बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती ?

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक

२२ जीव गेले , द्या ना पाच लाख प्रत्येकी

प्रेतं जाळायला सरपण कमी पडू देणार नाही

किंबहुना प्रेतांना सरपण मिळायलाच हवं, मिळेलच , का मिळू नये ?

ऑक्सिजन पाहिजे ? लष्कराचं विमान येईल ना

ऑक्सिजन प्लांट लावा , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्या म्हणताय ?

घेऊ ना लवकरच,

आधी कॅबिनेट बैठक संपू द्या

मग अधिकाऱ्यांची मीटिंग ,

मग टेंडर ,

मग खरेदी

तो पर्यंत किती बरे झाले?

ते पण एकदा बघा ना

रेमडीसिवीर?

अरे आहे ना

काळ्या बाजारात मिळतंय की हवं तेवढं

बेड मिळत नाही?

मग लॉकडाऊन लावू या ना

पंढरपूर निवडणुकीची सभा तर संपू द्या

बेडसाठी कडक निर्बंध लावू ना

आयसीयू बेड वाढवायचे ?

कशासाठी ? अरे हा मर्दांचा महाराष्ट्र आहे …

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरायच्या ?

स्मशानजोग्यांच्या ही भरुया …

किंबहुना भरायलाच हव्या

बोलूया ना फेसबुक लाइव्ह मध्ये

अॅम्बुलन्सची कमतरता

तोच अभ्यास करायला तर आमदारांना मोफत लॅपटॉप दिले

भूमिपूजन , झालं ना … पुतळा तर कधीच झाला ..

कोरोना मृतांचं स्मारक त्याहून मोठं करू

ऑक्सिजन अभावी गेलेल्यांना त्यात विशेष जागा देऊ

निवडणूक या मुद्द्यावर होईल असं वाटत नाही

बराच वेळ आहे अजून

तोपर्यंत घडेल काही तरी मुद्द्यांचं , तेव्हा ठरवू काही करायचं का …

नाशिक ऑक्सिजन मृतांच्या

जाती बघायच्या राहिल्या

पत्रकार परिषदेत तोच मुद्दा उचला

पॉलिटिकल नॅरेटिव्ह एवढ्या वर्षात कसा कळत नाही तुम्हाला

अहो हा शाहू, फुले, आंबेडकर , शिवरायांचा महाराष्ट्र आहे

ऑक्सिजन , बेड , रेमडीसीवीर येईल कि दुसऱ्या राज्यातून

“लवकरच”

तोपर्यंत तीन नियम विसरू नका

निर्लज्जपणाचा मास्क लावा , जमेल तस दुसर्या लाटेत वारंवार हात धुवून घ्या, समाज,

समस्या आणि उपायांपासून सामाजिक अंतर पाळा

बाकी चालू द्या…

ए स्कोर काय झाला रे?

आज आयपीएलच्या दोन मॅच आहेत ना??

डॉ अमोल अन्नदाते

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा?

कुठली लस चांगली याचे उत्तर  “जी उपलब्ध आहे ती”  एवढे सोपे आहे.  म्हणून  “कुठली घ्यावी”  यापेक्षा  “लस घ्यावी”  हेच महत्त्वाचे !

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या अनुभवांवरून हा टप्पा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य व शासन, प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर काही सुधारणा आवश्यक आहेत. साठीच्या पुढे व इतर आजारांसह पंचेचाळीशीच्या पुढे असलेल्यांचे लसीकरण आता सुरू झाले असले, तरी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला टप्पा अजून अपूर्ण आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संख्येपैकी केवळ ५० टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. दुष्परिणामांची भीती व लस घेऊनही कोरोनाची लागण होते या दोन गैरसमजांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर नैसर्गिक कारणांमुळे झालेले मृत्यू व दुष्परिणामांचे संबंधही लसीशी जोडण्यात आल्याने काही आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकडे पाठ फिरवली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे व एक दिवसासाठी अंगदुखी, थोडा ताप, थकवा हे तुरळक परिणाम सोडता लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे जीवघेण्या दुष्परिणामांची कुठलीही शक्यता मनात न आणता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने आणखी एकाला लसीकरणासाठी प्रेरित करणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हा सध्या देशसेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास काहीजण उत्सुक नव्हते. दोन डोस शिवाय पूर्ण प्रतिकारशक्ती येणे शक्य नाही. दुसरा डोस न घेणे म्हणजे पहिला डोस वाया घालवण्यासारखे आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची तारीख चुकवून ती उद्यावर ढकललेल्यांचे लसीकरण इच्छा असूनही चालढकल केल्यामुळे राहून गेले असे पहिल्या टप्प्यातले निरीक्षण आहे.  आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी लस घेणे हे  सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे प्राधान्य आहे असे ठरवून सकाळच्या सत्रातच लस घेण्याचा निश्चय करावा. एखाद्या साथीच्या रोगावर मात करायची असते तेव्हा कमी वेळात जास्त लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक असते. सध्या देशातील केवळ ०.६ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग संथ आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना लसीकरण बंद ठेवून चालणार नाही. शासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हालचाली तेव्हाच होतील जेव्हा लसीकरण केंद्रावर मागणी वाढेल. म्हणून आपल्याला ठरवून दिलेली तारीख न चुकविणे गरजेचे आहे. 


पहिल्या टप्प्यातील बॅक लॉग पाहता प्रत्येक टप्प्यावर असाच लस न घेणाऱ्यांचा बॅक लॉग राहिला तर  लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी म्हणजे कळप/सामूहिक प्रतिकारशक्तीच्या मुख्य हेतूपासून आपण वंचित राहू व सर्व मुसळ केरात जाईल. म्हणूनच प्रत्येकाने आरोग्य साक्षरता दाखवत साथ रोखण्यासाठीची  इच्छाशक्ती सिद्ध करण्याची ही वेळ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी विचलित होण्याची गरज नाही. लस ही आजारासाठी कवच कुंडले आहेत, पण तो काही अमरत्व देणारा अमृत कलश नाही. म्हणून इतर प्रतिबंधक उपायांचे महत्त्व याने कमी होत नाही. लस घेतल्यावर कोरोनासंसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल. म्हणजेच लसीचे मुख्य ध्येय हे मृत्यू टाळणे हे आहे हे समजून घ्यावे. 
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. दोन्ही लसी शासनाने सखोल वैज्ञानिक चिकित्सेअंति उपलब्ध केल्या आहेत म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच सध्या प्राधान्य असले पाहिजे. 
शासनाने लसीकरण धोरणात  काही बदल केला तर लसीची परिणामकारकता वाढवता येऊ शकते. सध्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ५६ टक्के प्रतिकारशक्ती मिळणार आहे. हे अंतर जर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवले तर लसीची परिणामकारकता ८० टक्केपर्यंत वाढू शकते. तसे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनेही दिले आहेत.  म्हणून पहिला डोस घेणाऱ्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यापेक्षा तो इतर लस न मिळालेल्यांना पहिला डोस म्हणून देता येईल (या धोरण सुधारण्यासाठी सूचना आहेत, पण सर्वसामान्यांनी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे चार आठवड्यांच्या अंतरानेच दुसरा डोस घ्यायचा आहे) 
दुसरा डोस लांबविण्याचा शासकीय पातळीवर फायदा असा होईल की पहिल्या डोस नंतरही काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होतेच व जास्तीत जास्त जनतेला कमी वेळात पहिला डोस मिळाला तर संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर व दुसऱ्या लाटेची शक्यता अशा अनेक गोष्टी कमी होतील.  दुसरा डोस लांबल्याने प्रतिकारशक्तीही जास्त प्रमाणात निर्माण होईल. 
दुसरा डोस लांबवून पल्स पोलिओच्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात पहिला डोस देण्याचा विक्रम प्रस्थापित करणे हा हर्ड इम्युनिटीसाठीचा राजमार्ग ठरू शकतो. यासाठी निश्चित काळ निर्धारित करून देशात उपलब्ध असलेले ८ लाख डॉक्टर व २० ते २५ लाख आरोग्य कर्मचारी सरकारच्या एका हाकेवर हे शिवधनुष्य नक्कीच पेलून धरतील. 


तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? फ्रान्समध्ये आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आधी संसर्ग झाल्याने त्यांच्यासाठी पहिला डोस हा काही प्रमाणात दुसऱ्या बुस्टर डोससारखा काम करण्याची वैज्ञानिक शक्यता आहे. याचाही हेतू जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस कमी वेळात देण्याचाच आहे. 
लसीकरण धोरण राबविताना  आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या, कमी मनुष्यबळ असलेल्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.  ग्रामीण भागातील  जनता कोविन ॲपवर नोंदणी व प्रवास करून गावातून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात येईल ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. अगदी गंभीर आजारासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची  आर्थिक व मानसिक क्षमता नसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला लसीकरण मोहिमेत कसे सामावून घेता येईल याचे सूक्ष्म नियोजन अजून आरोग्य खात्याकडे नाही. समाजाच्या या स्तरासाठी लसीकरण गाव-खेड्यात न्यावे लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग

टॉयलेट ट्रेनिंग मुलांना टॉयलेट ट्रेनिंगची गरज का आहे? स्वतः नीट व स्वच्छतेचे नियम पाळून ‘शी’, ‘सु’ करायला शिकणे हे मुलाला आयुष्यात पहिली अशी गोष्ट असते, जी त्याला स्वावलंबी झाल्याची भावना निर्माण करून आत्मविश्वास वाढवते व इतर गोष्टी स्वतः करण्यास प्रेरित करते. तसेच, ‘शी’, ‘सु’ करण्याचे प्रशिक्षण नीट झाले नाही किंवा हे करत असताना मुलाच्या मनात तणाव निर्माण झाल्यास पुढील आयुष्यात मानसिक समस्या निर्माण होता त.

सुरुवात कधी करावी?
टॉयलेट ट्रेनिंग शक्यतो मूल १८ महिने ते २४ महिन्या दरम्यान ‘शी’ करायला पॉटी सीटवर बसण्यास तयारी दाखवतात. मात्र, हे वय प्रत्येक मुलागणिक बदलू शकते आणि मुलाच्या मानसिक व शारीरिक तयारीप्रमाणे आईने वेळ ठरवावी. 
१८ महिन्यापासून पुढे मात्र या विषयी मुलाशी चर्चा करायला, त्याला याविषयी सांगायला सुरुवात करावी. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मूल प्रशिक्षणासाठी तयार आहे, हे कसे ओळखावे?

  • मूल तुमची नक्कल करू लागते. 
  • खेळणी जागच्या जागी ठेवू लागते. 
  • तुमच्यामागे बाथरूममध्ये येऊ लागते. 
  • स्वावलंबनाच्या खुणा दिसतात; नाही म्हणू लागते. 
  • स्वतः कपडे काढू लागते. 
  • ‘शी’, ‘सु’ आल्याचे सांगू लागते. 

कसे करावे?

  • यासाठी शक्यतो बाजारात मिळणाऱ्या पॉटी चेअरचा वापर करावा. कारण भारतीय शौचालयाचे भांडे मोठे असते व त्यावर मुलांना बसणे शक्य नसते व उभे राहण्यास भीती वाटते. 
  • प्रशिक्षणाचे मुख्य टप्पे असतात – ‘शी’ आल्याचे सांगणे, कपडे काढणे, ‘शी’साठी पॉटी चेअरवर बसणे/उभे राहणे, हात धुणे, कपडे परत घालणे. 
  • पॉटी चेअरचा वापर सुरू करण्याअगोदर ती मुलाला दाखवा, त्याची खरेदी करताना मुलाला सोबत घेऊन जा, त्याला त्यावर बसून खेळून बघू द्या. 
  • ही तुझी खुर्ची’, ‘ ही तुझ्या ‘शी’साठी आहे, असे ‘तुझे’ हा शब्द वापरून पॉटी चेअरची ओळख करून द्या. 
  • हे करताना ही प्रक्रिया सुरू ठेवणे गरजेचे हे मुख्य ध्येय असले पाहिजे, ती पूर्ण यशस्वी करणे नाही. 
  • सुरुवातीला ‘शी’ आलेली नसताना व जेवण झाल्यावर, दूध पिल्यावर मुलाला पूर्ण कपडे घालून फक्त पॉटी चेअरवर बसायला सांगणे. हे बसणे भारतीय पद्धतीने पाय गुडघ्यात दुमडून किंवा पाश्चिमात्य पद्धतीने खुर्चीवर बसल्यासारखे, कसे ही असू शकते. 
  • यासाठी रोज एक वेळ निवडावी व त्या वेळेला बसावे. 
  • बसलेले असताना मुलाशी गप्पा माराव्या. 
  • याची एकदा सवय लागली की ‘शी’ आल्यावर याच्यावर बसायचे का, असे मूल स्वतःच विचारेल. विचारले नाही की दरवेळी ‘शी’ आल्यावर तुझ्या खुर्चीत बसू या का ‘शी’ला, असे आपणहून विचारावे. 
  • बसले म्हणजे पॉटी चेअरमध्येच ‘शी’ करावी असा काही नियम घालून देऊ नये, मुलाचा त्या वेळचा मूड पाहून निर्णय घ्यावा. 
  • डायपरमध्ये ‘शी’ होते तेव्हा ती फेकताना पॉटी चेअरमध्ये टाकावी व हे मुलाला वारंवार दाखवावे 

काही टिप्स

  • टॉयलेट ट्रेनिंग पॉटी चेअर बाथरूममध्येच ठेवली पाहिजे, असा काही नियम नाही, ती मुलाला आवडत्या ठिकाणी ठेवून वापरू द्यावी. 
  • टॉयलेट ट्रेनिंग सुरू असताना शक्यतो ‘शी’ आई किंवा घरातील व्यक्तीनेच धुवावी, मुलाला स्वतःची शी धुण्याचा आग्रह व याची घाई करू नये. यात वडिलांनीही सामील व्हावे. 
  • टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान बाळाला ‘शी’ कडक होते का, याकडे लक्ष द्यावे. ज्या मुलांना कडक ‘शी’ म्हणजे बद्धकोष्ठता होते, त्यांना टॉयलेट ट्रेनिंग दरम्यान त्रास होतो. म्हणून ही समस्या असल्यास उपचार करावेत.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

खोकल्याचे उपचार

खोकल्याचे उपचार

खोकल्याचे उपचार ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते.
सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी अनेकदा अनावश्यक औषधे वापरली जातात. सर्दी खोकल्याचे उपचार कारणे पाहून करावे लागतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

व्हायरल ताप, सर्दी खोकला – 
बहुतांश खोकल्याचे रुग्ण हे साध्या सर्दी खोकल्यामुळेच असतात. त्यासाठी 

  • नाकात नॉर्मल सलाईनचे ड्रॉप्स व साधी खोकल्याची औषधे, सोबत ताप असल्यास तो नियंत्रणात आणण्यासाठी पॅरॅसिटॅमॉल वापरले तरी पुरेशी असतात. 
  • थोड्या मोठ्या मुलांनी घसा धरल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
  • खोकल्यासाठी मध व कोमट पाणी एकत्र किंवा वेगळे घेतले जाऊ शकते. 
  • ताप, सर्दी खोकल्यासाठी अँटिबायोटिक्स देण्याची गरज नसते.
  • अशा मुलांना ते खातील तितके अन्न द्यावे, बळजबरी करू नये, मात्र पाणी भरपूर पाजावे.
  • ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या मुलांना पाण्याची वाफ दिली जाऊ शकते. (रुग्णालयात जाऊन मशीनमधून वाफ देण्याची गरज नसते.) 
  • ताप, सर्दी खोकला आपोआप बरा होणारा व जीवाला धोका नसणारा आजार आहे. तो एक आठवडा चालतोच, म्हणून सतत ताप, सर्दी, खोकला बरा होत नाही म्हणून डॉक्टर बदलत राहू नये. असे केल्याने औषधाचे ब्रँड बदलत राहतील व तणावामध्ये डॉक्टर अँटिबायोटिक्स सुरू करतील. 
  • सर्दी खोकल्याची औषधे लक्षणे पूर्ण नाहीशी करण्यासाठी नव्हे, ती कमी करण्यासाठी असतात.
  • नॉर्मल सलाईन सोडून इतर औषधे असलेल्या नाकांच्या ड्रॉप्समुळे नाक तात्पुरते कोरडे पडते. मात्र, रिबाउंड कंजेशन, म्हणजे परत नाक भरून येण्याची शक्यता असते. 
  • खोकला दाबणारी औषधे (कोडीन, फोलकोडीन, डेक्सट्रोमीथारफान) मुलांना डॉक्टरांच्या परवानगी शिवाय देऊ नयेत. 
  • खोकल्याच्या अनेक औषधात एकाच वेळी, खोकला दाबणारी, खोकला पातळ करणारी आणि खोकला बाहेर काढणारी अशी परस्परविरोधी अॅक्शन असणारे घटक असतात. म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याची औषधे देऊ नये. 
  • ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते. 

अॅलर्जीमुळे सर्दी, खोकला – 
खोकल्याचे उपचार यासाठी अँटिअॅलर्जिक, म्हणजे शरीरात अॅलर्जी कमी करणारी औषधे दीर्घकाळासाठी घ्यावी लागतात. यासाठी अॅलर्जी टेस्ट करून काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा काय खाल्ल्याने सर्दी, खोकला होतो हे आईने निरीक्षण करून ठरवलेले योग्य. बाहेर, धुळीत जाताना मास्कचा वापर केल्यास अलर्जीचा त्रास कमी होतो. 

दमा – 
दम्यासाठी नियमित घ्यायच्या काळजी व्यतिरिक्त दम्याचा अॅटॅक आल्यावर तातडीने घ्यायचे औषध आणि अॅटॅक नसताना घ्यायचे औषध, असे दोन पंप मिळतात. हे पंप त्या-त्या वेळी वापरून दम्याचा खोकला नियंत्रणात येतो. याशिवाय दमा नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन घेण्याची काही औषधे असतात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोनासाठी झिंक महत्वाचे

कोरोनासाठी झिंक महत्वाचे

कोरोनासाठी झिंक महत्वाचे झिंक आपल्या शरीरातील असा सूक्ष्म घटक आहे जो प्रतिकारशक्ती साठी महत्वाचा असतो. कोरोना वर अजून संशोधन सुरु असून झिंक व कोरोना उपचार व प्रतिबंधाचा थेट संबंध सिध्द होण्यास अजून वेळ लागेल. पण मात्र सर्दी, खोकला, न्युमोनिया व इतर सर्व श्वसनाचे जेवढे जंतुसंसर्ग आहेत, ते टाळण्यात झिंकचे महत्व सिध्द झाले आहे. लहान मुलांना मधील जुलाब झाल्यावर दररोज ५ मिलीग्राम असलेले झिंकचे टॉनिक आम्ही बालरोगतज्ञ देतोच. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी झिंकचे महत्व आहे. उपचारामध्ये ही झिंकचा वापर सध्या केला जातो आहे. पण कोरोना टाळण्यासाठी झिंकच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. पुढील अन्ना मध्ये झिंक जास्त प्रमाणात असते. या अन्नाचा नियमित आपल्या जेवणात समावेश असावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोनासाठी झिंक महत्वाचे लसून , भोपळा, टरबुजातील बियांच्या मधला भाग ( मगजबी ), वाटणे , पॉलिश न केलेला भात , मशरूम , तीळ , कडधान्ये , पालक , बदाम, चीज, शेंगा व कडधान्यात फायटेट नावाचा घटक असतो ज्यामुळे त्यांच्यातील झिंक शरीरात शोषून घेतले जाऊ शकत नाही. त्यासाठी हे पाण्यात भिजवून, अंकुरित करून घेतल्यास झिंक आतड्यात शोषून घेतले जाते. मासे व अंड्यांमध्ये ही झिंक असते.

रोज ८ ते ११ मिलीग्राम झिंक मानवाच्या शरीराला लागते. पुढील व्यक्तीं मध्ये झिंक शरीरात कमी असण्याची शक्यता असते –

  • वय ६० पेक्षा जास्त असणे
  • गरोदर व स्तनदा माता
  • मद्यपान करणारे
  • कॅन्सर
  • मधुमेह
  • दीर्घकालीन किडनीचे आजार
  • सिकल सेल अॅनीमिया

झिंकचे सप्लीमेंट्स कोणी घ्यावे ?

  • वर दिलेले आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवस घेऊ शकता
  • कोरोनाशी संपर्क आला असल्यास किंवा लक्षण विरहीत कोरोना असल्यास शासकीय व्यवस्थेच्या निर्देशाप्रमाणे व तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत ‘ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली…

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत’ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे परदेशात भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास १.५ लाख भारतीयांनी परतण्यासाठी परदेशात नाव नोंदणी केली आहे. आता पर्यंत १५००० भारतीय मायदेशी परतले आहेत आणि वंदे भारतच्या दुसऱ्या टप्प्याला २२ मे पासून सुरुवात झाली आहे. आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यास काहीच हरकत नाही पण हे नागरिक भारतात व त्यातच मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या आयसोलेशन व क्वारंनटाइनचा जो गोंधळ उडाला आहे तो आधी जानेवारी महिन्यात जागतिक साथ सुरु झाल्याची घंटा वाजत असताना ज्या चुका झाल्या त्याचीच पुनरावृत्ती आहे व ती तत्काळ रोखायला हवी. एवढेच नव्हे तर यापुढे परदेशातून भारतात आणल्या जाणाऱ्या व त्यातच मुंबईत येणाऱ्या प्रवाशांबद्दल काय धोरण असेल हे निश्चित करावे लागेल. एकीकडे मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागात कोरोना ज्या झपाट्याने वाढत आहेत, त्यावरून समूह संसर्ग सुरु झाला आहे असे मानण्यास मोठी जागा असताना कोरोना संसर्ग भारता पेक्षा जास्त असलेले देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनाचा बोजवारा हा जून महिन्यात राज्यात दुसऱ्या कोरोना रुग्णांच्या लाटेला जबाबदार ठरू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्याच चुका परत नको सध्या मुंबई विमानतळावर येणाऱ्या या प्रवाशांची मुंबईचे व मुंबई बाहेरील अशी विभागणी केली जाते आहे. यात मुंबईतील रुग्णांना विमानतळा जवळील हॉटेल्समध्ये प्रती दिवस सहा हजारांपासून पुढे आकारून क्वारंटाइनची सोय केली जाते आहे. पण मुंबई बाहेरील प्रवाशांना मात्र गाड्यांनी त्यांच्या गावी जाऊन होम क्वारंटाइन होण्यास सांगितले जाते आहे. यात काहींना नागपूर, अकोला, गोंदिया, कोल्हापूर असा १० ते २० तासाचा प्रवास करून जावे लागले व पुढे ही असे प्रवासी असतील. हे रुग्ण परदेशाहून आले असल्याने त्यातील काही कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे. पण तरीही वाटेत ते थांबतील तिथे व पोहोचल्यावर ही नेमके कोणाला भेटून व कुठे रिपोर्टिंग करायचे हे न सांगता मध्य रात्रीच अनेकांना गाडीत बसवून मुंबई बाहेर धाडण्यात आले. या पैकी काही क्वारंटाइनसाठी पैसे भरण्याची तयारी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना हॉटेल मध्ये क्वारंटाइनची परवानगी देण्यात आली नाही. एकदा होम क्वारंटाइनने हात पोळून घेतलेली असताना परत एकदा माहित असलेल्या इंडेक्स केसेस ( निश्चित संसर्ग करतील अशा माहित असलेल्या सुरुवातीच्या केसेस ) बाबतही जोखीम आपण का करत आहोत? मुंबई मध्ये खाटा उपलब्ध नाही आणि आधीच आकडा वाढत असताना मुंबईवरच सर्व केसेसचा ताण नको हे एक वेळ गृहीत धरले . तर मग महाराष्ट्रात सर्व परदेशातून येणारी विमाने मुंबई विमानतळावर उतरवायची कशाला? यासाठी शिर्डी विमातळावर विमान उतरवून शिर्डीला रिक्त असलेल्या भक्त निवासांमध्ये एका वेळेला किती ही लोकांना क्वारंटाइन सुविधा पुरवता येईल. १४ दिवसांचा क्वारंटाइन संपला कि यांना घरी सोडता येऊ शकते. जर कोणाला लक्षणे आलीच तर शिर्डीचे भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहेच. हा पर्याय शक्य नसला तर नाशिक किंवा इतर कुठल्या ही विमानतळ असलेल्या शहराचा विचार करता येऊ शकतो. या परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या विलगीकरणाचे नियोजन गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे परदेशातील अधिक घातक कोरोना स्ट्रेन्स परत राज्यात मिसळण्यास ही संधी ठरू शकते. कोरोनाची संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे आणि भारता सारख्या उष्ण देशातील स्ट्रेन ही इतर देशांच्या मानाने कमी घातक ठरल्याचे दिसून येते आहे. अगदी महाराष्ट्र व पंजाब अशा राज्यांतर्गतही स्ट्रेन्स मध्ये फरक आहे. अशात परत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना इस्टीट्युशनल क्वारंटाइन न करता घरीच क्वारंटाइन करणे परदेशी कोरोनाच्या स्ट्रेन साठी आपले अंगण दुसऱ्यांदा मोकळे करण्यासारखे आहे. एरवी सगळी कडे होम क्वारंटाइन केले जातच असल्याने यासाठी निर्माण केलेल्या सुविधा रिकाम्या आहेत. त्यांचा वापर करून हे धोरण तातडीने शासनाने राबवायला हवे. दुसरी सध्या होत असलेली चूक म्हणजे आता होम क्वारंटाइन सारखे होम आयसोलेशन म्हणजेच तुम्ही कोरोना पोझीटीव असून तुम्हाला सौम्य लक्षणे असल्यास किंवा लक्षण विरहीत असल्यास तुम्ही घरीच राहायचे हे मुंबईत केले जाते आहे. होम क्वारंटाइन अपयशी झाल्याने आज असलेली स्थिती ओढवली मग परत होम आयसोलेशनची चूक कशासाठी? पूर्ण राज्यात सौम्य व मध्यम लक्षणे असल्यास निचित निदान झालेल्या रुग्णांना दहाव्या दिवशी सुट्टी देऊन उर्वरित ७ दिवस घरीच आयसोलेशन हे निकष पाळले जात आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत हे मान्य पण साथीच्या वाढत्या प्रमाणासोबत सुविधांच्या उपलब्धते प्रमाणे निकष मर्यादित करत नेऊन अपुऱ्या सुविधांना अनुरूप निकष आकसण्याची प्रक्रिया सुरु करायची. की निकष अधिक व्यापक करत आरोग्य सुविधा वाढवायच्या हे ठरवावे लागेल. सध्या तरी दिवसेंदिवस निकष आकसत असून त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आहे. किमान लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे नाकारताना त्यांनी कधी रुग्णालयात जायला हवे अशा ११ रेड फ्लॅग साईन्स म्हणजे धोका दर्शवणारी लक्षणे कोणती याचे सविस्तर समुपदेशन व लिखित माहिती घरी असलेल्या रुग्णांना दिली जात नाही आहे. यामुळे अनेक ‘सायलेंट हायपॉक्सिया’ किंवा ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणजे इतर काहीही लक्षणे नाही पण शरीरातील ऑक्सिजनची पातळी मात्र घसरलेली आढळून आलेल्या व पुढे गंभीर झालेल्या केसेस लक्षात न येण्याचा धोका आहे.त्याच चुका परत नको यासाठी घरी असलेल्या लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणे असून दाखल न करून घेतलेल्या रुग्णांना घरी बोटावर मावणारे पल्स ऑक्सिमीटर वापरून दिवसातून तीन वेळा ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सांगता येईल का? आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत म्हणून रुग्णांना घरी थांबा असे सांगून हा विषय संपवता येणार नाही कारण याची परिणीती मृत्यू दर वाढण्यात होऊ शकते. देशातील एकूण मृत्यू पैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी एक तर घरी रुग्ण ठेवणे टाळावे किंवा ठेवत असल्यास होम मॉनीटरींगचे निकष व रोज या रुग्णांशी ऑनलाईन संवाद व निरीक्षण करायला हवे. घरी लवकर पाठवणाऱ्यांच्या बाबतीत ज्यांना होम आयसोलेशन साठी वेगळी खोली आहे की नाही हे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण कुटुंबासह एक दोन खोल्यात राहतात. किमान अशांसाठी तरी होम आयसोलेशन चे निकष बदलून त्यांना पूर्ण चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे. कारण अपुऱ्या खाटांचे कारण पुढे करत रुग्णांना घरी पाठवून त्यांच्या कुटुंबाला बाधा करण्याचा मार्ग मोकळा करून उलट आरोग्य यंत्रणेवरील ताण पुढे वाढणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हा विषाणू नवीन असल्याने साथ व प्रतिबंधाचे नियोजन करताना चुका होणे सहाजिक आहे. पण आधी केलेल्या चुकांमधून अपरिमित नुकसान झालेले स्पष्ट असताना त्याच चुका पुन्हा करणे मूर्खपणाचे ठरेल.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

सलून व नाभिकांकडे जाताना…

सलून व नाभिकांकडे जाताना...

सलून व नाभिकांकडे जाताना ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये सलून व नाभिकांची दुकाने आता उघडू लागली आहेत. तसेच नंतर नाभिकांकडे जावे लागेलच. त्यामुळे या विषयी नाभिक व केस कापण्यास आलेल्या दोघांनी काळजी घ्याव –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • सलून व नाभिकांकडे जाताना नाभिकांनी शक्यतो पूर्ण पीपीई म्हणजे वयक्तिक सुरक्षेचे कवच वापरावे. पण ग्लोव्हज प्रत्येक ग्राहकांसाठी नवे वापरता येतील असे डिस्पोजेबल प्लास्टीकचे वापरावे. या ग्लोव्हजची किंमत १- २ रु इतकी कमी असते.
  • शक्यतो प्रत्येक ग्लोव्हजसाठी डिस्पोजेबल टॉवेल वापरावा किंवा प्रत्येकाने घरून आपला धुतलेला टॉवेल सोबत घेऊन जावा.
  • सलून व नाभिकांकडे जाताना… जर तुम्ही तुमचे स्वतःचे टॉवेल, अंगावर टाकण्याचा ड्रेप, कात्री, कंगवा, वस्तरा, ब्लेड व स्प्रेयर हे सर्व साहित्य खरेदी केले तरी त्याची किंमत जास्तीत जास्त १००० रुपये असेल. व हे तुम्ही अनेक वर्ष वापरू शकता. म्हणून शक्यतो हे सर्व साहित्य स्वतः खरेदी करावे व वापरावे. याने सलून मधील सर्वांना वापरले जाणारे साहित्य वापरण्याची गरज पडणार नाही.
  • नाभिकांना सलून मध्ये आल्यावर खुर्चीवर बसण्या आधी हात धुऊन व मास्क घालूनच बसण्याची सक्ती करावी. हात धुतल्यावर हँड सॅनीटायजरचा वापर करावा.
  • जर ग्राहकांनी स्वतःचे सामान आणले नसेल तर प्रत्येक कटिंग नंतर साहित्य सॅनीटायजरने धुउन घ्यावे.
  • दर रोज सलून बंद करताना काच , खुर्ची आणि जमीन , काचे समोरचे टेबल १ % सोडियम हायपोक्लोराईटने धुवून घ्यावे.
  • शक्यतो आपला नंबर आल्यावर सलून मध्ये यावे. तो पर्यंत सलून मध्ये गर्दी करून बसू नये. सलून ने वेळ देऊन बोलावण्याची सवय लावावी.
  • कटिंग सुरु असताना आपल्याला काही तरी बोलण्याची , नाभिकाशी गप्पा मारण्याची सवय असते. ग्रामीण भागात तर नाभिकाची खुर्ची म्हणजे गावभरच्या गप्पा, गॉसीपसाठीचे ठिकाण असते. हा मोह टाळावा व शांत बसावे.
  • सलून मध्ये दाढी करणे टाळावे व दाढी शक्यतो घरीच करावी. सलून मध्ये दाढी करत असल्यास त्यासाठी  प्रत्येकाला नवा डिस्पोजेबल खोऱ्या वापरावा.
  • कटिंग किंवा दाढी करताना थोडी जखम झाल्यास त्यावर तुरटी लावू नये. स्वच्छ कापसाने स्पिरीट लावावे.
  • प्रत्येक कटिंग किंवा दाढी झाल्यावर ग्लोव्हज काढून नाभिकाने हात धुवावे.
  • केस कापून झाल्यावर सलून मधून बाहेर पडताना हँड सॅनीटायजर वापरावे व घरी गेल्यावर हात धुवून लगेचच अंघोळ करावी.
  • सर्दी, खोकला, ताप असल्यास सलून मध्ये जाऊ नये, नंतर केस कापावे. तसेच नाभिकाला ही लक्षणे असल्यास त्यांनी बरे वाटे पर्यंत कामावर येऊ नये.
  • ग्रामीण भागात व तालुका पातळीवर नाभिक थोडे अधिक पैसे आकारून घरी येऊन केस कापण्यास तयार असतात. अशी सेवा असल्यास ती घ्यावी व अशा वेळी बाहेर मोकळ्या वातावरणात वरील सर्व काळजी घेऊन केस कापावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगावमधील ‘कोरोना’ च्या प्रादुर्भावाबद्दल वैद्यकीय आणि  विज्ञाननिष्ठ चर्चा करायची झाली तर धार्मिक स्पर्श बाजूला ठेवून धीराने मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण आणि  त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. जसे मुंबई हे महाराष्ट्रच नव्हे तर देशाची कोरोना राजधानी ठरते आहे तशीच मालेगाव ही ग्रामीण व उर्वरित महाराष्ट्राची कोरोना राजधानी ठरण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुधारणा करायची  असेल तर या मुद्द्यांकडे जातीय दृष्टीकोनातून न पाहता तातडीने पावले उचलली पाहिजेत.

     डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मालेगाव मध्ये कोरोना बाधितांचा अधिकृत आकडा ६९६ व कोरोना मृतांचा आकडा ४४  असला तरी खरा आकडा खूप मोठा आहे. मुस्लीम बहूल मालेगाव मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला ८ एप्रिलला म्हणजे रमजानच्या तोंडावर. क्वारनटाईन व आयसोलेशनची भीती, सणाच्या तोंडावर रुग्णालयात जाणे चांगले नाही अशा अनेक गैरसमजांमुळे इथला मुस्लीम समाज तपासणी साठी फारसा पुढे आला नाही. त्यातच जुन्या मालेगाव मध्ये दाटी वाटीने राहात असलेल्या मुस्लीम वस्त्यांमध्ये सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळणे अवघड आहे. यामुळे अधिकृत आकडे आणि  मृत्यू जरी कमी दिसत असले तरी मालेगाव मध्ये गेल्या दीड महिन्यात मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहे. मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये एप्रिल महिन्यात ४५७ मृतदेहांचे दहन करण्यात आले आहे व तुलनेत एप्रिल २०१९ मध्ये केवळ १४० मृतददेहांचे दहन जाहले आहे. प्रशासना कडून मात्र मृतांचा आकडा ४४ सांगितला जात असला आणि  इतर मृत्यू हे कोरोना मुळे नव्हे तर इतर कारणांमुळे होत असल्याचे सांगितले जाते आहे. मुळात मालेगाव मध्ये मृतांचा आकडा हा ४०० – ५०० पेक्षा खूप अधिक आहे आणि  शासनाने खरच खरा आकडा शोधून काढला तर मालेगाव मध्ये  प्रती दशलक्ष मृत्यू दर हा मुंबई व न्युयोर्क पेक्षा खूप जास्त निघेल असे मालेगाव मधील डॉक्टर व काही जाणकार नागरिक सांगतात. आज मालेगावच्या बडा कब्रस्थान मध्ये मृतदेह पुरायला जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे. असे असेल तर मृतांचे स्वॅब घेऊन ते कोरोनाचे होते का  हे सिध्द करायला हवे आणि  खरच इतर कारण असतील तर त्या कारणांचा शोध घ्यायला नको का? इतर कारण आहेत हे प्रशासनाचे उत्तर ग्राह्य धरले तरी या इतर आजार असलेले रुग्णच कोरोनाच्या भक्षस्थळी पडतात.

     मालेगावातील ‘कोरोना’ – हिमनगाचे टोक मृतांचा आकडा वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे साथ सुरु झाल्यावर शासकीय रुग्णालयात रुग्ण हाताळण्यासाठी कुठलीही सक्षम व्यवस्था नव्हती. त्यातच सर्दी खोकल्याचे रुग्ण खाजगी रुग्णालयात पहायचे नाहीत असा नियम असल्याने रुग्णांना शासकीय रुग्णालयात जावे लागायचे. पहिल्या काही दिवसात कोरोनाचे जे मृत्यू झाले ते बहुतांश सायलेंट हायपॉक्सिया मुळे झाले. म्हणजेच रुग्णांना विशेष लक्षणे नाही पण ऑक्सिजनची पातळी मात्र खालावलेली. काही जण खूप उशिरा रुग्णालयात पोहोचत. त्यामुळे साथ सुरु होताच झपाट्याने मृत्यूचा आकडा वाढला. या मुळे शासकीय रुग्णालयात कोरोना चा रुग्ण दाखल झाला म्हणजे मृत्यूच होणार अशी भीती पसरली आणि  या भीती पोटी मुस्लीम समाजात रुग्णालयात दाखल होणे किंवा त्रास होत असल्यास टेस्टिंग साठी पुढे येणे याचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे केसेस व मृत्यू वाढतच गेले. यासाठी स्थानिक प्रशासन सुस्त असून फारसे काही पाऊले उचलत नाहीत हे दिसल्याने इथल्या मुस्लीम डॉक्टर्सने जन जागृतीचे काम सुरु केले. टेस्टिंग आणि  उपचारासाठी पुढे आला नाहीत तर आपल्यालाच धोका आहे हे समाजाला समजावून सांगितले. आता स्थिती काहीशी नियंत्रणात असली तरी अजून सगळे आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. मालेगाव मध्ये मुस्लीम लोकसंख्या ८० टक्के असली तरी टेस्टिंग झालेल्यांपैकी केवळ १० % मुस्लीम आहेत. अजून हे प्रमाण वाढलेले नाही. हा प्रश्न धार्मिक पेक्षा अज्ञानाचा आणि  असुरक्षिततेचा आहे. तो दूर करण्यासाठी कुठला हा आराखडा आणि  मोहीम शासनाने आखलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रशासनाला आदेश दिले आणि  तेवढ्या पूर्ती चक्रे हलली पण परत सगळे जैसे थे झाले.

       मालेगाव हे दुसरे धारावी आहे असे मानून शासनाला वेगळे “मिशन मालेगाव“ आखावे लागणार आहे. राज्यात इतरत्र जसे एकसुरी कार्यक्रम राबवला जातो आहे तसे इथे करता येणार नाही. मालेगावचे प्रश्न वेगळे आहेत आणि  त्यात मुस्लीम समाजाला मोठ्या प्रमाणावर विश्वासात घेऊन पाऊले उचलावी लागणार आहेत. मालेगाव मनपा घरोघरी जाऊन होम स्क्रीनिंग ही करते आहे. पण तरी खरे आकडे बाहेर येणे आणि  त्याप्रमाणे कठोर पाऊले अजून उचल गेली पाहिजे . ‘मिशन मालेगाव’ चे अनेक पदर असू शकतात –

  • खाजगी संस्था / स्वयंसेवी संस्थांकडून वेगळे सर्वेक्षण करून वास्तव पुढे आणणे व खरी माहिती जाणून घेणे.
  • मुस्लीम समाजातील धार्मिक गुरु, मौलवी, डॉक्टर, नेते  यांना विश्वासात घेऊन समाजात टेस्टिंग साठी पुढे येण्या बाबत व मृत्यूची करणे, आजार न लपवण्याबाबत समाजात जन जागृती साठी सहकार्य मिळवणे.
  • मालेगाव मध्ये कापड व हँडलूम व्यवसाया मुळे इथे टीबी व फुफुसाची क्षमता कमी करणारे न्युमोकोनीयासीस या आजाराचे प्रमाण खूप जास्त आहे, ज्या कडे आजवर कधी लक्षच दिले गेले नाही. हे सर्व रुग्ण शोधून  त्यांच्यासाठी उपचाराची  स्वतंत्र सोय करणे गरजेचे आहे  कारण या रुग्णां मध्येच कोरोना मुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.
  • मालेगाव मध्ये एका किलोमीटर मध्ये १० ते २०,००० व एका घरात २० त २५ जन राहतात असा मुस्लीम वस्तीचा मोठा भाग आहे. जर ही लोकसंख्येची घनता अशीच दाट राहिली तर भविष्यात मालेगाव मध्ये कोरोनाचा मोठा स्फोट होईल व असंख्य मृत्यू होतील. मालेगावच्या भोवती जागा उपलब्ध आहे. त्यामुळे मालेगावच्या नगर विकासाचा व मुस्लीम वस्त्यांच्या गर्दी व दाटी वाटीने राहण्याचे प्रमाण  कमी होईल अशा रीतीने पुनर्विकास प्रकल्प आखावा लागणार आहे.
  • रोज ३० ते ४० दहनांमुळे मालेगावच्या बडा कब्रस्तान मध्ये आता मृतदेह पुरण्यास जागा उपलब्ध नाही. तसेच कोरोनाचे समोर न आलेले मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचे दहन संसर्ग पसरू नये यासाठी कसे करायचे याचे नीटसे ज्ञान कोणालाही नाही. म्हणून याविषयी माहिती देऊन कब्रस्तानसाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे आणि  मृतदेहांच्या विल्हेवाटी विषयी जागृती निर्माण करावी लागणार आहे.

          मालेगाव व बसवंत पिंपळगाव ही दोन शहरे नाशिकचा आर्थिक कणा आहेतच तसेच इथल्या संपन्न , सधन बाजारपेठा महराष्ट्राच्या ग्रामीण अर्थचक्राचा मोठा आधार आहेत. मालेगाव मध्ये कोरोना प्रतिबंध गांभीर्याने घेतला नाही तर इथला कापड व इतर उद्योग ढासळून , इथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची आवक थांबून त्याचा नाशिक व राज्याच्या अर्थकारणावर मोठा दुष्परिणाम होईल. म्हणून दडवून ठेवलेला मालेगावचा ग्राउंड रिपोर्ट स्वीकारून तातडीने पाऊले उचलली गेली पाहिजे

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते!

डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते!

डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते! चीन मध्ये व जगात पहिल्यांदा कोरोना बद्दल जाहीरपणे नव्या व घातक विषाणू संसर्गाला सुरुवात झाली आहे असा सुतोवाच करणारे डॉ. ली वेनलीआंग हे नेत्रतज्ञच होते. पुढे त्यांचा ही कोरोनाने मृत्यू झाला. आज दुखाची गोष्ट म्हणजे डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण असू शकते याबद्दल अजून अनेकांना पुरेशी माहिती नाही. भारतात कोरोनाचे काही रुग्ण असे आहेत ज्यांना वैद्यकीय इतिहास विचारल्यावर सांगितले कि त्यांच्या आजाराची सुरुवात डोळे येण्याने झाली होती. तसेच अनेक नेत्ररोग तज्ञांनी डोळे आलेल्या म्हणजे कंजक्टीवायटीस झालेल्या रुग्णांना कोरोनाची शंका व्यक्त केली व तपासणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

महाराष्ट्र ऑफथॅल्मिक सोसायटीचे राज्याचे सचिव नेत्ररोगतज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया सांगतात की सध्या साथीच्या वातावरणात डोळे आलेला रुग्ण कोरोनाचा असू शकतो ही शक्यता आहे. त्यातच जर तुमचा कोरोना रुग्णाशी संपर्क आला असेल, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे कोरोना असल्याचे निदान झाले असेल व तुमचे डोळे आले असतील तर हेच लक्षण कोरोनाची सुरुवात असू शकते. अजून डोळे येणे या लक्षणाची कोरोनासाठी टेस्टिंग करण्याच्या निर्देशात समावेश नसला तरी राज्यातील व देशातील नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेऊन तो करण्याची गरज आहे.

पुढील लोकांचे डोळे आल्यास जास्त शक्यता आहे की डोळे येणे हे कोरोनाचे पहिले लक्षण आहे – -डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ – पोलीस -स्वच्छता कर्मचारी -फिल्ड वर कोरोना वार्तांकन करणारे पत्रकार -थेट लोकांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते – हॉटस्पॉट, कन्टेनमेंट झोन मधील सर्व नागरिक

तुमचे डोळे आले असतील तर काय करावे

  • आपल्या नेत्र रोगतज्ञांना फोन द्वारे फोटो पाठवून टेली कन्सलटेशन घ्यावे.
  • आपण कोरोनाची जोखीम जास्त असलेल्या वर दिलेल्या घटकात आहात का ? हे सांगावे.
  • नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय इतिहास जाणून तुम्हाला कोविड रुग्णालयात जायचे का व कोरोनाची तपासणी करणे गरजेचे आहे का ? या विषयी पुढील सल्ला देतील.
  • डोळे येण्यासाठी औषध दुकानातून प्रीस्क्रीपशन व नेत्र रोगतज्ञांच्या सल्ल्या शिवाय ओव्हर द काऊनटर डोळ्याचे ड्रॉप घेणे हे सर्रास केले जाते. पण साथीच्या या काळात व इतर वेळी ही असे मुळीच करू नये. याने डोळ्यांना इजा होऊ शकते .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता

पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता

पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता कुत्रे मांजर या घरातील पाळीव प्राण्यांना ही मानवा कडून कोरोना संसर्गाचा धोका आहे. म्हणून   पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे समजून घ्यायला हवे . त्यासाठी खालील टिप्स –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • पाळीव प्राण्यांचा कोरोनापासून बचाव आणि संसर्गाची शक्यता पाळीव प्राण्यांना कोरोना बाधित व्यक्ती कडून संसर्ग होण्याचे काही पुरावे इतर देशांमध्ये सापडले आहेत म्हणून अशी व्यक्ती अलगीकरणात राहते तेव्हा प्राण्यांपासून ही लांब राहावे.
  • पाळीव प्राण्यांकडून मानवाला संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे व अजून यावर पुरेसे संशोधन झालेले नाही. म्हणून पाळीव प्राण्यांना आधी सांभाळ करताय तसेच करायला हरकत नाही. मात्र पाळीव प्राणी आजारी असल्यास त्याचे त्वरित उपचार करावे.
  • पाळीव प्राण्याची तब्येत बरी नसल्यास त्याच्या जवळ जाताना मास्कचा वापर करावा व प्राणी हाताळल्यावर हात धुवून घ्यावे.
  • बाहेर गेल्यावर मानवाने जे इतरांना पासून ६ फुट लांब राहण्याचा सोशल डीस्टन्सिंगचा नियम पाळावे.
  • पाळीव प्राण्यांना इतर घरातील पाळीव प्राण्यांशी संबंध येऊ देऊ नये
  • पाळीव प्राण्यांना नियमित अंघोळ घालने व त्यांची स्वच्छता ठेवणे
  • ५ वर्षा खालील मुले व ६० वर्षा वरील ज्येष्ठांनी शक्यतो पाळीव प्राण्यांपासून लांब राहावे .
  • लॉकडाऊन नंतर प्रवास करायचा झाल्यास पाळीव प्राण्यांना सोबत घेऊन प्रवास करणे टाळावे.
  • पाळीव प्राण्यांची व तुमची झोपण्याची जेवणाची जागा शक्यतो वेगळी ठेवा
  • वेटरनरी प्राण्यांच्या डॉक्टरांकडून घरातील पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण पूर्ण करून घ्या .

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता