विद्यार्थ्यांनो, किमान ‘नीट’ परीक्षेला तरी बसा !

विद्यार्थ्यांनो, किमान ‘नीट’ परीक्षेला तरी बसा !

-डॉ. अमोल अन्नदाते

नीट परीक्षेचे फॉर्म भरणे व त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत मुख्यत: ग्रामीण भागात आजही बरेच अज्ञान आहे! ते दूर करण्यासाठी तर चळवळच सुरू करायला हवी!

सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या नीट या सामायिक परीक्षेला या वर्षी २१ लाख एवढ्या विक्रमी संख्येने विद्यार्थी बसले. यापैकी सर्वाधिक २.७७ लाख मुले महाराष्ट्रातून बसली असली, तरी वैद्यकीय प्रवेशाच्या वेळी मात्र विद्यार्थी व पालकांचे बरेच अज्ञान समोर येते त्यातच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे जाणवते.

विज्ञान शाखेतून २०२३ साली ६.७ लाख मुले बारावीच्या परीक्षेला बसली. यापैकी सगळीच मुले वैद्यकीय शाखेकडे नीटबद्दल माहितीच नाही, अशा विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आढळून येते. क्लासची फी परवडत असलेल्या शहरी उच्च मध्यमवर्गीय वर्गातील एमबीबीएस, बीडीएस (दंतवैद्यक) व इकडे नाहीच प्रवेश मिळाला तर बीएएमएस (आयुर्वेद) या तीन अभ्यासक्रमांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेची माहिती असते; पण प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर नाव नोंदणी करताना छोट्या चुका झाल्याने खर्च परवडत असूनही प्रवेशाला मुकावे लागते.

उदाहरणार्थ सीईटी सेलची नोंदणी करताना १००० रुपये व ६००० रुपये अशा २ प्रकारच्या नोंदणीचे पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी जास्त फी असलेल्या व्यवस्थापन कोटा / इन्स्टिट्यूशनल कोटामधून सहज प्रवेश मिळतो; पण विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना हा पर्यायच निवडलेला नसल्याच्या तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस नव्हे. होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी अशा अनेक उत्तम पर्यायांची अनेक विद्यार्थ्यांना माहितीच नसते. विशेष म्हणजे नर्सिंग, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या शाखेमधील प्रवेशासाठी फक्त नीट परीक्षेला बसणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना शून्य किंवा अगदी त्याखाली निगेटिव्ह मार्क असले तरी प्रवेश मिळतो; पण प्रवेशासाठी येणाऱ्या बन्याच इच्छुक विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसावे लागते, हेच माहीत नसते.

नीट परीक्षा सुरू होऊन आता १० वर्षे उलटली तरी विज्ञान शाखेच्या विद्यार्थी/ पालकांना अजून या परीक्षेविषयी माहिती नाही, हे मुख्यतः ग्रामीण भागातील वास्तव आहे. आपल्या भवितव्याशी निगडित माहिती गुगलवर सर्च करण्याची तसदी हे विद्यार्थी, पालक घेत नाहीत.

२०१३ आधी वैद्यकीय प्रवेश हे महाराष्ट्र सीईटीच्या माध्यमातून होत. कित्येक विद्यार्थी याच भ्रमात राहून वैद्यकीय प्रवेशासाठी याच परीक्षेचे निकाल घेऊन येतात. परीक्षा दिली तरी त्या पुढचे अज्ञान असते नोंदणीबाबतचे कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू होताना सीईटी सेलची नोंदणी करायची असते, हेच माहीत नसते. याविषयीचे अज्ञान लक्षात घेता सीईटी सेलने प्रत्येक प्रवेशाच्या राउंड आधी ही नोंदणी खुली करणे आवश्यक आहे; पण असा फिडबॅक व गरज वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व मंत्र्यांपर्यंत कदाचित पोहोचतच नसावा. पोहोचला तरी या छोट्या पण महत्त्वाच्या सूचना ते किती गांभीर्याने घेतील, हा प्रश्नच आहे.

केवळ या अज्ञानामुळे विद्यार्थी प्रवेशाला इच्छुक असूनही गेल्या वर्षी अखेरच्या राउंडआधी होमिओपॅथी (बीएचएमएस) ४४१, आयुर्वेद (बीएएमएस) ५८३, युनानी ४, बीएस्सी नर्सिंग ९७५, फिजिओथेरपी – ७८१ एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त होत्या. यात ओबीसी विद्यार्थ्यांना ५०% व अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), भटक्या विमुक्त जातीच्या विद्यार्थ्याना १०० % शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळाचा मोठा व तीव्र तुटवडा असताना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहणे हे गंभीर व चिंताजनक आहे. दर वर्षी शासनाने मोठ्या प्रमाणावर या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना परवानगी देण्याआधी आहेत त्या जागा भरल्या जाण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नीट परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी व त्यानंतरच्या प्रक्रियेतील अज्ञान दूर करण्यासाठी तर चळवळच सुरू होणे गरजेचे आहे.

-डॉ. अमोल अन्नदाते
-reachme@amolannadate.com

  • www.amolannadate.com
    9421516551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *