त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत ‘ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली…

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत’ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे परदेशात भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास १.५ लाख भारतीयांनी परतण्यासाठी परदेशात नाव नोंदणी केली आहे. आता पर्यंत १५००० भारतीय मायदेशी परतले आहेत आणि वंदे भारतच्या दुसऱ्या टप्प्याला २२ मे पासून सुरुवात झाली आहे. आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यास काहीच हरकत नाही पण हे नागरिक भारतात व त्यातच मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या आयसोलेशन व क्वारंनटाइनचा जो गोंधळ उडाला आहे तो आधी जानेवारी महिन्यात जागतिक साथ सुरु झाल्याची घंटा वाजत असताना ज्या चुका झाल्या त्याचीच पुनरावृत्ती आहे व ती तत्काळ रोखायला हवी. एवढेच नव्हे तर यापुढे परदेशातून भारतात आणल्या जाणाऱ्या व त्यातच मुंबईत येणाऱ्या प्रवाशांबद्दल काय धोरण असेल हे निश्चित करावे लागेल. एकीकडे मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागात कोरोना ज्या झपाट्याने वाढत आहेत, त्यावरून समूह संसर्ग सुरु झाला आहे असे मानण्यास मोठी जागा असताना कोरोना संसर्ग भारता पेक्षा जास्त असलेले देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनाचा बोजवारा हा जून महिन्यात राज्यात दुसऱ्या कोरोना रुग्णांच्या लाटेला जबाबदार ठरू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्याच चुका परत नको सध्या मुंबई विमानतळावर येणाऱ्या या प्रवाशांची मुंबईचे व मुंबई बाहेरील अशी विभागणी केली जाते आहे. यात मुंबईतील रुग्णांना विमानतळा जवळील हॉटेल्समध्ये प्रती दिवस सहा हजारांपासून पुढे आकारून क्वारंटाइनची सोय केली जाते आहे. पण मुंबई बाहेरील प्रवाशांना मात्र गाड्यांनी त्यांच्या गावी जाऊन होम क्वारंटाइन होण्यास सांगितले जाते आहे. यात काहींना नागपूर, अकोला, गोंदिया, कोल्हापूर असा १० ते २० तासाचा प्रवास करून जावे लागले व पुढे ही असे प्रवासी असतील. हे रुग्ण परदेशाहून आले असल्याने त्यातील काही कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे. पण तरीही वाटेत ते थांबतील तिथे व पोहोचल्यावर ही नेमके कोणाला भेटून व कुठे रिपोर्टिंग करायचे हे न सांगता मध्य रात्रीच अनेकांना गाडीत बसवून मुंबई बाहेर धाडण्यात आले. या पैकी काही क्वारंटाइनसाठी पैसे भरण्याची तयारी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना हॉटेल मध्ये क्वारंटाइनची परवानगी देण्यात आली नाही. एकदा होम क्वारंटाइनने हात पोळून घेतलेली असताना परत एकदा माहित असलेल्या इंडेक्स केसेस ( निश्चित संसर्ग करतील अशा माहित असलेल्या सुरुवातीच्या केसेस ) बाबतही जोखीम आपण का करत आहोत? मुंबई मध्ये खाटा उपलब्ध नाही आणि आधीच आकडा वाढत असताना मुंबईवरच सर्व केसेसचा ताण नको हे एक वेळ गृहीत धरले . तर मग महाराष्ट्रात सर्व परदेशातून येणारी विमाने मुंबई विमानतळावर उतरवायची कशाला? यासाठी शिर्डी विमातळावर विमान उतरवून शिर्डीला रिक्त असलेल्या भक्त निवासांमध्ये एका वेळेला किती ही लोकांना क्वारंटाइन सुविधा पुरवता येईल. १४ दिवसांचा क्वारंटाइन संपला कि यांना घरी सोडता येऊ शकते. जर कोणाला लक्षणे आलीच तर शिर्डीचे भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहेच. हा पर्याय शक्य नसला तर नाशिक किंवा इतर कुठल्या ही विमानतळ असलेल्या शहराचा विचार करता येऊ शकतो. या परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या विलगीकरणाचे नियोजन गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे परदेशातील अधिक घातक कोरोना स्ट्रेन्स परत राज्यात मिसळण्यास ही संधी ठरू शकते. कोरोनाची संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे आणि भारता सारख्या उष्ण देशातील स्ट्रेन ही इतर देशांच्या मानाने कमी घातक ठरल्याचे दिसून येते आहे. अगदी महाराष्ट्र व पंजाब अशा राज्यांतर्गतही स्ट्रेन्स मध्ये फरक आहे. अशात परत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना इस्टीट्युशनल क्वारंटाइन न करता घरीच क्वारंटाइन करणे परदेशी कोरोनाच्या स्ट्रेन साठी आपले अंगण दुसऱ्यांदा मोकळे करण्यासारखे आहे. एरवी सगळी कडे होम क्वारंटाइन केले जातच असल्याने यासाठी निर्माण केलेल्या सुविधा रिकाम्या आहेत. त्यांचा वापर करून हे धोरण तातडीने शासनाने राबवायला हवे. दुसरी सध्या होत असलेली चूक म्हणजे आता होम क्वारंटाइन सारखे होम आयसोलेशन म्हणजेच तुम्ही कोरोना पोझीटीव असून तुम्हाला सौम्य लक्षणे असल्यास किंवा लक्षण विरहीत असल्यास तुम्ही घरीच राहायचे हे मुंबईत केले जाते आहे. होम क्वारंटाइन अपयशी झाल्याने आज असलेली स्थिती ओढवली मग परत होम आयसोलेशनची चूक कशासाठी? पूर्ण राज्यात सौम्य व मध्यम लक्षणे असल्यास निचित निदान झालेल्या रुग्णांना दहाव्या दिवशी सुट्टी देऊन उर्वरित ७ दिवस घरीच आयसोलेशन हे निकष पाळले जात आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत हे मान्य पण साथीच्या वाढत्या प्रमाणासोबत सुविधांच्या उपलब्धते प्रमाणे निकष मर्यादित करत नेऊन अपुऱ्या सुविधांना अनुरूप निकष आकसण्याची प्रक्रिया सुरु करायची. की निकष अधिक व्यापक करत आरोग्य सुविधा वाढवायच्या हे ठरवावे लागेल. सध्या तरी दिवसेंदिवस निकष आकसत असून त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आहे. किमान लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे नाकारताना त्यांनी कधी रुग्णालयात जायला हवे अशा ११ रेड फ्लॅग साईन्स म्हणजे धोका दर्शवणारी लक्षणे कोणती याचे सविस्तर समुपदेशन व लिखित माहिती घरी असलेल्या रुग्णांना दिली जात नाही आहे. यामुळे अनेक ‘सायलेंट हायपॉक्सिया’ किंवा ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणजे इतर काहीही लक्षणे नाही पण शरीरातील ऑक्सिजनची पातळी मात्र घसरलेली आढळून आलेल्या व पुढे गंभीर झालेल्या केसेस लक्षात न येण्याचा धोका आहे.त्याच चुका परत नको यासाठी घरी असलेल्या लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणे असून दाखल न करून घेतलेल्या रुग्णांना घरी बोटावर मावणारे पल्स ऑक्सिमीटर वापरून दिवसातून तीन वेळा ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सांगता येईल का? आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत म्हणून रुग्णांना घरी थांबा असे सांगून हा विषय संपवता येणार नाही कारण याची परिणीती मृत्यू दर वाढण्यात होऊ शकते. देशातील एकूण मृत्यू पैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी एक तर घरी रुग्ण ठेवणे टाळावे किंवा ठेवत असल्यास होम मॉनीटरींगचे निकष व रोज या रुग्णांशी ऑनलाईन संवाद व निरीक्षण करायला हवे. घरी लवकर पाठवणाऱ्यांच्या बाबतीत ज्यांना होम आयसोलेशन साठी वेगळी खोली आहे की नाही हे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण कुटुंबासह एक दोन खोल्यात राहतात. किमान अशांसाठी तरी होम आयसोलेशन चे निकष बदलून त्यांना पूर्ण चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे. कारण अपुऱ्या खाटांचे कारण पुढे करत रुग्णांना घरी पाठवून त्यांच्या कुटुंबाला बाधा करण्याचा मार्ग मोकळा करून उलट आरोग्य यंत्रणेवरील ताण पुढे वाढणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हा विषाणू नवीन असल्याने साथ व प्रतिबंधाचे नियोजन करताना चुका होणे सहाजिक आहे. पण आधी केलेल्या चुकांमधून अपरिमित नुकसान झालेले स्पष्ट असताना त्याच चुका पुन्हा करणे मूर्खपणाचे ठरेल.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

COVID- 19 घर कसे स्वच्छ करावे

COVID -19 घर कसे स्वच्छ करावे ज्यांना क्वारंटाइन चा सल्ला देण्यात आला आहे व सांगितलेला नसला तरी कोरोना चा कॅरीअर असलेली व्यक्ती घरात येऊन गेली किंवा असे सामान घरात आले असेल तर कोरोना चा धोका टाळण्यासाठी घर कसे स्वच्छ करावे हे समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

COVID -19 घर कसे स्वच्छ करावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली गोष्ट म्हणजे १% सोडियम हायपोक्लोराईट आपण स्वच्छतेसाठी वापरायला हवे. आपल्याला घरगुती ब्लिचिंग सोल्युशन कुठे ही सहज उपलब्ध होऊ शकते. ५% सोडियम हायपोक्लोराईट असते. त्यामुळे हे ब्लिचिंग सोल्युशन १:९ यासोबत स्वच्छ पाण्यासोबत मिसळावे. म्हणजे १ लिटर ब्लिचिंग सोल्युशन घेतले तर ९ लिटर पाणी घ्यावे. हातात साधे प्लास्टिकचे ग्लोज घालावे. स्वच्छ कपडा या पाण्यात बुडवून त्याने घर व इतर समान पुसून घ्यावे. इतर कोणी येत नसेल तर एक दोन तीन दिवसातून एकदा केले तरी चालेल. घर या पाण्याने स्वच्छ करत असताना डोळ्यांना गॉगल किवा चष्मा घालावा कारण या पाण्याने डोळे व त्वचेला त्रास होऊ शकतो. शक्यतो ब्लिचिंग सोल्युशन व पाण्याचे मिश्रण बनवताना ते प्लास्टिक च्या भांड्यात बनवावे .


सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आता आलीये.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना साथीच्या नियोजनाविषयी व उपाययोजनांविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे दै. लोकमत मधील खुले मा. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी कृपया ते पत्र जास्तीत जास्त शेअर करा.

प्रती,
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे,

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ ती हीच!

राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची व मृतांची संख्या वाढत असताना आता २६/११ च्या हल्ल्या प्रमाणे ही स्थिती आहे. त्यासाठी आपण दोघे प्रयत्नशील आहातच. पण तरीही कोरोनाला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आम्ही अनेक वर्षे शिकत, वैद्यकीय अभ्यासक्रमात वाचत आलेल्या गोष्टी ग्रास रूटला तशा राबवलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवून त्यावर एका दिवसाचा ही विलंब न होता अमलबजावणी झाली तरच आपण येत्या दोन आठवड्यात या साथीच्या तिसऱ्या स्टेजला रोखू शकतो. नंतर जर ग्रामीण भागात ही साथ पसरली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. तसेच या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी चीन, कोरिया, सिंगापूर मॉडेल चा अभ्यास करून यातील प्रत्येकाच्या चांगल्या उपायांची गोळाबेरीज महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या केस ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन व क्वारंटाइन या चार शब्दांभोवती सगळी यंत्रणा प्रत्येक मिनिटा गणिक हलली पाहिजे. पण असे कुठे ही होताना दिसत नाही. आयसोलेशन कक्षांची संख्या अजून ही खूप कमी आहे. तालुका पातळीवरून रुग्ण सापडल्यास तो नेमका कसा व कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जायचा याचे कुठले ही नियोजन अजून दिसत नाही. कुठल्या ही वयक्तिक सुरक्षेच्या साधना शिवाय रुग्ण नेणाऱ्या ड्रायव्हरलाच लागण झाल्याची उदाहरण समोर आहे. संशयित रुग्णाला प्रवास करत नेणेही मोठे जोखमीचे ठरणार आहे. म्हणून प्रत्येक तालुक्याला एक आयसोलेशन कक्ष तातडीने उभा करावा लागणार आहे. आयसोलेश साठी १०० खाटा तयार आहेत या गोष्टींना काही अर्थ नाही. फक्त आयसोलेशन कक्ष असे कुठल्या ही कक्षाला पाटी लावून तो तयार होणार नाही. हा कक्ष कसा असला पाहिजे व यातील ७ महत्वाची मार्गदर्शक तत्वे कुठली याचा अभ्यास होऊन त्या होत आहेत की नाही याचे व्हिडीओ प्रुफ मुख्य सचिव, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी रोज तपासले तरच यंत्रणा हलेल. ग्रामीण भागात रुग्ण स्वतः उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉजिटिव्ह व रुग्णाशी संपर्क आल्याचे सांगून ही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची चिठ्ठी देऊन पाठवले जात आहे. अजूनही परदेशी प्रवाशांचे वर्गीकरण व स्क्रिनिंग बाबत गोंधळ सुरूच आहे. अशाने परदेशातून येणाऱ्या इंडेक्स केसेस कशा रोखल्या जाणार. तसेच यांच्या बॅग्स चे निर्जंतुकीकरणही अजूनही विमानतळावर होत नाही. औरंगाबाद ला एका रशियन प्राध्यापिका कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समजून ही तिने दिवसभर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही तास एकत्र ठेवून, त्यातील तीन चार जणांचे स्वॅब घेऊन या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. अशी अनेक अनागोंदीचे प्रकार रोज घडत आहेत.मुळात होम क्वारंटाइन हा शब्द आपला सर्वांचा मोठा घात करणार आहे हे समजून घेतले पाहिजे. हातावर शिक्के मारून लोक स्वतःच्या घरी स्वयंप्रेरणेने एका खोलीत १४ दिवस राहतील हे अशक्य आहे. म्हणून आताच्या घडीला क्वारंटाइन साठी मुंबईत ओसाड व रिकामी असलेली सर्व कामगार हॉस्पिटल, सर्व शासकीय गेस्ट हाउस, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, गरज असल्यास खाजगी दवाखाने व अगदी या पुढे जाऊन मुंबईतील ७२००० रिकामे फ्लॅट, या पलीकडे जाऊन इतर भागातील हॉटेल्स अशी एक क्वारंटाइन साठी मोठी व्यवस्था आपण निर्माण केली व अति सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक केसच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले तरच या घडीला केसेस व मृतांची संख्या कमी होईल. हे आपल्याला फार काळ नाही तर फक्त पुढील दोनच आठवडे करायचे आहे. मुख्यमंत्री येतात तेव्हा रात्रीतून रस्ते आणी हेलीपॅड तयार होतात मग या सुविधा यंत्रणेने मनावर घेतले तर या कुठल्या ही विलंबा शिवाय का उभ्या राहू शकत नाहीत. यात कुठे ही चीनने १० दिवसात ४५०० खाटांचे रुग्णालय बांधले तसे करायचे नाही तर शासनाच्याच तयार वास्तूंमध्ये नियोजन करून त्या कार्यरत करायच्या आहेत.

पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आली आहे , केरळ या राज्याने प्रत्येक पॉजिटिव्ह रुग्णाच्या दर तासाच्या प्रवासाचे मॅपींग केले व सर्व संपर्कात आलेल्यांची पूर्ण माहिती मिळवली. हीच तत्परता आपल्याकडे आणावी लागणार आहे. होम क्वारंटाइन सध्या तरी अपयशी होताना दिसत असले तरी ते करयचे असल्यास फक्त हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून हे साध्य होणार नाही. त्यांना यंत्रणेने घरी सोडून त्यांच्यावर जीपीएस द्वारे निगराणी ठेवण्यासाठी गृह विभागाची यंत्रणा कामाला लावावी लागेल. यासाठी सिंगापूर मॉडेलचा अभ्यास करून त्याची पूर्ण नक्कल केली तरी यश येईल. २८ फेब्रुवारी रोजी लॅन्सॅटने लक्षणांनंतर जितक्या लवकर आयसोलेश व तातडीने संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाइन तितके प्रभावी साथ नियंत्रण हे इतर देशांच्या अनुभवा वरून सांगितले आहे. दक्षिण कोरियाने जास्तीत संशयितांच्या तपासण्या व युध्द पातळीवर आदर्श व्यवस्थेत आयसोलेशन, क्वारंटाइनकवर ( होम क्वारंटाइन नाही ) हे प्रारूप राबवले व साथ नियंत्रित करून मृत्यू दर ०.२ टक्के इतका कमी ठेवला.

आताच्या घडीला ही साथ पसरण्याचे A,B,C,D चेन समजली तर सगळ्या उपाय योजनांचे नियोजन सोपे जाईल पण हे आपण दोघां पर्यंत कदाचित पोचतच नाही आहे. म्हणून प्राधान्य कशाला द्यावे या विषयी सर्व यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे. आपण जाहीर केलेले कोरोना साथीचे ४५ कोटी अजून पोहोचलेलेच नाही. त्याचा खर्च कसा करायचा याचे कुठले ही सूक्ष्म नियोजन जिल्हा पातळीवर झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयांना दीड दोन लाखांपर्यंत हवी ती खरेदी करा असे संदेश केवळ पोहोचले आहेत . यात त्याच त्या सर्वसामन्यांच्या सूचनांचे बोर्ड लावण्यात हा निधी वाया जाण्याची दाट शक्यता आहे. केस ट्रेसिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण अजून नाही, आशा सेविका, हेल्थ वर्कर्सला आपली काय भूमिका असेल या बाबत काहीही माहिती नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना रुग्ण तपासताना वापरायचे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट पोहोचण्याची अजून लक्षणे दिसत नाहीत.

लोकसंख्येच्या प्रमाणात व सर्वाधिक केसेस असून ही आपल्या राज्याची टेस्टिंग क्षमता खूप कमी आहे. तसेच टेस्टिंग साठी परदेश प्रवास व कोविड पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

निवडणुकीच्या प्रचारात जसे घरो घरी जाऊन प्रचार होतो त्या पद्धतीने केसेस शोधणे व सरकार स्थापने साठी गतीने हालचाली होतात तशाच आयसोलेशन व क्वारंटाइन ची सोय उभारणे या क्षणाला गरजेचे आहे. आपण प्रयत्न करतच आहात व छत्रपती शिवाजींचे मावळे म्हणत आपण सगळ्यांचे मनोबल ही वाढवले. पण आदरणीय मुख्यमंत्री, शिवाजी महाराजांप्रमाणे आता मावळ्यांना वाचवण्यासाठी आपणच तलवार उपसून कोरोना व्हायरस विरोधात, या युद्धात उतरून सूक्ष्म नियोजन करण्याची ही वेळ आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता