सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते ? – डॉ. अमोल अन्नदाते

Dr amol annadate artical

दैनिक लोकमत

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते ?

डॉ. अमोल अन्नदाते

         गेल्या अनेक वर्षांपासून स्वाईन फ्लू पासून कोरोना पर्यंत व आता आताच्या झिका , चंदीपुरा अशा अनेक विषाणूंच्या साथी सुरूच आहेत. अनेक संसर्गजन्य आजार हे अधून मधून थोड्या फार फारकत प्रत्येकाला होत असतात. पण साथ पसरते तेव्हा तसे नसते. मानव जातीने आजवर प्लेग, फ्लू , कोलेरा , कोरोना अशा जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम केलेल्या महा साथी अनुभवल्या. मानवी जिवाला असलेला धोका लक्षात घेता या साथींची तुलना महायुद्धशीच होऊ शकते. पण हे युद्ध फक्त रुग्णालयातच लढले जात असल्याने त्याची तीव्रता कोणच्याही लक्षात येत नाही. युद्धात जसा देश बेचीरख होऊ शकतो तसा साथीत ही होऊ शकतो. आज ही कोरोनाच्या दुसर्या लाटेची आठवण निघाली तर अंगावर काटा येतो. कोरोना साथीत प्रत्येक व्यक्तीची जवळची तीन तरी व्यक्ती दगावल्याचे एका क्षणात सहज आठवेल. पण तरीही कोरोनाच्या साथीत आपण जे शिकलो ते सगळे स्मशान वैराग्यच ठरले. वेगाने मानवतेवर आदळणार्या साथी पाहता साथींचे शास्त्र हे फक्त डॉक्टरच नव्हे तर सर्व सामन्य लोक व धोरण आखणाऱ्या , राबवणाऱ्या प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे. 

                         साथ कुठलीही असो त्याची काही वैशिष्ट्ये असतात. साथ ही न सांगता कधी येत नाही. ती धोक्याची घंटा आधी वाजवते. भारतात कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच चीन व इतर अनेक देशात ती हाहाकार माजवत असल्याचे अक्खे विश्व पहात होते. साथीत सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट असते कमी वेळेत खूप मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होऊन अपुर्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण येणे. भारतात साथीं मध्ये आधीच मोडकळीला आलेल्या सार्वजनिक व्यवस्थे अजून अधिक ताणली जाणे ही  सर्वात मोठी समस्या असते. साथी टाळण्याचे उपाय हे अत्यंत साधे व आरोग्याच्या साध्या नियमांशी निगडीत असतात. साथी कमी होतात , पण पूर्णतः कधीही संपत नाहीत.  पण गरज सरो वैद्य मरो या वृत्ती प्रमाणे साथीची दाहकता कमी झाली कि सर्व यंत्रणा परत उपाय योजनांच्या बाबतीत सुस्त होते. १९६८ साली साधा सर्दी खोकला म्हणजे फ्लू ची साथ येऊन प्रत्येकाला तो होऊन गेला . पण आज ही जगभरात 7 लाख लोक साध्या फ्लू मुळे मृत्यू मुखी पडतात व यात भारतात ही ५ वर्षां खाली व ६५ वर्षां पुढे अनेक जणांचा फ्लू मुळे मृत्यू होतो. फ्लू टाळणारी उतम लस उपलब्ध असून ही कोणी पैसे खर्च करून ही लस घेत नाही व सार्वजनिक आरोग्य सेवेत ही लस मोफत मिळणे दिवा स्वप्नच आहे.कोरनाची साथ वेगळी होती कारण विषाणू बद्दल व उपाययोजना , उपचारांबद्दल फारशी माहिती नव्हती. पण डेंग्यू , चिकनगुनिया , झिका, फ्लू, न्युमोनिया अशा अनेक साथी आहेत ज्यांच्या उपाययोजना वर्षनुवर्षे माहित आहेत व सिध्द झाल्या आहेत.

               साथींचे प्रमाण वाढते आहे व अनेक नवे विषाणू किंवा आधी फारशे घातक नसलेले विषाणू हे डोके वर काढत आहेत . विषाणू हा सतत स्वतः मध्ये बदल घडवत असतो. ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ हा डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जसा मानवाला लागू आहे तसाच साथ पसरवणाऱ्या विषाणू , जीवाणूंना ही लागू आहे. म्हणून संक्रमित होऊन मानवावर मात करण्यासाठी विषाणू , जीवाणू ही झटत असतात.हवामानात होणारे टोकाचे बदल हे विषाणूंच्या संक्रमणासाठी एक महत्वाचे कारण आहे. २०२४ मधील उन्हाळा हा गेल्या कित्येक वर्षातील तापमानाचा उच्चांक गाठणारा ठरला. पावसाळा आधी सारखा राहिलेला नसून कमी वेळेत ढगफुटी सदृश पाउस पडतो. त्यामुळे साचलेल्या पाण्याचे प्रमाण वाढते. हवामानातील हे सगळे बदल विषाणूंना त्यांच्यात संक्रमण घडवून नव्या साथीच्या रुपात येण्यास पोषक आहेत.  
                   जीवनशैलीतील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती व आहारातील बदल हे साथी आल्यावर जीवितहानी वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच भारता विषयी एक निरीक्षण नोंदवले कि भारतातील ५० % लोक दिवसाच्या किमान हालचालींची गरज पूर्ण करत नाहीत. व्यायाम , हालचालींचा अभाव तुमची प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत असतात  व त्यातून साथीं मधले सोपे सावज निर्माण होतात  . भारतीय आहारत कर्बोदकांचे प्रमाण जास्त व प्रथिनांचे प्रमाण कमी आहे. तसेच भाज्या , फळे यांचा दर्जा घसरल्याने मायक्रोन्युट्रीयंटचे प्रमाण कमी असते.  अधिक साखर व मीठ असलेल्या साठवलेल्या आहाराचे ( अल्ट्रा प्रोसेस्ड फूड ) प्रमाण हे वाढत चालले आहे. प्रत्येक चौकात असलेली परदेशी फास्ट फूड आउटलेट्स हे लठ्ठपणा , मधुमेह , उच्च रक्तदाबाची ब्रंड अॅम्बॅसीडर आहेत. हे सगळे आजार प्रतिकारशक्तीचा बळी घेणारे आहेत. वाघ जेव्हा हरणाच्या कळपाची शिकार करतो तेव्हा त्यातील कमकुवत मागे राहून शिकार होतात. साथी मध्ये शिकार होणारे असे कमकुवत प्रतिकारशक्ती व सह आजार असलेले असतात. नियमित येणाऱ्या साथी ही मानवाच्या आरोग्याची वार्षिक परीक्षा असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आरोग्याची मुलभूत तत्वे हाच मुख्य अभ्यासक्रम आहे. 

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट दारात उभा… आता?

Corona's new Omicron variant standing in the doorway ... nowCorona's new Omicron variant standing in the doorway ... now

२६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या संक्रमित प्रजातीला ‘व्हेरिअंट ऑफ कन्सर्न’ म्हणजे नोंद घेण्याजोगी प्रजाती म्हणून जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका व युरोपसह नऊ  देशांमध्ये सध्या या नव्या प्रजातीमुळे नव्याने कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळण्यास सुरुवात झाली आहे. भारतात पहिली लाट ओसरल्यावर कोरोना संपल्याचा उत्सव सुरु होता, तेव्हा डेल्टाचे रुग्ण अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये आढळण्यास सुरुवात झाली व त्यावेळच्या गाफीलतेतून मार्च महिन्यात भारतात दुसरी लाट आली.  आता भारतात काळजी वाऱ्यावर सोडून दिलेली असताना  हा ओमिक्रॉन व्हेरिअंट आला आहे.

कोरोनामध्ये अशी संक्रमणे अपेक्षित असली, तरी ओमिक्रॉनच्या संक्रमणामध्ये काहीसा वेगळेपणा आहे. अल्फा व डेल्टा ही भावंडं निर्माण झाली तेव्हा कोरोना विषाणूमध्ये दोन ते तीन ठिकाणी जनुकीय बदल झाले होते. पण ओमिक्रॉन मध्ये तब्बल ३० ठिकाणी अशी म्युटेशन्स झाली आहेत. त्यामुळे हे संक्रमण आधीपेक्षा जनुकीयदृष्ट्या जास्त घातक आहे. अशा संक्रमणामुळे एक तर विषाणू जास्त लोकांना संक्रमित करण्यास सक्षम होतो आणि लसवंत व्यक्तिलाही संसर्गित करू शकतो. अर्थात, असे होईलच, असेही नाही. कारण संक्रमण घातक ठरेल की, विषाणूला माघार घ्यावी लागेल, हे मानव समूह म्हणून त्याला कसा प्रतिसाद देतो व सार्वजनिक आरोग्याची त्या विरोधात धोरणे कशी असतात, यावरून ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अर्धवट लोकसंख्येला कोरोना संसर्गामुळे मिळालेली अर्धवट प्रतिकारशक्ती व अजून सर्व लोकसंख्येचे न झालेले लसीकरण अशा सामूहिक प्रतिकारशक्तीची ‘ ना घर का, ना घाट का’ स्थिती ओमिक्रॉनच्या आक्रमणासाठी एक आदर्श स्थिती आहे. आज देशात केवळ ३१ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. २६ टक्के लोकांनी एक डोस घेतला असून, दुसरा डोस घेणे बाकी आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांपैकी १०० दशलक्ष भारतीयांनी दुसऱ्या डोसची वेळ येऊनही हा डोस घेतलेला नाही. दुसऱ्या डोसची वाट पाहणारे व तारीख उलटूनही न घेणारे हे दोन गट भारताला ओमिक्रॉनच्या तोंडी  देऊ शकतात. अजून लसीकरणच न झालेले ४३ टक्के भारतीय हे तर ओमिक्रॉनसाठी सर्वात सोपे सावज!

संक्रमण कुठलेही व कितीही घातक असो पूर्ण लसीकृत देश हेच त्याला उत्तर असणार आहे. म्हणून लसीकरणाची गती अजून वाढवणे, मुदत उलटून गेलेल्यांना शोधून तो देणे व पहिला डोस झालेल्यांना त्याच तारखेला डोस देणे, यासाठी तीन पातळ्यांवर काम करणारे आरोग्य सेवकांचे गट व स्वतंत्र कृती आराखडे तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय दुसरा डोस घेऊन सहा महिने होऊन गेलेल्यांना तिसरा बुस्टर डोस देण्याच्या निर्णयालाही काहीसा उशीर होतो आहे. जगात ३६ देशांमध्ये तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ६०पेक्षा जास्त वय असलेले, इतर आजार असलेले व पहिल्या फळीत काम करणारे आरोग्यसेवक या तीन गटांना बुस्टर डोसचा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा. ओमिक्रॉनचे अस्तित्व असलेल्या सर्व देशातून भारतात येणाऱ्या लोकांना १४ दिवस ठराविक ठिकाणी (गृह नाही) विलगीकरण, तपासणी अनिवार्य करणे गरजेचे आहे.  कोरोना रुग्णांचे जनुकीय वर्गीकरण वाढवून त्यात ओमिक्रॉन आढळतो का, याची सतत चाचपणी आवश्यक आहे. एवढे नुकसान झाले तरीही, मास्क, हात, धुणे व शारीरिक अंतर  या तीन मूलभूत गोष्टी जीवनशैलीचा भाग बनवण्यास आपण तयार नाही. ओमिक्रॉन अजून किती घातक ठरेल, हे काळच ठरवेल. पण त्यादृष्टीने आरोग्य सुविधांची तत्परता, बंद केलेले कोविड सेंटर्स कधीही सुरु करता येतील, अशी तयारी व औषधांचा पुरेसा साठा या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरी लाट येण्याआधीची गाफीलता व दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या चुका टाळून ओमिक्रॉनचा मुकाबला करावा लागेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते