अमेरिका, जपान, सिंगापूरसह इतर २० देशांनी काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने १२ वर्षांपुढील कुमारवयीन मुलांचा समावेश असला तरी या देशांमध्ये २ वर्षांच्या पुढच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. फायजरसारख्या लसींच्या इतर देशांतील लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्या असल्या तरी भारतात या ट्रायल्स अजूनही सुरू आहेत. भारतातील पालक लहान मुलांसाठी कोरोना लस कधी उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा साहजिक असली तरी सहज करता येतील व उपलब्ध आहेत त्या गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या राहून गेल्या आहेत. जी लस उपलब्ध आहे ती फक्त शास्त्रीय प्रयोग पूर्ण झालेले नाहीत म्हणून लहान मुलांना देता येत नाही. अशा लसीला ‘ऑर्फन व्हॅक्सिन’ किंवा ‘अनाथ लस’ असे म्हणतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तिन्ही लसी अशाच लहान मुलांसाठी अनाथ ठरत आहेत.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या लहान मुलांमधील शास्त्रीय प्रयोगांचा आढावा घ्यायचा झाल्यास फायजर, मॉडर्ना व सायनोफार्म या तीन लसींचे १२ ते १८ वर्षे वयोगटात प्रयोग यशस्वी झाले असून, त्यांची लहान मुलांमधील परिणामकारकता व सुरक्षितता ही मोठ्या व्यक्तींमध्ये आहे तेवढीच असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायलमध्ये तर फायजर लसीचे प्रयोग हे ६ महिने ते १८ वर्षे या वयोगटात सुरू आहेत. म्हणूनच २० देशांत १२ वर्षांच्या पुढे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फायजरचे लहान मुलांसाठी ६ महिने वयाच्या पुढे प्रयोग शेवटच्या टप्प्यात आहेत व लवकरच पूर्ण होणार असल्याने तीही लस सर्वच लहान मुलांसाठी वापरता येईल, असे सांगितले जाते आहे.
भारतात सध्या ३ वर्षे ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीच्या वापराच्या प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरा भाग नागपूर येथे सुरू आहे. यात मुलांना दुसरा डोस देऊन एक महिना झाला आहे. या प्रयोगाचे अधिकृत निकाल अजून जाहीर झाले नसले तरी या प्रयोगात सहभागी डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे अजून कुठल्याही मुलावर कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. तसेच पहिल्या डोसनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी समाधानकारक आढळून आली आहे. हा अभ्यास पूर्ण होऊन त्याचे अंतिम निष्कर्ष जाहीर होण्यास तीन ते चार महिने व ते प्रकाशित होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता आहे.
कोविशिल्डच्या लहान मुलांमधील ट्रायल्स इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव त्या थांबविण्यात आल्या. स्पुतनिक या लसीच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स अजून कुठेही सुरू झालेल्या नाहीत.
– म्हणजे सध्या फक्त कोव्हॅक्सिनकडूनच लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. पण, या लसीचे उत्पादन खूप कमी आहे व ते अजून मोठ्या व्यक्तींनाच पुरेनासे झाले आहे.
हान मुलांमध्ये कोरोनाचा आजार खूप सौम्य आहे म्हणून लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असा केंद्र सरकारचा होरा आहे. लहान मुलांमध्ये आजार सौम्य असला तरी १५ वर्षांपुढील मुलांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत आढळून आली आहे. तसेच इतर सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यावर चार ते सहा आठवड्यांनी एमआयएससी ही जीवघेणी गुंतागुंत दिसून येत आहे. मुलांमध्ये कोरोना व त्यानंतर गुंतागुंतीत मृत्युदर कमी असला तरी तो शून्य नाही. तसेच लहान मुले लक्षणविरहित व सौम्य असल्याने घरातील इतर ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वांत मोठे स्रोत (सुपर स्प्रेडर) ठरतात.
हर्ड इम्युनिटी (समूह / कळप प्रतिकारशक्ती)साठी देशातील ७० ते ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हावे लागते. देशात ० ते १४ या वयोगटात ३५.३ % व १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ४१ % लोकसंख्या आहे. या ४१ % लोकसंख्येच्या लसीकरणासाठी घाई न करता हर्ड इम्युनिटीचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे.
‘सर्व जण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही’ हे कोरोना लसीकरणाचे मुख्य सूत्र आहे. या ‘सर्व जण’चा महत्त्वाचा घटक असलेल्या लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबतच्या हालचालींचा अत्यंत संथ वेग कोरोनाविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.
सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.