बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती ?

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक

२२ जीव गेले , द्या ना पाच लाख प्रत्येकी

प्रेतं जाळायला सरपण कमी पडू देणार नाही

किंबहुना प्रेतांना सरपण मिळायलाच हवं, मिळेलच , का मिळू नये ?

ऑक्सिजन पाहिजे ? लष्कराचं विमान येईल ना

ऑक्सिजन प्लांट लावा , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्या म्हणताय ?

घेऊ ना लवकरच,

आधी कॅबिनेट बैठक संपू द्या

मग अधिकाऱ्यांची मीटिंग ,

मग टेंडर ,

मग खरेदी

तो पर्यंत किती बरे झाले?

ते पण एकदा बघा ना

रेमडीसिवीर?

अरे आहे ना

काळ्या बाजारात मिळतंय की हवं तेवढं

बेड मिळत नाही?

मग लॉकडाऊन लावू या ना

पंढरपूर निवडणुकीची सभा तर संपू द्या

बेडसाठी कडक निर्बंध लावू ना

आयसीयू बेड वाढवायचे ?

कशासाठी ? अरे हा मर्दांचा महाराष्ट्र आहे …

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरायच्या ?

स्मशानजोग्यांच्या ही भरुया …

किंबहुना भरायलाच हव्या

बोलूया ना फेसबुक लाइव्ह मध्ये

अॅम्बुलन्सची कमतरता

तोच अभ्यास करायला तर आमदारांना मोफत लॅपटॉप दिले

भूमिपूजन , झालं ना … पुतळा तर कधीच झाला ..

कोरोना मृतांचं स्मारक त्याहून मोठं करू

ऑक्सिजन अभावी गेलेल्यांना त्यात विशेष जागा देऊ

निवडणूक या मुद्द्यावर होईल असं वाटत नाही

बराच वेळ आहे अजून

तोपर्यंत घडेल काही तरी मुद्द्यांचं , तेव्हा ठरवू काही करायचं का …

नाशिक ऑक्सिजन मृतांच्या

जाती बघायच्या राहिल्या

पत्रकार परिषदेत तोच मुद्दा उचला

पॉलिटिकल नॅरेटिव्ह एवढ्या वर्षात कसा कळत नाही तुम्हाला

अहो हा शाहू, फुले, आंबेडकर , शिवरायांचा महाराष्ट्र आहे

ऑक्सिजन , बेड , रेमडीसीवीर येईल कि दुसऱ्या राज्यातून

“लवकरच”

तोपर्यंत तीन नियम विसरू नका

निर्लज्जपणाचा मास्क लावा , जमेल तस दुसर्या लाटेत वारंवार हात धुवून घ्या, समाज,

समस्या आणि उपायांपासून सामाजिक अंतर पाळा

बाकी चालू द्या…

ए स्कोर काय झाला रे?

आज आयपीएलच्या दोन मॅच आहेत ना??

डॉ अमोल अन्नदाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *