चक्रव्यूहातले अभिमन्यू – डॉ. अमोल अन्नदाते

दैनिक दिव्य मराठी रसिक 

         
  *चक्रव्यूहातले अभिमन्यू* *डॉ. अमोल अन्नदाते* 


गेल्या ८ महिन्यात कोट्यामध्ये नीट – जेईईच्या तयारी साठी गेलेल्या २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही वर्षात प्रवेश परीक्षांच्या ओझ्याखाली दबून नैराश्यग्रस्त होऊन प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे व दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. जेव्हा कोरोना, गॅस्ट्रो सारख्या संसर्गजन्य आजारांच्या साथी येतात तेव्हा यंत्रणा जागी होते, माध्यमे रान उठवतात व लसीकरणाच्या मोहिमा देशभर राबवल्या जातात कारण या समस्या दृश्य स्वरूपात दिसत असतात .पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या व नैराश्य यांचा संसर्गही तेवढाच गंभीर व जीवघेणा असतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यावरचे मानसिक लसीकरण व आयुष्याचा खरा आनंद , ध्येय , जगण्याचे अन्य उद्देश शोधण्याची दृष्टी माञ कुठलेच क्लास देत नाही.  आपल्या मुलाला शैक्षणिक स्पर्धेत उतरवताना  मुलांना मानसिक स्थैर्याची लस टोचनारे नि तो यशस्वी होवो अथवा न होवो  पण आधी तो जगला पाहिजे एवढी जाणीव असणारे पालक तयार होणे ही आजची सर्वात महत्वाची निकड आहे. 


 वर्गात साधारण पहिल्या दहा मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकडून  पालक शिक्षक , समाज सगळ्यांच्याच अपेक्षा असणे सहाजिक असते. या शैक्षणिक दृष्ट्या हुशार विद्यर्थ्याना त्यांच्या स्वतः कडून असणार्या अपेक्षा व इतरांना त्यांच्या कडून असणार्या अपेक्षा पेलत दोरीवर चालण्याची कसरत ही अगदी चौथी , पाचवी पासून करावी लागते. ३० मुलांचा वर्ग गृहीत धरला तर १० ते २० म्हणजे मधल्या फळीतील विद्यार्थ्यांणा कधीच फारसे टेन्शन असते. त्यांना पहिले  येऊन पुढे सरकण्याचा ही ताण नसतो व मागे घसरून फारसे काही बिघडणार नसते.  पण त्या 10 मध्ये असलेल्या व वर्षानुवर्षे शालेय व उच्च माध्यमिक  स्पर्धेतून बर्यापैकी यशस्वी होणार्या विद्यार्थ्यांची मोठी मानसिक फसगत होते व पालक, शिक्षक व समाज त्याला अजाणतेपणाने याला हातभार लावतो कारण तो ही त्याच मानसिकतेत जगत असतो. ती फसगत अशी कि आयुष्याचा आनंद व आंतरिक समाधानाला ही मुले आयुष्यातील काहीतरी कामगिरी, उपलब्धी  किंवा यशाशी जोडू लागतात. न्युरो प्लास्टीसिटी म्हणजे सवयी प्रमाणे किंवा वारंवार एखादी गोष्ट करून वळणे व वाकणे हा  मानवी मेंदूचा एक मोठा गुण हा जो त्याला इतर प्राण्यांपासून वेगळा ठरवतो. म्हणून सतत काहीतरी मिळवणारे विद्यार्थी व व्यक्ती यांच्या मेंदूला कामगिरी , यश एवढे एका व एकाच आनंदाच्या साधनाला मन व त्यामागे  मेंदू सरावतो. यात काही गैर नाही व असा कामगिरीचा ध्यास राहिला  नाही तर जग रहाटीच चालणार नाही. पण कामगिरीच नाही तर आनंदच नाही व मग माझे अस्तित्वच कशा साठी हा प्रश्न मनाला पडणे गैर आहे. चांगली कामगिरी व शैक्षणिक  यश हे आनंदाचे एक साधन असले तरी इतर अशी अनेक साधने आहेत ज्यातून तीच भावना किंवा त्याही पेक्षा मोठ्या आनंदाची भावना निर्माण होते ही सवयच मेंदूला राहत नाही. तसेच law of Averages म्हणजे सरासरीचा नियम सांगतो कि तुम्ही प्रत्येक परीक्षेत तसेच आणि तेवढेच यश मिळवू शकत नाही. चांगल्यात चांगला खेळाडू ही प्रत्येक चेंडूवर चौकार , षटकारा मारू शकत नाही. कधी तरी तो शून्यावर ही बाद होतो. नीट – जीईई साठी कोटाच नव्हे तर इतर शहरात कोचिंगच्या कारखान्यात जाणारे विद्यार्थी नेमक्या अशाच कामगिरीच्या दडपणाखाली (performance pressure) असतात. नीट जेईई ला जाणारी मुले ही सतत शैक्षणिक यश मिळवलेली हुशार मुले असतात. आता सर्वात महत्वाची म्हणून समजली जाणार्या परीक्षेच्या एका दिवसासाठी त्यांची तयारी सुरु असते. मुळात ही परीक्षा काही प्रमाणात  त्यांच्या आयुष्याची व्यावसायिक व आर्थिक दिशा ठरवणारी असली तरी ती काही त्यांच्या आयुष्याची अंतिम दिशा व सर्वात महत्वाचे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे , आंतरिक समाधानाचा शेवटचा निकाल लावणारी परीक्षा मुळीच नसते. पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन होत नसल्याने त्यांना या सत्याची उकल होत नाही. परिणामी  कोचिंग सुरु असतानाचे छोटेसे अपयश ही विद्यर्थ्याना मानसिक दृष्ट्या सहन होत नाही. त्यासाठी अशा तीव्र स्वरूपाचे कोचिंग सुरु करण्याअगोदर एक आठवडा पालक व विद्यार्थ्यांचे मानसिक प्रशिक्षण आवश्यक आहे. नापास होणार्या किंवा मधल्या फळीतील विद्यार्थ्यांना अपयशाचे काहीच वाटत नसते कारण असे समजाच्या दृष्टीने अपयश समजली जाणारी गोष्ट अनुभवतच तो मोठा झालेला असतो. त्याचेच कारण असते कि तो जास्त जोखीम उचलतो व पुढे मोठे व्यावसायिक यश मिळवतो. पण हुशार विद्यार्थ्यांना व प्रवेश परीक्षे साठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यासाठी विशेष मानसिक जडण घडण मुद्दामून करावी लागते. याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करावी लागते.              

मानसिक स्वास्थ्यासोबतच Resilance म्हणजेच मानसिक लवचीकपणाला मानस शास्त्रात खूप महत्व असते. एकदा पडल्यावर तुम्ही परत किती वेगाने उठून परत चालू लागता तसे तणावाच्या स्थितीत परत उसळी घेऊन मन पूर्ववत होऊ शकते याला resilance असे म्हणतात. सैन्य व खेळा मध्ये याचे प्रशिक्षण आवर्जून दिले जाते. स्वतः जखमी असलो तरी  गोळी लागलेल्या सहकाऱ्याला उचलून धावायचे कसे याचे विशेष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक  सैन्यात दिले जाते. स्पोर्ट्स सायकॉलोंजी मध्ये हरलो तर काय ? यावर भर दिला जातो. आज शैक्षणिक स्पर्धा इतकी वाढली आहे कि त्यासाठी शैक्षणिक स्पर्धे साठीचे मानसशास्त्र गरजेचे झाले आहे. या साठी पालकांनाच कंबर कसून दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या उदाहरणातून मुलांच्या मनाची व मेंदूची जडण घडण करावी लागेल. गुणवत्तेचा उत्तमतेचा  ध्यास गैर नाही. तो हवाच. त्याशिवाय गुणवत्तापूर्ण गोष्टी निर्माण कशा होणार ? पण या गुणवत्तेचा अट्टहास , दुराग्रह व त्यासाठी आपले अस्तित्व पणाला लावण्या इतपत ही ते महत्वाचे नाही हा समतोल महत्वाचा आहे. शैक्षणिक गुणवत्ता व नीट जेईई चा रँक हा आनंदाचे एक साधन आहे पण ते नसले  तरी केवळ आपले अस्तित्व हे ही आपल्या समाधानी ठेवण्यास पुरे आहे हा विचार विद्यार्थ्यांमध्ये खोलवर रुजवणे आवश्यक  आहे.                      

 मानवी मन व शरीर हे प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आहे. त्यामुळे धोका ओळखून त्यावर काही सेकंदात शरीरिक क्रिया करणारा अमिगडेला हा भाग मानवी मेंदूत प्राण्यांसारखा सक्रिय आहे. बर्याचदा हा धोका काल्पनिक असतो पण शरीर मात्र अतिरेकी प्रतिसाद देते. परीक्षेतील अपयशाची भीती व त्यातून घडणाऱ्या क्रिया  मेंदूच्या या  सर्किट मधून घडतात. पण मानवी मनाला एक वरदान ही मिळाले आहे. ते म्हणजे सारासार विचार करणारा फ्रंटल लोब. धोक्याचा व तणावाचा विचार मनात आला कि १० सेकंद ही थांबले तरी सरासर विचार करणारा फ्रंटल लोब ताबा घेतो व तुम्हाला शांत करतो. त्यातून तुम्ही योग्य rational व सद्सद्विवेक बुद्धीने वागून तणावावर मात करता. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना माइंडफुलनेस म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून सारासार विचार शक्ती विकसित करण्याचे प्रशिक्षण व सवय लावणे आवश्यक आहे.  एक तर गत काळात किंवा भविष्यात सतत रेंगाळणाऱ्या मनाला आताच्या क्षणात आणणे हा सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे.  


प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरले आहे. लौकिक यशासाठी आपण मुलांना या चक्रव्यूहात पाठवतो खरे पण ते मिळाले नाही तर त्यातून बाहेर कसे पडायचे हे शिकवत नाही. किंबहुना ते आपल्यालाही माहित नसते. परिणामी आप्तांच्या अपेक्षांची अन बाहेरच्यांच्या नजरांशी लढता लढता आतलं बळ संपत नी दुर्दैवाने त्यातच अनेकांचा आत्मघात होतो. पालक नातेवाईक आणि समाज म्हणून अशा चक्रव्यूहात मुलांना पाठवून त्यांचे आयुष्य पणाला लावण आपण थांबवणार आहोत की नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.                       

 *डॉ. अमोल अन्नदाते* 

*dramolaannadate@gmail.com*

*www.amolannadate.com**

Mo.No. 9421516551*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *