कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

देशभरातील व राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुढील काही काळ न घाबरता सतर्क मात्र राहावे लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे, पण या उपायांच्या प्रचारापलीकडे आता शासनालाही महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. आता पर्यंत परदेशातील ज्या देशांनी कोरोनाचा सामना केला त्यात सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशातील कोरोनाच्या उपायांचे प्रारूप हे सध्या आदर्श व अभ्यासण्याजोगे आहे. खरेतर आपण ही तयारी चीन मधून इतर देशांत साथ पसरली तेव्हाच करायला हवी होती. कोरिया आणि सिंगापूर या देशांनी पहिला रूग्ण निश्चित होण्याअगोदरच प्रत्येक शहरात स्क्रीनिंग व निदान करण्यासाठी मुबलक प्रमाणात डायग्नोस्टीक किट्स उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर ट्रॅवल थ्रू म्हणजे गाड्या थांबतात तिथेही तुम्हाला तातडीने करोनाची चाचणी करण्याची सोय होती.

कोरोना प्रतिबंध आणि शासन- आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच गाळात असताना एवढी मोठी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण सध्या असलेली कोरोना तपासणी केंद्रे आणि आयसोलेशन वॉर्ड्स कमी पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबई शहरासाठी कस्तुरबा रूग्णालयातील ५८ खाटा व इतर ३० खाटाही खूपच कमी आहेत. राज्यात ३९ ठिकाणी असलेले आयसोलेशन कक्ष ही अपुरे आहे व संख्या वाढवण्याची गरज आहे, कारण कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढू शकते. आयसोलेशन वॉर्ड नेमका कसा असला पाहिजे याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही गरजेचा आहे. अगदीच प्रत्येक वॉर्ड वातानुकुलीत असण्याच्या आदर्श व्यवस्थेची अपेक्षा आधीच मोडकळीला आलेल्या आणि अनेक आजारांचा ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेकडून करता येणार नाही. पण किमान दोन बेड मधील १ मीटरचे अंतर , दोन बेड मध्ये पार्टीशन नाही तर किमान स्क्रीनने त्यांचे विलगीकरण, प्रत्येक रुग्णाला तपासताना डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळे प्रतिबंधक साहित्य, रुग्णाचा केसपेपर वॉर्डच्या बाहेर ठेवणे या प्राथमिक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब होणे आवश्यक आहे. तसेच या आयसोलेशन वॉर्ड मध्ये कार्यरत असणाऱ्यांचे या विषयी प्रशिक्षणही गरजेचे आहे. ज्यांचे निदान निश्चित झाले आहे त्यांच्यासाठी आयसोलेशन व ज्यांचा अशा रुग्णांशी संपर्क आलाय पण अजून काही त्रास नाही व निदानही निश्चित नाही अशांसाठी विलगीकरणाचाही (क्वारनटाइन) गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आयसोलेशन व क्वारानटाइन या दोन्हीसाठी एकच वॉर्डच नव्हे तर एकच रुग्णालय वापरणेही घातक ठरू शकते. ‘होम क्वारनटाइन’ म्हणजे संपर्क असलेल्यांनी घरीच थांबा हे सांगितले जात असले तरी यावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणून साथ पसरण्याआधीच विलगीकरणासाठी वेगळी समांतर यंत्रणा निर्माण करता येते का याचा विचार होणे गरजेचे आहे. आयसोलेशन किती दिवसांसाठी आवश्यक आहे यावरही तज्ज्ञांचे मत घेऊन शासनाने निर्णय घ्यायला हवा. परदेशातील अभ्यासानुसार कोरोनाचे रुग्ण श्वासाद्वारे ३० दिवसांपर्यंत आणी सरासरी २० दिवसांपर्यंत विषाणू सोडत होते. सध्या आयसोलेशन १४ दिवसांचे आहे ते २० दिवसांचे तरी करायला हवे. हे सगळे आता साथीच्या सुरुवातीच्या पातळीवरच गरजेचे व शक्यही आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना प्रतिबंध आणि शासन -किती रूग्ण सापडेस्तोवर नेमक्या कुठल्या उपाय योजनांना प्राधान्य व भर द्यायचा या विषयी शासन सध्या गोंधळून गेलेले दिसते आहे. दक्षिण कोरियाने ‘स्क्रीन, टेस्ट, ट्रीट आणि आयसोलेट’ या चार गोष्टींवर एक महिना पूर्ण भर दिला व देशातील आधीच सज्ज असलेल्या आरोग्य यंत्रणेने एका दिवसात २५,००० तपासण्या आणि किमान ६ व कमाल २४ तासात टेस्टचा रिपोर्ट हा नियम पाळला. आज महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच तपासणीची सोय आहे, उद्या ग्रामीण भागात ही साथ पसरली तर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसोलेशनसाठी नेमके कुठे पाठवायचे याची निट माहिती कोणालाही नाही. तालुका पातळीवर जिथे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे आयसोलेशन वॉर्ड व किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त तपासणी करून निदान निश्चित करण्याची सोय करण्याची हीच वेळ आहे. साथ पसरली तर सगळ्यात मोठी समस्या ही असेल की सर्दी , खोकला , ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाला मला कोरोना झालाय का हे तपासून पाहण्याचा आग्रह होणार आहे. यासाठी सर्वसामान्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की सर्दी खोकला म्हणजे प्रत्येकवेळी कोरोना असेल असे नव्हे. कोरोना मध्ये सर्दी हे मुख्य लक्षण नसून कोरडा खोकला , ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही मुख्य लक्षणे आहेत. ज्यांचा कोरोनाबाधित रुग्णाशी थेट संपर्क आला आहे आणि ज्यांनी कोरोनाची साथ असलेल्या देशात १ जानेवारी नंतर प्रवास केला आहे त्यांनाच चाचणीची गरज आहे. कोणाची चाचणी करायची हे ठरवण्यासाठी तालुकानिहाय लक्षणांचे स्क्रीनिंग केंद्र उभारणे गरजेचे ठरू शकते. सध्या कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात आम्ही बळजबरीने लोकांना आयसोलेट किमवा क्वारनटाइन करू असे विधान आरोग्य मंत्री किंवा अन्य कुठल्याही मंत्र्यांनी करणे लोकांमध्ये अजून घबराट पसरवणारे ठरेल. चीनमध्ये अशा बळजबरीमुळे भयभीत होऊन लोक पुढे आले नाहीत व त्याचा साथीचे नियंत्रण करण्यावर अनिष्ट परिणाम झाला. त्यापेक्षा, ‘त्रास होत असल्यास व कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला असल्यास तुम्ही बिनदिक्कत पुढे या, आम्ही तुमची काळजी घेऊ’ हे वारंवार सौम्यपणे शासनाने सांगावे. नागरिकांनीही आयसोलेशनला मुळीच घाबरू नये, कारण शासन हे आपल्या व इतरांच्या भल्यासाठीच करते आहे. या आजारावर उपचार नाही अशी सरसकट विधाने केली जात आहेत. हा आजार व्हायरल असल्याने तो इतर व्हायरल आजारांसारखा आपोआप वेळेत बरा होणारा आहे. ज्या केसेस गंभीर होतील त्यांच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत व त्यासाठी काही औषधे यशस्वीरित्या वापरली गेली आहेत. औषध नाही असा टाहो फोडण्यापेक्षा, बाधा झालेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन, इनविट्रो क्लिनिकल ट्रायल ( रुग्णांवर नव्हे! ) का सुरु करत नाहीत? सध्या मास्कचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, परंतु अशा स्थितीत मास्क हा धो धो पावसातील छोट्या छत्रीसारखा कुचकामी आहे. मास्क हा निरोगी व्यक्तीला इतरांनाकडून संसर्ग होऊ नये या साठी नसून आजारी व्यक्तीकडून तो इतरांना होऊ नये यासाठी असतो. मास्कची जागा खरे तर ‘हात धुण्याने’ घ्यायला हवी. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी व लिक्विड साबण उपलब्ध करणे व लोकांना हात धुण्याची पद्धत शिकवण्याची गरज आहे.

या साथीची निष्पत्ती नेमकी काय असेल हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांना संसर्ग होऊन आणि कदाचित थोडी हानी होऊन कोरोना विरोधात हळूहळू सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. शासन जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. त्यामुळे, ‘घाबरू नका’ असे सांगताना सोबत शासनाकडून ठोस कृती होणेही गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाइम्स मध्येही वाचू शकता.


One Reply to “कोरोना प्रतिबंध आणि शासन”

  1. It would have been worth it if it was scripted in our National language Hindi or in English as well, so that maximum number of people could be benefitted. Because I don’t understand Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *