खोकल्याचे उपचार ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते.
सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी अनेकदा अनावश्यक औषधे वापरली जातात. सर्दी खोकल्याचे उपचार कारणे पाहून करावे लागतात.
डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा
व्हायरल ताप, सर्दी खोकला –
बहुतांश खोकल्याचे रुग्ण हे साध्या सर्दी खोकल्यामुळेच असतात.
त्यासाठी
- नाकात नॉर्मल सलाईनचे ड्रॉप्स व साधी खोकल्याची औषधे, सोबत ताप असल्यास तो नियंत्रणात आणण्यासाठी पॅरॅसिटॅमॉल वापरले तरी पुरेशी असतात.
- थोड्या मोठ्या मुलांनी घसा धरल्यास मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
- खोकल्यासाठी मध व कोमट पाणी एकत्र किंवा वेगळे घेतले जाऊ शकते.
- ताप, सर्दी खोकल्यासाठी अँटिबायोटिक्स देण्याची गरज नसते.
- अशा मुलांना ते खातील तितके अन्न द्यावे, बळजबरी करू नये, मात्र पाणी भरपूर पाजावे.
- ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या मुलांना पाण्याची वाफ दिली जाऊ शकते. (रुग्णालयात जाऊन मशीनमधून वाफ देण्याची गरज नसते.)
- ताप, सर्दी खोकला आपोआप बरा होणारा व जीवाला धोका नसणारा आजार आहे. तो एक आठवडा चालतोच, म्हणून सतत ताप, सर्दी, खोकला बरा होत नाही म्हणून डॉक्टर बदलत राहू नये. असे केल्याने औषधाचे ब्रँड बदलत राहतील व तणावामध्ये डॉक्टर अँटिबायोटिक्स सुरू करतील.
- सर्दी खोकल्याची औषधे लक्षणे पूर्ण नाहीशी करण्यासाठी नव्हे, ती कमी करण्यासाठी असतात.
- नॉर्मल सलाईन सोडून इतर औषधे असलेल्या नाकांच्या ड्रॉप्समुळे नाक तात्पुरते कोरडे पडते. मात्र, रिबाउंड कंजेशन, म्हणजे परत नाक भरून येण्याची शक्यता असते.
- खोकला दाबणारी औषधे (कोडीन, फोलकोडीन, डेक्सट्रोमीथारफान) मुलांना डॉक्टरांच्या परवानगी शिवाय देऊ नयेत.
- खोकल्याच्या अनेक औषधात एकाच वेळी, खोकला दाबणारी, खोकला पातळ करणारी आणि खोकला बाहेर काढणारी अशी परस्परविरोधी अॅक्शन असणारे घटक असतात. म्हणून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय खोकल्याची औषधे देऊ नये.
- ताप, सर्दी खोकल्यानंतर बाळाचे वजन कमी होऊ शकते व शरीरात विटामिन ‘ए,’ ‘डी’ची कमतरता भासू शकते. त्यासाठी बाळ बरे झाल्यावर त्याला एक वेळा अधिक जेवण व विटामिन ‘ए’, ‘डी’ देणे गरजेचे असते.
अॅलर्जीमुळे सर्दी, खोकला –
खोकल्याचे उपचार यासाठी अँटिअॅलर्जिक, म्हणजे शरीरात अॅलर्जी कमी करणारी औषधे दीर्घकाळासाठी घ्यावी लागतात. यासाठी अॅलर्जी टेस्ट करून काही उपयोग होत नाही. त्यापेक्षा काय खाल्ल्याने सर्दी, खोकला होतो हे आईने निरीक्षण करून ठरवलेले योग्य. बाहेर, धुळीत जाताना मास्कचा वापर केल्यास अलर्जीचा त्रास कमी होतो.
दमा –
दम्यासाठी नियमित घ्यायच्या काळजी व्यतिरिक्त दम्याचा अॅटॅक आल्यावर तातडीने घ्यायचे औषध आणि अॅटॅक नसताना घ्यायचे औषध, असे दोन पंप मिळतात. हे पंप त्या-त्या वेळी वापरून दम्याचा खोकला नियंत्रणात येतो. याशिवाय दमा नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकालीन घेण्याची काही औषधे असतात.
सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.