमणे , जुळवून घेणे हा सामाजिक  वाढीचा महत्वाचा टप्पा असतो. सध्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या आयुष्यातून  हा टप्पा पूर्णपणे वगळला गेला असल्याने आता अजून त्याला उशीर करणे हे दिवसागणिक अधिक घातक ठरणार आहे. तसेच ही मुले शाळेत परततील तेव्हा त्यांच्या मानसिक जडणघडणी साठी विशेष व वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या दोन वर्षात ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये शाळा बंद असल्याने मानसिक समस्या , मानसिक कारणे असलेल्या शारीरिक समस्या ( सायको – सोमॅटीक आजार ) अति चंचलता, स्व मग्नता , टी व्ही व मोबाईल स्क्रीनचे व्यसन असे अनेक आजार कधी नव्हते एवढे वाढीस लागले आहेत. या पैकी कुठल्या ही आजारावर आम्हा बालरोगतज्ञांकडे निश्चित असे औषध नसले तरी शाळेचे सर्व वर्ग सुरु करणे हे यावर प्रभावी औषध ठरू शकते.
                जेवढा उत्साह शाळा सुरु करण्यासाठी गरजेचा आहे त्या पेक्षा दुप्पट उत्साह हा कोरोना प्रतिबंधाची मार्गदर्शक तत्वे तयार करून ती राबवण्यास आवश्यक आहे. जरी लहान मुलां मध्ये कोरोना सौम्य असला व त्यानंतर काही आठवड्यांनी होणाऱ्या एमआय एस्सी या काहीशा गंभीर गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी ही कोरोना प्रतिबंधाला शाळेत सर्वोच्च प्राधान्य द्यावेच लागणार आहे. कारण अशी एकही केस पालक व विद्यार्थ्यांचे मनोधर्य खच्ची करणारी ठरू शकते. या साठी शाळेत साधा सोपा कोरोना प्रतिबंधाचा ७ कलमी कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. १. सर्व मुलांना व शाळेतील शिक्षकांना  फ्लू चे लसीकरण अनिवार्य करावे २. शाळेतील सर्व शिक्षकांचे व सर्व मुलांच्या घरातील मोठ्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण झालेले असावे ३. मधल्या सुट्टीत मुलांना एकत्रित बसून न जेवण्याची सक्ती असावी 4. मुलांना मास्कच्या योग्य वापरा विषयी शिकवून शाळेत मास्कचा वापर अनिवार्य असावा ५. मुलाला सर्दी, खोकला, ताप असेल किंवा घरी कोणीही कोरोनाचा रुग्ण असेल तर त्याला १० दिवस शाळेत पाठवू नये ६. सर्व मुलांना विटामिन डी ६०,००० IU दर आठवड्याला या प्रमाणे ६ आठवडे विटामिन डी द्यावे ७. मुलांचे इंडियन अॅकॅडमी ऑफ पिडायट्रीक्स या बालरोगज्ञांच्या संघटनेने सुचवलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रका प्रमाणे सर्व लसीकरण पूर्ण झालेले असावे. ही तत्वे काटेकोरपणे पाळल्यास शाळेतून कोरोना संसर्गाचे प्रमाण शून्यावर येणे सहज शक्य आहे.
                अनेक वर्षां पासून राज्यात स्कूल हेल्थ प्रोग्राम म्हणजे शालेय आरोग्य कार्यक्रम हा केवळ कागदावरच अस्तितवात आहे. आता कोरोना साथीच्या युगात मात्र या कार्यक्रमाने कात टाकून , त्यात कोरोनाच्या दृष्टीने बदल करून तो राबवण्याची वेळ आली आहे. कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांचे निदान व उपचार हे शाळेतच शक्य आहेत. म्हणून आता शालेय आरोग्य केंद्र प्रत्येक शाळेने विकसित करून एका बालरोग तज्ञाला या कार्यक्रमात समावून घेतल्यास कोरोनाची भीती अजून कमी होण्यास मदत होईल. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तरी पालक मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत. पण शाळा पूर्णवेळ व सर्व वर्ग सुरु करायच्या असतील तर शाळाच नव्हे तर प्रशासन व पालक या दोन्ही घटकांनी भीती मनातून काढून टाकायल हवी.  आरोग्य शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी अनेक वर्षे होते आहे. कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य शिक्षणाचा समावेश अभ्यासक्रम करून चांगले आरोग्य संस्कार असलेली पिढी पुडे येईल.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com
www.amolannadate.com