ही हिरकणी आपल्या बाळांपर्यंत पोहोचण्या आधीच वाहून गेली !
सध्या राज्यात किचन ओटा किंवा बेसिन धूत असताना, बारीक कीटक ड्रेनेज मध्ये वाहून जातात त्याप्रमाणे माणसे वाहून जात आहेत. नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात, धायरी पुलावरून घरी जात असलेली ‘अमृता सुदामे’ ही वाहून गेली. एक मैत्रिणीकडून तिचा सगळा वैयक्तिक तपशील कळाला तेव्हा ‘या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण काय करतोय?’ या हतबलतेने अमृताच्या चीतेत आपण जिवंत जळतोय अशा वेदना झाल्या!
एका डायग्नोस्टिक सेंटरवर रीसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी ‘अमृता’ ही तरुणी रात्रभर घरी पोचत नाही. आणि रात्री पासून बेपत्ता असलेल्या अमृताचा शोध शेवटी ससूनच्या शवागारात संपतो! त्या शोधासोबतच उन्मळून पडतो, एका अख्ख्या कुटुंबाचा आधारवड!! आपल्यासाठी ‘पुरात एका तरुणीचा मृत्यू’ एवढ्या बातमीवर विषय संपतो. ती कोणा मंत्र्याची–सत्ताधाऱ्यांची किंवा हाय-प्रोफाइल समाजातील कुणाचे मुल बाळ नातलग नसल्याने, तिच्या मृत्यूची मोठी बातमी होत नाही आणि ती कोण होती यावर रकाने लिहून येत नाहीत. कोण होती ही ‘अमृता’ ??
इयत्ता आठवी आणि शिशू वर्गातील दोन मुलींचं एकल पालकत्व निभावत काबाड कष्ट करत जीवनसंघर्ष चालू ठेवणारी एक माता… २ वर्षापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यावर कँन्सरग्रस्त आईची जबाबदारी पेलणारी एक लेक. परिस्थितीसमोर हात न टेकता उलट तिच्याशी दोन हात करून आलेला दिवस समर्थपणे झेलणारी एक रणंगिनी…! जाऊ नको, रात्री इथेच थांब असे सांगूनही, “मी गेले नाही तर माझ्या मुलींकडे या भयाण रात्री कोण पाहणार ” असे म्हणत, पाण्यातच दुचाकीने घरी निघालेली ‘आधुनिक हिरकणी’! कामावरून धो धो पावसात बाहेर निघेलेली आणि पापांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहात लेकरांसाठी घरी निघालेल्या अमृताचे हेच वाक्य शेवटचे वाक्य ठरले!
अशी ही परिस्थितीशी झुंज देणारी अमृता त्या रात्री व्यवस्थेशी संघर्ष करू शकली नाही आणि शेवटी या व्यवस्थेने तिचा जीव घेऊनच तिचा संघर्ष संपवला.
‘एका महिलेचा पुरात वाहून मृत्यू’ या बातमी मागे उघडे पडलेले एक कुटुंब आणि एवढी करूण कहाणी असू शकते याची जाणीव ही न ठेवता वर्तमानपत्रांची पाने आपण उलटत असतो, सोशल मिडिया खाली खाली स्क्रोल करत जातो.
हिची संघर्षगाथा ऐकून आमच्या मित्राने आजच्या युगाची हिरकणी गेली अशी प्रतिक्रिया नोंदवली. शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या बाळासाठी गड चढून गेलेल्या हिरकणीची कथा आपल्याला माहित आहे. ‘माझी मुले घरी एकटी आहेत मला घरी जावेच लागेल’ या ओढीने घरी निघालेली ही हिरकणी मात्र आपल्या बछड्यांपर्यंत पोहोचूच शकली नाही! आज शिवरायांच्या नावाने यात्रा, राजकारण करणाऱ्यांना या घटनेची लाज वाटली पाहिजे. अनेक वर्षे शिवछत्रपतींचे दाखले देणाऱ्यापर्यंत कदाचित अमृताची ही गोष्ट पोहोचणार ही नाही, कारण सध्या प्रचार सुरु आहे ना! कोण जिंकणार, कोण हरणार , कुठल्या मतदार संघात मराठा किती, दलित, माळी, धनगर, मुस्लीम मतदान किती …? त्यावरून कुठल्या जातीचा उमेदवार द्यायचा याच्यातून सत्ताधरी, विरोधकांना वेळ कुठे आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका इंजिनिअर मित्राने सांगितले कि, पुण्यात ड्रेनेजसाठी जे खड्डे आणी त्यावर जाळी दिसते त्यात अनेक ठिकाणे फक्त खड्डे आणी त्यावर जाळी आहे .खाली त्यांना जोडणारी पाईपलाईन अस्तित्वातच नाही. आपण नागरिक म्हणून हे खड्डे कधी उघडून बघितले आहेत का ? पुण्यात अनेक नाले बुजवून त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. यात घरे विकत घेणाऱ्याला ही आपण अशा अनेकांचे जीव धोक्यात घालून उभे राहिलेल्या इमारतीत राहणार आहोत हे माहित नसते. स्थापत्य अभियंते , बांधकाम व्यवसायिक, राज्यकर्ते यांच्या संगनमताने अशा विकासाचे आपण सगळे भागीदार आहोत. पण तो विकास ‘अमृता’ सारख्यांच्या थडग्यांवर उभा आहे … फरक इतकाच आहे … हे थडगे आज अमृताचे आहे … उद्या तुमच्या आमच्या पैकी कोणाचे असेल सांगता येत नाही … कारण संधाकाळ पर्यंत कुठलीही सूचना नसताना भर शहरात अचानक घुसलेले पाणी वाहून नेताना कोणात ही भेद करत नाही ….!
डॉ. अमोल अन्नदाते | reachme@amolannadate.com