माती, खडू खाण्याचा आजार

माती, खडू खाण्याचा आजार लहान मुलांना माती किंवा इतर गोष्टी खाण्याची सवय असते. यात खडू, पाटीची पेन्सिल, पेपर, साबण, प्लॅस्टर, भिंत चाटणे, क्ले, कोळसा, राख, पेंट, खेळणी चाटणे अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. थोड्याफार प्रमाणात कळत नसल्याने दुसऱ्या वर्षापर्यंत या गोष्टी नॉर्मल असतात, पण दुसऱ्या वर्षानंतर सतत एक महिना अशी माती व इतर वस्तू खाण्याची लक्षणे दिसत असल्यास त्याला ‘पायका’ असे म्हटले जाते व उपचाराची गरज असते. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

वय 
मुलांमुलींमध्ये २ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत हा आजार कधीही दिसू शकतो. अनेक जणांना मोठे झाल्यावरही त्यातच महिलांना गरोदर असतना माती, खडू खाण्याची इच्छा होते. लहान मुलांमध्ये मतिमंदत्व, स्वमग्नता (ऑटिझम) तसेच इतर मानसिक आजारात याचे प्रमाण जास्त आढळून येते. 

कारणे 
– माती, खडू खाण्याचा आजार सहसा शरीरात लोहाची कमतरता माती व इतर गोष्टी खाण्याची इच्छा होण्यामागचे मुख्य कारण असते. त्यासोबत झिंक व काही प्रमाणात कॅल्शियमची कमतरता असते, पण कॅल्शियमपेक्षाही लोह हाच यात महत्त्वाचा घटक आहे. 
– मानसिक तणावामुळे ही मुले माती खातात. पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असेल, तर मुले लक्ष वेधून घेण्यासाठी माती खातात. दुष्परिणाम माती खाल्ल्यामुळे जंताचा त्रास तर होतोच, शिवाय जेवण कमी जाते व शरीरात इतर जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते. तसेच खडे किंवा खात असलेल्या इतर गोष्टी पोटात अडकून आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.   यासाठी ऑपरेशनही करण्याची गरज पडू शकते. 
– माती व इतर गोष्टी खाणाऱ्या मुलांमध्ये जुलाब व कुपोषणाचे प्रमाण जास्त असते. 

उपचार 
– यासाठी तीन महिने सहा मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम याप्रमाणे रोज रात्री झोपताना लोहाचे औषध द्यावे लागते. तीन महिन्यांनंतर गरज असल्यास १ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅम या कमी डोसमध्ये ते सुरू ठेवावे लागते. 
– यासोबत तीन दिवस रात्री झोपतना जंताची गोळी – अल्बेनदेझोल किंवा डोसाप्रमाणे पातळ औषध स्वरुपात द्यावी लागते. लोह दिल्यावर काही दिवसांनी माती खाणे कमी झाले तर जंताची गोळी तीन महिन्यांनी एकदा परत द्यावी लागते. 
– माती खाणाऱ्या मुलांना अधिक मानसिक आधार द्यावा. त्यांना माती खाताना बघितले तर लगेच रागावू नये. याविषयी त्यांना भीती दाखवून, मारून ही सवय जात नाही. 
– उपचार सुरु केल्यावर मुलाला माती खाण्याची संधी मिळणार नाही, याबद्दल दक्षता घ्यावी. 
– माती , खडू, पेन्सिल खाताना दिसला तर त्याला याबद्दल प्रेमाने सांगून, या गोष्टी त्याच्याकडून घ्याव्यात व त्याच्या आवडत्या खेळणी, वस्तू द्याव्यात. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *