दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी दमा हा दीर्घकालीन आजार असल्याने त्याचे उपचार सतत सुरू ठेवावे लागतात. आकुंचन पावलेला श्वसनमार्ग पूर्ववत होण्यासाठी, म्हणजे प्रसरण पावण्यासाठी पंपाद्वारे उपचार करण्यात येतात. हे उपचार दोन प्रकारचे असतात –
१) तातडीने श्‍वसन मार्ग प्रसरण पावण्यासाठी 
२) श्‍वसनमार्ग अंकुचित होऊ नये या साठी नियमित घेण्याचा पंप 
पंप घेतल्याने याची सवय लागेल या गैरसमजामुळे अनेक पालक हे टाळतात व त्यामुळे आजार बळावत जातो. मात्र, हे दोन प्रकारचे पंप हाच दम्यासाठी मुख्य उपचार असतो. यात श्वास वाढल्यावर ३ ते ५ दिवस घ्यायचा व नियमित घ्यायचा पंप कुठला, हे डॉक्टरांकडून समजून पंपावर लिहून घ्यावे. कारण बरेच रुग्ण वापरताना नेमके उलटे करतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

याशिवाय दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील काळजी घ्यावी 

  • थंड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम, चिकट-गोड पदार्थ, क्रीम बिस्कीट या गोष्टी पूर्ण टाळाव्या. 
  • आंबट, शिळे, फार तिखट व दाक्षिणात्य पदार्थ टाळावेत. 
  • दह्यापेक्षा पातळ ताक देण्यास हरकत नाही. 
  • सर्दी/दमा वाढलेला असताना डोक्यावरून अंघोळ टाळावी. खांद्याच्या खाली अंघोळ करावी व डोके ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. 
  • गार हवेत व समुद्रकिनाऱ्यासारखे वारे घोंगावते अशी ठिकाणे टाळावीत. 
  • प्रवासात खिडकी उघडी ठेवून बसू नये, रेल्वेमध्ये पंख्याखाली बसू नये, कारण वाऱ्याच्या झोताने दमा वाढतो. 
  • अशा मुलांचा घरात व बाहेर प्राण्यांशी संपर्क टाळावा. 

घरात घ्यायची काळजी 

  • डास विरोधी अगरबत्ती/इलेक्ट्रिक लिक्विड रेपेलंटऐवजी मच्छरदाणी वापरावी. 
  • घरात कोणीही धुम्रपान करू नये. 
  • हिवाळ्यात बरेच दिवस ठेवलेले वुलन कपडे आधी दोन दिवस उन्हात ठेवावेत व मगच वापरायला घ्यावेत. 
  • घर स्वच्छ करत असताना झाडू नये, ओल्या कपड्याने थेट पुसावे. 
  • बेडशीट व उशीचे कव्हर नियमित बदलावे व धुतलेले वापरावे. 
  • शक्यतो पांघरण्यासाठी वुलन चादरी वापरू नये. 
  • अंथरूण किंवा इतर गोष्टी घराऐवजी बाहेर मोकळ्या हवेत झटकाव्यात. 
  • घरात झुरळ असू नये याची काळजी घ्यावी. 
  • संध्याकाळच्या वेळेला दार, खिडक्या बंद ठेवाव्यात. 

इतर काळजी  

  • त्रास नसला तरी दर ४ महिन्यांनी डॉक्टरला दाखवावे. 
  • दर वर्षी फ्लूची लस घ्यावी 
  • दमा डायरी लिहावी व कुठल्या गोष्टीने त्रास झाला याची नोंद ठेवून डॉक्टरांना दाखवावी. 

दमा बरा होतो का

  • दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी नेहमी उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात नक्कीच राहू शकतो. 
  • लक्षणे १ वर्षाच्या आत सुरू झाल्यास ९० टक्के मुले बरी होतात. 
  • ३ वर्षात लक्षणे सुरू झाल्यास ८० टक्के मुले बरी होतात व ३ वर्षानंतर सुरू झाल्यास ७० टक्के मुले बरी होतात. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये फुफ्फुसाची क्षमता कशी आहे, यावर कुमारवयापर्यंत बरी होणार की पुढे प्रौढपणी ही दम्याचे रुग्ण असतील हे ठरते. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.