लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

अमेरिका, जपान, सिंगापूरसह इतर २० देशांनी काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने १२ वर्षांपुढील कुमारवयीन मुलांचा समावेश असला तरी या देशांमध्ये २ वर्षांच्या पुढच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. फायजरसारख्या  लसींच्या इतर देशांतील लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्या असल्या तरी  भारतात या ट्रायल्स अजूनही सुरू आहेत. भारतातील पालक लहान मुलांसाठी कोरोना लस कधी उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा साहजिक असली तरी सहज करता येतील व उपलब्ध आहेत त्या गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या राहून गेल्या आहेत. जी लस उपलब्ध आहे ती फक्त शास्त्रीय प्रयोग पूर्ण झालेले नाहीत म्हणून लहान मुलांना देता येत नाही. अशा लसीला ‘ऑर्फन व्हॅक्सिन’ किंवा ‘अनाथ लस’ असे म्हणतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तिन्ही लसी अशाच लहान मुलांसाठी अनाथ ठरत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या लहान मुलांमधील शास्त्रीय प्रयोगांचा आढावा घ्यायचा झाल्यास फायजर, मॉडर्ना व सायनोफार्म या तीन लसींचे १२ ते १८ वर्षे वयोगटात प्रयोग यशस्वी झाले असून, त्यांची लहान मुलांमधील परिणामकारकता व सुरक्षितता ही मोठ्या व्यक्तींमध्ये आहे तेवढीच असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायलमध्ये तर फायजर लसीचे प्रयोग हे ६ महिने ते १८ वर्षे या वयोगटात सुरू आहेत. म्हणूनच २० देशांत १२ वर्षांच्या पुढे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फायजरचे लहान मुलांसाठी ६ महिने वयाच्या पुढे प्रयोग शेवटच्या टप्प्यात आहेत व लवकरच पूर्ण होणार असल्याने तीही लस सर्वच लहान मुलांसाठी वापरता येईल, असे सांगितले जाते आहे.

भारतात सध्या ३ वर्षे ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीच्या वापराच्या प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरा भाग नागपूर येथे सुरू आहे. यात मुलांना दुसरा डोस देऊन एक महिना झाला आहे. या प्रयोगाचे अधिकृत निकाल अजून जाहीर झाले नसले तरी या प्रयोगात सहभागी डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे अजून कुठल्याही मुलावर कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. तसेच पहिल्या डोसनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी समाधानकारक आढळून आली आहे. हा अभ्यास पूर्ण होऊन त्याचे अंतिम निष्कर्ष जाहीर होण्यास तीन ते चार महिने व ते प्रकाशित होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता आहे. 
कोविशिल्डच्या लहान मुलांमधील ट्रायल्स इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव त्या थांबविण्यात आल्या. स्पुतनिक या लसीच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स अजून कुठेही सुरू झालेल्या नाहीत.
– म्हणजे सध्या फक्त कोव्हॅक्सिनकडूनच लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. पण, या लसीचे उत्पादन खूप कमी आहे व ते अजून मोठ्या व्यक्तींनाच पुरेनासे झाले आहे. 

हान मुलांमध्ये कोरोनाचा आजार खूप सौम्य आहे म्हणून लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असा केंद्र सरकारचा होरा आहे. लहान मुलांमध्ये आजार सौम्य असला तरी १५ वर्षांपुढील मुलांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत आढळून आली आहे. तसेच इतर सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यावर चार ते सहा आठवड्यांनी एमआयएससी ही जीवघेणी गुंतागुंत दिसून येत आहे. मुलांमध्ये कोरोना व त्यानंतर गुंतागुंतीत मृत्युदर कमी असला तरी तो शून्य नाही. तसेच लहान मुले  लक्षणविरहित व सौम्य असल्याने घरातील इतर ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वांत मोठे स्रोत (सुपर स्प्रेडर) ठरतात. 

हर्ड इम्युनिटी (समूह / कळप प्रतिकारशक्ती)साठी देशातील ७० ते ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हावे लागते. देशात ० ते १४ या वयोगटात ३५.३ % व १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ४१ % लोकसंख्या आहे. या ४१ % लोकसंख्येच्या लसीकरणासाठी घाई न करता हर्ड इम्युनिटीचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे. 
‘सर्व जण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही’ हे कोरोना लसीकरणाचे मुख्य सूत्र आहे. या ‘सर्व जण’चा महत्त्वाचा घटक असलेल्या लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबतच्या हालचालींचा अत्यंत संथ वेग कोरोनाविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा?

कुठली लस चांगली याचे उत्तर  “जी उपलब्ध आहे ती”  एवढे सोपे आहे.  म्हणून  “कुठली घ्यावी”  यापेक्षा  “लस घ्यावी”  हेच महत्त्वाचे !

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या अनुभवांवरून हा टप्पा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य व शासन, प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर काही सुधारणा आवश्यक आहेत. साठीच्या पुढे व इतर आजारांसह पंचेचाळीशीच्या पुढे असलेल्यांचे लसीकरण आता सुरू झाले असले, तरी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला टप्पा अजून अपूर्ण आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संख्येपैकी केवळ ५० टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. दुष्परिणामांची भीती व लस घेऊनही कोरोनाची लागण होते या दोन गैरसमजांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर नैसर्गिक कारणांमुळे झालेले मृत्यू व दुष्परिणामांचे संबंधही लसीशी जोडण्यात आल्याने काही आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकडे पाठ फिरवली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे व एक दिवसासाठी अंगदुखी, थोडा ताप, थकवा हे तुरळक परिणाम सोडता लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे जीवघेण्या दुष्परिणामांची कुठलीही शक्यता मनात न आणता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने आणखी एकाला लसीकरणासाठी प्रेरित करणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हा सध्या देशसेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास काहीजण उत्सुक नव्हते. दोन डोस शिवाय पूर्ण प्रतिकारशक्ती येणे शक्य नाही. दुसरा डोस न घेणे म्हणजे पहिला डोस वाया घालवण्यासारखे आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची तारीख चुकवून ती उद्यावर ढकललेल्यांचे लसीकरण इच्छा असूनही चालढकल केल्यामुळे राहून गेले असे पहिल्या टप्प्यातले निरीक्षण आहे.  आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी लस घेणे हे  सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे प्राधान्य आहे असे ठरवून सकाळच्या सत्रातच लस घेण्याचा निश्चय करावा. एखाद्या साथीच्या रोगावर मात करायची असते तेव्हा कमी वेळात जास्त लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक असते. सध्या देशातील केवळ ०.६ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग संथ आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना लसीकरण बंद ठेवून चालणार नाही. शासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हालचाली तेव्हाच होतील जेव्हा लसीकरण केंद्रावर मागणी वाढेल. म्हणून आपल्याला ठरवून दिलेली तारीख न चुकविणे गरजेचे आहे. 


पहिल्या टप्प्यातील बॅक लॉग पाहता प्रत्येक टप्प्यावर असाच लस न घेणाऱ्यांचा बॅक लॉग राहिला तर  लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी म्हणजे कळप/सामूहिक प्रतिकारशक्तीच्या मुख्य हेतूपासून आपण वंचित राहू व सर्व मुसळ केरात जाईल. म्हणूनच प्रत्येकाने आरोग्य साक्षरता दाखवत साथ रोखण्यासाठीची  इच्छाशक्ती सिद्ध करण्याची ही वेळ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी विचलित होण्याची गरज नाही. लस ही आजारासाठी कवच कुंडले आहेत, पण तो काही अमरत्व देणारा अमृत कलश नाही. म्हणून इतर प्रतिबंधक उपायांचे महत्त्व याने कमी होत नाही. लस घेतल्यावर कोरोनासंसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल. म्हणजेच लसीचे मुख्य ध्येय हे मृत्यू टाळणे हे आहे हे समजून घ्यावे. 
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. दोन्ही लसी शासनाने सखोल वैज्ञानिक चिकित्सेअंति उपलब्ध केल्या आहेत म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच सध्या प्राधान्य असले पाहिजे. 
शासनाने लसीकरण धोरणात  काही बदल केला तर लसीची परिणामकारकता वाढवता येऊ शकते. सध्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ५६ टक्के प्रतिकारशक्ती मिळणार आहे. हे अंतर जर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवले तर लसीची परिणामकारकता ८० टक्केपर्यंत वाढू शकते. तसे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनेही दिले आहेत.  म्हणून पहिला डोस घेणाऱ्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यापेक्षा तो इतर लस न मिळालेल्यांना पहिला डोस म्हणून देता येईल (या धोरण सुधारण्यासाठी सूचना आहेत, पण सर्वसामान्यांनी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे चार आठवड्यांच्या अंतरानेच दुसरा डोस घ्यायचा आहे) 
दुसरा डोस लांबविण्याचा शासकीय पातळीवर फायदा असा होईल की पहिल्या डोस नंतरही काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होतेच व जास्तीत जास्त जनतेला कमी वेळात पहिला डोस मिळाला तर संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर व दुसऱ्या लाटेची शक्यता अशा अनेक गोष्टी कमी होतील.  दुसरा डोस लांबल्याने प्रतिकारशक्तीही जास्त प्रमाणात निर्माण होईल. 
दुसरा डोस लांबवून पल्स पोलिओच्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात पहिला डोस देण्याचा विक्रम प्रस्थापित करणे हा हर्ड इम्युनिटीसाठीचा राजमार्ग ठरू शकतो. यासाठी निश्चित काळ निर्धारित करून देशात उपलब्ध असलेले ८ लाख डॉक्टर व २० ते २५ लाख आरोग्य कर्मचारी सरकारच्या एका हाकेवर हे शिवधनुष्य नक्कीच पेलून धरतील. 


तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? फ्रान्समध्ये आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आधी संसर्ग झाल्याने त्यांच्यासाठी पहिला डोस हा काही प्रमाणात दुसऱ्या बुस्टर डोससारखा काम करण्याची वैज्ञानिक शक्यता आहे. याचाही हेतू जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस कमी वेळात देण्याचाच आहे. 
लसीकरण धोरण राबविताना  आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या, कमी मनुष्यबळ असलेल्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.  ग्रामीण भागातील  जनता कोविन ॲपवर नोंदणी व प्रवास करून गावातून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात येईल ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. अगदी गंभीर आजारासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची  आर्थिक व मानसिक क्षमता नसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला लसीकरण मोहिमेत कसे सामावून घेता येईल याचे सूक्ष्म नियोजन अजून आरोग्य खात्याकडे नाही. समाजाच्या या स्तरासाठी लसीकरण गाव-खेड्यात न्यावे लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का?

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? कोरोना’साठी जर आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असतील व शासनाने जरी या उपचाराच्या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी खासगी रुग्णालयातील काही रुग्णांचा खर्च ५ लाखांपर्यंत ही गेला आहे. याचे कारणही तसेच आहे. जर कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ झाला व त्याला महागड्या औषधांची गरज पडली, तर हा खर्च शासनाने ठरवलेल्या दरात समाविष्ट नाही व रुग्णालयाला वेगळे पैसे आकारावे लागतातच. शिवाय, जर व्हेंटिलेटरची गरज पडली तर खर्च वाढतोच. म्हणून यासाठी काही विमा कंपन्यांनी वेगळा कोरोनासाठी विमा सुरू केला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

‘कोरोना’साठी वेगळा आरोग्य विमा घ्यावा का? हा विमा घेताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.जर आपला आधी काढलेला आरोग्य विमा असेल व याचे प्रीमियम आपण नियमित भरत असाल, तर वेगळ्या कोरोना आरोग्य विम्याची गरज नाही.आरोग्य विमा असल्यास तो प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाखांची सुरक्षा देणारा असावा किंवा नसल्यास तो वाढवून घ्यावा. जर आरोग्य विमा नसेल तर वेगळा कोरोना विमा घ्यावा. कोरोना झाल्यास किंवा घरात इतर कोरोनाची जोखीम वाढवणारे आजार असलेली व्यक्ती असल्यास त्यासाठी उपचाराचे आर्थिक नियोजन करून ठेवावे. काही खर्च कमी करून कधीही वापरता येतील, अशी पैशांची तजवीज असावी. कोरोना विमा वार्षिक रुपये १५० पासून ते ५००० पर्यंत उपलब्ध आहे. व यात २५,००० पासून ते ५ लाखांपर्यंत विमा सुरक्षा आहे. यात काही सरसकट पूर्ण ठरवलेली विम्याची रक्कम देण्यात येते, काही विम्यामध्ये भरती होण्याची गरज व खर्चाप्रमाणे देण्यात येते. काही विमा हा तुम्ही काही विशिष्ट दुसऱ्या व तिसºया पातळीची शहरे किंवा ग्रामीण भागात राहात असाल त्यांच्या साठीच आहेत व काही विम्यामध्ये अतिदक्षता विभागात दाखल झाल्यास किंवा व्हेंटिलेटरच गरज पडल्यास विम्याची रक्कम मिळत नाही. म्हणून विमा घेताना या गोष्टींचा खुलासा करून घ्यावा.प्रत्येक विम्याला लागू होण्यास विमा काढल्यापासून १४-१६ दिवसांचा अवधी आहे.बºयाच विम्यामध्ये संपर्क आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागले तर आजारी पडल्यावर मिळणार त्याच्या ५०% रक्कम दिली जाते. शक्यतो क्वारंटाइनमध्ये ही विमा सुरक्षा देणाºया पॉलिसीची निवड करावी.शक्यतो ज्या विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे म्हणजे क्लेम अंतर्गत पैसे देण्याचे प्रमाण जास्त आहे त्या कंपनीचा विमा घ्यावा. ही सर्व विमा कंपन्यांची माहिती कफऊअक उपलब्ध करून देते.प्रत्येक विम्याचा काळ फक्त१ वर्ष असतो याची नोंद घ्यावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही

कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही, एका प्रसिद्ध आयुर्वेद कंपनीने मोठी जाहिरात करून बाजारात आणलेले कोरोनावरील औषध अजून कोरोना साठीचे अंतिम औषध किंवा रामबाण उपाय म्हणून मान्यता मिळालेले नाही. आयुष मंत्रालय व आयसीएमआरने या औषधाची जाहिरात थांबवावी, असे निर्देशही या कंपनीला दिले आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कुठल्याही कंपनीचे आयुर्वेदिक औषध अजून कोरोनावर रामबाण व अंतिम उपचार नाही आयुर्वेदाचा कोरोना उपचारात व लक्षणविरहित कोरोनारुग्णांसाठी कसा उपयोग करू शकते, याविषयी आयुष मंत्रालय कार्य करते आहे. तसेच, महाराष्ट्रातील वैद्यांचा टास्क फोर्स यावर काम करतो आहे.संबंधित कंपनीने आणलेल्या औषधांचे ट्रायल घेतले आहे, असा दावा त्यांच्याकडून केला गेला आहे. पण, एखादे क्लिनिकल ट्रायल यशस्वी आहे व संबंधित औषध आता वापरले जाऊ शकते, यासाठी काही निकष असतात. यात किती लोकांवर ते केले आहे (सॅम्पल साईज), त्या अभ्यासाचा प्रकार कसा होता (स्टडी डिझाईन), त्या क्लिनिकल ट्रायलचे विश्लेषण करण्यासाठी हाती आलेल्या निकालाचे कसे विश्लेषण केले आहे. (स्टॅटीस्टीकल मेथड), त्याचे नंतर टीकात्मक विश्लेषण (क्रिटीकल अ‍ॅनॅलिसीस) झाले का व याचे स्टॅस्टीटीक्स म्हणजे संशोधनातील आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्यां कडून चाचपणी व इतर तज्ज्ञांकडून मते मागवणे (पीर रिव्हीव्यू) या कुठल्याही पद्धतीने या औषधाचे क्लिनिकल ट्रायल केलेले दिसत नाही. या कंपनीचे आयुर्वेदिक औषधच काय, पण इतर कुठले ही अ‍ॅलोपॅथीचे औषध ही अजून या निकषात बसून कोरोनासाठी शंभर टक्के उपचार म्हणून मान्यता पावलेले नाही. नुकतेच जे औषध एका कंपनीने बाजारात आणले आहे त्याचा प्रचार समाज माध्यमांवर व वैयक्तिक पातळीवर सुरु झाला आहे. पण, अशा औषधापासून सर्वांनी सावध राहायला हवे. आयुर्वेद नक्कीच पुरातन चिकित्सा पद्धती आहे व आयुष मंत्रालय यावर वेळोवेळी निर्देश देते आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे सोडूनइतर कुठले ही कंपनीचे कोरोनासाठी उपाय म्हणून बाजारात आणलेले औषध घेऊ नये. तसेच आयुष मंत्रालयाचे बहुतांश निर्देश हे प्रतिबंधासाठी आहेत. हे घेत असताना अ‍ॅलोपॅथीचे उपचार सोडू नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?

एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का? तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

कोरोना तपासणीसाठी नवे निकष

कोरोना तपासणीसाठी नवे निकष नुकतेच आयसीएमआर या कोरोनाविषयी तपासणी व उपचाराचे  वैद्यकीय धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संस्थेने कोणाची कोरोना तपासणी करायला हवी याचे नवे निकष जाहीर केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. पुढील व्यक्तींची आता कोरोना तपासणी करावी असे आयसीएमआरचे निर्देश आहेत –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

पुढील निर्देशात श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे याचा अर्थ १००.४ डिग्री फॅरनहाईट पेक्षा जास्त ताप आणि खोकला असा आहे

  • गेल्या १४ दिवसात अंतरराष्ट्रीय प्रवास झाला असून अशा व्यक्तीला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • निदान निश्चित झालेल्या केस च्या संपर्कात आलेल्या कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • कंटेनमेंट भागात व कोरोना संदर्भात कार्यरत असलेले सर्व कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • सारी म्हणजे ताप, खोकला , श्वास घेण्यास त्रास
  • कोरोना तपासणीसाठी नवे निकष निदान निश्चित झालेल्या केसच्या थेट संपर्कात आलेली लक्षण विरहीत  आलेली आणि जोखीम वाढवणारे घटक ( ६० पेक्षा जास्त वय, ६० च्या खाली वय व इतर मोठे आजार ) असल्यास त्यांची संपर्क आल्या पासून पाचव्या ते चवदाव्या दिवसा पर्यंत तपासणी करणे
  • हॉटस्पॉट व कन्टेनमेंट झोन मध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • रुग्णालयात दाखल असलेल्या कुठल्या ही रुग्णाला  श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • स्थलांतरितांमध्ये कुठल्या ही व्यक्ती ला श्वसनमार्ग संसर्ग नुकतीच आलेली लक्षणे असल्यास
  • कुठलीही प्रोसिजर किंवा शस्त्रक्रिया करत असताना वरील कुठल्या ही निकषांमध्ये रुग्ण बसत असल्यास तपासणी करून प्रोसिजर करावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य

कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी आपले नाक व तोंड हा मुख्य मार्ग आहे. जर आपले मौखिक आरोग्य चांगले असेल तर आपल्याला कोरोनाचा धोका कमी संभवू शकतो. त्यामुळे कोरोन साथीच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी पुढील काही महत्वाच्या गोष्टी

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  1. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य घरातील सर्व व्यक्तींचे टूथब्रशेस एकाच ठिकाणी ठेवले जातात परंतु कोरोनाच्या वातावरणात ब्रश प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. रोज टूथब्रश बॉक्स किंवा प्लास्टिक बॅग ठेवावा लहान मुलांच्या ब्रश ची विशेष काळजी घेण्यात यावी.
  2. सर्व सदस्यांसाठी एकच टूथपेस्ट वापरली जाते, त्याऐवजी शक्य झाल्यास वेगवेगळ्या स्मॉल साइज टूथपेस्ट वापराव्यात.
  3. दात कोरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथ पिक्स पेपर मध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकाव्यात,  बऱ्याचदा उघड्यावर टाकण्यात येतात.
  4. घरातील प्रत्येकासाठी डेंटल फ्लॉसच्या  वेगळ्या बॉक्सेस चा वापर करण्यात यावा व पेपरमध्ये गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
  5. घरातील एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला झाला असल्यास त्यांनी वेगळ्या  बेसिनचा वापर करावा. 
  6. जीभ स्वच्छ करण्याचे टंग क्लीनर , इंटर डेंटल ब्रश  वापरल्यावर गरम पाण्यात बुडवून ठेवावे व नंतर  बंद कंटेनरमध्ये  ठेवावे
  7. कोरोना रोखण्यासाठी मौखिक आरोग्य दंततज्ञ डॉ. अनघा राजवाडे यांच्या वृद्धांनी काढता येणारी कवळी  रात्री झोपताना कवळी बॉक्समध्ये पाण्यात काढून ठेवताना रोज dentures cleaning tablet वापरावी ( इतर वेळी आठवड्यातून एकदा वापरली जाते ) कवळी स्वच्छ करण्यासाठीचा ब्रश  पण रोज वेगळ्या डब्यात ठेवावा. लहान मुलांनी काढलेल्या कवळीला हात लावू नये  याची काळजी घ्यावी.घरातील सर्वजण वापरत असलेल्या कॉमन बेसिन जवळ कवळी  ठेवू नये. स्वतंत्र कप्पा करावा.
  8. दंत तज्ञांकडे उगीचच जाऊ नये. जर तातडीचे उपचार गरजेचे असतील तरच जावे. फोन वर सल्ला घेऊन पुढे ढकलण्या सारखी प्रोसीजर असेल तर पुढे ढकलावी.
  9. रूट कॅनाल उपचार किव्हा इम्प्लांट टाकण्याची प्रोसिजर सुरु असेल  अश्या रुग्णांनी विशेष स्वच्छता ठेवावी, किडलेल्या दाता मध्ये अन्न अडकून राहू नये म्हणून प्रत्येक जेवणानंतर ब्रश करणे गरजेचे आहे
  10. सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे अनिवार्य आहे.
  11. सुजलेल्या हिरड्या व तापमानाची संवेदना वाढली असेल तर घरा बाहेर पडून मेडिकल वरचे  महागडे mouthwash, mouth rinse  वापरण्यापेक्षा मीठ + हळद यांचे कोमट मिश्रण वापरून खळखळून गुळण्या करणे आवश्यक आहे. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी साध्या पाण्याने  दिवसातून एकदाच नव्हे तर प्रत्येक जेवणानंतर चूळ व गुळण्या करणे आवश्यक आहे.
  12.  लहान मुलांना रात्रीच्या वेळी वापरायची काढता येतील अशी आपलायन्स  दिली जातात त्यांची विषय स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी.

    सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा!

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सध्या राज्यातील काही भाग हा ऑरेंज व ग्रीन झोन आला असला तरी या भागासाठी आता कोरोनाचा धोका १०० % टळला असे अनेकांना वाटते आहे. या विषयी आपला भाग अमुक अमुक झोन मध्ये आल्या बद्दल शुभेच्छा, अभिनंदनाच्या  इमेजेस ही समाज माध्यमांवर काही जणांनी प्रसारित केल्या. पण ऑरेंज म्हणजे गेल्या १४ दिवसात १५ केसेस पेक्षा कमी केसेस अढळल्या नाहीत आणी ग्रीन झोन म्हणजे गेल्या २८ दिवसात एक ही रुग्ण अढळला नाही एवढाच आहे. रुग्ण संख्या कमी असल्याने स्थानिक उद्योगांना चालना मिळावी म्हणून काही गोष्टींना परवानगी दिली आहे. पण याचा अर्थ इतर भागातून आत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीतून आपला कोरोना बाधिताशी संपर्क येणारच नाही म्हणून साजरीकरण करू नये व नियम धुडकावून लावू नये. या दोन्ही झोन मधील लोकांनी पुढील गोष्टी पाळाव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! ज्या गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी मिळतात, नित्य सेवा, खरेदी तिथेच कराव्या, गरज नसताना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये.
  • परवानगी असली तरी अनावश्यक प्रवास टाळावा.
  • कुठल्याही झोन मध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी आहे या सूक्ष्म गोष्टीचा विसर पडू देऊ नये.
  • परवानगी असली तरी गरज नसलेल्या गोष्टी, कपडे, चैनीच्या गोष्टी उगीचच ई कॉमर्सच्या माध्यमातून मागवू नये.
  • कुरिअर व पोस्ट सेवा ही सर्व झोन मध्ये सुरु झाल्या असल्या तरी उगीचच या सेवेचा लाभ घेऊ नये. अत्यावश्यक गोष्टींसाठीच याचा वापर करावा. कागदपत्रे उगीचच पोस्टाने पाठवू नये. त्यासाठी इ- मेलचाच वापर करावा.
  •  ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये असणाऱ्यांनो, सतर्क रहा! सोशल डीस्टन्सिंगच्या नियमाची सर्वात जास्त तुडवणूक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर होण्याची शक्यता आहे व अचानक या दुकानां भोवती मोठी गर्दी उसळते आहे. या साठी मद्य विक्रेत्यांनी स्वतःला शिस्त लावून सोशल डीस्टन्सिंग व दुकानांभोवती लोक एकमेकांपासून लांब उभे राहतील याची काळजी घ्यावी .
  •  कुठल्या ही झोन मध्ये असले तरी ताप, सर्दी, खोकल्याच्या व्यक्तीने घरा बाहेर निघायचे नाही आहे व स्वतःला कटाक्षाने इतरांपासून १४ दिवस लांब ठेव्याचे आहे.
  • डॉ. अमोल अन्नदाते

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

चाचणीचे निकष बदला

चाचणीचे निकष बदला महाराष्ट्रात करोना चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, यापलीकडे जात तपासणीचा गुणात्मक दर्जा कसा सुधारता येईल आणि तपासणीचे निकष सीमित असल्याने आपण निदान करण्यात कमी पडतो आहोत का, हे पाहायला हवे. याचे कारण उशिरा निदानामुळे मृत्यूचे प्रमाण खूप आहे. आमची तपासणी जास्त म्हणून केस जास्त, या युक्तिवादापेक्षा आपण कुठे सुधारणा करू शकतो, हे जाणून घेणे योग्य ठरेल.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

चाचणीचे निकष बदला सध्या मुंबई ही देशाची करोना राजधानी आहे; म्हणून मुंबईत करोना कसा रोखला जाईल, ही लिटमस टेस्ट असेल. करोनाचे ६९ टक्के रुग्ण लक्षणहीन असतात. तेच ‘सुपर स्प्रेडर’ म्हणजे, जास्त लोकांना व झपाट्याने संसर्ग देणारे ठरत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या चाळणीत तपासणीचे निकष बदलले असल्याने हे रुग्ण निसटून जात आहेत. मुंबईमध्ये संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी न करता, ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसतात, त्यांचीच तपासणी होत आहे. यामुळे संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण की होम क्वारंटाइन, हा निर्णय घेण्याचा पायाच खिळखिळा झाला आहे. होम क्वारंटाइन हा प्रकार दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अपयशी ठरूनही, संपर्कात आलेल्या सर्वांना न तपासण्याची जोखीम का घेतली जाते? राज्यात वेगळाच प्रश्न आहे. तपासणीसाठी ‘सारी’ म्हणजे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास हा निकष शासकीय यंत्रणेत पाळला जातो आहे. आता करोनाचे रुग्ण या मर्यादित लक्षणांसह येत नाहीत. इतर विविध लक्षणे आढळणारे रुग्ण रुग्ण तपासणीसाठी शासकीय यंत्रणेत पाठवले, तर संशयिताच्या व्याख्येत बसत नाहीत, म्हणून सरकारी करोना तपासणी केंद्रात त्यांची तपासणी नाकारली जाते. त्या रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतरच्या तपासणीत ते पॉझिटिव्ह आढळतात. यामुळेच संशयितांची तपासणी अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. केसचे निदान हुकणे या घडीला अजिबात परवडणारे नाही. तपासणी व्यापक केल्यास ‘उशिरा निदान’ या मृत्यूच्या प्रमुख कारणाला अटकाव करता येईल.
संशयित ही व्याख्या कशी बदलते, हे काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल. महाडचे डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पहिला रुग्ण पाहिला. त्याला अनियंत्रित जुलाबांचा त्रास होता व बऱ्याच उशिरा श्वसनाचा त्रास झाला. या रुग्णाचा पुढे मृत्यू झाला. उपचाराला प्रतिसाद न देणारे अनियंत्रित जुलाब, हे नेहमीपेक्षा वेगळे लक्षण दिसल्याने, त्यांना तो रुग्ण करोना संशयित असल्याचे जाणवले. रुग्णाच्या पतीला फक्त भूक लागत नव्हती. पत्नीचा मृत्यू झाल्यावर तपासणी केली असता तोही करोनाग्रस्त आढळला. खारघरचे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मते, ज्येष्ठ नागरिकांमधील थकवा येणे आणि सतत झोपेत राहणे, या दोन लक्षणांचे रुग्ण पुढे करोनाग्रस्त आढळू शकतात. संशयित रुग्ण ठरवताना, नातेवाइकांच्या मताला महत्त्व देणे आवश्यक आहे. नेहमी आजारी पडल्यास आपला नातेवाइक कसा असतो, कसा प्रतिसाद देतो, हे घरात माहीत असते. ‘आधी सर्दी-खोकला असताना इतका आजारी वाटायचा नाही आणि दोन दिवसांत झपाट्याने कोसळणारी तब्येत,’ हे नातेवाइकांचे मत तपासणी करण्यास पुरेसे आहे.

चाचणीचे निकष बदला कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे घ्राणशक्ती कमी झाल्याचे, करोनाचे पहिले लक्षण घेऊन रुग्ण येत आहेत. अर्धांगवायू व मेंदूशी संबंधित लक्षणे करोनामध्ये दिसत आहेत. हा नवा आजार आहे. ‘सारी’ हे सर्वाधिक आढळणारे लक्षण असले, तरी अशा एकाच पॅटर्नमध्ये करोना येणार नाही, हे सरकारने समजून घ्यायला हवे. ‘हाय क्लिनिकल सस्पिशन,’ म्हणजे ‘लक्षणांवरून संशय गडद होणे,’ हे डॉक्टरांचे मत तपासणी करताना ग्राह्य धरावे, असे शासनाला ठरवावे लागेल. करोना निदान झालेले रुग्ण पहिल्या दिवसापासून नेमकी कुठली लक्षणे घेऊन आले आहेत, याची माहिती संकलित करून, ती डॉक्टरांना उपलब्ध करून दिल्यास, करोना कसा वागतो आहे, या ज्ञानात भर पडून, त्याचे निदान लवकर होईल. एका अॅपद्वारे ही माहिती संकलित करून, डॉक्टरांना त्यांच्याकडील करोनारुग्ण कसा आला, हेही सांगण्याची सोय करता येईल.
तपासणी किती वेळा केली आहे, याबरोबर तपासणी कशी केली जाते आहे, यावर सध्या कुठलेही नियंत्रण नाही; म्हणून सुरुवातीला करोनामुक्त आलेले रुग्ण, नंतर मृत्युशय्येवर असताना करोनायुक्त आढळतात किंवा लक्षातही येत नाहीत. तपासणी करताना नाकातून द्राव घेतल्यास तो युक्त येण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे, तर घशातून घेतल्यास ३२ टक्के आहे. निदानाची शक्यता वाढविण्यासाठी हे दोन्ही द्राव घेणे आवश्यक असल्याचे आयसीएमआरचे निर्देश आहेत; पण बऱ्याच ठिकाणी फक्त घशातून द्रावनमुना घेतला जातो आहे. हा ग्राउंड रिपोर्ट शासनापर्यंत पोहोचत नाही; त्यामुळे रुग्णांचा खरा आकडा समोर येत नाही. याचे कारण नाकातून स्वॅब घेताना, शिंक येण्याची शक्यता जास्त असते; म्हणून तो घेणाऱ्याला धोका वाढवतो. तुलनेने, घशातून स्वॅब घेणे सोपे आहे. स्वॅब घेणारे सुरक्षित राहावेत, यासाठी काचेच्या चेम्बरमधून स्वॅब घेण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार केली आहे. अजूनही ती शासनापर्यंत पोहोचलेली नाही. सध्या अनेक खासगी ठिकाणी तपासणी सुरू आहे. यात कुठल्याही नव्या व्यक्तीला जाहिरात देऊन स्वॅब घेण्यासाठी नेमले जाते आहे, म्हणून याची सुसूत्रता अधूनमधून तपासून पाहणे गरजेचे आहे. स्वॅब घेतल्यावर त्याची वाहतूक थंड डब्यातून होते का आणि तपासणी केंद्रात त्यांची तपासणी चार तासांत होते की नाही, याची दक्षता खासगी निदान केंद्रांनी घेणे गरजेचे आहे. तपासणी करतानाच्या प्रात्यक्षिकाचे केवळ चित्रण पाठवून भागणार नाही, तर त्याचे वारंवार प्रात्यक्षिक (मॉक) करून, तपासणीत काटेकोरपणा आणावा लागेल.

चाचणीचे निकष बदला शासकीय पातळीवर स्वॅब घेताना, रिपोर्ट येईपर्यंत सर्व संशयितांना एकाच कक्षात ठेवले जाते. त्यानंतर युक्त व मुक्त वेगळे केले जातात; पण तपासणी अहवाल येईपर्यंत, या दोन्हींचा संपर्क येऊन, या समूहातील करोना नसणाऱ्यांना संसर्गाचा धोका आपण वाढवत असल्याचे सूक्ष्म निरीक्षण लक्षात येत नाही. सर्वांचे तपासणी अहवाल एकाचवेळी येत असल्याने, निगेटिव्ह रुग्ण घरी जातात. निश्चित संपर्कामुळे ते पुढे लक्षणविरहीत करोना पसरवणारे ठरू शकतात; म्हणूनच तपासणी अहवाल येईपर्यंत या सर्वांचे आठ ते दहा तास विलगीकरण काटेकोरपणे, शक्यतो वेगळ्या खोल्यांमध्ये व संपर्कविरहीत असायला हवे. मुंबई आणि पुणे ही मोठी शहरे सोडून इतरत्र जागेचा प्रश्न फार कळीचा नाही. तेथे वेगळ्या खोल्या वापरल्या जाऊ शकतात. प्रत्येक पायरीवर तपासणी आणि केसचा शोध परिपूर्ण कसा करता येईल, यावर भर देणे गरजेचे आहे. या काही गोष्टी पाळल्यास करोनाविरोधातील लढ्यास त्या अतिशय उपयुक्त ठरतील.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

How To Improve Immune System

How To Improve Immune System 10 most effective immunity boosters in day to day routine A most important factor in the fight against corona or any illness is Immunity. In this chronicle, Dr. Amol Annadate talks about 10 most effective lifestyle practices that are very simple to follow and help improve individual immunity. Watch these easy to adopt practices in daily routine to be strong healthy and safe in a vulnerable environment.

How To Improve Immune System कोरोना या किसी बीमारी के खिलाफ लड़ाई में सबसे महत्वपूर्ण बात इम्युनिटी है। इस विडिओ में डॉ अमोल अन्नदाते 10 सबसे प्रभावी जीवन शैली प्रथाओं के बारे में बात करते हैं जो व्यक्तिगत रोग प्रतिकार शक्ती में सुधार करने में मदद करने के लिए बहुत सरल हैं। कमजोर वातावरण में मजबूत स्वास्थ और सुरक्षित रहने के लिए दैनिक दिनचर्या में इन प्रथाओं को अपनाने के लिए जरूर देखे

https://youtu.be/0Yy5PbAsVzc

How To Improve Immune System कोरोना किंवा कोणत्याही आजाराविरूद्धच्या लढाईतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती. या विडिओ मध्ये डॉ. अमोल अन्नदाते 10 सर्वात प्रभावी जीवनशैली प्रथा बद्दल बोलतात ज्या अनुसरण करणे आणि वैयक्तिक रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत. या असुरक्षित वातावरणामध्ये सुरक्षित राहण्यासाठी दररोजच्या या पद्धती जाणून घ्या … नक्की पहा

For regular updates from Dr. Amol Annadate like announcements, youtube videos, and articles stay tunned.