…जेव्हा डॉक्टरच होतो संस्थाचालक!

…जेव्हा डॉक्टरच होतो संस्थाचालक! डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट डॉक्टर हुशारी असूनही संस्था किंवा स्वतःच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय महाविद्यालय काढण्याच्या फंदात सहसा पडत नाहीत. मात्र मराठवाड्यातल्या वैजापूरसारख्या एका छोट्या तालुक्यातला एक तरुण डॉक्टर, आपला भाऊ आणि वडील यांच्या मदतीने थेट नर्सिंग कॉलेज आणि आयुर्वेदिक महाविद्यालय उभारण्याचा निर्धार करतो आणि तो निर्धार वास्तवात आणतो. ही सारी सत्यकथा ‘एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण’ या पुस्तकातून कळते.

‘एका मेडिकल कॉलेजचे बाळंतपण’ या पुस्तकातील कथा एका धडपडणाऱ्या तरुण माणसाची जेवढी आहे, तेवढीच नवे काहीतरी करू पाहणाऱ्या, समाजहिताची काळजी करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे. सरकारी व्यवस्थेला तोंड देताना सामान्य माणसे अक्षरशः मेटाकुटीला येतात, पण डॉ. अमोल अन्नदाते हा माणूस कुठल्याही अवघड परिस्थितीला शरण न जाता त्या प्रत्येक अडचणींवर मात करतो आणि आपले ध्येय पूर्ण करतो.

हे पुस्तक त्यांच्या सगळ्या प्रयत्नांची माहिती देते. आपल्याकडची सरकारी यंत्रणा नियमाला किती बांधील असते व माणसापेक्षा नियम मोठा आणि नियमाची अंमलबजावणी जास्त महत्त्वाची या मानसिकतेत कशी वावरत असते याचा दर पानागणिक अनुभव देते. या यंत्रणेच्या त्रासाला, या सगळ्या गोंधळाला आणि प्रचंड अशा कागदपत्रांच्या पूर्ततेला माणसे वैतागतात आणि नकोच ते काम करणे किंवा नको ती संस्था उभारणे अशा निष्कर्षाला येतात. इथेच या पुस्तकाचे सगळे वेगळेपण आहे. ही कहाणी आहे ती अन्नदाते यांच्या कष्टाची. आपल्या ध्येयाच्या ते कसे जवळ जातात, त्यांना कशी आणि कुणाची मदत होते त्याची या पुस्तकातून सविस्तर माहिती मिळते.

अमोल अन्नदाते आपली मुंबईतली बड्या हॉस्पिटलमधली चांगली प्रॅक्टिस सोडून आपल्या गावात वडील आणि आपला मोठा भाऊ यांच्याबरोबर काम करण्यासाठी येतात, त्यांच्या रुग्णालयासाठी आणि परिसरातील मुलींना चांगली संधी मिळावी म्हणून ते नर्सिंग महाविद्यालय काढण्याची योजना आखतात. हे करताना त्यांना येणारे अनुभव धक्कादायक आहेत. काही वेळा, ठरवले तर सरकारी अधिकारी एखाद्यासाठी किती चांगल्या पद्धतीने यंत्रणा राबवू शकतात त्याचीही झलक दिसते.

पुस्तक जसजसे वाचत जातो तसे वाचक त्या कथानकात गुंतून पडतो, ही कुठली फॅंटसी नाही किंवा अमिताभ बच्चन यांचा मारधाड पट म्हणजे ॲक्शनपट नाही, याची कल्पना आली तरी वाचक अन्नदाते यांच्या जागी स्वतःला पाहायला लागतो आणि त्यांना कामात यश मिळावे यासाठी प्रार्थना करायला लागतो. हा जो अन्नदाते आणि वाचक यांच्यातला अनुबंध निर्माण होतो हेच अन्नदाते यांच्या कामाच्या प्रामाणिकपणाचे यश आहे आणि त्याच्या कथनशैलीची जादू आहे. पंकज जोशी यांनी पुस्तकाचे संकलन करताना विषयाची जाण ठेवून संकलन केले आहे.

सरकारी यंत्रणा आणि तिथले कर्मचारी कशी अडवणूक करतात याचा पुरेपूर अनुभव साध्या एका झेरॉक्सच्या प्रकरणात येतो. दिल्लीतल्या संस्था कशा वगातात, माणसाला त्या कशा शुल्लक लेखतात आणि परिस्थितीचा कसा गैरफायदा घेतात तेही यातून कळते. अन्नदाते यांना आयुर्वेदिक महाविद्यालय काढायचे असते. त्यासंदर्भातली सुनावणी ज्या कार्यालयात होणार असते, तिथला झेरॉक्सवाला एका प्रतीचे पाचशे रुपये मागतो. कशी लूट केली जाते त्याचे हे एक उदाहरण. या पुस्तकात जसे वाईट अधिकारी आणि कामासाठी पैसे घेणारे दलाल भेटतात तसेच काही चांगले अधिकारी आणि काही चांगले लोकही भेटतात. सुष्ट दुष्टचा हा खेळ एखाद्या टीव्ही मालिकेसारखा सतत सुरू असतो. अन्नदाते यांच्या या पुस्तकावर उत्तम मालिका होऊ शकेल इतके जबरदस्त अनुभवांचे गाठोडे या पुस्तकात दडलेले आहे.

अन्नदाते आपल्या महाविद्यालयासाठी बाक तयार करताना ते आपल्या गावातील स्थानिक उद्योजकाला बळ देऊन त्याच्याकडून काम करून घेतात. त्याचा एक छोटा उद्योजक ते मोठा उद्योजक हा प्रवास अन्नदातेंमुळे पूर्ण होतो. केवळ हे एकच उदाहरण नाही तर मेस किंवा अन्य बाबींसाठी ते स्थानिक माणसाला बळ देतात, ते सारे कौतुकास्पद आहे. अन्नदाते या पुस्तकात जो सकारात्मक सूर लातात, त्यामुळे हे पुस्तक एका लढवय्या माणसाच्या प्रयत्नांची यशोगाथा ठरते. उगीच परिस्थितीला दोष देत, इतरांना जबाबादर धरून आपल्या अपयशाबद्दल ज्याला त्याला नावे ठेवायची असा खाक्या इथे नाही. अडचणीचे, निराशेचे अनेक प्रसंग इथे येतात, पण चिकाटीने अन्नदाते त्यावर मार्ग काढतात. हे पुस्तक डॉक्टरी संघटना म्हणजे ‘आयएमए’ किंवा अन्य पॅथीच्या किंवा स्पेशालिस्ट मंडळीच्या संघटनांनी आवर्जून खरेदी करून आपल्या सदस्यांना वाचायला दिले पाहिजे.

बारावीला सायन्स शाखेतून विक्रमी गुण मिळवून त्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद करणारे अन्नदाते नंतर मुंबईत महागड्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असताना आपल्या गावच्या लोकांसाठी परत येतात आणि एक कमिटमेंट म्हणून हॉस्पिटलचा व्याप उभा करतात. ते करताना महाविद्यालयाचीही स्थापना करतात, त्यातही काही मूल्ये कशी रुजायला हवीत याबद्दलही काळजी घेतात, त्यासाठी काही नवे आणि चाकोरीबाहेरचे उपक्रम राबवतात. साधे टॉयलेट स्वच्छ कसे राहील याकडेही ते आवर्जून लक्ष देतात, एक व्यवस्था उभी राहण्याकडे त्यांचा कटाक्ष आहे आणि त्याचबरोबर ती व्यवस्था कर्मकांडात अडकणार नाही याचीही दक्षता घेतात. एक डॉक्टर, एक प्राध्यापक आणि एक धडपड्या संस्थाचालक अशी अन्नदाते यांची अनेक रूपे या पुस्तकात दिसतात. आपला भाऊ, वडील, पत्नी आणि बरोबरचे सारे सहकारी यांचा आपल्या यशात कसा वाटा आहे याचेही श्रेय ते मनमोकळेपणाने देऊन टाकतात.

अनेक अडचणी आणि त्रास सहन करून ते नर्सिंग आणि आयुर्वेदिक कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावतात. नव्या संकल्पना आणि नवी संस्कृती ग्रामीण भागात ते रुजवू पाहत आहेत. त्यांची ही संघर्षगाथा अर्थातच कुणालाही प्रेरणादायी अशीच आहे.

डॉ. अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *