दै. दिव्य मराठी रसिक
आपल्याला हा महाराष्ट्र कुठं न्यायचाय..?
- डॉ.अमोल अन्नदाते
गेल्या एक-दोन आठवड्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात ज्या घटना, क्रिया-प्रतिक्रिया घडत आहे, विधाने-प्रतिविधाने केली जात आहेत, ते पाहता कुठल्याही सुजाण नागरिकाला या राज्याचा सामाजिक- राजकीय इतिहास नेमका कुठल्या दिशेने जातो आहे आणि या राज्याचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
कोल्हापूरसारख्या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील नसलेल्या आणि कधीही सामाजिक सौहार्दाला गालबोट न लागलेल्या छ. शाहू महाराजांच्या भूमीत दोन गटांमध्ये दंगल झाली. एकीकडे हे सुरू असतानाच मीरा-भाईंदरमध्ये झालेली अत्यंत क्रूर अशी हत्या, मुंबईच्या शासकीय वसतिगृहातील बलात्कार आणि हत्या, काल-परवा मुंबईतच घडलेले धावत्या लोकलमध्ये तरुणीवरील अत्याचाराचे प्रकरण आणि दुसरीकडे दिवसाढवळ्या रिव्हॉल्व्हरच्या धाकाने होणाऱ्या लुटी, चक्क एटीएमच पळवून नेण्याच्या घटना… राजरोस होत असलेल्या अशा गुन्ह्यांची मालिका थांबायला तयार नाही. मात्र, या प्रकारच्या गंभीर प्रकरणांवर राज्यकर्ते आणि विरोधक सामान्य जनतेच्या हितापेक्षा राजकीय सोयीची भूमिका घेत आहेत. कोल्हापूरच्या घटनेसंदर्भात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा जबाबदार पदावर असलेले व समंजस समजले जाणारे नेतेही निवडणुकीच्या सभेत बोलावे अशी उथळ विधाने करीत असतील, तर त्या पदाच्या संविधानिक दायित्वाचे काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. राज्यकत्यांसाठी सगळ्या जाती-धर्मातील, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील नागरिक एकसमान असतात. विशेषत: धार्मिक, सामाजिक संवेदनशील घटनांच्या वेळी आपण कुठल्या पक्षाचे नेते नव्हे, तर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले मंत्री आहोत, याचे भानही नेत्यांनी गमवावे, याचे आश्चर्य वाटते. विरोधी नेतेही अशा घटनांबाबत ठाम ‘भूमिका न घेता कधी सोयीची, तर कधी बोटचेपेपणाची विधाने करीत राहतात, हेही तितकेच दुर्दैवी आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या या उक्ती व कृतीमधील टोकाच्या बदलांमागे राज्याच्या संभाव्य राजकारणाचे नरेटिव्ह सेट करण्याची स्पर्धा कारणीभूत आहे.. या स्पर्धेतून कदाचित कुणाला सत्ता मिळेलही, पण देशातील पुरोगामी आणि आघाडीचे राज्य म्हणून आपण खूप काही गमावलेले असेल, याचे किमान ‘भान आपण हरपून बसलो आहोत. महाविकास आघाडी सरकार कोसळून नवे सरकार बनल्यापासून सत्ताधारी पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व कार्ड कसे पळवायचे, याची तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातच सत्तेतील भाजप आणि शिवसेना या जय-वीरूच्या जोडीमध्ये खरे हिंदुत्व कुणाचे, अशी छुपी स्पर्धा सुरू आहे. हिंदू मतांवर एकगठ्ठा मालकी सांगण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चापासून सावरकर गौरव यात्रेसारख्या अनेक संकल्पना या पक्षांच्या वॉररूममध्ये ठरत असतात. त्यात अलीकडे ‘आयआयएम’मधील उच्चशिक्षित निवडणूक रणनीतिकार दिवस-दिवस ‘ब्रेन स्टॉर्निंग’ करून धोरणे ठरवत असतात. ‘क्लाएंट’ पक्षाला सत्ता मिळवून देणे, एवढे एकच ध्येय या कॉर्पोरेट रणनीतिकारांचे असते. यात आधीच सेट झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मॉडेलला तसेच्या तसे राबवता येते का, हेसुद्धा पाहिले जाते आणि त्यानुसार काही धोरणे ठरवली जातात.
राजकीय लाभासाठी अशा गोष्टी करणाऱ्या सर्वांनीच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की इतिहासापासून ते आजवर तयार होत गेलेली महाराष्ट्राची सामाजिक वीण ही जाती-धर्मातील सौहार्दाच्या, पुरोगामित्वाच्या धाग्याने आणखी घट्ट झाली आहे. हाच या राज्याचा डीएनए आहे. महाराष्ट्राच्या सर्वसमावेशकतेमुळेच मुंबईसारखे शहर देशाची आर्थिक राजधानी बनून
जागतिक नकाशावर ठळकपणे आपले स्थान निर्माण करू शकले. स्वातंत्र्यापासून सर्वधर्मीयांना आणि इतर राज्यांतील स्थलांतरितांना हे आपले घर वाटले, त्यांनी इथल्या प्रगतीत मोलाची भर टाकली. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या माझ्या रुग्णालयात काश्मीरच्या बारामुल्लाची मुलगी स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेते. इथे प्रवेश घेताना या मुलीचे वडील मला म्हणाले, ‘हमारी बेटी महाराष्ट्र में है, तो फिर हमें कैसी फिक्र..?’ आपल्याकडील दर्जेदार शिक्षण आणि उत्तम सुविधांमुळे खरे तर महाराष्ट्र हे देशाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जायला हवे. पण, सध्या घडत असलेल्या गोष्टी पाहता आपल्याला राज्याची ही प्रतिमा अधिक प्रगल्भ करायची आहे की उत्तरेतील राज्यांसारखी ‘क्राइम स्टेट’ म्हणून कलंकित करायची आहे, हे आपल्याला ठरवावे लागेल. वर्षानुवर्षे महाराष्ट्राची प्रतिमा ही उद्योगस्नेही आणि संयमी राज्य म्हणून राहिली आहे. पण, जबाबदार व्यक्तींची भडकाऊ उक्ती आणि त्याप्रमाणे समाजात घडणाऱ्या हिंसक कृती पाहता उद्योग विश्वासह जगभरातील लोकांमध्ये राज्याचा कोणता ‘ब्रँड’ प्रस्थापित होतो आहे, याचा विचार कधीतरी करावा लागेलच. जातीय-धार्मिक तेढ, द्वेषपूर्ण वक्तव्ये यामुळे कदाचित मते, सत्ता मिळेलही; पण त्यासाठी या
राज्याने कष्टातून कमावलेल्या प्रागतिकतेच्या ‘ब्रँड’ला बट्टा लागेल, याचीही चिंता वाटायला हवी.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांची जबाबदारी काय, हेही महत्त्वाचे आहे. या देशात तीन प्रकारचे मतदार आहेत. एक मोठा वर्ग ज्यांचा रोजचा संघर्षच संपलेला नाही आणि त्यांना देशाचे काय होईल, यापेक्षा त्यांचे स्वतःचे काय होईल, याची भ्रांत आहे. दुसरा वर्ग, ज्याचा संघर्ष संपलेला असला, तरी आपले राज्य, भाषा, धर्म आणि भूभागाच्या अस्मितेवर तो स्वार झाला आहे. त्याच्यासाठी मानवी विकास, देशाची जागतिक प्रतिमा यापेक्षा हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. विशेष म्हणजे, हे दोनच वर्ग प्रामुख्याने मतदान करतात. तिसरा वर्ग शिकलेला, बुद्धिप्रामाण्यवादी, विचारी वर्ग आहे. देशाचे राजकारण धर्माऐवजी विकासकेंद्रित व्हावे, असे या वर्गाला वाटते. पण त्याला हे फक्त वाटते. त्यासाठी कुठलीही कृती करण्यास तो उत्सुक नाही. मतदान करण्याच्या सर्वात महत्त्वाच्या कृतीपासूनच त्याची ही उदासीनता सुरू होते. आपला पदवीधर आमदार कोण आणि त्याची निवडणूक कधी होते, तेही माहीत नसलेला हा वर्ग आहे. मतदान करून लोकशाहीचे भवितव्य ठरवणाऱ्या दोनपैकी पहिला वर्ग हा तात्कालिक फायदा किंवा मोफत काही मिळते आहे का, हे पाहून किंवा दिवाळीला धान्याच्या एखाद्या मोफत पिशवीवर हुरळून मतदान करणारा आणि दुसरा अस्मितेवर भावनिक होऊन मतदान करणारा आहे. परिणामी देशाचे राजकारण भावनिक लाट आणि ठरवून निर्माण केलेल्या धारणांवर आधारले आहे. त्यामुळे सर्वसमावेशक, लोककल्याणकारी राज्यासाठी तरुण, शिक्षित आणि बुद्धिप्रामाण्यवादी वर्गाला केवळ समाजमाध्यमांवर लिहिण्या-बोलण्या आणि रील्स तयार करण्यापलीकडे जाऊन सजग मतदार बनावे लागेल. जगात नव्या प्रगतीच्या युगाची पहाट फटफटत असताना, महाराष्ट्राच्या प्रगतीत भर घालू शकणाऱ्या देश आणि जगभरातील लोकांसाठी आपण चुंबक बनायचे आहे की आपल्या दारांना जातीय धार्मिक द्वेष, गुन्हेगारी अन् अशांततेचे कुलूप लावायचे आहे, हे आपल्याला ठरवावे लागेल.
-डॉ.अमोल अन्नदाते
Reachme@amolannadate.com
www.amolannadate.com
• संपर्क : 9421516551